वजाबाकी - शतशब्दकथा

Submitted by हर्पेन on 28 August, 2013 - 03:47

तो एक नवतरुण.
नवनवीन विचारांनी भारावलेला.
नुकतेच शिक्षण आटोपून, परत आपल्या माणसात आलेला.
प्रत्येक गोष्ट तार्कीकतेच्या कसोटीवर घासून पहायची सवयच लागलेला.

आपल्यातील अनेक गोष्टीत सुधारणा करायला भरपूर वाव असला तरी आपलीच माणसे आहेत, समजून घेतीलच आपल्याला, अशी त्याची खात्री होती.

चांगल्या कामाची सुरुवात नेहेमी देवापासून करावी म्हणतात. त्यानेही केली. तो विचारी, कशावरून नारळातील पाणी ही देवाची करणी? कधी उठतो-निजतो देव? का करायची काकड-आरती, शेजारती? कोण ठरवतो त्याने किती झोपावे?

तो म्हणे, माणसाने नेहेमी कशावरून? कधी? का? किती? कुठे? केव्हा? कोण? अशी ‘क’ची बाराखडीच विचारावी?

मग एक दिवस सख्ख्या भावानेच त्याला विचारले कशावरून तू माझ्या बापाचाच? आणि त्याला आयुष्यातूनच वजा केले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमलीय, जे मांडायचे होते ते पोहोचलेय..
वेलकम टू शशक क्लब
माझ्याव्यतिरीक्त माबोवर आणखी काही जणांनी हा प्रकार ट्राय करावा असे मला वाटत होतेच, फक्त उगाच कोणावर आपले दडपण नको म्हणून तसे बोललो नव्हतो.

धन्यवाद, तॄष्णा, अंकु....

अभिषेक, तुला विशेष धन्यवाद. तुझ्यामुळे हा फॉर्म माहित झाला आणि हा पहिला-वहिला प्रयत्न करावासा वाटला. आणि तुझ्याकडून आलेले प्रोत्साहनपर शब्द हे आयसिंग ऑन केक....:)

छान!

धन्यवाद स्वाती२, नंदीनी आणि इब्लिस
इब्लिस - आपल्याला कथाविचारात नक्की काय खटकतय / न पटण्याजोगे आहे जरा विस्कटून सांगणार का? आपला दृष्टीकोन जाणून घ्यायला आवडेल.

मला कथा विचार आणि कथा दोन्ही आवडल्या.

खरच लोकं वजा करुन टाकतात आयुष्यातुन. Sad
बहुदा "कशावरून तू माझ्या बापाचाच?" वाक्य नसतं तरी चाललं असतं

छान कथा. आवडली.

तुझं माझं जमेनाच्या कालच्या भागात विद्याधर जोशींच्या तोंडी एक संवाद होता, 'सगळ्याच गोष्टींचा विचार डोक्याने करायचा नसतो, काही काही गोष्टी मनाने, हृदयाने विचार करण्याच्या असतात.'