अवयवदान

Submitted by मामी on 6 August, 2013 - 02:46

शतेषु जायते शूर:, सहस्त्रेषु च पंडीत:
वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवति वा न वा

दानशूर असणं असं दुर्मिळ मानलं गेलंय. गरजूंना अन्न, पैसे, कपडे, शिक्षण, निवारा, नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी अनेकजण आपापल्या परीनं मदत करत असतात. पण तुमच्या आर्थिक, सामाजिक अथवा जेंडरबेस्ड पातळीच्याही पल्याड जाऊन केवळ मानव आहात म्हणून इतर मानवांकरता देण्यासाठी तुमच्याकडे एक नाही तर अनेक देणग्या आहेत. अवयवदान!

अवयवदानाची सुरूवात झाली ती बोस्टनला - १९५४ मध्ये किडनी प्रत्यारोपणानं. या शस्त्रक्रियेत एका जुळ्या भावाची किडनी त्याच्या आयडेंटिकल जुळ्या भावाला बसवण्यात आली. त्या आधीही नेत्रदान आणि त्वचादान सुरू झालं होतं. पण किडनी प्रत्यारोपण हे एक मोठं पाऊल होतं.

जागतिक पातळीवर अवयवदानाकरता स्वसंमतीच्या 'ऑप्ट इन' आणि 'ऑप्ट आऊट' या दोन पध्दती आहेत. ऑप्ट-इन पद्धतीत ज्या दात्यांनी खास फॉर्म भरून आपली संमती जाहीर केली असेल अशांनाच दाते समजण्यात येतं. तर ऑप्ट-आऊट पद्धतीत 'अवयवदान करायचे नाही' असा नकार दिला नसलेल्या उर्वरीत सगळ्यांना ते दाते आहेत असं गृहीत धरलं जातं. भारतात 'ऑप्ट-इन' ही पद्धत अवलंबली जाते.

ऑप्ट-आऊट पध्दतीचा स्वीकार केल्यास दात्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढते. उदा. जर्मनीसारख्या देशात ऑप्ट-इन पध्दत आहे. तेथे एकूण लोकसंख्येच्या १२% दाते आहेत. तर त्यांच्या शेजारच्या ऑस्ट्रियामध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक साम्य असलं तरी केवळ ऑप्ट्-आऊट पध्दत स्विकारल्यामुळे एकूण लोकसंख्येच्या ९९.९८% दाते आहेत

इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात ही संकल्पना अजून सहजासहजी स्विकारली गेली नाहीये. यामागे धार्मिक, सांस्कृतिक, अज्ञानामुळे पुरेशी सजगता नसणे, अंधश्रद्धा असे अनेक घटक असू शकतात. शिवाय अवयवदानाकरता आवश्यक असलेली यंत्रणाही सर्वत्र उपलब्ध नाहीये. भारतात सर्व अवयवदाते आणि अवयवग्राहक यांना राष्ट्रीय पातळीवर एकत्र आणणारी यंत्रणा अजून तरी अस्तित्वात नाही. अशा संस्थेची अत्यंत निकडीची गरज आहे.

त्यामुळे भारतात अनेक रूग्ण अवयवांची वाट पाहत असतात. लोकसंख्येच्या मानाने असे अवयवदाते मिळणं भारतात विरळाच आहे. भारतात मधुमेहींची संख्या खूपच जास्त आहे. मधुमेह हा अनेक अवयव निकामी करू शकतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांना अशा अवयवांची अत्यंत गरज भासते.

गेल्या वर्षीच्या म्हणजे २०१२च्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त दान अर्थातच किडनीचं होतं. त्यापाठोपाठ हृदयातील व्हाल्व्हज, हृदय, यकृत आणि फुफ्फुसं दान केली गेली. मात्र वेटिंगलिस्टवर असलेल्या एकूण लोकांपैकी ९०% लोकांना अवयव न मिळाल्याने मृत्युमुखी पडावे लागते. किडनीची गरज असलेल्या ३० व्यक्तींपैकी केवळ एका व्यक्तीलाच किडनी मिळते तर दरवर्षी जवळजवळ २५,००० लोकांना यकृताची गरज असते पण फक्त ८०० यकृतं प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होतात.

मृत शरीरातून अवयव काढून ते स्टोअर करून ठेवता येतात मात्र हा कालावधी प्रत्येक अवयवाकरता वेगवेगळा असतो. उदा. हृदय - ३ तास, यकृत आणि स्वादुपिंड - १२ तास, किडनी - २४ तास, कॉर्निया - २ आठवडे, कानाच्या आतील भाग, त्वचा, बोन मॅरो - ५ वर्षे, हृदयातील व्हाल्व्हज - १० वर्षे.

या पार्श्वभूमीवर, प्रत्येक सजग, सुशिक्षित आणि सामाजिक बांधिलकी मानणार्‍या व्यक्तीने अवयवदानाचा फॉर्म भरलाच पाहिजे. शिवाय आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींनाही अवयवदानाचं महत्त्व समजावून दिलं पाहिजे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे जास्तीत जास्त ४० व्यक्तींना जीवनदान मिळू शकतं हे लक्षात घ्या. तेव्हा ज्योत से ज्योत जलाते चलो ......

अवयवदान : FAQs

१. अवयवदान म्हणजे नक्की काय? ते कसे करतात?

एखाद्या जिवंत अथवा मृत मानवी शरीरातील अवयव वा टिशूज (tissues) त्या शरीरातून काढून दुसर्‍या मानवी शरीरात त्यांचे प्रत्यारोपण करणे म्हणजे अवयवदान. याला दान म्हणतात कारण असे करण्याबाबत त्या दात्याची संमती घेतलेली असते.

२. अवयवदान करणे भारतात कायदेशीर आहे का?

हो. नक्कीच. Transplantation of Human Organs Act (THOA), 1994 या अ‍ॅक्टद्वारे अवयवदान आणि 'ब्रेनडेड' या संकल्पना स्विकारल्या गेल्या आहेत. मात्र अवयव खरेदी-विक्रीवर कायद्याने बंदी आहे. म्हणजे या व्यवहारात पैशाची देवाणघेवाण कायदेशीर नाही.

३. कोणकोणते अवयव दान करता येतात?

हृदय (heart), यकृत (liver), मूत्रपिंड (kidneys) यासारखे अवयव (organs) तसेच त्वचा, कॉर्निया, बोन मॅरो सारख्या टीशूज (tissues) दान करता येतात. यातील काही जिवंतपणीही दान करता येतात तर काही मरणोत्तर.

जिवंत असताना आपण आपल्या आरोग्याला सांभाळून आपण किडनी, रक्त, बोन मॅरो, बोन्स, त्वचा, ब्लड सेल्स आणि काही अवयवांचा (यकृत, फुफ्फुसं आणि दुर्मिळ केसेस मध्ये स्वादुपिंड आणि आतडी) काही भाग दान करता येतो.

तर मरणोत्तर अवयवदानात वर दिलेल्यां व्यतिरीक्त अजून कितीतरी अवयव आणि टीशूज दान करू शकतो - फुफ्फुसं (lungs), आतडी (intestine), स्वादुपिंड (pancreas), हृदयातील व्हॉल्व्हज (heart valves), हृदय, रक्तवाहिन्या असे एकूण ३४ अवयव व टिशूज. न्युझिलंडच्या क्लिंट हॅलॅमवर तर हाताच्या प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

४. अवयवदानाचा फॉर्म कोणाला आणि कोठे भरता येतो?

कोणीही कायद्याने सज्ञान आणि ६५ वर्षापर्यंतची कोणातीही व्यक्ती 'डोनर' बनू शकते. अर्थात काही अटी पाळूनच. अशा व्यक्तीला स्वत:लाच काही मोठे आजार नसावेत. शक्यतो मधुमेह, उच्चरक्तदाब अथवा हृदयरोगाच्या रुग्णांचे अवयव पूर्णपणे निरोगी असण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे त्यांना सगळे अवयव दान करता येत नाहीत. मनोरुग्णांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव असल्याने त्यांनाही दाता म्हणून ग्राह्य धरले जात नाही.

अवयवदानाची संमती दर्शवणारा फॉर्म भारतीय सरकारच्या http://mohfw.nic.in/ या वेबसाईटवरून उतरवून भरता येतो. त्याव्यतिरीक्त इतर अनेक संस्था, एनजीओज तर्फेही असा फॉर्म भरता येतो. फॉर्म स्वीकारला गेल्यानंतर दात्यांना एक 'डोनर कार्ड' देण्यात येते. ते नेहमी आपल्याजवळ बाळगावे. शिवाय आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना याची कल्पना देऊन ठेवावी.

मृत व्यक्तीने तिच्या हयातीत फॉर्म भरला नसेल तरीही अशा व्यक्तीच्या मृत्युनंतर त्वरीत जवळच्या नातेवाईकांनी हालचाल करून अवयवदानाची संमती देऊन त्या व्यक्तीचे अवयव दान करता येतात.

५. मेंदू बंद पडल्याने मृत्यु पावणे (ब्रेन डेड) आणि हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यु पावणे (कार्डिआक डेथ) यात फरक काय? त्यामुळे अवयवदानावर काय परिणाम होतो?

ब्रेन डेड म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे निकामी झालेला असतो. त्याचे कार्य पूर्णपणे बंद पडलेले असते आणि त्यात काहीही सुधारणा होण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. मात्र व्हेंटिलेटरवर ठेवल्यास अशा व्यक्तीचे हृदय काम करत असते. त्यामु़ळे जोवर ते मशिन सुरू आहे, तोवर ती व्यक्ती 'जिवंत' आहे असं म्हणू शकतो. हात लावल्यास त्वचाही गरम असते कारण मशिनमुळे रक्तप्रवाहही सुरू असतो. मात्र वैद्यकीय दृष्ट्या अशी व्यक्ती मृत म्हणूनच धरली जाते. मात्र रक्तप्रवाह सुरू असल्याने अशा व्यक्तींचे अवयव शाबुत असतात आणि त्यामुळे दानाकरता अत्यंत योग्य ठरतात.

याउलट हृदयक्रिया बंद पडून मृत्यु आल्यास महत्त्वाचे अवयव त्वरीत निकामी होण्यास सुरूवात होते. त्यामुळे अशा व्यक्तींची किडनी, यकृत वेळेवर काढून घेण्याकरता अत्यंत जलद हालचाल करण्याची गरज आहे. मात्र हाडे, त्वचा, हृदयाचे व्हाल्व्हज, कॉर्निया इ अवयव चोवीस तासात दान करता येतात.

६. भारतात अवयवदानासाठी इतर कोणत्या संस्थांतर्फे फॉर्म भरता येतो?

वर दिलेल्या सरकारी वेबसाईट व्यतिरीक्त सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्येही हे फॉर्म जाऊन भरता येतील. तसेच या क्षेत्रात काम करणार्‍या इतर अनेक एन्जीओज च्या वेबसाईटवर हे फॉर्मस उपलब्ध आहेत. काही संस्थांच्या वेबसाईटवर डायरेक्ट डोनर्स कार्डस अव्हेलेबल आहेत. त्याचा प्रिंटआऊट काढून, तो भरून स्वतःजवळ ठेवता येतं.

७. अवयवदान केल्यानं मृत शरीर खराब दिसू शकतं का?
नाही. अवयव काढून घेतल्यानंतर शरीर विद्रुप दिसणार नाही याची काळजी घेतली जाते.

संदर्भ :
https://en.wikipedia.org/wiki/Organ_donation
http://www.pbs.org/wgbh/aso/databank/entries/dm54ki.html
http://www.organtransplants.org/understanding/death/
http://www.donatelifeindia.org/organinindia.php
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Cadaver-donation-sees-spurt...
http://www.donateorgans.net/faqs.html
ToI, Tuesday, 6 August 2013
**************************************
डिस्क्लेमर :
मी स्वतः डॉक्टरही नाही किंवा या विषयाचे मला ज्ञानही नाही. पण अवयवदानाचं महत्त्व मात्र मला मनापासून पटलं आहे. इंटरनेटवर या विषयाची भरपूर माहिती उपलब्ध आहे. पण एका सामान्य वाचकाच्या दृष्टीकोनातून ती संकलित करून मायबोलीच्या वाचकांपर्यंत पोहोचवावी या हेतूने हा लेखप्रपंच केला आहे.

विषयव्याप्ती अतिशय मोठी आहे आणि समजून घेण्याकरता तांत्रिक ज्ञानाची गरज आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे काही चुका असतील तर जरूर दाखवून द्याव्यात. काही महत्त्वाची माहिती माझ्याकडून लिहायची राहून गेली असेल तरी नक्कीच द्या. इथे अ‍ॅड करेन.
**************************************************
याच विषयावरील मायबोलीवरचे इतर धागे :
कविन : http://www.maayboli.com/node/38727
मुग्धानंद : http://www.maayboli.com/node/23686

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, छान माहिती. मी स्वतः असा फॉर्म भरलेला आहे. अवयव निकामी असतील( म्हणजे कुणाच्या उपयोगी पडण्यासारखे नसतील ) तर सर्व शरीर, अभ्यासासाठी दान केलेले आहे.

मृत शरीरावर होणार्‍या कुठल्याही अंत्यसंस्कारांवर माझा विश्वास नाही.
माझ्या वडीलांची पण असे लिहून ठेवले होते, पण तो कागद आम्हाला खुप नंतर मिळाला.

खुप महत्त्वाचि माहीती.
निवडक १०त. नेत्रदानाचा फोर्म भरला होता पण आता आठवत नाही डीटेल्स. पुन्हा भरता येईल का?

हो विजय देशमुख. नेत्रदानाचा फॉर्म पुन्हा भरता येईल. पण त्याहीपुढे जाऊन विचार करायचा असेल तर ऑर्गन डोनर कार्डही काढून ठेवता येईल. यात नेत्रदानही आपसुकच येतं.

टाईम्स ऑफ इंडियातर्फे आजच ऑर्गन डोनेशन डे साजरा होत आहे. या उपक्रमात सहभागी होणार्‍या इतर संस्था आहेत - मोहन फाउंडेशन, शतायू, Gift a life आणि Gift your organ. यापैकी कोणत्याही संस्थेच्या वेबसाईटवर रजिस्टर करू शकता.

हो मामी, भारतातच. देह तिथेच पडावा, अशी इच्छा आहे. पण बाकी कुठेही पडला तरी तसेच करावे, असे नेहमी सांगून ठेवतो.

दिनेशदा, एक सुचवू का? भारतातील कार्डाबरोबरच ज्या देशात वास्तव्य आहे तेथिल कार्डही काढून ठेवावे. तातडीनं उपयोगात आणता येणारे अवयव तिथेच दान करता येतात. आपल्यामुळे ज्या व्यक्तीला फायदा होणार आहे ती कोणीही असली तरी काय फरक पडतो?

जाई, त्या धाग्याबद्दल धन्यवाद. हा लेख लिहिण्याआधी मी मायबोलीवर सर्च मारला होता पण तो बाफ काही दिसला नाही. मी वाचलेही असणार पण आता लक्षात आलं नाही. Sad

कविनचा धागा वाचताना दिसलं की मुग्धानंदनेही या विषयावर लिहिले आहे : http://www.maayboli.com/node/23686

या दोन्ही बाफांच्या लिंक्स वरती देते.

असू दे ग
तू चांगल काम करतेस
तुझ्या बाफात असल्याने एकत्रीकरण होईल
मुग्धाचा बाफ पण त्यात आहे

धन्स मामी. आज organ donation day आहे. जास्तीत जास्त लोकांनी आज फॉर्म भरुन, जवळच्या इस्पितळात द्यावा, आणि ते कार्ड भरुन लॅमिनेट करुन आपल्याजवळ सतत बाळगावे, आपल्या जवळच्या नातेवाईकांना याची कल्पना देवुन ठेवावी.

मी रक्तदान नेहमी करते. देहदानाचा ही विचार आहेच.
फक्त तो फॉर्म आपण कधी भरू शकतो? याबद्दल काही माहिती नाही.

खुप छान धागा मामी.
मी नेत्रदानाचा फॉर्म काही वर्षापूर्वी भरला आहे.

मला ज्या व्यक्तीने नेत्रदान करण्यास प्रव्रुत्त केले त्याने हेही सांगितले की आपल्या जवळच्या जास्तीत जास्त माणसांना सांगुन ठेवावे. कारण आपल्यानंतर त्यानांच सगळी धावपळ करायची असते. हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे.

प्राचीचा मुद्दा हा खुपच महत्वाचा आहे. हे कार्य नातेवाईकांनाच करायचे असते.
जवळच्या माणसाचा मृत्यू कितीही दु:खदायक असला तरी, त्याची इच्छा लक्षात ठेवून, त्यांनी हा फोन करणे अत्यंत गरजेचे असते.

कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्ट शिकताना मृत्यू हा मोस्ट सर्ट्न इव्हेंट मानला जातो, असे कळले. त्याबाबत सर्वांनीच मनाची तयारी ठेवणे आवश्यक आहे.

आपल्या जवळच्या जास्तीत जास्त माणसांना सांगुन ठेवावे. कारण आपल्यानंतर त्यानांच सगळी धावपळ करायची असते. हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे.

>>> प्राची हा मुद्दा वर लिहिला आहे. इथे बघा:
अवयवदानाची संमती दर्शवणारा फॉर्म भारतीय सरकारच्या http://mohfw.nic.in/ या वेबसाईटवरून उतरवून भरता येतो. त्याव्यतिरीक्त इतर अनेक संस्था, एनजीओज तर्फेही असा फॉर्म भरता येतो. फॉर्म स्वीकारला गेल्यानंतर दात्यांना एक 'डोनर कार्ड' देण्यात येते. ते नेहमी आपल्याजवळ बाळगावे. शिवाय आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना याची कल्पना देऊन ठेवावी.

उत्तम धागा
अमेरीकेत ड्रायव्हर्स लायसन्स वर ऑर्गन डोनर नमुद केलेले असते.

माझीपण अवयवदानाची इच्छा आहे (आणि देहदानाचीही). इथे डोंबिवलीच्या आसपास 'दधिची' नावाची संस्था ह्यासंबंधी काम करते असे ऐकून आहे.

@ तोषवी .... हो. भारतातही ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोनर्स कार्ड एकत्रित करण्याकरता प्रयत्न सुरू आहेत.

Pages