डस्ट इन द विंड

Submitted by अपूर्व on 21 August, 2013 - 23:24

काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.

माझ्या मते कॉलनीमधल्या सगळ्या ताया, आया, मावश्या, आज्या त्याच्याकडून नियमित भाजी घ्यायच्या. 'तुम्हाला काय देउ ताई?','जरा एक मिनिट हं आजी.. देतोच', 'आलं देऊ ताई, ताजं आहे मस्त, बघा चहात घालून', 'कोथिंबीर अत्त्ताच संपली दादा , आणि काय देऊ? भेंडी घेता, छान गावठी आहे' प्रत्येकाशी, अगदी प्रत्येकाशी तो असंच प्रेमाने बोलायचा. मीही त्याच्याकडून अनेकदा भाजी घेतलेली आहे. एकदा त्याने मला मी घेतलेल्या लिंबांबरोबर, भरपूर कढीपत्ता असाच, मोफत देऊ केला होता. मी चार चार वेळा विचारलं होतं, 'काही नाही? नक्की?'. त्याने हसत ' काही नाही दादा' म्हटलं होतं.

वाईट माणसं त्यालाही भेटली. माझ्या आईच्या समोर एका बाईने अर्धा किलो टोमॅटो घेतले. आणि त्याने ते दिल्यावर दोन आणखी उचलून पिशवीत टाकले. त्यानेही ते बघितलं होतं, पण तरीही तिला तो सगळ्यांसारखं 'बरंय ताई' असंच म्हणाला आणि तसंच हसत म्हणाला. मग माझ्या आईला म्हणाला, 'कशी असतात बघा ना लोकं! काय करणार.' इतकं चांगलं कसं वागू शकायचा तो, मला खरंच प्रश्न पडायचा, पडतो. अशी माणसं फार दुर्मिळ असतात.

'त्याचे बाबा मोठ्या मार्केटात भाजी विकायचे, तू लहान असताना आपण नेहमी त्यांच्याकडून बटाटे घ्यायचो', आई मला त्याचे संदर्भ सांगत होती. पण तो गेला, हे ऐकून मला फार जास्त वाईट वाटत होतं, त्यामुळे मी त्याच विचारात होतो. कसा गेला, तर, तापाने. अंगावर काढला असणार. करेल तरी काय, पैसे कुठे असतील इतके त्याच्याकडे डॉक्टरांना द्यायला. असे अनेक विचार तेंव्हा माझ्या डोक्यात येत होते. Yet another 'good' person goes out of this world. धक्का बसला होता. 'पर...वा घेतलेली यार भाजी त्याच्याकडून...' मी म्हटलं, 'किती अकस्मात आहे हे!..' विचार थांबेना. पण पुढे दिवस सरत गेला. नेहमीची कामं होत राहिली. आणि नकळत या गोष्टीचा विचार मागे पडला.

चार दिवसानंतर मी असाच सकाळी गाडीने ऑफिसला चाललो होतो. ईद चा दिवस होता. माझ्या ऑफिसला नसली तरी ब-याच ऑफिसांसाठी ती सुट्टी होती. रस्ते रिकामे होते त्यामुळे गाडी चालवायचा निखळ आनंद मिळत होता. निवांत एका स्पीड ला गाडी लावून धरली होती. स्टिरिओ वर मला आवडणारी, 'कंट्री साँग्स' लागली होती. आणि हे गाण लागलं. कन्सास बँड चं, 'डस्ट इन द विंड'. चार ओळी ऐकताच मला तो भाजीवाला, त्याचा हसरा चेहरा, त्याच्याबरोबरचं माझं एक अन एक संभाषण, त्याचं जाणं, सग्गळं धडाधड मनाच्या प्रोजेक्टर वर फिरायला लागलं. 'ऑल वी आर इज डस्ट इन द विंड'... ही गाण्याची ओळ कानात घुमायची, आणि मनात असंख्य विचार. एकट्याने गाडीतून जाताना असाही मी गाण्यांची विजेरी घेऊन स्वतःला शोधत असतो. आज हा विचारही सोबत होता. पुढे थेट ऑफिस आलं एवढंच माहिती आहे; कारण दरम्यानच्या काळात मी याच 'ट्रान्स' मधे होतो.

हे ते गाणं: http://www.lyrict.info/2011/04/dust-in-wind-lyric-kansas.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा ... वपुंच्या एका कथेची आठवण झाली, एका टॅक्सीचालकाची कथा. अश्या चांगल्या लोकांची कमतरता नेहमीच जाणवत राह्ते.

>>चांगल्या माणसांचा तुटवडा भोवणार एक दिवस अशी भीती, नव्हे सबळ शक्यता वाटते. >>
>.एकट्याने गाडीतून जाताना असाही मी गाण्यांची विजेरी घेऊन स्वतःला शोधत असतो >>

सहमत अपूर्व. अगदी साधं सत्य परिणामकारकपणे उतरवलं आहे तुम्ही शब्दात.

अर्रे काय लिहिलंस यार ....
केवळ 'अपूर्व' स्टाईल....... खूपच आवडलं हे लिखाण.....

छान लिहिले आहे
आसपासचे बरेच चांगलेवाईट तर्हेवाईक भाजीवाले आठवले.
मुंबईत भैय्या लोकांना छान जमलाय हा धंदा, पण सारेच एकसारखे नसतात, किंबहुना चांगले अनुभव कमीच आहेत, खास करून काळ बदलतोय तसा धंदेवाईकपणा वाढत चाललाय.. बरेचदा गोड बोलणेही २० चा माल २५ ला विकायला म्हणून असते, आणि जाणवते हे..