दाक्षिणात्य चवीची हिरव्या मुगाची उसळ

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 14 August, 2013 - 08:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोड आलेले हिरवे मूग - दोन ते अडीच वाट्या
चवीनुसार : गूळ, मीठ व आमसूल
पाणी

वाटणासाठी :

धणे : २ टेबलस्पून
उडीद डाळ : १ टेबलस्पून
जिरे : १ टीस्पून
सुक्या लाल मिरच्या : ६
किसलेले कोरडे खोबरे : अर्धी वाटी
कढीपत्ता : ६-७ पाने
तेल : वरील जिन्नस भाजण्यापुरते

फोडणीसाठी :

तेल
मोहरी
सुक्या लाल मिरच्या : २
कढीपत्ता : २-४ पाने
हिंग
कोथिंबीर
हळद

सजावटीसाठी :

ओले खोबरे, कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

मोड आलेले हिरवे मूग वेगळे शिजवून घ्यावेत.
कढईत थोडे तेल तापवून त्यात अनुक्रमे धणे, जिरे, उडीद डाळ, लाल मिरच्या, कोरडे खोबरे व कढीपत्ता परतून घ्यावे. खूप परतायचे नाहीये. वरील जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्यावेत.
नॉन स्टिक पॅनमध्ये शिजवलेले मूग, वरील वाटण, चवीनुसार मीठ - गूळ - आमसूल एकत्र करावे व आवश्यकतेनुसार पाणी (२ वाट्या अंदाजे) घालून एक दणदणीत उकळी आणावी.

लोखंडाच्या छोट्या पळीत फोडणीसाठी तेल गरम करावे. गरम तेलात मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात अनुक्रमे लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर व हळद घालून गॅस बंद करावा. शिजलेल्या मुगांवर ही फोडणी घालावी व उसळ एकसारखी करून घ्यावी. वरून सजवण्यासाठी हवे असल्यास ओले खोबरे, कोथिंबीर भुरभुरावी.

पोळी, भाकरी, भातासोबत उसळ खावी.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात पाच वाट्या भरून उसळ झाली.
अधिक टिपा: 

१. आमसुलाऐवजी आमचूर पावडर वापरू शकता.
२. लाल मिरच्यांचे प्रमाण गरजेनुसार कमी करू शकता. पण चवीचा खमंगपणा त्या प्रमाणात येईलच ह्याची गॅरंटी नाही!
३. एकूण वेळात मूग शिजवण्याचा वेळ (१० ते १५ मिनिटे) व उसळ करण्याचा वेळ (२५ ते ३० मिनिटे) गृहित धरला आहे.
४. या पाककृतीचे काही खास दाक्षिणात्य नाव आहे, परंतु ते आठवत नसल्यामुळे दाक्षिणात्य चवीची हिरव्या मुगाची उसळ असे शीर्षक या पाककृतीला दिले आहे.
५. एरवीच्या मुगाच्या उसळीसारखीच ही उसळही दिसते. चवीत काय तो फरक, म्हणून वेगळा फोटो दिलेला नाही.

माहितीचा स्रोत: 
टीव्हीवरील एका शो मध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेल्या कृतीवरून साभार
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, सिंडरेला, बहुतेक त्या चवीच्या जवळपास जाणारी चव असेल... मसाल्यातले काही घटक सेम आहेत. मेधाची मुगा मोळोची कृती वाचली. तिने दिलेल्या कृतीत व ह्या पाककृतीत थोडाफार फरक आहे, पण चव तशीच लागत असणार! Happy

मी ह्या पद्धतीने चवळीची उसळ करते. कारण चवळी जरा चवीला उग्र असते. आता मुगाची करुन पाहिन. बहुतेकदा मुगाची उसळ मी लसूण फोडणी देवुन करते. आता अशी करुन बघेन....

दाक्षिणात्य पद्धतीच्या (कर्नाटक सोडून) गूळ, आमसूल वापरतात का भाजी आमटीत?
>>> तमिळनाडूत तरी आमसुलं माहित नाहीत, असा माझा अंदाज. गूळ भाजीआमटीत वापरत नाहीत.

मूळ रेसिपीत (विष्णू मनोहरांनी सांगितलेल्या) आमचूर पावडर वापरली होती, आणि त्या ऐवजी आमसुलं घातली तरी चालतील असे ते म्हणाले होते.

मंजू, छानच की!

ललिता-प्रीति, येस्स, बिनकांद्याची रेसिपी आहे आणि खमंग चव आहे! Happy