आधुनिक सीता - ६

Submitted by वेल on 16 September, 2013 - 13:54

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग १ - http://www.maayboli.com/node/44930
भाग २ - http://www.maayboli.com/node/44956
भाग ३ - http://www.maayboli.com/node/45054
भाग ४ - http://www.maayboli.com/node/45057
भाग ५ - http://www.maayboli.com/node/45139

******************************************

पण तोवर विमान आकाशात पोहोचलंसुद्धा होतं. मी सौदीला जाते आहे ते योग्य की अयोग्य ह्याचा विचार करण्यामध्ये माझा प्रवास कसा झाला कळलंच नाही. विमान सौदी एअरपोर्टवर उतरलं. मी घरून निघाल्यापासून विचारांच्या नादात फारसं खाल्लंसुद्धा नव्हतं, विमानातल्या काही चॉकोलेट्सशिवाय. आता मात्र प्रचंड भूक लागली होती. पोटाला खाण्याची आणि मनाला सागरला भेटण्याची.

सगळे सोपस्कार पार पाडून मी बाहेर पडले, ठरल्याप्रमाणे सागर मला घ्यायला आला होता. खरंतर इतक्या दिवसांनी सागरला पाहून मला सगळ्या विचारांचा विसर पडला. असं वाटत होतं तिथल्या तिथे त्याच्या मिठीत शिरावं. मी त्या आवेगाने त्याच्याकडे धावलेसुद्धा होते पण मुंबई पुणं नव्हतं, सागरने एक छानसं स्मितहास्य करीत मला डोळ्यांनी खूण केली, शांत राहा. आणि केवळ डोळ्यांनीच सार्‍या भावना व्यक्त करत आम्ही सागरच्या हॉस्पिटलच्या गाडीने घरी निघालो. गाडीमध्ये देखील स्वतःच्या भावनांवर आम्ही कसा ताबा ठेवला आम्हालाच माहीत. घरी जाण्यापूर्वी आम्ही रेस्तेराँमध्ये जेवून घेतलं. जेवत असताना आम्ही न बोलता नजरेने एकमेकांना स्पर्श करत होतो. खरंतर एकमेकांना नजरेनेच पीत होतो. पोटभर जेवून आम्ही सागरच्या हॉस्पिटलमधील बंगल्यावर आलो.

आज आम्ही जवळ जवळ दीड महिन्यांनी एकमेकांना भेटत होतो. घरात शिरताच सामान जमिनीवरच टाकून आम्ही एकमेकांच्या मिठीत शिरलो. एकमेकांबद्दलचं प्रेम, एकमेकांची ओढ, इतक्या दिवसांचा उपास काय नव्हतं त्या मिठीत. सकाळ होईपर्यंत आम्ही असेच एकमेकात विरघळत होतो प्रेमाच्या वर्षावात एकदुसर्‍याला गुदमरवून टाकत होतो.

सकाळी आम्हाला जगाची जाणीव झाली ती दारावरच्या बेलच्या आवाजाने. सागरने सांगितलेले आठवले सकाळी स्वयंपाक करायला रामण्णा येतो. रामण्णा मूळचा केरळचा. त्याचे आईवडिल बायको मुले केरळमध्येच होते. तो स्वतः गेली काही वर्ष सौदीमध्येच होता. पूर्वी रेस्तेराँमध्ये होता आता इथे राहणार्‍या भारतीयांकडे जेवण बनवत असे आणि भारतीय स्त्रियांना खरेदीला मदत करत असे. शिवाय रामण्णाचा एक भाचा शिवा इथे साफसफाईचे वरकाम करत होता. तोही थोड्या वेळात आलाच असता. सागर चटकन आवरून दार उघडायला गेला. त्या दिवशी रामण्णाने मस्त बटाट्याची भाजी आणि डोसे बनवले. सागरने माझ्याशी आणि रामण्णासोबत बोलून ठरवले की रामण्णा आता सकाळ्चा नाश्ता आणि रात्रीचं जेवण बनवेल आणि मी दुपारचं. मला खरेदीला एकटीला बाहेर पडायला लागू नये म्हणून इतर कुटुंबांप्रमाणे रामण्णाच सगळं सामान आणणार होता.
त्यादिवशी सागरला सुट्टी होती. मी आणि सागर घरातच बोलत बसलो होतो. सागर मला पुन्हा एकदा इथल्या लिखित आणि अलिखित कायद्यांची माहिती करून देत होता. स्त्रियांनी पुरुष पालकाशिवाय घराबाहेर जाऊ नये. पूर्ण कपडे घालून, डोक्यावर स्कार्फ घालून जावे. आपण मुस्लिम नसल्याने केस किंवा डोके झाकायची गरज नसते. इथली भारतीय कुटुंबे हॉस्पिटलपासून लांब राहात असल्याने त्यांमध्ये फारसे मिसळता येणार नाही. पण तरिही दर दोन तीन आठवड्यातून एका सुट्टीच्या दिवशी आपण भारतीय कुटुंबांसोबत गेट-टुगेदर करू हेही मला सागरने प्रॉमिस केले. बाकीचे दिवस टी.व्ही. इंटरनेट पुस्तकं. खरं तर थोडं कंटाळवाणं होणार होतं, मला सवय सतत लोकांमध्ये वावरायची. सागरने मला अभ्यासाची थोडी पुस्तकं आणून दिली होती हॉस्पिटलच्या लायब्ररीतून. महिन्याभरानंतर सागर मला त्याच्या हॉस्पिटलमध्ये कौन्सिलर म्हणून काम मिळते का ते पाहणार होता. आजच्या वेगवान युगाची लागण सौदीमध्येसुद्धा झाली होती. कायदे कितीही कडक असले तरी सौदीबाहेर जाणार्‍या अरब मुलांना जगातल्या इतर ठिकाणच्या मुलांप्रमाणेच समजून घेण्याची गरज जाणवत होती आणि ते त्या मुलांचे आईवडिल करू शकत नव्हते. हॉस्पिटल मध्ये कौन्सिलर म्हणून काम मिळाले नसते तरिही एखाद्या शाळेत नक्कीच मला काम करता आले असते. आणि काहीच नाही तर माझ्या पीएचडीची तयारी तर नक्कीच झाली असती.
पण त्यापूर्वी होणार होती जंगी मेजवानी. सागर आणि माझ्या लग्नाप्रीत्यर्थ. सागरने लग्न ठरल्यापासून माझा फोटोदेखील कोणालाही दाखवला नव्हता. का ह्याचं उत्तर कोणालाच माहित नव्हतं सगळ्यांना तो एकच सांगायचा, " ती इथे राहायला आली की प्रत्यक्षच पाहा ना तिला." त्यामुळे सागरची बायको कशी दिसते ते सगळ्यांनाच कुतुहल होते. आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात हे थोडं विश्वास ठेवण्यापलिकडचं होतं. पण सागरने मला अगदी गुलदस्त्यात ठेवलं होतं.

आणि ती जंगी मेजवानी होती दोन दिवसानंतर. ह्याच बंगल्यात. जेवणाचा बेत खास भारतीय होता, चक्क शाकाहारी. सागरचे सगळे सहकारी, त्यांच्या बायका, इथले सागरला ओळखणारे सगळी भारतीय कुटुंब हे सगळेच येणार होते आणि येणार होता सागरचा मित्र कम बॉस - रफिक आणि त्याची पत्नी फातिमा. खास रफिकच्या आवडीची पुरणपोळी आम्ही पुण्यातून मागवली होती. मला खूप कुतुहल होतं रफिकबद्दल आणि फातिमालाही पाहायचं होतं.

त्यादिवशी मी आमच्या रिसेप्शनची साडी नेसणार होते. सागरची आवडती - आकाशी म्हणजेच सागरी निळ्या रंगाची, बुंदके असलेली. सागरच्या भारतीय सहकार्‍याची पत्नी - वंदना माझी तयारी करून देणार होती. ती एकटीच होती जी मला आमच्या मेजवानी आधी पाहणार होती.

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45278

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही सगळे इतक्या उत्कंठेने कथेची वाट पाहात असता, मला तुमची माफी मागयची आहे पुढचे भाग टाकायला उशीर होतो म्हणून.