"पत्र सांगते गूज मनीचे" : जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 September, 2013 - 03:40

पत्र क्र. १

प्रिय बोंबिल

मेहेंदी रंग लाती है सुख जाने के बाद ह्या ओळींप्रमाणे श्रावणांत झालेल्या तुझ्या विरहामुळे तुझ्याबद्दल दाटून आलेल्या भावना आज पत्राद्वारे व्यक्त करत आहे.

तसा तू आणि तुझे इतर फ्रेंडसर्कल म्हणजे कोलंबी, पापलेट, बांगडा, रावस, मांदेली आणि इतर बरेच बालपणापासूनचेच सोबती. सोबती म्हणण्यापेक्षा फॅमिली मेंबरच. बुधवार, शुक्रवार, रविवार ह्या दिवशी तर तुमचे येणे हक्काचेच असते. तुम्ही घरच्यांचे सगळ्यांचेच लाडके असल्याने जेव्हा जेव्हा तुम्ही घरी असता तेंव्हा घरी गोकुळ नांदत. म्हणजे सगळे खुप खुष असतात. लहान मुलांपासुन वृद्धांपर्यंत सगळ्यांना जरा दोन घास जास्त जातात.

बोंबिल अरे तू तर घरात सगळ्यांचाच सगळ्यात जास्त फेव्हरेट. माझ्या मोठ्या श्रावणीला पण आवडतोस. १ वर्षाच्या राधाने तर तुझ्याच पहिल्या घासाने मासे खाणे चालू केले.

आठवड्यात जेंव्हा वरच्या तिन दिवशी व्रत किंवा उपवास येतो न तेंव्हा तुम्ही न येण्याची खुप रुखरुख लागते रे. करमत नाही तुमच्या सगळ्यांशिवाय. इतके कसे रे तुम्ही प्रचंड टेस्टी? बर ताजेच नाही तर सुकवूनही तुम्ही चविष्टच लागता.

खर तर मला तुमचे आभार मानायचे आहेत. तुमच्या रेसिपीज लिहून लिहून मी मायबोलीवर मासेविषयावर प्रसिद्ध झाले आहे. सुरुवातीला तर माबोकरांना तळ्यात, हॉटेलमध्ये कुठेही मासे किंवा माश्यांची डिश दिसली की मी आठवायचे. तसे त्यांच्या लिखाणात, फोनवरील संभाषणात ते बोलतातही.

तुला एक गुपित सांगू का काही शाकाहारी मायबोलीकर तुझ्या चमचमीत रुपावर फिदा होऊन मांसाहारी बनलेत. फोनवर विचारतात ना मला रेसिपी.

तुझ्या खमंगपणामुळे, फोटोजनीक रुपामुळे आणि माबोवरच्या चिनुक्स आयडी मुळे तुझ्या रेसिपीज माहेर अंकात छापून आल्या तेंव्हा खुप आनंद झाला. सगळ्या मायबोलीकरांच्या प्रोत्साहनामुळेच मी तुझ्या ४४ मित्र-मैत्रीणींच्या रेसिपीज आत्तापर्यंत लिहू शकले. मला हा आकडा ५० वर न्यायचा आहे आणि मग तुमच्या सुंदर सुंदर पोझेस घेउन, तुमच्या रेसिपीज लिहून एक पुस्तकही छापायचे आहे. असे होईल हा विचार मी कधी स्वप्नातही केला नव्हता.

पण एक खंत ही मनात राहीली आहे. अरे काहीमाबोकरांना वाटत की मला माश्यांशिवाय काही येत नाही. मी रोज मासेच खात असेन. पण मी फक्त बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच तुमचा आस्वाद घेते ना रे. बाकीच्या दिवशी अगदी प्युअर व्हेज. त्यात कधी कधी मंगळवारी अगदीच इच्छा झाली आणि घरातील अर्धी माणसे खातात म्हणून आणते. Lol काहिंना वाटत की मी फक्त माश्यांच्याच रेसिपीज बनवते पण रोज घरी सकाळी माझ्या दोन मुलींसाठी मी वेगवेगळे शुद्ध शाकाहारी नाश्ता करते Happy

माबोवर हल्ली माश्यांच्या विरोधात वगैरे काही लिहीले ना की मला वाटते हे मलाच टोचताहेत Lol आता हेच बघ ना गणेशोत्सवाच्या पाकस्पर्धेच्या प्रस्तावनेत अगदी ठळक अक्षरात लिहील आहे - पदार्थ शाकाहारीच असावा.. अंडं, मांस, मासे आणि इतर सीफूड यापैकी काही वापरू नका. हे वाक्य खास माझ्यासाठीच लिहीलेय की काय असेच मला वाटले म्हणून मी तिथून क्षणात धुम ठोकून दुसर्‍या धाग्यावर गेले. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस हा. मला माझ्या मनातल तुझ्यापुढे व्यक्त करायच होत म्हणून लिहीतेय. तुला दुखवायचा मला आजीबात विचार नाही. तू माझा एक सच्चा सोबती आहेस. आणिबाणिच्या प्रसंगातही तू मला साथ देतोस. अगदी ओला नाही मिळालास तरी सुका तरी माझ्या वाळवणीच्या डब्यात कायम साथीला असतोस. आपली ही सोबत कायमच राहणार ह्यात शंकाच नाही कारण कुठल्याही कारणाने तुमच्यावर पाणी सोडणे हे माझ्यासाठी अशक्य आहे.

तुमची खुप भरभराट होवो, खुप मासेसंख्या वाढो ही मनापासून सदिच्छा.

तुझीच
जागू
_________________________________________________________________________

पत्र क्र. २

प्रिय जागू

मलाही तुझ्या श्रावणातल्या विरहाने तुझी खुप आठवण येत होती. पहिला म्हणजे तुझ अभिनंदन आणि माझ्याकडूनही आभार की तू आम्हाला मायबोलीवर, मासिकात झळकवलस. माझ्या वेगवेगळ्या मित्र-मैत्रीणींची तू नेटवर ओळख करून दिलीस. तू बोलतेस ते बरोबर आहे मी ऐकतो ना. मायबोलीकरांनी आम्हाला पाहीले की तुझी आठवण काढतात ते.

तुझे गुपित वाचून मला गंमत वाटली आणि आमचे फॅन वाढल्याचे ऐकून आनंदही झाला. त्याच श्रेय तुलाही आहे कारण तू तशी आमची चविष्ट रंगरंगोटी करून आमचे फोटो काढून त्यांच्यापुढे सादर करतेस.

फक्त मी एक माझ्यापुरते सांगतो हा, तू ना माझे कालवण करून फोटो नको टाकू त्यामुळे मी आळसटलेला, थकला-भागलेला वाटतो. तू ना मला तळतेस तेंव्हा मी अगदी रुबाबदार, ताठ, सुट-बुट घातल्याप्रमाणे वाटतो.

मी ते मासे न खाणे वगैरेचे दु:ख नाही ग मानत कारण तुम्हा समुद्र किनारी लोकांचे मुख्य अन्नच मासे आहे हे जाणतो आम्ही. आमची मासे संख्या वाढावी म्हणून श्रावणात आमच्या प्रजननाच्या वेळी तुम्ही आम्हाला मुक्त सोडता. तुम्ही सगळी व्रत-वैकल्य, उपास-तपास करून मधल्य वारी आम्हाला जीवनदान देता याचीही जाणीव आहे आम्हाला. देवाने आम्हाला तुमचे अन्न म्हणूनच नेमले आहे आणि शेवटी त्याच्या मर्जीनेच आमच्या मासेजीवनाचे सार्थक होणार हे मी मानतो.

आमचे पाण्यातील जगही फार सुंदर आहे. आत शंख, शिंपले, समुद्री वनस्पती, आमच्याच रंगीबिरंगी जाती ह्या सगळ्यात फिरताना फार मजा वाटते. फक्त हल्ली जे समुद्रात प्रदुषण झाले आहे ना त्यामुळे खुप कोंडमारा होतो ग आम्हा सगळ्या माश्यांचा. नुसती माणसेच आमचे भक्षण नाही करत. समुद्रातले मोठे मोठे मासेही आम्हाला कच्चे गिळून टाकतात. तुम्ही निदान शिजवून छानस रुप देऊन आमची स्तुती तरी करता.

अग तू नको खंत करू आणि मलाही काही वाईट वगैरे नाही वाटले. शेवटी तू म्हटल्याप्रमाणे आपण दोघे घनिष्ट सोबती आहोत. मी तर तुझ्या घरातल्यांचा सगळ्यांचाच प्रिय. छोटीला मी आवडतो हे वाचून मी तिला खेळवतोय असेच छान वाटले.

चल आता कोळीमामा येतील मला न्यायला. सगळ्या माबोकरांना माझ्याकडून आणि माझ्या मित्रपरीवाराकडून धन्यवाद सांग आणि तुझ्या ५० रेसिपीज पूर्ण होऊन लवकरच तू आम्हाला पुस्तकात स्थान देशील अशी सदिच्छा. तुझ्या घरच्यांना नमस्कार आणि मुलांना आशिर्वाद.

तुझाच आवडीचा
बोंबिल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू सही लिहिलयं गं! Happy
कारण कुठल्याही कारणाने तुमच्यावर पाणी सोडणे हे माझ्यासाठी अशक्य आहे. >>> Lol
लवकरच तुझे माशांचे रेसिपी बुक निघो, ह्या शुभेच्छा!

प्रिय रानभाजी,

जागुने पत्र फक्त बोंबिलालाच लिहिलं आणि मायबोलीचे अनुल्लेख हे अमोघ शस्त्र वापरुन तुमच्या समस्त जातबांधवांचा अपमान केला अशी ज्वलंत वार्ता नुकतीच डोंगरावरचा गार गार वारा घेऊन आला आणि लगोलग मी तुमचा हा गैरसमज दुर करण्यासाठी लेखणी हाती धरली.

जागूने बहुतेक तोत्तोचान वाचले नसावे त्यामुळे समुद्रातल्या काहीतरी बरोबर डोंगरातले काहीतरीही लागते हे ती विसरली असेल. आणि त्यात उद्यापासुन तिला (ऑफिशीयली) तिचे लाडके बोंबिल घरात आणायला आणि मायबोलीवर टाकायलाही मिळणार, त्यामुळे त्या आनंदाच्या भरात तिच्या हातुन अजाणतेपणे ही चुक घडली असावी. तर ते जे काय असेल ते तुम्ही मोठ्या मनाने माफ करा. पुढच्या वर्षी तुम्हालाही पत्र येईल हो नक्की.

क.लो.अ. ही. वि.

साधना
------------------------------------------
प्रिय साधना,

आम्हाला आमच्या लाडक्या जागूताईचा राग आला ह्यावर तुझा विश्वास बसलासच कसा? तु डोंगरावरच्या वा-यावर विश्वास कसा काय ठेवलास? त्याचे काय, आली लहर आणि केला कहर..

जागूताईने भले तोत्तोचान वाचले नसेल पण तिला अनुभवावरुन समुद्रातल्या काहीतरी बरोबर डोंगरातले काहीतरीही लागतेच हे माहित आहे. नाहीतर समुद्रातल्या काहीतरी बरोबर डोंगरातल्या काहीतरींना तिने आपल्या घरात जागा दिली नसती. तिचे माशांचे पुस्तक प्रकाशित झाले की ती लगोलग आमच्यावर पुस्तक लिहायला घेणार याची खात्री आहे आम्हाला.

जागूताईवर आधी हक्क समुद्रातल्या काहीतरींचा आहे. तिचे पत्र हे समुद्री जीव तिला किती आवडतात ते अगदी उलगडून सांगतात. आम्ही तसेही मोसमीच, पण तिचे आवडते मासे तिची वर्षभर साथ देतात. तिचे पत्र वाचुन गेला महिनाभर ज्या काही मोजक्या लोकांना समुद्री जीवांचा विसर पडलेला ते उद्या सक्काळीच उठुन बाजारात धाव घेतील यात शंका नाही. ज्यांना ते शक्य नाही ते आज परत जुने धागे उघडुन बघतील आणि उगाच आपापले की -बोर्ड ओले करुन घेतील.

तर तू वा-याने उडवत आणलेल्या बातमीवर अजिबात विश्वास ठेऊ नको. आम्ही जागूताईच्या दुस-या पत्राची वाट पाहात आहोत.

तु ला

रानभाजी.

भारी. Happy
जागू तुझ्यामुळे मला नवीन छंद जडला, त्याबद्दल तुझे आभार.
मी शाकाहारी असले तरी तुझ्या रेसिप्या वाचून मांसाहारी नवर्‍याला तुला हा मासा माहीती आहे का तो मासा खाल्लायस का अस सतत विचारणे आणि मी बघ खात नाही काहीच तरी पण मला सगळे माहिती आहे असे सांगणे हा आता माझा छंद झाला आहे. Proud

अनुजा, अंजू, मानुषी, अवल, जिगिषा, वर्षा, प्रज्ञा, वर्षू ताई, चनस, माधवी, स्वाती,

हो भारती नावही त्याचे बॉम्बे डक आहे ना.

योग Lol

वत्सला, प्रकाश, Happy

विद्या वाचला ग काल मेल. छान आहे आयडीया. मी तुला त्याचा मेलवर रिप्लाय देईन.

हो दिनेशदा मी सगळ्या माश्यांना पत्र लिहू शकते Lol

मामी बदल केला ग.

साधना क्या बात है. प्रतिसादही पत्राने.
अग नाही विसरले रानभाज्यांना. त्यांच्याही अजुन काही मित्र-मैत्रीणींचा मला शोध काढायचा आहे.

हे रुनी सह्हीच.

क्या बात है जागू???... तु खरी मत्स्यप्रेमी Happy

सह्ही आयडिया आणि लेखन!

पदार्थ बनवणे, लेखन, कलाकृती, लहान मुली, नोकरी, आले-गेले... सगळचं तु किती मनापासुन करत असतेस... आणि परत कुठे गर्व नाही... मदत करायला पुढे.... मला नेहमी तुझं कौतुक वाटतं Happy अशीच आनंदात रहा Happy

मी शाकाहारीच पण नवर्‍यासाठी तुझा कोलंबी पुलाव करते नेहमी.... त्याला तर आवडतोच पण त्याच्या मित्राला एकदा डब्बा दिला होता तर त्यालाही फार आवडला Happy थँक्यु Happy

क्या बात है... जागू, इथे झक्कास खरपुस (तळून) टॅन झालेला किंवा आंबट-तिखटाच्या सारात पहुडलेला अशा पोझेसमधे बोंबलाने स्वतः टाकलेले स्वतःचे फोटो आवडले असते.
तुझ्या पत्रात तशी बोंबलास विनंती करणे.

जागु तुझी रेसिपी वाचताना जसं तोंपासु होतं तसच आताही झालय.. खरं तर बोंबिल आवडत नाहीत पण अजुन दसर्‍यापर्यंत मासे खाता येणार नाहीयेत त्यामुळे असेल.. पण जागुचं पत्र म्हणजे माश्यांनाच असेल अशी मात्र खात्री होतीच Happy

जबरी पत्रे आहेत ही...
बोंबिलाला पत्र ही आयडियाच केवळ, केवळ .....

शशांक, कविन, लोला धन्यवाद.

थंड फोन मधुन पाठवते ग.

फक्त मी एक माझ्यापुरते सांगतो हा, तू ना माझे कालवण करून फोटो नको टाकू त्यामुळे मी आळसटलेला, थकला-भागलेला वाटतो. तू ना मला तळतेस तेंव्हा मी अगदी रुबाबदार, ताठ, सुट-बुट घातल्याप्रमाणे वाटतो. >>>>सही!

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

भारि

मासे खात नसले तरी पत्र आवडले.
जागू,
तुमच्या सगळ्या रेसिपी मी वाचत असते आणि त्यात माशाबदली बटाटा,फ्लॉवर्,वांगं घालून करावे काय, कशी लागेल डिश असा विचार करत असते.

Pages