लॉर्ड ऑफ द वर्ड्स!

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 June, 2009 - 00:13

Spoiler Warning : लॉर्ड ऑफ द फ्लाईज वाचायचं ठरवलं असेल आणि शेवट पुस्तकातूनच वाचावा असं वाटत असेल त्यांनी स्टार्सच्या नंतरचा भाग वाचू नये.
---------------------------------------------------------------------------------

मला आठवतंय त्याप्रमाणे नववीनंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत 'पिंगळावेळ' हातांत पडलं होतं.

शब्द बसल्याजागी हसवतात, रडवतात, उत्कंठा ताणतात, थक्क करतात, जगाची सफर घडवून आणतात, कधी वैताग, कधी शिसारी आणतात, कधी गुदगुल्या करतात, तर कधी वाचताना थांबून 'कोणी बघत नाही ना' हे तपासायला भागसुद्धा पाडतात - इतपत शब्दांशी ओळख, नव्हे दोस्ती तोवर झाली होतीच. हातातलं पुस्तक मिटावं, पण डोकं त्या पानांतून बाहेर पडू नये हा ही अनुभव नवीन नव्हता.

पण हे प्रकरण निराळं आहे याची चुणूक पुस्तकाच्या नावापासूनच मिळाली. वाचायला सुरुवात केली आणि वाटलं, आपण इतके दिवस बोलत आलो तीच का ही मराठी भाषा? तेच शब्द, तीच लिपी? भयकथांमधे कशी एखादी शापित वस्तू ज्याच्या हातात पडेल त्याचं आयुष्य बदलून टाकते? तसं या पुस्तकाला हात लागल्यापासून मला माहीत असलेलं माझं जग बदलून गेलं. नव्हे, वितळून गेलं! तरी त्यांनी 'Stranger, think long before you enter..' म्हणून सावध केलं होतं...

सहसा भयकथा/thrillers वगैरे रात्री वाचल्या तर जास्त परिणाम करतात असा बर्‍याच जणांचा अनुभव असतो. मुंबईतल्या चाळीतल्या दोन खणी जागेत रात्र काही केल्या भयंकर वाटत नाही, तेव्हा मला तो अनुभव नव्हता.

माझी 'स्वामी' कथा वाचून संपली तेव्हा टळटळीत दुपार होती. कथेने तिची जादू नाही वापरली तरी आजूबाजूच्या भिंती कुठल्याही क्षणी भुरूभुरू जळून जातील असा उकाडा. इतका वेळ जिला घट्ट जमीन समजून धरून, पाय रोवून होते, तीही त्या कथेने नाहीशी करून टाकलेली! धडपडत मागल्या गॅलरीत आले. चाळीत ही वेळ विचित्र! कर्ती माणसं/बायका कामानिमित्त बाहेर, मागे उरलेली मुलंमाणसं उन्हाला दारं बंद करून घरांत कोंडलेली. गडीमाणसंसुद्धा कामं, जेवणं, तंबाखू आटोपून कुठेतरी जिन्यांखालच्या जागेत अदृष्य झालेली! कुठेतरी कांहीतरी जिवंतपणाचं लक्षण दिसावं, काही हालचाल दिसावी म्हणून प्राण कंठाशी आला! जणू कोणीतरी शाप देऊन उभी चाळ निर्मनुष्य केली होती! तेवढ्यात खालच्या बोळातून एक मोलकरीण बाहेर पडली. जाता जाता शिरस्त्यानुसार बोळाच्या भिंतीच्या कडेला पानाची पिचकारी मारून गेली. एरवी न चुकता संताप आणणारं हे दृष्य. त्या दिवशी मात्र त्याचाच प्रचंड दिलासा वाटला..

पिंगळावेळ वाचून संपलं, पण तळहातावर नवीनच रमलखूण उमटवून गेलं. मग त्या भीतीचीच चटक लागली. मग त्याहीपुढे जाऊन त्या तुटलेपणाशीच काहीतरी नाळ जुळली. तुटल्या तार्‍यासारखं जगापासून alienate झालेल्यांच्यात उठबस वाढली. 'शतदा प्रेम करावे' वगैरे म्हणणारे लोक दिसले की खदाखदा हसणारं एक संशयपिशाच्च डोक्यात कायमचं वस्तीला आलं...

आणि तरी..

तरी काल रात्रीपासून विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज्'ने हादरवून सोडलं आहे. कधी नव्हे ते मी स्वतःला 'हे पुस्तक आहे, fiction आहे, वाचून संपलं!' असं काहीतरी समजावायचा प्रयत्न करते आहे. आणि समजूत पटत नाहीये.

विमान अपघातात सापडून एका निर्जन बेटावर येऊन पडलेल्या मुलांची ही गोष्ट. त्यांच्या ओळखी, त्यांचे स्वभाव, राल्फ नावाच्या त्यांच्यातल्या थोड्या जाणत्या वयाच्या आणि त्यातल्या त्यात समजूतदार मुलाकडे त्यांचं जवळपास नैसर्गिकपणेच आलेलं म्होरकेपण, आलेल्या परिस्थितीतून परस्पर सहकार्याने मार्ग काढायचे त्यांचे ऑलमोस्ट वयाला न साजेसेही सुरुवातीचे प्रयत्न.. आणि मग..

कथेतल्या एखाद्या पात्राबरोबर identify केलं गेल्याचा अनुभव बरेचदा येतो. जवळजवळ आपल्या सुखदु:खांइतकी त्यांची सुखदु:खं जाणवतात, आपल्या प्रश्नांपेक्षाही त्यांचे प्रश्न आपले वाटायला लागतात. पण इथे ते identification त्या शब्दाच्या सगळ्या मर्यादा पार करून थेट हाडापर्यंत जाऊन भिडतं. मग आजूबाजूच्या कोलाहलात (chaos) काहीतरी सूत्र शोधू पाहणारा, सुटकेची आशा आणि त्यासाठीचे प्रयत्न जिवापाड जपू पाहणारा, त्या गोंधळाला काही नियम, काही आकार देऊ पाहणारा राल्फही आपलाच चेहरा घेऊन येतो; त्या कोलाहलापलिकडे जाऊन विचार करायची क्षमता असलेला, पण दुर्बळ असहाय्य दमेकरी पिगीही आपल्याच फुफुसांकडून श्वास उसना घेत बोलतो; काटक, आततायी, शिकारीसाठी चेहर्‍याला फासलेल्या रंगाने कोणीतरी निराळाच उन्मत्त रासवट झालेला जॅक आपल्याच ओठांच्या कडा मुडपून छद्मी हसतो; बीस्ट समजून मारला जाणारा सायमन होऊन आपणच रडतो-भेकतो-विव्हळतो; अन्नासाठी रानडुकरांची शिकार करता करता killingमधल्या थ्रिलचीच चटक लागलेले, त्या नादात आपल्याच मित्रांच्याही जिवावर उठलेले पिसाट शिकारी होऊन आपणच भाले सरसावतो आणि डोळ्यंदेखत घडलेला मनुष्यवध नाकारत आपणच आपल्यापासून नजर चुकवतो.

*****************************************************

दूर जगाच्या पाठीवर कुठेतरी आपलं घर अजूनही आहे, नकाशात आपलं गाव आहे, पण मनातून मात्र त्याच्या आठवणी, त्याची ऊब, त्याची कल्पनासुद्धा पुसट पुसट होत नाहीशी व्हायच्या बेताला आलेली आहे. पूर्वी कधीतरी आपल्या नावाला आपल्या वडिलांचं, आपल्या घराण्याचं नाव जोडलेलं होतं. 'पर्सिवल वेमस मॅडिसन. राहणार...'. आपलं अस्तित्व या सगळ्या ओळखींच्या बाह्यरेषांनी निश्चित केलं होतं. आता त्या रेषा नाहीशा झाल्यावर आपण कोण उरलो आहोत? शेवटी खरंच आपली त्या बेटावरून सुटका होते ना, तेव्हा आपल्याला तो एकेकाळी पाठ असलेला आपला पत्ता सोडा, आपलं पूर्ण नावसुद्धा आठवत नाही!!

कथा सुरू होते ती ऑलमोस्ट तक्रार करावी इतक्या संथ लयीत, पण तिच्या सगळ्या रूपकांसहित हाडामांसात रुतत, रुजत, उगवत, वाढत जाते, आणि शेवटी शेवटी त्या घटनांचा वेग सहनशक्तीच्या पलिकडे जातो. वाटतं.. त्या छापील पानांत उडी टाकावी आणि तो वेडाचार थांबवावा.. कोणीतरी ऐकेल.. कोणीतरी क्षणभर थांबून काही सारासार विचार करेल..

पण असं काहीसुद्धा करता येत नाही. आपण उघड्या डोळ्यांनी असहाय्यपणे शेवटपर्यंत ते सगळे भोग भोगत जातो. मुळापासून अधिकाधिक हादरत जातो. ही भीती नुसती बौद्धिक पातळीवर राहत नाही. ती त्यातल्या हिंस्त्रपणाची भीती नाही. याहून भयंकर हिंसा आपण पूर्वी कधीतरी कुठेतरी पाहिली/वाचलेली आहे. ही भीती त्या हिंसेच्या विश्वसनीयतेची आहे!!

हे घडू शकतं.. हे घडतं.. नव्हे, हेच घडतं - ही जाणीव पुसताच येत नाही!!

पुस्तकभर राल्फ त्याची sanity टिकवायचा आटोकाट प्रयत्न करत असतो. तो चिडतो, चिडवतो, ओरडतो, भांडतो, मनातून घाबरतोही. मृत्यूला अक्षरशः काही इंचांच्या अंतरावरून पाहतो तेव्हा बधीरही होतो. पुस्तकभर ज्या एका घडीच्या आशेवर जगत असतो तो सुटकेचा क्षण आल्यावर मात्र इतक्या दिवसांत प्रथमच धाय मोकलून रडतो! 'Death of innocence' साठी रडतो.. माणसाच्या काळजात केवढा भयाण काळोख दाटलेला आहे ते उमजून रडतो..

तो रडतो.. आणि आपण फक्त भान विसरून पाहत राहतो..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेखे लिहिलं आहे.
'हे पुस्तक आहे, fiction आहे, वाचून संपलं!' असं काहीतरी समजावायचा प्रयत्न करते आहे. आणि समजूत पटत नाहीये. >>> या एका वाक्यात सगळं आलं. हे पुस्तक आयुष्यभरासाठी हादरवून टाकतं. बदलून टाकतं.
आमच्या अस्तित्वाभोवती सतत घोंघावणार्‍या आमच्या आदिम हिंस्र भावभावना, आमच्या मूलप्रवृत्ती... त्या आमच्या अस्तित्वामुळेच आहेत, त्या आमच्या अस्तित्वाचाच एक भाग आहेत हे आम्ही विसरतो... आणि कणाकणाने लचके तोडणार्‍या त्या असंख्य माशा थव्याथव्याने आमच्याभोवती फिरत आहेत, याचा अर्थ 'त्या आमच्या 'फॅन' आहेत, अनुयायी आहेत, चाहत्या आहेत, अन् आमचे त्या माशांवर नियंत्रण आहे' असा समज आम्ही करून घेतो... आणि काठीवर रोवलेल्या धडविहीन शीरासारखे आम्हीसुद्धा होतो - 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'. हे पुस्तक आमची इतकी पारदर्शी ओळख करून देते.

    ***
    A falling leaf
    looks at the tree...
    perhaps, minus me

    'लॉर्ड ऑफ द फ्लाइज' कुणाला कसे भावेल ह्याला मर्यादाच नाही.. मला ते मानवी स्वभावाचे गुडी-गुडी वर्णने फाडून उघडी वागडी केलेले वर्णन वाटले. पण ते वाचून मी अस्वस्थ कधीच झालो नाही उलट अधिक समाधानी झालो. हे असेच आहे फक्त आपण मुखवटे घालून जगतो असे जे वाटते ते अधिक गडद झाले.

    जाता जाता, 'माशांचा राजा' (की माश्यांचा राजा) ह्या नावाने जी ए कुलकर्णींना ह्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केलेला आहे.

    'शतदा प्रेम करावे' वगैरे म्हणणारे लोक दिसले की खदाखदा हसणारं एक संशयपिशाच्च डोक्यात कायमचं वस्तीला आलं>> आलं तर काय.
    जियो स्वाती !!!!

    जे वाचल्यानंतर आपले चिरपरिचीत जग अक्षरशः उलटेपालटे होते त्यातल्यापैकीच. झापडं म्हणून टिकु द्यायची नाहीत असे जीव खाऊन ठरवून लिहील्यासारखे.

    ह्म्म्म !
    स्वाती धन्यवाद

    वाचायलाच हवं ह्या कॅटॅगिरीत टाकतो आता Happy

    *********************

    'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
    याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
    'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
    तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !

    Biggrin Wink Light 1

    अप्रतिम स्वाती!! जीए आणि ह्या पुस्तकाची घातलेली सांगड अफलातून आहे आणि जसाच्या तसा आठवतोय ह्या दोन्हींचा परिणाम वाचून झाल्यावरचा. यांच्या शब्दांचे कोष इतके मजबूत चिरेबंद विणले जातात आपल्या भोवती की बाहेरच्या जगाशी संपर्कच सुटतो.

    अवांतर माहिती: दुसर्‍या महायुद्धात युद्धाचे प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व पेशाने शाळामास्तर असलेल्या गोल्डिंगने हे पुस्तक लिहिले आहे. मला आठवते त्यानुसार स्टीवन्सनच्या ट्रेजर आयलँड ह्या पुस्तकात दर्शविलेल्या लहान मुलांच्या करामती, त्यांचे एकत्र येणे, धाडसाने संकटांना सामोरे जाणे वगैरे बाबींच्या कृत्रीमपणातून गोल्डिंगने 'लॉर्ड ऑफ द फ्लाइज' लिहिली. अर्थात ट्रेजर आयलँड हे निमित्तमात्र किंवा प्लॉटमात्र. ह्या पुस्तका इतके व्यापक रुपक पुस्तक क्वचितच.

    छानंच लिहिलयेस स्वाती!

    पुस्तक वाचतांना आणि वाचून ठेवल्यानंतरही काही काळ अस्वस्थ होतेच, नाही असे नाही.
    राल्फ, पिगी, जॅक आणि सायमनची (अगदी सॅमनेरिकही) पात्र रेखाटतांना त्यांना समाजातल्या धाडसी, हिंस्त्र, भेकड. अध्यात्मवादी प्रवृत्तींचे मुखवटे चढवून त्या बेटावर जे काय थरारक चित्र उभं केलं आहे ते इतकं पारदर्शी आणि बोलकं आहे की वाचकाला ते आतून बाहेरून हलवून विचार करायला भाग पाडतंच.
    इतर अनेकानेक पुस्तकांसारखं 'हं हे संपलं आता ठेवून द्या' असं Lord of the Flies बाबतीत होत नाही.

    -----spolier warning-----
    पुस्तकाच्या सुरवातीला फक्त उतावीळ वाटणारा जॅक पहातापहाता आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी हिंस्त्र आणि पाताळयंत्री बनून बेटावर नवी हुकूमशाहीची पाळंमुळं रुजवतो आणि एकट्या पडलेल्या राल्फची लोकशाही अक्षरशः मुळापासून उखडून जाते. तो शंखाचा संदर्भही एकमेवाद्वितीय. सायमनला मारतांनाचा प्रसंग मात्र थोडा अतिरंजित वाटतो.

    बेटावरच्या थरारापेक्षाही गमावलेल्या पिगी आणि आपल्या निरागसपणासाठीचं शेवटचं राल्फचं दु:खं चटका लावून जातं
    ह्या पुस्तका इतके व्यापक रुपक पुस्तक क्वचितच. >> अगदी खरं.

    दोन सिनेमे आले होते या पुस्तकावर यूट्यूबवर आहेत.

    अजून एक असंच अस्वस्थ करणारं पुस्तक कॉनरॅड रिचरचं, एका जन्मानं व्हाईट पण (रेड) इंडियन्समध्ये वाढलेल्या मुलाचं जंगल ते सुशिक्षित समाज आणि पुन्हा जंगल अशा प्रवासावरचं The light in the forest.

    अस्वस्थ व्हायला होतंच. शेवट थोडाफार गेस केला तरी पुढे काय वाढुन ठेवले आहे ते लक्षात येत नाहीच. संपल्यावर मलाही लगेच कोणाला तरी सांगावे वाटले, म्हणून अर्धवट अवस्थेत ते लिहीले. Happy

    The Stand नावाचे एक पुस्तकं (पुस्तक कसले एक मोठ्ठा खंड) वाचल्यावर पण असेच वाटू शकते. Happy माणसाच्या पॉझीटिव्ह व निगेटिव्ह साईडचे सुंदर दर्शन घडवले आहे स्टिफन किंगने. वाचले नसशील तर माझ्याकडून आग्रह. Happy

    मी पुस्तकातील रहस्याबद्दल थोडं लिहिलं आहे...spolier warning टाकतो.

    सहीच स्वाती, छान मांडलयस.. आवडलं.. पढना पडेंगा!

    तुटल्या तार्‍यासारखं जगापासून alienate झालेल्यांच्यात उठबस वाढली. >> Happy

    आवडलं.. पढना पडेंगा!>> नको वाचूस, तू शतदा प्रेम करणार्‍यांपैकी आहेस, उगाच हा समंध मानगुटीवर कशाला हवाय तुला. ....

    धन्य आहे तुमची. किती हे संवेदनाक्षम मन तुमचे. नवल नाही तुम्हाला कविता वगैरे कळतात.

    मला स्वतःला जित्या जागत्या, हलत्या बोलत्या माणसांच्या भावना जाणवत नाहीत! पुस्तकातल्या, टीव्ही, सिनेमातल्या लोकांबद्दल तर दूरच. अगदी मायबोलीवर सुद्धा म्हणूनच मी असे बेधडक लोकांना बोचेल, आवडेल की नाही याचा विचार न करता लिहीत असतो.

    माझी खात्री आहे, मी हे पुस्तक जरी पूर्ण वाचले तरी संपल्यावर टाकून देईन. मी फक्त विनोद पुस्तके जपून ठेवतो. पूर्वी वाचली असली तरी नंतर वाचायला काही वाईट नसतात, विशेषतः पु. लंची विनोदी पुस्तके.

    Happy Light 1

    अद्भुत!
    ... ही भीती त्या हिंसेच्या विश्वसनीयतेची आहे!!
    अद्भुत!

    फारच छान लिहिलं आहे.

    धन्यवाद सर्वांचेच.

    टण्या, माहितीसाठी स्पेशल आभार.

    केदार, म्हणूनच तू लिहिलं होतंस त्याची लिंक दिली वरती. तिथल्या चर्चेमुळेच वाचलं मी, म्हणून तुझेही स्पेशल आभार.
    'The Stand'पण वाचेन आणि तू मागे सांगितलेलं "Sophie's World"पण आहे रांगेत. Happy

    रैना, उतारा म्हणून 'किमया' घेतलं वाचायला पुन्हा. Happy
    (आणि दोन लेख वाचून होईस्तोवर समंध अस्वस्थ झाला म्हणून Crime and Punishment पण केलंच सुरू! :P)

    -----------------------------------------------
    I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

    धन्स स्वाती...
    तू एकंदर खूपच चांगल्या पुस्तकाबद्दल लिहिलेलं दिसतंय. अजून वाचलं नसल्याने पुस्तकाबद्दल काही बोलू शकत नाही. स्पॉयलर वॉर्निंग देऊन अगदी उत्तम केलंस.

    >>>आता त्या रेषा नाहीशा झाल्यावर आपण कोण उरलो आहोत?
    वाह !

    सुंदर लिहीलं आहेस !!!

    सुरेख लिहिलं आहेस. Happy

    सुरेख लेख, अतिशय आवडला. हे पुस्तक वाचताना तेंडुलकरांनी लिहिलेल्या हिंसेवरील लेखाची (आणि त्यात दिलेल्या लहान मुलांच्या उदाहरणाची) आठवण होणे अपरिहार्यच.

    नंदन
    मराठी साहित्यविषयक अनुदिनी

    छान लेख. लॉर्ड ऑफ दी फ्लाइज ही कादंबरी कोरल आयलंडचा अँटिथीसिस आहे. ही कादंबरी म्हणजे हिंसा, स्वार्थ, द्वेष, मत्सर ह्यांच्यापायी निष्पाप, सुसंस्कृत जग कसं रानटी बनत जातं ह्याचा सुन्न करणारा दृष्टान्त आहे. माझ्या आवडत्या साहित्यकृतीची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

    .....................................................................................................
    अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता

    स्वाती छान लिहील आहे .लेख आवडला .

    फार चांगला दुवा दिलात बैरागी. लेख मननीय आहेच, पण या संकेतस्थळाबद्दलही त्यामुळे समजलं. धन्यवाद.

    मला व्यक्तिशः 'कोरल आयलंड' वाचलेली नसूनही (किंबहुना त्याबद्दल काहीच माहिती नसतानाही) त्यामुळे 'लॉर्ड..'च्या आस्वादात काही उणेपणा आला असं वाटलं नाही.

    उलट आता ही माहिती कळल्यावर गोल्डिंगला 'कोरल आयलंड'चा अशा प्रकारे उल्लेख करण्याचा इतका अनावर मोह का झाला असेल याची गंमत मात्र वाटते. इतकी स्थलकालातीत साहित्यकृती निर्माण केल्यावर(ही) तिला आपल्याच हाताने "अमुक कलाकृतीला वा विचारसरणीला उत्तर" असं मर्यादित, लहान का करून टाकायचं? शिवाय प्रत्यक्ष उल्लेख नाही केला तरी तो निर्देश समजायचा त्यांना समजतोच. Happy असो.

    सर्वांचे मनापासून धन्यवाद.
    -----------------------------------------------
    I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

    बैरागी, फारच उत्तम दुवा दिलात. अनेक धन्यवाद.

    तसेच लेख देखील सुरेख. ते शेवटचे वाक्य मराठीमध्ये तितक्या जोमाने येतच नाही हे खरे आहे.

    >>> इतकी स्थलकालातीत साहित्यकृती निर्माण केल्यावर(ही) तिला आपल्याच हाताने "अमुक कलाकृतीला वा विचारसरणीला उत्तर" असं मर्यादित, लहान का करून टाकायचं? >>>
    कोरल आयलँडचा उल्लेख एका विशिष्ट विचारसरणीला उत्तर म्हणुन न येता एका विशिष्ट विचारसरणीचा जनमानसावर असलेला पगडा व त्यातला फोलपणा-भाबडेपणा दाखवण्यासाठी म्हणुन येतो. स्थलकालातीत साहित्यकृतीमध्ये तत्कालीन संदर्भ न येणे ही जवळपास अशक्य बाब आहे. 'तत्कालीन संदर्भ आल्याने ती साहित्यकृती स्थलकालातीत होत नाही' हे विधान सुद्धा बरोबर नाही. एखाद्या साहित्यकृतीमधील विचार व मांडणी तिला स्थलकालातीत करेल, संदर्भ नाहीत. यात्रिक सारखी लघुकथा सुद्धा डॉन क्विओटेचा संदर्भ घेउन येते.

    बैरागी- दुवा फारच मस्त. धन्यवाद.

    कोरल आयलँडचा उल्लेख एका विशिष्ट विचारसरणीला उत्तर म्हणुन न येता एका विशिष्ट विचारसरणीचा जनमानसावर असलेला पगडा व त्यातला फोलपणा-भाबडेपणा दाखवण्यासाठी म्हणुन येतो.>> पूर्ण अनुमोदन.
    त्यामुळे 'निष्पाप, सुसंस्कृत जग कसं रानटी बनत जातं ' असे दाखवणारे हे पुस्तक नसून त्याचा गाभा- आपण मूळात जनावरच आहोत आपला सुसंस्कृतपणा केवळ सामाजिक बंधनांमुळे,सोशल मिरर्स् मुळेच आहे,ज्या क्षणी ही बंधने शिथील होतात तेंव्हा आपल्या मनात दबलेल्या रानटी भावना प्रकत होतात;असा आहे. उदा.लहान मुलांना लांबून दगड मारणार्‍या दुसर्‍या मुलाचे दगड आधी त्यांच्यापासून लांब पडतात,पण नंतर मात्र ते सरळ अंगावर पडू लागतात- हा प्रसंग तर गोल्डींगने अफलातून लिहिला आहे.

    ह्या निबंधाचे नाव आधी ऐकले नसल्याने, गूगलून पाहिल्यावर हा दुवा मिळाला - http://www.studytemple.com/forum/novels-other-related-books/17416-kalpla...
    ह्याच निबंधाबद्दल म्हणत होता का? (हा हजारीप्रसाद द्विवेदींचा दिसतो आहे). डाऊनलोड करून वाचला. चांगला आहे, पण तितका ग्रेट वाटला नाही.

    Pages