प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव

Submitted by रेव्यु on 20 July, 2013 - 09:17

प्रामाणिकपणाचा एक तेजस्वी अनुभव

भारतात अजूनही प्रामाणिकपणा हे एक जीवनमूल्य आहे, आशेला जागा आहे .
स्वानुभव - २०-७-१३
आज सकाळी मी माझ्या फेरीला नेहेमीसारखा निघालो. आज शनिवार असल्याने अस्मादिक खुषीत होते. पहाटे पाऊस झाला असल्याने हवेत गारवा होता आणि रस्ते निर्मनुष्य होते. त्याच मूडमध्ये मी दुधाच्या दुकानापाशी थांबलो , त्याने नेहेमी प्रमाणे दुधाच्या पिशव्या दिल्या. मी खिशात हात घातला तर पाकीट नव्हते. एवढ्या पहाटे , ते कोणी मारण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता . माझ्या साठीच्या प्रवेशाबरोबरच माझा साथीदार बनलेल्या विस्मरणाचा हा परिणाम असावा , मी पाकिट आणायचे विसरले असावे,असा समज करून घेवून दुकानदाराकडून उधारीवर पिशव्या घेवून घरी परतलो. घरी तयार असलेला गरमागरम नाष्टा केला. पेपर वाचले , आंघोळ केली अन तयार होवून शनिवारची फावल्या वेळातील कामे उरकण्यासाठी बाहेर पडण्यसाठी पाकिट शोधू लागलो. काही केल्या ते सापडेना. घरबर शोधले. कपाटे, खाने, ड्रॉवर्स, सगळे झाले, जिथे तीळभरही शक्यता नव्हती त्या जागा म्हणजे, मायक्रोवेव्ह्च्या आत, वॉशिंग मशीन ,कारची डिक्की अशा हास्यास्पद जागा ही शोधून झाल्या. अगदी अगतिक झालो होतो , पुढची पायरी म्हणजे बँकांना, क्रेडिट कार्ड वाल्याना फोन इ. भानगडी मला वाकुल्या दाखवित होत्या. शेवटी हताश होवून , ते हरवले या निर्णयाप्रत पोहोचलो अन पुढील २ तास सर्व बँकाना फोन करून १ दाबा, मग ३ दाबा , मग ५ दाबा इ करण्यात, कार्डे ब्लॉक करण्यात आणि डुप्लिकेट कार्डाची मागणी करण्यात गेले. अशा 'दारुण' प्रसंगी सुध्दा ते कॉल सेंटर्वरील लोक मला कमी व्याजाने कर्ज, अ‍ॅड ऑन कार्ड वगैरेची प्रलोभने ठेवण्याचा गड लढवत होते. प्रसंग काय, माझी मनःस्थिती काय, पण शेवटी ते आपला कार्यभाग साधण्याच्या मागे होते.
मला सोमवारी आर. टी .ओ कडे डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज देण्याचे दु:स्वप्न सतावत होते. ती कसरत नकोशी झाली होती अन त्यात माझ्याकडे त्या लायसन्सचा नंबर पण नव्हता,फोटो कॉपी देखील नव्हती.
खूप उदास झालो होतो. पाकिटात पैसे फारसे नव्हते पण ते कुठे गेले हे कोडे सुटत नव्हते.
अखेरीस कसाबसा जेवलो अन क्लांत, श्रांत होवून पडलो, डोळा केव्हा लागला कळले नाही.
साधारण ३-३० च्या सुमाराला हीने उठ्वल्याचा भास झाला. डोळे उघडले तर हीच्या हातात पाकिट होते, मला वाटले मी झोपेत स्वप्न पाहतोय की काय? हीने हळूच स्पर्श केला तेव्हा ते खरे आहे यावर विश्वास बसला.ती मला बाहेर घेवून गेली. एक पोरसवदा तरुण पावसातून आला होता. त्याचे जॅकेट चिंब भिजले होते. तो म्हणाला, "साहेब! हे मला इंडस्ट्रियल इस्टेटच्या वळणावर सकाळी सापडले. यातील ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमचा पत्ता वाचला अन शोधत आलो. " मी त्याचे मनःपूर्वक आभार मानले अन त्याचे अभार व्यक्त करण्यासाठी तसेच त्याचे कौतुक म्हणून त्याला काही रक्कम बक्षिसादाखल देवू केली. त्याने ती नाकारली अन म्हणला, " साहेब! प्रामाणिकपणा अन कर्तव्य नावाचीही काही चीज असते. मला ती संधी मिळाली." मी त्याचे नाव अन सेल नंबर लिहून घेतला. त्याला आत बोलावले, चहा देवू केला , तोही त्याने नाकारला.
जसा आला तसाच तो निघून गेला.
मी अवाक होवून पहात राहिलो.
आजचा दिवस मात्र- सोन्याचा झाला.
आपल्या देशाला, सर्व अक्षरांची अन आकड्यांची कूट कारस्थाने अन भ्रष्टाचार झाले तरी अजून आशेस खूप जागा आहे.
PS All my calls to the card agencies to reverse the blocking were politely declined in plastic tones.
--

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुखद अनुभव. मलाही एकदा पाकीट असेच परत मिळाले आहे. पैश्यापेक्षाही ते क्रेडीट कार्ड कॅन्सल करनं मोठ्ठ काम असतं.

अभिजीत म्हणतो तस आपण "Pay it forward" करु शकतो.

मलाही असा सुखद अनुभव मागच्यावर्षी गणपतीत मुंबईला आला. गणपती स्थापनेच्या दिवशी सकाळी मुंबईत पोचलो मुहुर्त सक्काळीसच होता तो गाठण्यासाठी घाईघाईने टॅक्सीतून उतरुन घरात आलो. पाच मिनीटांनी बेल वाजली. टॅक्सीवाला माझी पर्स घेऊन दारात उभा तोपर्यंत मी पर्स विसरलेय हे माहीतच नव्हतं त्यात पैसे डेबीट कार्ड लायसन्स्....अश्या अनेक महतवाच्या वस्तु होत्या....

हम्म. नो ऑफेन्स, पण त्या तरुणाने त्याचं नाव आणि नंबर दिला नसता तर मला कौतुक वाटलं असतं.

आपली हरवलेली वस्तू सापडल्यानंतर जो काही रिलीफ मिळतो की बास.
म्हणूनच पूर्वी राजे वगैरे काहीतरी शोधून देणार्यास अर्धे राज्य बिज्य देत असावे. Proud

मी असंच एका आज्जींचं बसमधे सापडलेलं पाकिट परत केलं होतं तेव्हा त्या मोठा बुके घेऊन आल्या होत्या.
मस्त वाटलं एकदम. Happy स्पेशल.

तुर्र् मखान
हम्म. नो ऑफेन्स, पण त्या तरुणाने त्याचं नाव आणि नंबर दिला नसता तर मला कौतुक वाटलं असतं.
>>>
नो ऑफेन्स?? तुम्ही ओफेंड नक्कीच केलय.
अत्यंत साधभोळा पण सज्जन होता-मी नंबर विचारला-नाव विचारले अन त्याने दिला- यात काय चुकला वा त्याचा स्वार्थ कुठे दिसला तुम्हाला?
का उगीचच फाटे फोडायचे ?

छान अनुभव...!
वर कुणितरी म्हटले ते खरे आहे, या गोष्टी पुस्तकातून नाही तर संस्कारातून शिकवल्या जातात, रूजवल्या जातात. "दीवार" आठवलाच.. Happy

Happy

त्या व्यक्तीने कुठल्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचं नाव आणि फोन लंबर का म्हणून द्यावा? फक्त एक माणूस म्हणून प्रामाणिकपणा दाखवता आला असता. मला वाटतं, कुणालाही न कळता केलेली मदत हीच निस्वार्थी आणि निरपेक्ष असते. नाहीतर कहीना काही परतीची अपेक्षा असतेच. त्याशिवाय का लम्बर आणि नाव दिलं असेल? पुढच्या वेळी पाकीट हरवलं तर फोन करायला नक्कीच तुम्ही फोन लंबर घेतला नसणार. इट्स अ‍ॅन इन्वेस्टमेंट.

सकाळी सकाळी असा सुखद अनुभव वाचून प्रसन्न वाटलं एकदम.
काही वर्षांपूर्वी माझ्या नवर्‍याचं पाकिट कोयना बॅकवॉटर्स परिसरात एका लाँचमधे पडलेलं, ते एका महिन्याने त्या लॉंचवाल्याने कागदपत्रे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून पोस्टाने परत पाठवलं होतं. तोवर ते प्रवासात नक्की कुठे पडलं तेही नवर्‍याला आठवत नव्हतं. पुन्हा तिकडे जाणं कधी होईल माहिती नव्हतं म्हणून मग आभाराचं पत्र पाठवलेलं त्या प्रामाणिक माणसाला. अनोखा होता तो अनुभव.

ही पण एक लागण असते नाही? लागण हा शब्द एरव्ही नकारार्थीच वापरला जातो खरं... पण असे अनुभव जी सकारात्मक ऊर्जा पुरवतात तीही अशीच पसरत जाते. आपण सिग्नलला थांबलो की बाकीचेही एकेक करून थांबत जातात तसंच थोडंसं.

सकाळी सापडलेलं पाकिट लक्षात ठेवून दिवसभराच्या असतील त्या कामातून वेळ काढून पावसातून चिंब भिजत पत्ता शोधून परत करायला आल्यावर आपण आपलं नाव-पत्ता सांगून स्वार्थीपणा करतोय हे तुम्हाला तरी सुचलं असतं का हो खानसाहेब? त्या पोरसवदा मुलाइतक्या प्रामाणिकपणे सांगा बघू.

<<पत्ता शोधून परत करायला आल्यावर आपण आपलं नाव-पत्ता सांगून स्वार्थीपणा करतोय हे तुम्हाला तरी सुचलं असतं का हो खानसाहेब?>>

अलबत! मी स्वतः कितीतरी वेळा अशा वस्तू परत केल्या आहेत आणि माझं नाव आणि माहिती न सांगता. माझ्या विसरलेल्या/हरवलेल्या वस्तू परत करणार्‍याला मी काहिना काही पैसे दिलेत. काहींनी नाकारले पण कोणत्याही व्यक्तीचं नाव आणि फोन नंबर मी लिहून घेतला नाही. जी काही परत फेड करायची असेल तर तिथल्या तिथे. परत फेड करून घेण्याची अपेक्षाच नसेल तर वस्तू सापडलेली व्यक्ती फोन नंबर वगैरे देणार नाही.

पुढच्या वेळी पाकीट हरवलं तर फोन करायला नक्कीच तुम्ही फोन लंबर घेतला नसणार. इट्स अ‍ॅन इन्वेस्टमेंट.>>>>>
केवळ हास्यास्पद!!!!
त्या व्यक्तीला कशाला फोन करू?
Happy

अलबत! मी स्वतः कितीतरी वेळा अशा वस्तू परत केल्या आहेत आणि माझं नाव आणि माहिती न सांगता. माझ्या विसरलेल्या/हरवलेल्या वस्तू परत करणार्‍याला मी काहिना काही पैसे दिलेत. काहींनी नाकारले पण कोणत्याही व्यक्तीचं नाव आणि फोन नंबर मी लिहून घेतला नाही. जी काही परत फेड करायची असेल तर तिथल्या तिथे. परत फेड करून घेण्याची अपेक्षाच नसेल तर वस्तू सापडलेली व्यक्ती फोन नंबर वगैरे देणार नाही. >>>>> साधेपणा, प्रामाणिकपणा आणि भोळेपणा कित्येकवेळा हातात हात घालून असतात. रेव्यूंनी विचारला, त्याने मनात कुठलंही किल्मिष न आणता दिला... इतकं साधं आहे हे. फोन नंबर आणि नाव देताना आपण फायदा करुन घेऊ असा स्वार्थ किंवा आपला फायदा करुन घेतला जाईल का? असा संशयही मनात आला नसणार. असतात हो अशी निर्मळ विचार करणारी माणसं आणि ती आपल्याला भेटणं हे आपलं नशिब समजायचं. दुखवायचं नाही त्यांना कधीही.

सुखद अनुभव रेव्यु.

मागच्या शुक्रवारी मलाही अनुभव आला पण अर्थातच वाईट. मंडईत पे अँड पार्क ला गाडी पार्क केली अन पेशवाईपर्यंट अ‍ॅटोने गेलो. पाऊस होता.त्याच्या नादात अ‍ॅटोतून पटकन उतरलो अन तिथेच एका दुकानात शिरलो सगळे. पर्स अ‍ॅटोतच राहीली Sad . फोर व्हीलरची चावी, २५०० रु. + सगळी डेबीट+ क्रेडीट कार्डं सगळे होते त्यात. खरेदीचा सगळा मूडच गेला. पार्कींगच्या बाहेर जिथून अ‍ॅटोत बसलो तिथे एक दीड तास वाट पाहीली की तो इमानदारीत आणून देइल पर्स. एक बरे झाले की मी इतक्या घाईतही क्रेडीट कार्ड ब्लॉक केले लगेच. मोबाईल वर मेसेज आला दीड तासानी की कॅश विथ्ड्रॉवल साठी ट्राय केला म्हणून Sad
सगळी कार्ड ब्लॉक केली लगेच.वाईट अनुभव. पण चांगला धडा मिळाला. अक्कल विकत घेतली म्हणून सोडून द्यायचे अन काय !

सद्यस्थितीत, "केवळ नशिबवान" आहात म्हणुन असा अनुभव तुम्हाला आला असे म्हणावे लागेल. अन त्याबद्दल (म्हणजे नशिबवान असल्याबद्दल) अभिनन्दन Happy

>>>> आपल्या देशाला, सर्व अक्षरांची अन आकड्यांची कूट कारस्थाने अन भ्रष्टाचार झाले तरी अजून आशेस खूप जागा आहे. <<< ही आशा थोडी जास्तच होते आहे.

जी गोष्ट आपली नाही त्या गोष्टीला स्पर्षही करू नये, घेणे तर फार दूरचे, ही शिकवण केव्हाच काळाच्या पडद्या आड गेलीये. फुक्कट ते पौष्टीक हा मन्त्र अगदी नाटक/सिनेमामधुन देखिल निमित्ताने जाहिररित्या शिकवला घटवला जातोय. अन जे "प्रामाणिकपणाची" शिकवण देऊ शकतात ते "व्यवस्थेतून" केव्हाच बाहेर हाकलले गेले आहेत. सबब मी तरी फाऽऽर आशा ठेवू शकत नाही, आशा असलीच तर ती नशिबाचे हवाल्यावर सोडतो. Happy

@रेव्यु:
<<केवळ हास्यास्पद!!!!
त्या व्यक्तीला कशाला फोन करू?>>

तेच तर म्हणतोय. तुम्ही पुढे-मागे काही मदत करता येइल या भावनेनेच त्याचा फोन नंबर घेतलात ना?

@ अश्विनी के:
मग साध्या आणि भोळ्यालोकांचं प्रमाणिकपणाचं कसलं कौतुक? हे म्हणजे लहान मुलांना आणि वेड्यांना निरागस वगैरे म्हणण्यासारखं आहे.

तुर्रमखान
तुमच्या विधानातील विसंगती आणि विरोधाभास आणि त्याच बरोबर एका चांगल्या सकारात्मक घटनेस कुत्सित कलाटणी कशी द्यायची हे कौशल्य(?).
थोडे अंतर्मु़ख व्हा असा वडीलकीचा -कदाचित अनाहूत सल्ल्ला देत आहे. बघा पटतय का?
विधान १ >>पुढच्या वेळी पाकीट हरवलं तर फोन करायला नक्कीच तुम्ही फोन लंबर घेतला नसणार. इट्स अ‍ॅन इन्वेस्टमें>>>
विधान २ >>@रेव्यु:
<<केवळ हास्यास्पद!!!!
त्या व्यक्तीला कशाला फोन करू?>>

तेच तर म्हणतोय. तुम्ही पुढे-मागे काही मदत करता येइल या भावनेनेच त्याचा फोन नंबर घेतलात ना?>>
विधान ३>>@ अश्विनी के:
मग साध्या आणि भोळ्यालोकांचं प्रमाणिकपणाचं कसलं कौतुक? हे म्हणजे लहान मुलांना आणि वेड्यांना निरागस वगैरे म्हणण्यासारखं आहे.>> लहान मुले निरागस नसतात का?

इतर सर्व मायबोलीकर
तुमच्या प्रतिक्रिया वाचून छान वाटले

सुखद अनुभव. आजच्या काळात खरंच एकदा वस्तु हरवली की गेलीच समजायचं. कोणी त्याचा अगदी गैरवापर जरी नाही केला तरी आवर्जून एखाद्या अनोळखी माणसाची वस्तू वेळ काढून परत करण्याइतका मनाचा मोठेपणा आणि त्यासाठी वेळ आणि शक्ती घालवण्याची कोणाचीही तयारी नसते. त्याबद्दल त्या मुलाचे नक्कीच अभिनंदन.

रेव्यु: <<लहान मुले निरागस नसतात का?>>

नाही. ती निसर्गतःच प्रचंड स्वार्थी, अप्पलपोटी आणि आपमतलबी असतात. त्यांच्यात ती बेसिक इन्टींक्ट सर्वायल साठी लागतातच. पुढे जसजशी त्यांना समज यायला लागते तसे आपण संस्कार करून त्यांना समाजात रहाण्याच्या लायकीचे बनवतो. आता ती आपली स्वतःची असतात, आणि/किंवा गोग्गोड दिसतात म्हणून आपण त्यांना निरागस वगैरे म्हणतो. एरवी एखाद्या ओंगळ वेड्या भिकार्‍याला केवळ त्याच्या मर्कटलीला बघून आणि त्याच्यात स्वार्थ आणि इतर दुर्गुण नसल्यामुळे आपण त्याला निरागस म्हणत नाही.

Pages