'अर्बन लीव्हज्' (Urban Leaves)च्या संस्थापिका प्रीती पाटील यांची मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 August, 2013 - 05:04

महानगरांमध्ये आपल्या घरात, बाल्कनीत, परसदारी किंवा टेरेसवर हौसेने बाग फुलविणार्‍यांची संख्या कमी नाही. ग्लोबल वॉर्मिंग, अन्न सुरक्षेसंबंधीच्या प्रश्नांच्या वातावरणात मुंबईसारख्या महानगराच्या मध्यवर्ती भागांमध्ये अर्बन फार्मिंग (नागरी शेती) सामुदायिक स्वरूपात (कम्युनिटी फार्मिंग) यशस्वीपणे अंमलात आणणार्‍या प्रीती पाटील यांचा प्रवास स्फूर्तिदायक आहे. शाश्वत शेतीचे धडे देणारे त्यांचे कार्य व त्यांची संस्था अर्बन लीव्हज् (Urban Leaves) यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा योग आला. त्यांची ही मुलाखत खास मायबोलीकरांसाठी!

p1 copy.jpg

प्रीती पाटील : संस्थापिका, 'अर्बन लीव्हज्'

मुंबईसारख्या महानगरात मध्यवर्ती भागात शेती का करावीशी वाटली? आणि तीही सामुदायिक स्वरूपात का?

आज मुंबईसारखे महानगर एवढ्या झपाट्याने पसरत चालले आहे की पूर्वी मुंबईच्या जवळपास असणारी शेते, भाजीपाल्याचे, फळांचे मळेही मुंबईपासून दूर दूर जात चालले आहेत. त्यामुळे आपल्याकडे भाजीमार्केटमध्ये येणारी भाजी, फळं बराच प्रवास करून बाजारात विकायला येतात व त्यानंतर आपल्यापर्यंत पोचतात. वाहतुकीचा वेळ, खर्च, इंधनाचा व्यय या सर्वांमुळे त्या भाजीची किंमतही वाढते, ताजेपणा कमी होतो आणि त्यातून आपला कार्बन फूटप्रिंटही वाढायला मदत होते. हे एक कारण झाले. दुसरे म्हणजे आपल्या शहरातून महिन्याला टनावारी ओला कचरा जमा होतो. हा कचरा मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जिरवायची, विकेंद्रित करायची व्यवस्था अद्याप नाही. कचर्‍याचे सुयोग्य व्यवस्थापन नसल्यामुळे तो कचरा वाहून नेताना खर्च होणारी मानवी ऊर्जा, वेळ, पैसा, आरोग्याला धोका आणि पुन्हा कार्बन फूटप्रिंटमध्ये वाढ या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर त्या त्या परिसरातील कचरा त्याच परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात जिरविणे हाच एक मार्ग सध्या तरी दिसतो. पण मग हा कचरा जिरवायचा कोठे? तर शहराच्या मध्यवर्ती भागातल्या किंवा ठिकठिकाणच्या उपनगरांमधील उद्यानांमध्ये व शहरी शेतांमध्ये! कारण आपल्या घरातल्या बागेत आपण ठराविक प्रमाणापलीकडे जास्त कचरा जिरवू शकत नाही. त्यामुळे शहरात हा कचरा जिरवून, त्या माध्यमातून शेती करण्यासारखा उत्तम उपाय नाही. सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात ही हिरवाई आजूबाजूच्या वातावरणासाठीही चांगली ठरते.

सामुदायिक शेती करण्याचे एक कारण म्हणजे शेती हा तसा वेळखाऊ व्यवसाय-उद्योग आहे. मुंबईसारख्या व्यस्त शहरामध्ये आपली नोकरी-कामधंदा सांभाळून लोकांना शेतीसाठी इतका वेळ देता येईलच हे शक्य नाही. छोट्या परिवारांमुळे आपल्यापाशी म्हणावे तसे मनुष्यबळ नाही. दुसरे म्हणजे शहरातील सध्याची जीवनशैली अशी आहे की कित्येकदा आपण आपल्या शेजार्‍यांनाही ओळखत नाही. आयुष्य चाकोरीबद्ध झाले आहे. अशा वेळी समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील लोकांनी एकत्र येऊन शेतीसारख्या प्रत्यक्ष अनुभव मिळणार्‍या उपक्रमात भाग घेणे, त्या निमित्ताने परस्पर-संवाद साधणे, मिळणारे पीक (भाज्या - फळे इ.) आपापसांत वाटून घेणे, त्या निमित्ताने निसर्गाच्या जवळ जाणे याच्यात खूप फायदे आहेत. अनेकांनी एकत्र येऊन केल्यामुळे अशा शेतीत वेळेचे व्यवस्थापन तर होतेच, शिवाय निरनिराळ्या कौशल्यांची माणसे एकत्र येतात, एकमेकांकडून खूप काही शिकायला मिळते.

'अर्बन लीव्हज्' ची संकल्पना कशी सुचली? त्या अगोदरच्या प्रवासाविषयी जरा सांगाल का?

मी नागपूर विद्यापीठातून फूड टेक्नॉलॉजी मध्ये बी. टेक. केले आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये १९९१ मध्ये केटरिंग ऑफिसर म्हणून रुजू झाले. आमच्या कॅन्टिनमध्ये रोज पाच ते सहा हजार लोकांचा स्वयंपाक होतो. त्यामुळे ओला कचरा, वाया जाणारे अन्न यांची सुयोग्य विल्हेवाट कशी लावायची हा आमच्यापुढे मोठा प्रश्नच होता. कचरा साठविला तरी त्याचा त्रास व्हायचा. आमच्या इमारतीच्या तीन हजार स्क्वेअर फूट टेरेसचा तेव्हा इतर कोणताच वापर होत नव्हता. मग तिथेच किचन गार्डन करावे व त्यात हा कचरा जिरवावा असा विचार मनात आला. दरम्यान, २००१ साली डॉ. आर. टी. दोशी यांच्या कामाचा परिचय करून घेत असताना त्यांनी वांद्र्याला टेरेसवर फुलवलेली शेती पाहिली. कचर्‍याचा वापर एक उत्तम स्रोत म्हणून कसा करता येईल याबद्दल त्यांचे मार्गदर्शन मिळाले. आमच्या कॅन्टिनच्या टेरेसवर तेव्हा मी एक झाड लावून आमच्या टेरेस गार्डनची सुरुवात केली. माझे बागेचे प्रयोग, त्यात येणार्‍या प्रश्नांवर उपाय शोधणे, काही वेगळे करता येते आहे का हे पाहणे, त्यासाठी आवश्यक माहिती जमविणे, नव्या गोष्टी - तंत्रे शिकणे असा काळ होता तो! मला तो छंदच जडला. आमच्या कॅन्टिनचा ओला कचरा मी ह्या बागेत जिरवायला सुरुवात केली. हळूहळू आमचे इतर सहकारी, कर्मचारीही बागेत रस दाखवू लागले. आज आमच्या पोर्ट ट्रस्ट टेरेसवरील ह्या बागेत १५० पेक्षा जास्त प्रकारची रोपे, झाडे आहेत. भाजीपाला, नारळाची झाडे, फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती आहेत. गेल्या १४ वर्षांमध्ये ही प्रगती झाली. तेव्हा माझ्याकडे शेती करण्याचा काहीएक अनुभव नव्हता. पण ओल्या कचर्‍याचे व्यवस्थापन करणे आणि त्यातून फळं, भाज्या यांसारखे खाण्यायोग्य, वापरता येणारे उत्पादन काढणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट होते.

दरम्यान मला श्री. दीपक सुचडे आणि प्रयोग परिवार व Natueco Farming च्या डॉ. दाभोळकरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कॅन्टिनच्या स्वयंपाकघरातला ओला कचरा बारीक करून बागेत वापरणे व 'अमृत मिट्टी' किंवा अमृत मातीचा बागेत उपयोग करणे यांमधून पोर्ट ट्रस्टचे टेरेस गार्डन अधिकाधिक समृद्ध होत होते. बागेतली माती जसजशी अधिक कसदार, सुपीक बनत गेली तसतसे बागेतून भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, औषधी वनस्पती, हर्ब्जचे उत्पादन होऊ लागले. हळूहळू आमच्या या सिमेंट काँक्रिटच्या जागेत निर्माण झालेल्या बागेच्या परिसरात वेगवेगळे पक्षी, फुलपाखरं दिसू लागली. निसर्गाच्या जवळ जाऊन काम करताना आम्हाला मिळणारा आनंद वर्णनातीत होता.

int01.jpg

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या टेरेस गार्डन मध्ये प्रीती पाटील

हे सर्व काम आम्ही कर्मचारी एकत्रितपणे करत होतो. आमच्या बागेची बातमी प्रसारमाध्यमांनी उचलली, छापून आणली, मुलाखती छापल्या गेल्या. आमचे सगळ्यांचे परिचय व छायाचित्रे प्रसिद्ध झाली. लोक आमच्या बागेमुळे आम्हाला ओळखू लागले. आमच्या या प्रकल्पात सामील कर्मचार्‍यांना प्रतिष्ठा मिळाली, बक्षिसं, सन्मान, प्रतिसाद मिळू लागले. हे सर्वांसाठी खूप उत्साहवर्धक होते.

आमच्या या बहरलेल्या बागेची, येथील मातीची आणि मिळणार्‍या फळफळावळं-भाज्यांची चर्चा जसजशी वाढू लागली तसतसे अनेक उत्साही लोक पोर्ट ट्रस्टच्या बागेला भेट द्यायला येऊ लागले. परंतु मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत प्रवेशासंबंधी व सुरक्षेसंबंधी काही बंधने होती. सर्वांना प्रवेश मिळणे अवघड होत होते. तेव्हा आतापर्यंत संपादन केलेले ज्ञान, माहिती व अनुभव इतरांबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात वाटले जावे यासाठी मला वेगळ्या माध्यमाची आवश्यकता भासू लागली. तसेच या बागेतून मिळालेले धडे समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोचविण्यासाठी काय करता येईल हाही विचार चालू होता. एव्हाना मला बागकामाची आत्यंतिक आवड-छंद असणार्‍या, निरनिराळ्या क्षेत्रात काम करणार्‍या, तसेच नागरी शेतीत रस असणार्‍या मैत्रिणीही मिळाल्या होत्या. आम्ही कायम भेटायचो, चर्चा करायचो. असेच एकदा आम्ही मैत्रिणी डायनिंग टेबलापाशी बसून कॉफी पीत असताना, बागकामाचे वर्कशॉप्स घेण्याची व त्यांद्वारे समाजातल्या विविध लोकांना एकत्र आणायची कल्पना सुचली. ही २००९ सालची घटना आहे. कल्पना सुचल्यावर एका मैत्रिणीने आमच्या या नागरी शेती चळवळीला नाव सुचविले, 'अर्बन लीव्हज्'! माझ्यासोबत इतर अनुभवी मैत्रिणीही होत्या. सर्वांच्या सक्रिय सहभागातून आमची कल्पना आकार घेऊ लागली. त्याच्या जोडीला आम्हाला विद्या वारिधि ट्रस्टचा खंदा आधारही मिळाला.

सामुदायिक नागरी शेतीची कल्पना तुम्ही प्रत्यक्षात कशी आणलीत?

सुरुवातीला आमचे अर्बन लीव्हज् चे ३-४ वर्कशॉप्स छान पार पडले. आम्ही अमृत माती कशी बनवायची तेही शिकवायचो. त्याला खूपच उत्तम प्रतिसाद मिळत होता. पण व्हायचे असे, की वर्कशॉप केल्यावर त्यातले थोडेच लोक शिकविलेल्या गोष्टी नंतर फॉलो करायचे. बरेच जण ते विसरून जायचे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही शिकविलेल्या गोष्टींचा त्यांच्याकडून सराव होत नव्हता. त्यावेळी आम्हाला माहीमच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक अविनाश कुबल भेटले. आमची अडचण त्यांच्या लक्षात आली. त्यांच्या उद्यानातील नुसती पडून राहिलेली, निरुपयोगी ठरलेली एक मोकळी जागा त्यांनी आम्हाला आमच्या शेतीसाठी देऊ केली. चाळीस फूट लांब आणि वीस फूट रुंदीच्या ह्या जागेत आम्ही आमचे वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. ही जागा एखाद्या टेरेस स्पेस सारखी होती. वर्कशॉप झाले की मग नंतर दर रविवारी सकाळी दोन तास आम्ही तिथे फॉलो-अप घ्यायचो. येथूनच आमच्या नागरी शेती चळवळीला खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला. हे आमचे सामुदायिक तत्त्वावर चालविलेले पहिलेच नागरी शेत होते. मुंबईत असा प्रयोग करणारा आमचाच ग्रुप सर्वप्रथम असेल. दर रविवारी घेतल्या जाणार्‍या फॉलो-अप मधून आम्हाला उत्साही व कामसू स्वयंसेवक मिळाले. अशा स्वयंसेवकांची हळूहळू एक फळीच तयार होत गेली. कालांतराने या स्वयंसेवकांमधील शिकून तयार, पारंगत झालेल्या स्वयंसेवकांनी आपापल्या नेतृत्वाखाली मुंबईच्या इतर भागांमध्ये सामुदायिक नागरी शेतीची सुरुवात केली.

अर्बन लीव्हज् चे उद्दिष्ट काय आहे?

मुंबईसारख्या सिमेंट कॉक्रिटच्या जंगलाने भरलेल्या महानगरात प्रत्येक भागात, उपनगरात, सामुदायिक नागरी शेती सुरू व्हावी, त्या त्या ठिकाणचा ओला कचरा काही प्रमाणात तिथे जिरवला जाऊन कचर्‍याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन व्हावे, मुंबईत हिरवाई वाढावी, नागरी शेतीच्या माध्यमातून लोकांनी एकत्रितपणे शहराच्या, स्वतःच्या व समाजाच्या आरोग्यासाठी सजग उपक्रम करावेत, निसर्गाच्या जवळ जाता यावे आणि हे सर्व करताना आपल्या आहारविषयक सवयी, जाणिवाही सुधाराव्यात या विचारांमधून आमचे उपक्रम चालू असतात.

सध्या अर्बन लीव्हज् ची सामुदायिक नागरी शेते मुंबईत कोणकोणत्या ठिकाणी आहेत?

आमच्या स्वयंसेवकांनी आपापल्या नेतृत्वाखाली सुरू केलेली नागरी शेते अंधेरी येथील भवन्सचे अ‍ॅडवेंचर अँड नेचर सेंटर, बोरिवली येथील इस्कॉनचे स्कूल (गोपाल गार्डन स्कूल), माटुंग्याचे डॉन बॉस्को स्कूल आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे कुलाबा येथील वनस्पती उद्यान या ठिकाणी आहेत. बाबुलनाथ येथील इस्कॉन मंदिराच्या टेरेसवर शेतीची नुकतीच सुरुवात केली आहे. यातील बरीचशी शेते टेरेसवर, सिमेंट काँक्रिटने बांधलेल्या जागेत आकाराला येत आहेत.

माहीमच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील आमच्या शेताबद्दल मी अगोदर सांगितले आहेच!
कुलाब्याच्या वनस्पती उद्यानात आम्हाला ५००० स्क्वेअर फीट मोकळी अशी सिमेंट काँक्रीटने बांधलेली व कोणताही वापर केला जात नसलेली जागा मिळाली आहे. त्या जागेचा अन्यथा काहीच उपयोग होत नव्हता. मग आम्ही तिथे फळझाडे, भाज्या, हर्ब्ज लावून त्या जागेचा पुरता कायापालट केला. आता लवकरच तिथून फळं, भाज्या वगैरेंचे उत्पादनही मिळू लागेल. मोकळ्या, वापरात नसलेल्या आणि निरुपयोगी ठरलेल्या जागांमध्येही शेती केली जाऊ शकते हे ह्या निमित्ताने लोकांच्या लक्षात येत आहे.

int1.jpg

शहरी शेतकरी सामुदायिक नागरी शेतात काम करताना

तुमच्या सामुदायिक नागरी शेतांमध्ये तुम्ही कोणकोणत्या तर्‍हेची उत्पादने व किती प्रमाणात घेता?

सध्या तरी मी फक्त पोर्ट ट्रस्टच्या शेताचीच आकडेवारी देऊ शकते. कारण बाकीची शेते ही तुलनेने खूपच बाल्यावस्थेत आहेत. पोर्ट ट्रस्टच्या बागेत एका मोसमात आम्हाला ६ डझन चिक्कू, १-२ स्क्वे. फुटाच्या जागेतून १० किलो हळद मिळते. याखेरीज ३ किलो आले, दोडका-पडवळ-दुधी इत्यादींच्या वेलींवरून प्रत्येक वेलीमागे १२ ते १५ किलो दोडके-पडवळ-दुधी, केळ्यांचे २५ किलोंचे घड, सीताफळांच्या झाडांवरून प्रत्येकी ३५ ते ४० सीताफळे, एका लिंबाच्या झाडावरून २०० लिंबे, या शिवाय इतरही अनेक पालेभाज्या, फळभाज्या, हर्ब्ज असे उत्पादन मिळते. बाकीच्या सामुदायिक नागरी शेतांमध्येही आम्ही खाण्यायोग्य फळे, भाज्या, हर्ब्जची लागवड करतो. सध्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात दर आठवड्याला आम्हाला दोन किलो भाजीचे उत्पादन मिळते. आठवड्यातून आम्ही तिथे फक्त दोन तास खर्च करतो. शेतात पिकलेली फळे, भाज्या सध्या तरी स्वयंसेवक व उपक्रमात सहभागी झालेले लोक आपसांत वाटून घेतात.

एका सामुदायिक नागरी शेतात साधारणपणे किती ओला कचरा जिरतो?

ओला कचरा हा कायमस्वरूपी, सातत्याने जिरविता येतो. १० बाय ३ च्या वाफ्यात ४-५ गोण्या भरून उसाची चिपाडे, ८० ते ९० किलो पालापाचोळा, स्वयंपाकघरातील ओला कचरा साधारणपणे एक किलो असे आरामात जिरविले जाते. नंतरही तिथे आवश्यकतेनुसार ओला कचरा जिरविला जातो. असे किती वाफे तुम्ही तुमच्या शेतात तयार करता त्यानुसार तिथे जिरणार्‍या ओल्या कचर्‍याचे प्रमाणही वाढत जाते.

तुमच्या कार्यशाळा व नागरी शेती उपक्रमांमध्ये अमृत मिट्टी किंवा अमृत मातीच्या वापरावर विशेष भर असतो. त्याबद्दल जरा सांगाल का?

हो. आपल्याला काय साध्य करायचे आहे ह्यापेक्षा पर्यावरणाला कशाची गरज आहे हे पाहायला शिकायचे असे मी आमच्या कार्यशाळांमध्ये कायम सांगत असते. सामान्यतः जंगलामधील जमीन ही उच्च प्रतीची समजली जाते. असे का? तर त्या जमिनीवर वर्षानुवर्षे पालापाचोळा, फळे-फुले, झाडांचे अवशेष, प्राण्यांचे अवशेष, प्राण्यांचे व पक्ष्यांचे मलमूत्र, किड्यांची शरीरे इत्यादी जमा होऊन, मिसळून त्यांचे विघटन होत असते. अशा जमिनीमधील कार्बन-नायट्रोजनचे तसेच जीवाणूंचे प्रमाण हे झाडांच्या वाढीसाठी परफेक्ट असते. ही प्रक्रिया घडून यायला किमान पाचशे वर्षे लागतात. अमृत मातीमध्ये निसर्गाच्या या तंत्राची नक्कल केली आहे. ही माती बनवायला किमान चार महिन्यांचा अवधी लागतो. अमृत माती बनविण्याची व तिच्या वापराची बेसिक माहिती आमच्या संकेतस्थळावर व ब्लॉगवर तपशीलवार दिलेली आहे. मात्र प्रत्येक ठिकाण, तेथील पर्यावरण, हवामान व आवश्यकता यांनुसार या कृतीत आपापल्या सोयीने थोडाफार बदल केला जाऊ शकतो. मीही आवश्यकतेनुसार अमृत मातीच्या तंत्रात थोडेफार प्रयोग व बदल केले आहेत.

int2.jpg

कष्टेविण फळ नाही!

तुमचे कोणकोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम असतात? कोणासाठी असतात? ज्यांना बागकामाचे किंवा शेतीचे काहीही ज्ञान नाही असे लोकही सहभागी होऊ शकतात का?

हो, हो, अगदी! आमच्याकडे अगदी शाळकरी वयातल्या मुलांपासून पेन्शनर आजी-आजोबांपर्यंत सर्व वयोगटांतील मंडळी शिकायला येतात. तसेच नानाविध क्षेत्रातील लोक या कार्यशाळांना उपस्थिती लावत असतात. आजतागायत सॉफ्टवेअर क्षेत्रातील लोक, वकील, डॉक्टर्स, सर्जन्स, व्यावसायिक, विद्यार्थी, चार्टर्ड अकाऊंटन्ट्स, गृहिणी इत्यादींनी आमच्या वर्कशॉपचा लाभ घेतला आहे. आम्ही दर दोन-तीन महिन्यांतून एकदा एक पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेतो. त्यात टेरेस गार्डन संदर्भातील माहिती, तंत्रे, स्लाईड्स, अनुभव, प्रात्यक्षिके यांचा समावेश असतो. तसेच अर्बन फार्मिंग किंवा कम्युनिटी फार्मिंग क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींची व्याख्याने, मार्गदर्शन असते. आजवर या वर्कशॉप्समध्ये आम्ही शिकवत असलेल्या गोष्टींखेरीज आहारतज्ज्ञ, वनस्पतीतज्ज्ञ, आरोग्यतज्ज्ञ, पर्माकल्चर तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लोकांना मिळाले आहे. ह्या कार्यशाळा सशुल्क असतात. या शिवाय आम्ही वार्षिक सदस्यत्वही ठेवले आहे. आमच्याकडे सर्व वयोगटांमधील लोक सदस्यत्व घेतात, येथे शिकतात आणि हळूहळू स्वयंसेवक म्हणून काम करू लागतात.

int3.jpg

कोवळी, ताजी भाजी मळ्यातून थेट पानात!

त्या नंतर ठिकठिकाणी आमच्या अर्बन कम्युनिटी फार्म्समध्ये दर रविवारी सकाळी आमचे दोन तासांचे फॉलो-अप्स असतात. कार्यशाळेत सहभागी झालेले लोक येथे येऊन शिकलेल्या तंत्रांचा, माहितीचा प्रत्यक्षात उपयोग करू शकतात. एखाद्या ग्रुपला त्यांच्यासाठी वेगळी, स्वतंत्र कार्यशाळा हवी असेल तर तशी आम्ही त्यांच्या जागेतही कार्यशाळा घेतो. अनेक सोसायट्यांचे लोक आपल्या सोसायटीच्या रिकाम्या जागेत किंवा टेरेसवर कम्युनिटी फार्मिंग करू इच्छितात. त्यांच्या मागणीवरून आम्ही त्यांच्या ग्रुपसाठी खास कार्यशाळा घेतो.

सध्या कॉर्पोरेट क्षेत्रातही पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, किंवा पृथ्वी दिनाच्या निमित्ताने अशा कार्यशाळा भरविण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही तिथेही कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच त्यांना हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित ठेवायचा नसतो. मग अर्बन कम्युनिटी फार्मिंगचा चालू उपक्रम करण्याकरता आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. टाटा ग्रुपबरोबर आमचे या संदर्भात काम चालू आहे.

ह्या अगोदरच मी वेगवेगळ्या ठिकाणच्या आमच्या कम्युनिटी फार्म्सचा उल्लेख केला आहे. आमचा तो उपक्रम तर सातत्याने चालू असतो. याखेरीज काही शाळांमध्येही आमचे कायमस्वरूपी, पूर्णवेळ उपक्रम सुरू झाले आहेत. त्यांत फक्त विद्यार्थीच नव्हे तर पालक, शिक्षक व इतर कर्मचार्‍यांचाही समावेश असतो. ह्या संदर्भात आम्हाला अजून खूप काम करायचे आहे. शाळांमधील कम्युनिटी फार्म्स या क्षेत्रात पोर्टलंडच्या डेलाफ्रोज विल्यम्स बाईंनी खूप काम केले आहे. परदेशांत शाळांमध्ये कम्युनिटी फार्म्स मोठ्या प्रमाणात चालविली जातात व तिथे सातत्याने काही प्रयोग केले जातात. बागकामातून, शेतीकामातून व बागेच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण दिले जाते. प्रात्यक्षिकातून मुलं शिकत जातात. त्यांची मोटर स्किल्स, सेन्सेस अधिक विकसित होतात. त्यांची चौकसबुद्धी, निसर्गाबद्दलची जाण वाढते. भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये अद्याप हे दृश्य दुर्मिळ आहे. या शिवाय आमचे कॉटन ग्रीन मधील मुलींच्या अनाथालयासाठीही काम चालू आहे.

int4.jpg

काळ्या मातीत गवसला आनंदाचा ठेवा!

आजकाल आपण म्हणतो की शहरांमधील घरांमध्ये परस्पर-संवाद हरवत चालला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातील सर्व सदस्य आपापले मोबाईल्स, लॅपटॉप, गेम्स, टी.व्ही. इत्यादी उपकरणांना चिकटून बसलेले असतात, किंवा आपापल्या उद्योगांत मग्न असतात. मुलं आईबाबांशी, आजी-आजोबांशी बोलत नाहीत. पण गंमत म्हणजे इथे वर्कशॉपला जेव्हा अशा पालकांच्या व मुलांच्या किंवा आजी-आजोबा व नातवंडांच्या जोड्या येतात तेव्हा त्यांच्यात बागेत - शेतात काम करताना, नवे तंत्र शिकून घेताना आपापसांत एक सहज संवाद निर्माण होत जातो. इथे शिकलेल्या गोष्टींचा प्रयोग ते त्यांच्या घरच्या बागेत करतात, त्याबद्दल आम्हाला सांगतात, स्वयंसेवक म्हणून उत्साहाने काम करतात - आणि यातून त्यांचा एकमेकांशी संवादही वाढतो. बागेत, निसर्गाच्या सान्निध्यात एकत्रितपणे काम करताना त्यांच्यातले नाते अधिक दृढ होत जाते.

शारीरिक श्रमांची किंवा मातीत काम करण्याची फारशी सवय नसलेल्या शहरी मंडळींना तुम्ही कुदळ, फावडे, खुरपे घेऊन मातीत काम करायला कसे उद्युक्त करता?

आपण कोणावर कसले काम करण्याची बळजबरी नाही ना करू शकत! त्यांना तसे करायची इच्छा आतून व्हायला पाहिजे. आम्ही कार्यकर्ते प्रात्यक्षिक देताना आपले हात मातीत घालतो, तिथे बागेत, शेतीत कष्ट करतो. आणि हे परिश्रम घेताना आम्हाला मिळणारा आनंद आमच्या चेहर्‍यांवर दिसतो. ते पाहून नव्या लोकांनाही आमचे अनुकरण करण्याची इच्छा होते. ओल्या मातीचा स्पर्श, त्या मातीचा गंध, रोपांना - झाडांना हाताळताना त्यातून मिळणारी अनुभूती ही काही औरच असते. तो अनुभव मिळाल्यावर लोक आपण होऊन श्रमांची कामेही स्वेच्छेने करू लागतात.

ह्या अगोदर तुम्ही वाड्या-वस्त्यांमधील मुलांसोबत काही उपक्रम केले होते त्याबद्दल सांगाल का?

हो, खूप पूर्वी मी असे काही उपक्रम केले आहेत. पण तेव्हा माझ्याजवळ मनुष्यबळ नव्हते. आणि असे उपक्रम करायला मनुष्यबळाची गरज प्रामुख्याने असते हे मला तेव्हा कळले. रोझरी स्कूल मार्फत रस्त्यावर राहणार्‍या काही मुलांना घेऊन मी असा एक उपक्रम केला होता. पण त्यांना चार पैसे कमावायची संधी मिळाली की ही मुले गायब व्हायची. तरी त्यांचा व्यवहारीपणा, आकलनशक्ती हे कौतुकास्पद होते. मी काही शिकविले की त्यांना ते लगेच कळायचे. कोणती झाडे लावायची याबद्दल त्यांच्या कल्पनाही भन्नाट असायच्या. एकजण सांगायचा, नारळ लावूयात - त्या झाडाचा प्रत्येक भाग वापरता येतो. कोणी सांगायचे - आपण गवती चहा लावूयात, म्हणजे मी मग तयार गवती चहाची टपरी लावेन. दुसरा म्हणायचा, आपण विड्याच्या पानांचा वेल लावूयात, म्हणजे मी पानपट्टीचा ठेला टाकेन...फार चुणचुणीत होती ती मुलं. पण दुर्दैवाने तो उपक्रम पुरेश्या मनुष्यबळाअभावी तेव्हा बंद पडला.

हे उपक्रम करताना तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

माझ्यासमोर मुख्य आव्हान असते ते स्वयंसेवकांच्या उपलब्धीचे. आमचे सर्व कार्य हे स्वयंसेवा तत्त्वावर चालू असते. त्यामुळे तसे कोणी बांधील नसतात. कधी कधी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपलब्ध असतात, तर कधी अगदीच तुरळक प्रमाणात! त्यामुळे नव्या व खास करून दीर्घकालीन कमिटमेंट्स घेताना या सर्वाचा विचार करावा लागतो. स्वयंसेवक हे आपापल्या सोयीने, वेळ काढून, आपल्या अन्य जबाबदार्‍या सांभाळून येत असतात. त्यामुळे त्यांच्यावर सक्ती करता येत नाही. शिवाय आम्हाला वेगळे असे फंडिंग नाही. त्यामुळे सध्या तरी पगारी माणसे ठेवू शकत नाही. ह्याचा परिणाम आम्ही हाती घेतलेल्या उपक्रमांवर होऊ नये म्हणून आमची धडपड चालू चालते.

int5.jpg

हिरवी पाती, जडली नाती!

आणि आमच्यातील प्रत्येकालाच घरच्या जबाबदार्‍या, नोकरी-व्यवसाय सांभाळून हे काम करायचे असते. ती कसरत करावीच लागते. नशिबाने मला नोकरीमुळे संस्थेने दिलेली राहण्याची जागा आहे, हाताखाली दोन मदतनीस आहेत. पण तरी संसाराच्या जबाबदार्‍या सुटत नाहीत. तिथे वेळ देऊन हे काम सांभाळायचे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही.

असे उपक्रम व्यावसायिक पातळीवर करता येऊ शकतात का?

नक्कीच करता येतील. परंतु त्यांतील कम्युनिटी स्पिरिट कितपत राहील याबद्दल मला शंका वाटते. तसे पाहायला गेले तर सामुदायिक शेती ही व्यावसायिक दृष्ट्या फार फायदेशीर नाही. कारण त्यातून मिळणारे फळे-भाज्या इत्यादींचे उत्पादन खूप मोठ्या समूहाला पुरेसे पडणारे नाही. पण आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांना अशा तर्‍हेची शेती करून अन्नाची चिंता काही प्रमाणात नक्की मिटवता येऊ शकते. त्यांना जोड-उत्पन्नाचे एक साधन मिळू शकते. त्यांचा आहार सुधारू शकतो. त्याच जोडीला अशा शेतीमुळे होणारा पर्यावरणाचा फायदा, समाजाचा व सहभागी होणार्‍या व्यक्तीचा फायदा या गोष्टी मोजता येणार्‍या नाहीत. निसर्गाच्या जवळ जाऊन काम करण्याचा अनुभव, त्या कामाच्या निमित्ताने परस्पर-संवाद साधणारा नागरी समाज, रसायनमुक्त शेतांतून मिळणारी ताजी फळे व भाज्या, शेतात काम करताना मिळणारे समाधान व तणावमुक्ती यांचे मोजमाप व्यावसायिक परिभाषेत कसे करणार?

यापुढे तुमच्या कोणत्या योजना आहेत? भविष्यात कोणत्या प्रकारचे उपक्रम हाती घेण्याचा विचार आहे? मुंबईबाहेर जाऊन काही काम करायचा विचार आहे का?

मुंबईबाहेर काम करायचा सध्या तरी विचार नाही. कारण मुंबईतच करण्यासारखे खूप आहे. परंतु मुंबईबाहेरचे ग्रुप्स नक्कीच आमच्या कार्यशाळांचा व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपापल्या ठिकाणी सामुदायिक नागरी शेतीचा उपक्रम सुरू करू शकतात.

कचरा उचलणारे कामगार, चिंध्या गोळा करणारे कामकरी असतात त्यांना या उपक्रमात सामील करून घ्यायचे माझ्या मनात आहे. कचरा व्यवस्थापनात त्यांची भूमिका फार मोलाची आहे. परंतु त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा नाही. नागरी शेती उपक्रमात त्यांचा सक्रिय समावेश कसा करता येईल याबद्दल सध्या विचार चालू आहे. तसेच ह्यातून त्यांना थोडे उत्पन्न किंवा लाभ व त्याच जोडीने श्रमप्रतिष्ठा प्राप्त करून देता येण्याची शक्यताही अजमावत आहे.

ह्याच बरोबर महिला संघटनांच्या साहाय्याने समाजातील दुर्बल, गरजू स्त्रियांना गटवार प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून सामुदायिक नागरी शेती उभी करण्याचाही मानस आहे.

int6.jpg

लहानग्यांनी केला शेतीकामाचा श्रीगणेशा!

शाळांमध्येही सामुदायिक स्वरूपाच्या नागरी शेतीचा प्रसार करायचे काम बरेच मोठे आहे. तिथे दीर्घकालीन उपक्रम करावा लागतो. शहरांमधील मुलांना अगदी लहान वयापासून निसर्गाची ओळख व्हावी, श्रमांचे मोल कळावे, अन्न-धान्य-शेतीविषयी सजगता यावी, त्यांच्या आहाराच्या सवयी सुधाराव्यात, शेतीच्या माध्यमातून त्यांच्या जाणिवांचा विकास व्हावा असे फार वाटते. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. परदेशांतील अनेक शाळांमध्ये मुलांना फार्मिंगच्या अभिनव पद्धती - छतावर, भिंतींवर शेती कशी करावी, व्हर्टिकल फार्मिंग कसे करावे याचे सप्रयोग धडे, प्रात्यक्षिके करायला मिळतात. त्यांचे उपक्रम खरोखरीच वाखाणण्याजोगे आहेत. त्यातून मुलांचे निसर्गाशी असलेले नाते तर पक्के होतेच, परंतु त्यांना श्रममूल्यांची शिकवण मिळते, आत्मविश्वास वाढतो, आपण समाजासाठी, पर्यावरणासाठी काही चांगले करू शकतो ही भावना त्यांच्यात जागृत होते आणि अन्नाशी असलेले त्यांचे नाते बदलते.

काही लक्षात राहिलेले अनुभव?

तसे अनुभव बरेच आहेत. प्रत्येक कार्यशाळेत व नंतरच्या फॉलो-अपमध्ये आम्हाला कोणी ना कोणी येऊन त्यांचे अनुभव सांगत असतात. मला लक्षात राहिलेला एक अनुभव म्हणजे, मुंबईतील अतिशय उच्चभ्रू अशा शाळेतील चिमुरड्यांची सहल आमच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बागेत आली होती. त्यातल्या काही मुलामुलींना मी अमृत माती तयार करण्याच्या कामात 'मला मदत कराल का,' म्हणून विचारले, आणि त्याबद्दल त्यांना बक्षीस द्यायचेही कबूल केले. त्याप्रमाणे त्यातल्या काही मुलांनी मला मदत केली. बक्षीस म्हणून मी त्यांना बागेतल्या झाडांवरची पिकलेली फळे जेव्हा आपल्या हाताने तोडून घ्या म्हणून सांगितले तेव्हा एका चिमुरडीने मला नवलाईने विचारलेच, ''आंटी, मी खरंच फळ तोडू का? तुम्ही मला फ्री देणार फळ? फ्री?? त्याचे पैसे नाही घेणार?'' मला त्या वेळी खरेच हसावे की रडावे कळेना! त्या मुलीला पैसे न देता फळ घेणे, झाडावरून आपल्या हाताने फळ तोडणे ही संकल्पनाच माहीत नव्हती. आपल्या लहानपणी आपण कितीतरी वेळा झाडांवरून फळे बिनबोभाटपणे तोडली असतील. पण या मुलांचे विश्वच वेगळे आहे. त्यांना फळं, भाज्या ह्या मार्केटमधून विकत घ्यायच्या असतात हेच माहीत आहे. निसर्ग आपल्याला हे सर्व विनामूल्य, मोफत देत असतो हेच त्यांना माहीत नाही.

int7.jpg

हिरवाईचे स्वप्न आणि स्वप्नाचे शिल्पकार!

तुम्हाला व्यक्तिशः या उपक्रमांमधून काय मिळते?

मला माणसे जोडायला, त्यांच्याशी संवाद साधायला, नवनवीन मित्रमैत्रिणी मिळवायला फार आवडते. आणि फळाफुलांमध्ये-झाडांमध्ये मी फार पूर्वीपासून रमायचे. माझ्या ह्या दोन्ही आवडी मला या माध्यमातून खूप उत्तम तर्‍हेने जोपासायला मिळतात. अर्बन लीव्हज् च्या माध्यमातून मला खूप जिव्हाळ्याचे मित्रमैत्रिणी, समविचारी स्नेही मिळाले आहेत. खूप प्रकारची माणसे जोडायला मिळाली आहेत. मी कायम सांगत असते, की अर्बन लीव्हज् हे कोणा एका व्यक्तीचे किंवा समूहाचे नाही. ते सर्वांचे आहे. सगळ्यांचे इथे स्वागत आहे. आम्ही सर्वजण मिळून जेव्हा काम करतो तेव्हा त्या कामातून आम्हाला मिळणारे समाधानही अफाट असते. आपण समाजात काही सकारात्मक घडवून आणण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलत आहोत ही भावनाही प्रेरणा व उत्साह देणारी असते. आमच्या उपक्रमांना समाजातूनही भरघोस प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. आजवर प्रसारमाध्यमांनी आमच्या मुलाखती घेऊन, आमच्यावर लेख छापून तसेच वेगवेगळ्या रेडियो - टी.व्ही. कार्यक्रमांद्वारा आमचे कार्य समाजासमोर आणले आहे. आमच्या कार्यावर आधारित एक माहितीपटही बनत आहे. गेली अनेक वर्षे नॅशनल कौन्सिल फॉर फ़्रेंड्स ऑफ ट्रीज संस्थेकडून आमच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बागेला पहिले बक्षीस मिळत आहे. ही सर्व केलेल्या कामाचीच पावती आहे. आणि आमच्या कामामुळे म्हणा, पण मुंबईसारख्या अतिशय गर्दीच्या, व्यस्त शहरातही अशा तर्‍हेचे उपक्रम करता येऊ शकतात हे लोकांना कळू लागले आहे. यापेक्षा अधिक काय हवे?

अर्बन लीव्हजच्या कार्याविषयी, कार्यशाळांविषयी, स्वयंसेवा संधीविषयी येथे अधिक माहिती कळू शकेल.

संकेतस्थळ

पूर्विताचा ब्लॉग

फेसबुक पान

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान मुलाखत.. शहरीकरणाला चटावलेल्या शहरी लोकांना निसर्गाच्या जवळ नेण्याचं उत्तम सामाजिक कार्य करणार्‍या प्रीती पाटील यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद:)

वेगळ्याच कार्याची आणि व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद अकु!
तू मुलाखत नेहमी नेमकी शब्दबद्ध करतेस!

मला नेहमी एक प्रश्न पडतो. कदाचित प्रिती पाटील उत्तर देऊ शकतील.
प्लास्टिकच्या टबात/कुंडीत भाज्या किंवा फळे पेरल्याने प्लास्टिकचा परिणाम त्यावर होत नाही का?

मस्त मुलाखत !
वत्सला तुझ्या सगळ्याच पोस्टला +१
प्लास्टिकच्या टबात/कुंडीत भाज्या किंवा फळे पेरल्याने प्लास्टिकचा परिणाम त्यावर होत नाही का? >>>>> अगदी अगदी मला ही हा प्रश्न पडतो नेहमी

आसपासच्या उपलब्ध चीजवस्तुंच्या जाणीवपूर्वक केलेल्या सदुपयोगामुळे बहरास आणलेली "अर्बन लिव्हज" ची शेती बघून मी नतमस्तक झालो आहे.

प्रीती पाटील ह्यांस मानाचा मुजरा!

अरुंधती,
उत्तम संकल्पनेवरील चांगल्या कामास, चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

वा!!!
अरुंधती, तुझे अभिनंदन. अशा चांगल्या व्यक्तिमत्त्वाची आणि चांगल्या उपक्रमाची ओळख करून दिल्याबद्दल.

खूप छान ओळख झाली. प्रेरणादायी आहे संकल्पना.

मुंबईसारख्या शहरात अशा कामांची खरोखरच गरज आहे. मराठी विज्ञान परिषद आणि मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभगातर्फेही अर्बन फार्मिंगकरता मार्गदर्शन मिळते.

धन्यवाद अरुंधती.

अतिशय सुंदर मुलाखत.
अकु, अगदी नेमके प्रश्न विचारले आहेत, आणि प्रीती पाटील ह्यांनी ही खूप छान उत्तरं दिली आहेत.
प्रीती ह्यांना खूप शुभेच्छा. अतिशय उपयुक्त असं कार्य त्या करत आहेत.

Pages