मका-पनीर सार्/तिखट/जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 September, 2013 - 04:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मक्याची कणसे (स्विट कॉर्न) किंवा मक्याचे दाणे
१ वाटी पनीर
४-५ पाकळ्या लसूण चिरुन
३ मिरच्या चिरुन
७-८ पाने कढीपत्ता
अर्धा चमचा जिरे
२ मोठे चमचे तेल
चवीनुसार मिठ
थोडी साखर (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

कदाचीत माझ्या कुंडलीत कष्टच लिहीलेले असतील म्हणून मला काही मार्केट मध्ये मक्याचे दाणे मिळाले नाहीत. Lol मायबोली गणेशोत्सवाला आता शेवटचे २-३ दिवसच आहेत आणित त्यात भाग घ्यायचा म्हणून दाणे मिळेपर्यंत वाट न पाहता सरळ मक्याची कणसे घेउन आले. तुम्ही मात्र दाणे घ्या म्हणजे कष्ट कमी पडतील.

प्रथम मक्याची कणसे किसणीवर किसुन घ्या. जर मक्याचे दाणे असतील तर ते मिक्सरमधून वाटून घ्या.

आपल्याला सार करायचा आहे म्हणून किसलेल्या/वाटलेल्या कणसांत थोडे पाणी घाला.

जर सार स्मुथ हवे असेल मक्याच्या सालांचा चरचरीत पणा नको असेल तर हे मिश्रण पिठ चाळायच्या चाळणीत किंवा गाळणीत गाळून घ्या. पण जर वेळ कमी असेल/ कंटाळा आला असेल तर साले पौष्टीक असतात, फायबर वगैरे मिळेल असे मनातल्या मनात स्वतःशी वदवून तसेच राहूद्या. मलाही वेळ नव्हता म्हणून मी तशीच ठेवली. Lol

आता भांडे गॅसवर ठेऊन चांगले तापले की त्यात तेल तापवा आणि जिर, लसुण कढीपत्ता, मिरची ह्यांची फोडणी द्या. फोडणी करपऊ नका. पनिरचे तुकडे आधीच थोड्या तेलात तळून ठेवा. आमच्या कामवालीने मायबोली आय डी मामीच्या कामवालीचे पत्र वाचून बहुतेक मलाही तसाच दगा दिलाय आणि ती गेले १० दिवस आजारपणाचे कारण सांगून येत नाही. आता ती घरातील १० दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करूनच येणार हे अनुभवाने माहीत असल्याने जास्त भांडी घासायला नको, ऑफीस गाठायला पाहीजे ह्या विचाराने मी पनिर डायरेक्ट फोडणीतच परतवले.

नंतर त्यात मक्याचे मिश्रण ओतले. मिठ व थोडी साखर घालून मिश्रण मध्यम आचेवर ५ मिनीटे उकळू दिले.

अशा प्रकारे झाला मका पनीर सार तय्यार. ( फोटोही शॅडोचा विचार न करता घाई-घाईत काढले आहेत)

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

लहान मुलांना मक्याचे दाणे आवडतात म्हणून तुम्ही तेही सोबत टाकू शकता.

दाटपणा हवा असेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा बेसनचे थोडे पिठ पाण्यात मिसळून ते ह्यात उकळवू शकता.

माहितीचा स्रोत: 
मायबोली गणेशोत्सवाच्या कृपेने माझाच प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

है य्या! आली जागू! छान दिसतंय सार! Happy नक्की पाहीन करून...

रच्याकने, ते पनीर डायरेक्ट फोडणीत परतले त्याकरता किती ती प्रस्तावना! मस्त लिहिलंय पण!! आवडलं Happy

रंगासेठ धन्यवाद.

रच्याकने, ते पनीर डायरेक्ट फोडणीत परतले त्याकरता किती ती प्रस्तावना! मस्त लिहिलंय पण!! आवडलं.

ते माझ्या मनीचे गुज (भडभडाट/दु:ख) मी इथे व्यक्त केले आहे Lol

आली आली, जागूची रेसिपी आली. मस्त दिसतंय ते सार. शेवटचा फोटो तर महान. प्लेट, कणिस, त्याची पानं, सार, कोवळं उन ... खूप सुरेख हिरव्या-पिवळ्या छटा आल्यात.

>>> फोडणी करपऊ नका. >> Lol लै भारी

>>>> पण जर वेळ कमी असेल/ कंटाळा आला असेल तर साले पौष्टीक असतात, फायबर वगैरे मिळेल असे मनातल्या मनात स्वतःशी वदवून तसेच राहूद्या. मलाही वेळ नव्हता म्हणून मी तशीच ठेवली. >> Lol

>>> आमच्या कामवालीने मायबोली आय डी मामीच्या कामवालीचे पत्र वाचून बहुतेक मलाही तसाच दगा दिलाय आणि ती गेले १० दिवस आजारपणाचे कारण सांगून येत नाही. आता ती घरातील १० दिवसांच्या बापांचे विसर्जन करूनच येणार हे अनुभवाने माहीत असल्याने जास्त भांडी घासायला नको, ऑफीस गाठायला पाहीजे ह्या विचाराने मी पनिर डायरेक्ट फोडणीतच परतवले. >>> Biggrin

मस्त. सोप्पी आहे रेसिपी. करुन बघणार.

रच्याकने मक्याचे दाणे काढणे सोपे करण्यासाठी - मका उभा ( देठाचा भाग हातात) येईल असा पकडायचा. धारदार सुरी घेऊन उजव्या बाजुला साधारण दाण्याएवढी जागा ठेवुन उभा काप करायचा. त्या बाजुचे दाणे कापुन खाली येतील. मग तसाच मका थोडा थोडा फिरवत सर्व बाजुंनी कापायचा. मधला घट्ट भाग तेवढा राहातो. ही ( उभा) किंवा ही (आडवा) लिंक बघा
सुरी धारदार आणि सवयीची हवी.

वा!

Pages