प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव

Submitted by रेव्यु on 20 July, 2013 - 09:17

प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव

भारतात अजूनही प्रामाणिकपणा हे एक जीवनमूल्य आहे, आशेला जागा आहे .
स्वानुभव - २०-७-१३
आज सकाळी मी माझ्या फेरीला नेहेमीसारखा निघालो. आज शनिवार असल्याने अस्मादिक खुषीत होते. पहाटे पाऊस झाला असल्याने हवेत गारवा होता आणि रस्ते निर्मनुष्य होते. त्याच मूडमध्ये मी दुधाच्या दुकानापाशी थांबलो , त्याने नेहेमी प्रमाणे दुधाच्या पिशव्या दिल्या. मी खिशात हात घातला तर पाकीट नव्हते. एवढ्या पहाटे , ते कोणी मारण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता . माझ्या साठीच्या प्रवेशाबरोबरच माझा साथीदार बनलेल्या विस्मरणाचा हा परिणाम असावा , मी पाकिट आणायचे विसरले असावे,असा समज करून घेवून दुकानदाराकडून उधारीवर पिशव्या घेवून घरी परतलो. घरी तयार असलेला गरमागरम नाष्टा केला. पेपर वाचले , आंघोळ केली अन तयार होवून शनिवारची फावल्या वेळातील कामे उरकण्यासाठी बाहेर पडण्यसाठी पाकिट शोधू लागलो. काही केल्या ते सापडेना. घरबर शोधले. कपाटे, खाने, ड्रॉवर्स, सगळे झाले, जिथे तीळभरही शक्यता नव्हती त्या जागा म्हणजे, मायक्रोवेव्ह्च्या आत, वॉशिंग मशीन ,कारची डिक्की अशा हास्यास्पद जागा ही शोधून झाल्या. अगदी अगतिक झालो होतो , पुढची पायरी म्हणजे बँकांना, क्रेडिट कार्ड वाल्याना फोन इ. भानगडी मला वाकुल्या दाखवित होत्या. शेवटी हताश होवून , ते हरवले या निर्णयाप्रत पोहोचलो अन पुढील २ तास सर्व बँकाना फोन करून १ दाबा, मग ३ दाबा , मग ५ दाबा इ करण्यात, कार्डे ब्लॉक करण्यात आणि डुप्लिकेट कार्डाची मागणी करण्यात गेले. अशा 'दारुण' प्रसंगी सुध्दा ते कॉल सेंटर्वरील लोक मला कमी व्याजाने कर्ज, अ‍ॅड ऑन कार्ड वगैरेची प्रलोभने ठेवण्याचा गड लढवत होते. प्रसंग काय, माझी मनःस्थिती काय, पण शेवटी ते आपला कार्यभाग साधण्याच्या मागे होते.
मला सोमवारी आर. टी .ओ कडे डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज देण्याचे दु:स्वप्न सतावत होते. ती कसरत नकोशी झाली होती अन त्यात माझ्याकडे त्या लायसन्सचा नंबर पण नव्हता,फोटो कॉपी देखील नव्हती.
खूप उदास झालो होतो. पाकिटात पैसे फारसे नव्हते पण ते कुठे गेले हे कोडे सुटत नव्हते.
अखेरीस कसाबसा जेवलो अन क्लांत, श्रांत होवून पडलो, डोळा केव्हा लागला कळले नाही.
साधारण ३-३० च्या सुमाराला हीने उठ्वल्याचा भास झाला. डोळे उघडले तर हीच्या हातात पाकिट होते, मला वाटले मी झोपेत स्वप्न पाहतोय की काय? हीने हळूच स्पर्श केला तेव्हा ते खरे आहे यावर विश्वास बसला.ती मला बाहेर घेवून गेली. एक पोरसवदा तरुण पावसातून आला होता. त्याचे जॅकेट चिंब भिजले होते. तो म्हणाला, "साहेब! हे मला इंडस्ट्रियल इस्टेटच्या वळणावर सकाळी सापडले. यातील ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमचा पत्ता वाचला अन शोधत आलो. " मी त्याचे मनःपूर्वक आभार मानले अन त्याचे अभार व्यक्त करण्यासाठी तसेच त्याचे कौतुक म्हणून त्याला काही रक्कम बक्षिसादाखल देवू केली. त्याने ती नाकारली अन म्हणला, " साहेब! प्रामाणिकपणा अन कर्तव्य नावाचीही काही चीज असते. मला ती संधी मिळाली." मी त्याचे नाव अन सेल नंबर लिहून घेतला. त्याला आत बोलावले, चहा देवू केला , तोही त्याने नाकारला.
जसा आला तसाच तो निघून गेला.
मी अवाक होवून पहात राहिलो.
आजचा दिवस मात्र- सोन्याचा झाला.
आपल्या देशाला, सर्व अक्षरांची अन आकड्यांची कूट कारस्थाने अन भ्रष्टाचार झाले तरी अजून आशेस खूप जागा आहे.
PS All my calls to the card agencies to reverse the blocking were politely declined in plastic tones.
--

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर आणि अगदी "इन्स्पायरिंग" व्हिडिओ लिंक, रेव्यु.

या पट्टीतील मला सर्वाधिक भावलेला प्रसंग म्हणजे तो ऑफिसरसारखा दिसणारा सुटबुटातील गृहस्थ गाडीतील एक जडशीळ बॅग उचलून घेण्यास त्या ड्रायव्हरला मदत करतो तो प्रसंग. सुरुवातीला मला वाटले की बॅग त्या गृहस्थाचीच असणार, पण तो तर तिथून चटकन निघूनही जातो.

खरच फे.बू. द्वारे सर्वत्र शेअर करण्याजोगी फित.

अशोक पाटील

छान. Happy (पर्स हरवली की होणारा मनस्ताप २ वेळा झेलला आहे. तरीही त्यानंतर २ वेळा पर्स पार्किंगलॉट मधे shopping-cart मधे विसरलेली आहे व तेव्हा अनामिक प्रामाणिक माणसांनी दुकानात दिल्याने परत मिळाली आहे).. माझे नाव 'पर्सहरवी' करावेसे वाटते केव्हाकेव्हा.

छान , तुमचे पाकिट तुम्हाला मिळाले.
अशी माणसं भेटली कि चांगुलपणा वरचा विश्वास द्रुढ होतो.

पुण्यात एकदा ओफिस मधे च माझे वॉलेट हरवले होते.खुप शोधले, नाही सापडले.दुसर्या दिवशी एन्ट्री जवळच सीक्युरिटीने परत दिले. 850रूपये सोडून बाकी कार्डस मिळाले. पैसे गेले त्याचे काही वाटलं नाही. पण म्हत्वाचे कार्डस मिळाले.
एकदा कोलेजला बसने जात असताना सैक च्या मागच्या कप्प्यातून वौलेट मारले गेले होते.350रू. होते, तेव्हा पैसे गेले म्हणून हळहळले होते.

छान अनुभव. खूप चांगल्या पद्धतीने लिहिला आहे. खूप कौतुक तुमचे असा चांगला अनुभव share केल्याबद्दल. अवतीभोवती अंधार दाटलेला असताना असे कवडसे कोठूनही मिळाले, तरी ते मनाच्या टिपकागदाने टिपून घेतले पाहिजेत, जपून ठेवले पाहिजेत. आपल्यालाही नवी ऊर्जा मिळते, चांगुलपणावरचा विश्वास दृढ होतो. आपल्या नवीन पिढीसमोर असे दाखले देऊन "सगळेच दीप मंदावले आता, "अशी परिस्थिती नाही आली अजून.. हे मांडू शकतो आपण.

क्ष वर्षांपूर्वी मला ट्रेनमधे एक वॅलेट सापडले होते.त्यात त्या बाईचा फर्स्ट्चा पास आणि ७००-८०० रुपये होते.त्या बाईची नी माझी तोंडओळख होती.ऑफिसमधे गेल्यावर,पासवर दिलेल्या नंबरवर मी बरेचदा कॉल केले.तो लँडलाईन नंबर तिच्या आईचा होता.मला खूप टेन्शन आले होते.कारण दुसर्‍या दिवसापासून मी रजेवर जाणार होते.अखेर ५.००च्या दरम्यान तिचा फोन आला की ती माझ्या स्टेशनवर भेटेल म्हणून.भेटल्यावर तिची वस्तू तिच्या सुपूर्द केली आणि मी सुटले.

२०११ साली असेच स्टेशनच्या आवारात ५०० रुपये मिळाले.मी उचलायला नको होते,पण कोण तरी शोधत आलेच तर देऊ म्हणून बरेच दिवस ठेवले.पण नंतर फ्रॅक्चर आणि इतर भानगडी निस्तरता माझे, मिळालेल्या रकमेच्या १५० पट रक्कम खर्च झाली.
३-४ वर्षांपूर्वी नवर्‍याला शिवनेरी बसमधे एक वॅलेट सापडले.त्याच्याशेजारी बसलेल्या मुलीचे होते.ती उतरुन गेली आणि थोड्या वेळाने याच्या लक्षात आले.घरी आल्यावर पाहिले तर ८-१० हजार आणि पॅनकार्डसकट इतर कार्डस होती.तिला एकेठिकाणी बोलावून ते सर्व दिले.

छान केलेत. त्या मुलीला किती आनंद झाला असेल ना..

मला तर फार वाईटच अनुभव आहेत. आमचे कित्येक मोबाईल (४ वेळा मिळून ६ मोबाईल) सामानासह गेले आहेत. दरवेळी मोबाईल स्विचऑफच झाले आहेत Sad

म्हणजे कधी बॅग वा पर्स राहिली तर त्यात मोबाईलही असला की तो सुद्धा त्यासोबत गेल्यावर आपण मोबाईलवर कॉल करून बघतो. थोड्यावेळाने ज्याच्या हाती हा ऐवज पडतो तो मोबाईल स्विच ऑफ करून सगळा माल लंपास करतो

Pages