अवयवदान

Submitted by मामी on 6 August, 2013 - 02:46

शतेषु जायते शूर:, सहस्त्रेषु च पंडीत:
वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवति वा न वा

दानशूर असणं असं दुर्मिळ मानलं गेलंय. गरजूंना अन्न, पैसे, कपडे, शिक्षण, निवारा, नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी अनेकजण आपापल्या परीनं मदत करत असतात. पण तुमच्या आर्थिक, सामाजिक अथवा जेंडरबेस्ड पातळीच्याही पल्याड जाऊन केवळ मानव आहात म्हणून इतर मानवांकरता देण्यासाठी तुमच्याकडे एक नाही तर अनेक देणग्या आहेत. अवयवदान!

अवयवदानाची सुरूवात झाली ती बोस्टनला - १९५४ मध्ये किडनी प्रत्यारोपणानं. या शस्त्रक्रियेत एका जुळ्या भावाची किडनी त्याच्या आयडेंटिकल जुळ्या भावाला बसवण्यात आली. त्या आधीही नेत्रदान आणि त्वचादान सुरू झालं होतं. पण किडनी प्रत्यारोपण हे एक मोठं पाऊल होतं.

जागतिक पातळीवर अवयवदानाकरता स्वसंमतीच्या 'ऑप्ट इन' आणि 'ऑप्ट आऊट' या दोन पध्दती आहेत. ऑप्ट-इन पद्धतीत ज्या दात्यांनी खास फॉर्म भरून आपली संमती जाहीर केली असेल अशांनाच दाते समजण्यात येतं. तर ऑप्ट-आऊट पद्धतीत 'अवयवदान करायचे नाही' असा नकार दिला नसलेल्या उर्वरीत सगळ्यांना ते दाते आहेत असं गृहीत धरलं जातं. भारतात 'ऑप्ट-इन' ही पद्धत अवलंबली जाते.

ऑप्ट-आऊट पध्दतीचा स्वीकार केल्यास दात्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढते. उदा. जर्मनीसारख्या देशात ऑप्ट-इन पध्दत आहे. तेथे एकूण लोकसंख्येच्या १२% दाते आहेत. तर त्यांच्या शेजारच्या ऑस्ट्रियामध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक साम्य असलं तरी केवळ ऑप्ट्-आऊट पध्दत स्विकारल्यामुळे एकूण लोकसंख्येच्या ९९.९८% दाते आहेत

इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात ही संकल्पना अजून सहजासहजी स्विकारली गेली नाहीये. यामागे धार्मिक, सांस्कृतिक, अज्ञानामुळे पुरेशी सजगता नसणे, अंधश्रद्धा असे अनेक घटक असू शकतात. शिवाय अवयवदानाकरता आवश्यक असलेली यंत्रणाही सर्वत्र उपलब्ध नाहीये. भारतात सर्व अवयवदाते आणि अवयवग्राहक यांना राष्ट्रीय पातळीवर एकत्र आणणारी यंत्रणा अजून तरी अस्तित्वात नाही. अशा संस्थेची अत्यंत निकडीची गरज आहे.

त्यामुळे भारतात अनेक रूग्ण अवयवांची वाट पाहत असतात. लोकसंख्येच्या मानाने असे अवयवदाते मिळणं भारतात विरळाच आहे. भारतात मधुमेहींची संख्या खूपच जास्त आहे. मधुमेह हा अनेक अवयव निकामी करू शकतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांना अशा अवयवांची अत्यंत गरज भासते.

गेल्या वर्षीच्या म्हणजे २०१२च्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त दान अर्थातच किडनीचं होतं. त्यापाठोपाठ हृदयातील व्हाल्व्हज, हृदय, यकृत आणि फुफ्फुसं दान केली गेली. मात्र वेटिंगलिस्टवर असलेल्या एकूण लोकांपैकी ९०% लोकांना अवयव न मिळाल्याने मृत्युमुखी पडावे लागते. किडनीची गरज असलेल्या ३० व्यक्तींपैकी केवळ एका व्यक्तीलाच किडनी मिळते तर दरवर्षी जवळजवळ २५,००० लोकांना यकृताची गरज असते पण फक्त ८०० यकृतं प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होतात.

मृत शरीरातून अवयव काढून ते स्टोअर करून ठेवता येतात मात्र हा कालावधी प्रत्येक अवयवाकरता वेगवेगळा असतो. उदा. हृदय - ३ तास, यकृत आणि स्वादुपिंड - १२ तास, किडनी - २४ तास, कॉर्निया - २ आठवडे, कानाच्या आतील भाग, त्वचा, बोन मॅरो - ५ वर्षे, हृदयातील व्हाल्व्हज - १० वर्षे.

या पार्श्वभूमीवर, प्रत्येक सजग, सुशिक्षित आणि सामाजिक बांधिलकी मानणार्‍या व्यक्तीने अवयवदानाचा फॉर्म भरलाच पाहिजे. शिवाय आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींनाही अवयवदानाचं महत्त्व समजावून दिलं पाहिजे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे जास्तीत जास्त ४० व्यक्तींना जीवनदान मिळू शकतं हे लक्षात घ्या. तेव्हा ज्योत से ज्योत जलाते चलो ......

अवयवदान : FAQs

१. अवयवदान म्हणजे नक्की काय? ते कसे करतात?

एखाद्या जिवंत अथवा मृत मानवी शरीरातील अवयव वा टिशूज (tissues) त्या शरीरातून काढून दुसर्‍या मानवी शरीरात त्यांचे प्रत्यारोपण करणे म्हणजे अवयवदान. याला दान म्हणतात कारण असे करण्याबाबत त्या दात्याची संमती घेतलेली असते.

२. अवयवदान करणे भारतात कायदेशीर आहे का?

हो. नक्कीच. Transplantation of Human Organs Act (THOA), 1994 या अ‍ॅक्टद्वारे अवयवदान आणि 'ब्रेनडेड' या संकल्पना स्विकारल्या गेल्या आहेत. मात्र अवयव खरेदी-विक्रीवर कायद्याने बंदी आहे. म्हणजे या व्यवहारात पैशाची देवाणघेवाण कायदेशीर नाही.

३. कोणकोणते अवयव दान करता येतात?

हृदय (heart), यकृत (liver), मूत्रपिंड (kidneys) यासारखे अवयव (organs) तसेच त्वचा, कॉर्निया, बोन मॅरो सारख्या टीशूज (tissues) दान करता येतात. यातील काही जिवंतपणीही दान करता येतात तर काही मरणोत्तर.

जिवंत असताना आपण आपल्या आरोग्याला सांभाळून आपण किडनी, रक्त, बोन मॅरो, बोन्स, त्वचा, ब्लड सेल्स आणि काही अवयवांचा (यकृत, फुफ्फुसं आणि दुर्मिळ केसेस मध्ये स्वादुपिंड आणि आतडी) काही भाग दान करता येतो.

तर मरणोत्तर अवयवदानात वर दिलेल्यां व्यतिरीक्त अजून कितीतरी अवयव आणि टीशूज दान करू शकतो - फुफ्फुसं (lungs), आतडी (intestine), स्वादुपिंड (pancreas), हृदयातील व्हॉल्व्हज (heart valves), हृदय, रक्तवाहिन्या असे एकूण ३४ अवयव व टिशूज. न्युझिलंडच्या क्लिंट हॅलॅमवर तर हाताच्या प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

४. अवयवदानाचा फॉर्म कोणाला आणि कोठे भरता येतो?

कोणीही कायद्याने सज्ञान आणि ६५ वर्षापर्यंतची कोणातीही व्यक्ती 'डोनर' बनू शकते. अर्थात काही अटी पाळूनच. अशा व्यक्तीला स्वत:लाच काही मोठे आजार नसावेत. शक्यतो मधुमेह, उच्चरक्तदाब अथवा हृदयरोगाच्या रुग्णांचे अवयव पूर्णपणे निरोगी असण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांना सगळे अवयव दान करता येत नाहीत. मनोरुग्णांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव असल्याने त्यांनाही दाता म्हणून ग्राह्य धरले जात नाही.

अवयवदानाची संमती दर्शवणारा फॉर्म भारतीय सरकारच्या http://mohfw.nic.in/ या वेबसाईटवरून उतरवून भरता येतो. त्याव्यतिरीक्त इतर अनेक संस्था, एनजीओज तर्फेही असा फॉर्म भरता येतो. फॉर्म स्वीकारला गेल्यानंतर दात्यांना एक 'डोनर कार्ड' देण्यात येते. ते नेहमी आपल्याजवळ बाळगावे. शिवाय आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना याची कल्पना देऊन ठेवावी.

मृत व्यक्तीने तिच्या हयातीत फॉर्म भरला नसेल तरीही अशा व्यक्तीच्या मृत्युनंतर त्वरीत जवळच्या नातेवाईकांनी हालचाल करून अवयवदानाची संमती देऊन त्या व्यक्तीचे अवयव दान करता येतात.

५. मेंदू बंद पडल्याने मृत्यु पावणे (ब्रेन डेड) आणि हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यु पावणे (कार्डिआक डेथ) यात फरक काय? त्यामुळे अवयवदानावर काय परिणाम होतो?

ब्रेन डेड म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे निकामी झालेला असतो. त्याचे कार्य पूर्णपणे बंद पडलेले असते आणि त्यात काहीही सुधारणा होण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. मात्र व्हेंटिलेटरवर ठेवल्यास अशा व्यक्तीचे हृदय काम करत असते. त्यामु़ळे जोवर ते मशिन सुरू आहे, तोवर ती व्यक्ती 'जिवंत' आहे असं म्हणू शकतो. हात लावल्यास त्वचाही गरम असते कारण मशिनमुळे रक्तप्रवाहही सुरू असतो. मात्र वैद्यकीय दृष्ट्या अशी व्यक्ती मृत म्हणूनच धरली जाते. मात्र रक्तप्रवाह सुरू असल्याने अशा व्यक्तींचे अवयव शाबुत असतात आणि त्यामुळे दानाकरता अत्यंत योग्य ठरतात.

याउलट हृदयक्रिया बंद पडून मृत्यु आल्यास महत्त्वाचे अवयव त्वरीत निकामी होण्यास सुरूवात होते. त्यामुळे अशा व्यक्तींची किडनी, यकृत वेळेवर काढून घेण्याकरता अत्यंत जलद हालचाल करण्याची गरज आहे. मात्र हाडे, त्वचा, हृदयाचे व्हाल्व्हज, कॉर्निया इ अवयव चोवीस तासात दान करता येतात.

६. भारतात अवयवदानासाठी इतर कोणत्या संस्थांतर्फे फॉर्म भरता येतो?

वर दिलेल्या सरकारी वेबसाईट व्यतिरीक्त सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्येही हे फॉर्म जाऊन भरता येतील. तसेच या क्षेत्रात काम करणार्‍या इतर अनेक एन्जीओज च्या वेबसाईटवर हे फॉर्मस उपलब्ध आहेत. काही संस्थांच्या वेबसाईटवर डायरेक्ट डोनर्स कार्डस अव्हेलेबल आहेत. त्याचा प्रिंटआऊट काढून, तो भरून स्वतःजवळ ठेवता येतं.

७. अवयवदान केल्यानं मृत शरीर खराब दिसू शकतं का?
नाही. अवयव काढून घेतल्यानंतर शरीर विद्रुप दिसणार नाही याची काळजी घेतली जाते.

संदर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/Organ_donation
http://www.pbs.org/wgbh/aso/databank/entries/dm54ki.html
http://www.organtransplants.org/understanding/death/
http://www.donatelifeindia.org/organinindia.php
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Cadaver-donation-sees-spurt...
http://www.donateorgans.net/faqs.html
ToI, Tuesday, 6 August 2013
**************************************
डिस्क्लेमर :
मी स्वतः डॉक्टरही नाही किंवा या विषयाचे मला ज्ञानही नाही. पण अवयवदानाचं महत्त्व मात्र मला मनापासून पटलं आहे. इंटरनेटवर या विषयाची भरपूर माहिती उपलब्ध आहे. पण एका सामान्य वाचकाच्या दृष्टीकोनातून ती संकलित करून मायबोलीच्या वाचकांपर्यंत पोहोचवावी या हेतूने हा लेखप्रपंच केला आहे.

विषयव्याप्ती अतिशय मोठी आहे आणि समजून घेण्याकरता तांत्रिक ज्ञानाची गरज आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे काही चुका असतील तर जरूर दाखवून द्याव्यात. काही महत्त्वाची माहिती माझ्याकडून लिहायची राहून गेली असेल तरी नक्कीच द्या. इथे अ‍ॅड करेन.
**************************************************
याच विषयावरील मायबोलीवरचे इतर धागे :
कविन : http://www.maayboli.com/node/38727
मुग्धानंद : http://www.maayboli.com/node/23686

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,

तुमची तळमळ पोहोचली! Happy अवयवदानाच्या बाबतीत एक वेगळाच रंजक मुद्दा नजरेस आला. अवयवाचे रोपण स्वीकारल्यावर याचकाच्या आवडीनिवडी, व्यक्तिमत्व, कौशल्ये, इत्यादिंत फरक पडू शकतो. इकडे काही प्रत्यक्ष प्रसंग दिलेले आहेत (इंग्रजी दुवा). जाळ्यावर आजून बरेच सापडावेत.

आ.न.,
-गा.पै.

छान धागा, माहीती..
नेत्रदान करायचे आहेच डोक्यात, याबद्दलही आता विचार करतो.
लोकांनी चुकीचे समज आणि अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकल्या तर यात काही फार अडचणी येऊ नयेत.

अवयव काढून घेतल्यानंतर शरीर विद्रुप दिसणार नाही याची काळजी घेतली जाते.>>>> हा एक मुद्दाही तसा निकालात आहेच

झेडटीसीसी पुणे यांची वेबसाईट
http://www.ztccpune.com/
Ms.Arti Gokhale,

489 Rasta Peth,

Sardar Moodliar Road,

Pune 411011
त्यांच्याशी मी मायबोलीवर असलेल्या अवयवदानाच्या जागृती बाबत बोललो तसेच त्यांना या विषयावरील धाग्याच्या लिंकही पाठवल्या आहेत.ztccpune@gmail.com यावर त्यांचेशी संपर्क साधता येईल.वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या अपप्रवृत्तींमुळे अवयवदानाचा दुरुपयोग तर होणार नाही ना? अशी शंका अनेकांच्या मनात असते. त्या विषयी त्या म्हणाल्या कि ब्रेन डेड पेशंट बाबत तसे होत नाही. झेडटीसीसी याबाबतच कोऑर्डिनेट करते.

व्वा उत्तम माहिती ..
एक बाळबोध प्रश्न ,
<< ६५ वर्षापर्यंतची कोणातीही व्यक्ती 'डोनर' बनू शकते. >> हे फॉर्म भरण्यासंदर्भात आहे कि मृत्यूच्या संदर्भात आहे .? म्हणजे आपला मृत्यू ६५ वयवर्षाच्या नंतर झाला तर दान नाही करता येत का .?

मी नियमितपणे रक्तदान करतो. नुकतेच बोन मेरो दानाकरता नोंद केली आहे. हे वर सांगितलेले सगळे मला करायचे आहे पण मी अजून त्याकरता काही हालचाल केलेली नाही कारण माझे वयवर्ष २२ आहे. त्यामुळे मला मरण येण्यास अजून अवकाश असेल असे मला वाटते.
तसेच यामध्ये आपल्याकडची यंत्रणा कशी आहे असाही प्रश्न पडतो (शंका येते)..
म्हणजे माझ्याकडे सांभाळायला काही कागदपत्रे येऊन वर्षानुवर्ष ते सांभाळायचे आणि नंतर काहीतरी नियम बदलून भलतेच काहीतरी व्हायचे असे करण्यापेक्षा हे जरा सावकाश करावे असे मला वाटते ..
आपला दृष्टीकोन कळवावा . हे सगळे आत्ताच करून ठेवावे कि नंतर करावे (नंतर मी विसरणार नाही)..

बोनमेरो रजिस्ट्री बनवण्याचे काम एका संस्थेने हाती घेतले आहे, इन्फोसिस फाउंडेशनने यात जवळपास २५० कोटी गुंतवले आहेत. भारतात याची अत्यंत कमतरता आहे म्हणे. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी हे करणे गरजेचे आहे.
त्या संस्थेबद्दल सविस्तर माहिती लवकरच टाकतो इथे..

धन्यवाद ..

बोन मॅरो रजिस्ट्री भारतात होत नव्हती असे एका कँसर पेशंटच्या नातेवाईकाकडुन ऐकले होते. आता सुरु झाली ही खुप चांगली गोष्ट आहे.

मला वाटते ६५ व्या वर्षांनंतरही अवयवदान करता येते. माझ्या आजोबांनी नेत्रदान केलं त्यांचं वय सत्तरच्या पुढे होतं. काही दिवसांपूर्वी आमच्या शेजारच्या आजी गेल्या (७८) त्यांनीही देहदान केलं.

मला वाटते ६५ व्या वर्षांनंतरही अवयवदान करता येते>>>>>> माझ्या वडिलांचे ८३ व्या वर्षी नेत्रदान केले.त्यामुळे कदाचित वय हा फॅक्टर नसून काही आजार इ.शी संबधित असावा.(दुसर्‍या धाग्यात याविषयी माहिती आहे.)

पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. किडनी रॅकेट प्रकरणात नव्याने आणखी तीन रुग्णालयांची नावे समोर आली आहेत. पुण्यातील वानवडी येथील इमानदार, ठाण्यातील ज्युपिटर, व कोईम्बंतूर येथील के.एम.सी.एच ही तीन रुग्णालये असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या रुग्णालयात देखील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ज्या प्रकारे बनावट कागदपत्राद्वारे एजंटच्या मार्फत किडणी प्रत्यारोपण करण्यात आले. तशाच प्रकारे या तीन रुग्णलयात देखील किडणी प्रत्यारोपण झाल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितलं.

https://lokmat.news18.com/amp/maharashtra/pune/shocking-revelation-in-pu...

Pages