मका-पनीर सार्/तिखट/जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 September, 2013 - 04:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मक्याची कणसे (स्विट कॉर्न) किंवा मक्याचे दाणे
१ वाटी पनीर
४-५ पाकळ्या लसूण चिरुन
३ मिरच्या चिरुन
७-८ पाने कढीपत्ता
अर्धा चमचा जिरे
२ मोठे चमचे तेल
चवीनुसार मिठ
थोडी साखर (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

कदाचीत माझ्या कुंडलीत कष्टच लिहीलेले असतील म्हणून मला काही मार्केट मध्ये मक्याचे दाणे मिळाले नाहीत. Lol मायबोली गणेशोत्सवाला आता शेवटचे २-३ दिवसच आहेत आणित त्यात भाग घ्यायचा म्हणून दाणे मिळेपर्यंत वाट न पाहता सरळ मक्याची कणसे घेउन आले. तुम्ही मात्र दाणे घ्या म्हणजे कष्ट कमी पडतील.

प्रथम मक्याची कणसे किसणीवर किसुन घ्या. जर मक्याचे दाणे असतील तर ते मिक्सरमधून वाटून घ्या.

आपल्याला सार करायचा आहे म्हणून किसलेल्या/वाटलेल्या कणसांत थोडे पाणी घाला.

जर सार स्मुथ हवे असेल मक्याच्या सालांचा चरचरीत पणा नको असेल तर हे मिश्रण पिठ चाळायच्या चाळणीत किंवा गाळणीत गाळून घ्या. पण जर वेळ कमी असेल/ कंटाळा आला असेल तर साले पौष्टीक असतात, फायबर वगैरे मिळेल असे मनातल्या मनात स्वतःशी वदवून तसेच राहूद्या. मलाही वेळ नव्हता म्हणून मी तशीच ठेवली. Lol

आता भांडे गॅसवर ठेऊन चांगले तापले की त्यात तेल तापवा आणि जिर, लसुण कढीपत्ता, मिरची ह्यांची फोडणी द्या. फोडणी करपऊ नका. पनिरचे तुकडे आधीच थोड्या तेलात तळून ठेवा. आमच्या कामवालीने मायबोली आय डी मामीच्या कामवालीचे पत्र वाचून बहुतेक मलाही तसाच दगा दिलाय आणि ती गेले १० दिवस आजारपणाचे कारण सांगून येत नाही. आता ती घरातील १० दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करूनच येणार हे अनुभवाने माहीत असल्याने जास्त भांडी घासायला नको, ऑफीस गाठायला पाहीजे ह्या विचाराने मी पनिर डायरेक्ट फोडणीतच परतवले.

नंतर त्यात मक्याचे मिश्रण ओतले. मिठ व थोडी साखर घालून मिश्रण मध्यम आचेवर ५ मिनीटे उकळू दिले.

अशा प्रकारे झाला मका पनीर सार तय्यार. ( फोटोही शॅडोचा विचार न करता घाई-घाईत काढले आहेत)

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

लहान मुलांना मक्याचे दाणे आवडतात म्हणून तुम्ही तेही सोबत टाकू शकता.

दाटपणा हवा असेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा बेसनचे थोडे पिठ पाण्यात मिसळून ते ह्यात उकळवू शकता.

माहितीचा स्रोत: 
मायबोली गणेशोत्सवाच्या कृपेने माझाच प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

मस्तच होतं. कॅनमधलं क्रीम्ड कॉर्न होतं. त्याचं काय करावं बै... अशा गहन विचारात असताना जागूची रेसिपी वाचली.
अप्रतिम झालं... मी पनीर क्यूब्जचे अजून दोन भाग करून वेगळे परतून घेतले. म्हणजे मग ते चिव्वट लागले नाहीत.

Pages