आधुनिक सीता - ४

Submitted by वेल on 5 September, 2013 - 08:06

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग १ - http://www.maayboli.com/node/44930
भाग २ - http://www.maayboli.com/node/44956
भाग ३ - http://www.maayboli.com/node/45054

******************************************

सागर आणि मी एकमेकांना पसंत केल्याच्या दुसर्‍याच दिवशी सागरची आजी पुन्हा बीपी वाढून आणि उलट्या होऊन आजारी पडल्याचा सागरच्या मामांचा फोन आला. अनायसे लग्न ठरले असल्याने मी आई आजी आणि दादा आम्हीदेखील सागर आणि सागरच्या आईसोबत सातार्‍याला जायचे ठरले.
सातारा ... माझ्या आजीचं आजोळ. सातार्‍यात शिरल्यापासून सातारा किती बदललं हेच सांगत होती आजी आम्हाला. ती लहानपणी आजोळी कशी यायची, आजी आजोबा गेल्यानंतर तिचा मामा मामीच्या गावी नाशिकला कसा गेला मग सातार्‍याशी संबंध पुन्हा कसा नाही आला हे सांगताना आजीचे डोळे अगदी भरून आले होते.
"आजी नॉस्टेल्जिक होणं म्हणतात बरं का ह्याला .. आता तू आणि नॉस्टेल्जिक प्रथमच पाहतोय, तूच सांगतेस ना, मागचं सगळं विसरून पुढे जायचं मग हे काय? " दादा एक संधी सोडत नव्हता आजीची मस्करी करायची. आजीने एक धपाटा हाणला दादाच्या पाठीत, तितक्यात सागरच्या मामांचं घर आलं. आम्ही कोण कुठले ते सांगता सांगता, चाकाच्या खुर्चीत बसलेली सागरची आजी तिथे आली, आली म्हणण्यापेक्षा तिला आणलं. तिचं बीपी सारखं वर खाली होत होतं, काही महिन्यांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊन गेला होता. सागरची आजी आणि माझी आजी साधारण एकाच वयाच्या. त्या दोघी बोलत असताना अचानक दोघी रडू लागल्या. आम्ही त्यांच्याकडे धावलो, अगदी गळ्यात गळे घालून दोघी रडत होत्या. मग रडत रडत हसत हसत दोघींनी त्या का रडत आहेत हे आम्हाला सांगितले. सागरची आजी लग्नापूर्वीची कमल रास्ते आणि माझी आजी लग्नापूर्वीची सुमन भावे, सातार्‍यातल्या गजानन जोशी या शाळा शिक्षकांची नात या दोघी एकत्र काचापाणी आणि लपाछपी खेळत असत. आजीचे आजोबा - गजानन जोशी स्वर्गवासी झाल्यानंतर मामा रघुवीर जोशी नशिक मध्ये राहायला गेले आणि कमल आणि सुमन ह्या दोघी मैत्रिणी एकमेकींना दुरावल्या, त्या आज ६५ वर्षानंतर भेटल्या होत्या. आता हे लग्न ठरल्याचा सगळ्यांना अधिकच आनंद झाला. इतकेच नव्हे तर तीन दिवसानंतरचा मुहूर्त धरून सातार्‍यातच साखरपुडा करायचं ठरलं. तसं सुद्धा साखरपुडा घरातल्या घरात अगदी जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला बोलावून करायचा होता. सगळेच पुण्यात असल्याने त्यांना सातार्‍याला येणे फारसे कठिण नव्हते. अचानक माझ्या आयुष्यात फक्त घडामोडी होत होत्या त्याही इतक्या झटापट की इतर काही विचार करायला वेळच नव्हता.
दोन मैत्रिणींच्या नातवंडांचा साखरपुडा - " तुम्ही दोघींनी हे लग्न आधीच ठरवून ठेवलं होतं आम्हाला फक्त आत्ता सांगितलंत" असं दादा आणि पटवर्धन काकांनी अनेकदा बोलून दाखवलं. इतक्या वेळा की सागरच्या आजी म्हणाल्या, " हो आम्ही परकरात असताना बाहुला बाहुलीची लग्न करायचो ना तेंव्हाच आम्ही ठरवलं होतं आपल्या नातवंडाचं लग्न करायचं" माझी आजी अचानक म्हणाली, "कमल अगं त्यावेळीसुद्धा तुझा बाहुला आणि माझी बाहुली असायची आणि नेहमी तुझ्या अंगणात लग्न लावायचो आपण त्यांचं. आत्तासुद्धा तसच झालं बघ." असंच थट्टा मस्करीत आम्ही आमचा सातार्‍यातला वेळ खूप मजेत काढला. सुमन आजी आणि कमल आजी ह्यांनी खास आम्हा दोघांकडे लक्ष ठेवलं होतं, साखरपुडा होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर आम्हा दोघांना एकत्र फिरायला मिळावं म्हणून, त्या दोघींनी आम्हा दोघांना बोलावून हेही सांगितलं, "साखरपुडा झाल्यानंतरसुद्धा चार दिवस इथे राहा, दोघांच्या सगळ्या - आत्ते, चुलत, मावस, मामे - भावंडांसोबत फिरून या सज्जनगड, शिवथरघळ आणि महाबळेश्वर. एकमेकांना खूप वेळ द्या, ओळख करून घ्या चांगली. आणि हो सागर तिचा हात वगैरे धरलास, तिच्या सोबत थोडा वेळ एकट्याने घालवलास तर कोणी बोलणार नाही हो तुला. फक्त दिवसांच्या रात्री आणि रात्रीचे दिवस करू नकात. तुम्ही आजकालची मुलं, काळजी वाटते, " आणि ह्या काळात आम्ही जणू एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. सोबत मोठी माणसे नसल्यामुळे आम्हाला एकमेकांसोबत खूप मोकळे वाटत होते. रम्य निसर्गाच्या सान्निध्यातले ते निसटते स्पर्श, डोळ्यांची भाषा आणि निशब्द रोमान्स. आम्ही खूप गप्प सुद्धा मारल्या. शाळा कॉलेज मधले अनुभव मित्र मैत्रिणी. माझे कौन्सिलिंग मधले अनुभव, त्याचे नोकरीतले अनुभव ...

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45139

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy