वारी

Submitted by मधुरा आपटे on 2 August, 2013 - 03:06

पांडुरंगाची वारीला जाण्यासाठी बरीच जुळवा जुळव चालू होती. कारण त्याने ठरवलं होतं की काहीही करुन यावर्षी वारीला जायचच आणि पांडूरंगाचं दर्शन घ्यायचच. वारीला जाणारी मोठी दिंडी दरवर्षी गावातून निघायची. आपापला लवाजमा घेऊन, पूढच्या प्रवासाचा शिधा घेऊन गावातून बरेच वारकरी वारीला दरवर्षी हमखास जायचे. छोटी- मोठी सगळी माणसं त्या दिंडीत सहभागी व्हायची. गेल्या वर्षीच पांडूने पडक्या वाड्याच्या मागे असलेल्या विठ्ठलाच्या देवळात शप्पथ घेतली होती की मी पंढरपूरला येऊन तुझी भेट घेईन. त्या विठ्ठलाची आणि पांडूची खास दोस्ती होती. अगदी काहीही झालं तरी पांडू रोज न चूकता त्या देवळात जायचा. त्याची पूजा करायचा. पूजा कसली साधी दोन फुल वहाणं हीच काय ती त्याची पूजा. तरी तो ती नेमाने, भक्तीभावाने करायचा. कारण ती विठ्ठलाची मुर्ती त्याच्या मनाच्या फार जवळ होती. तासन तास त्याच्या विठ्ठलाशी गप्पा चालायच्या. त्याला नेहमी प्रश्न पडायचा की एवढी सुरेख मुर्ती असूनही कोणीच कसं पूजा करत नाही या विठ्ठलाची? vari.jpg

पण कोणी नसलं म्हणून काय झालं मी आहे ना! असं म्हणून पांडूने स्वतः पूजा करायला सुरुवात केली होती.
८-९ वर्षाच्या आसपास असणारा रंगाने जरा सावळा, कपाळावर टिळा, अंगात पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट अशा अवतारात असणारा पांडूरंग अगदी गोड मुलगा होता. कोणाची खोडी नाही, अभ्यासात हुशार आणि सगळ्यांना मदत करणारा त्याचा स्वभाव ह्यामुळे त्याचा लळा पटकन लागी. घरची म्हातारीच काय ती पांडूचं घरचं नात्याचं माणूस होतं. आजी- नातवाचं एकमेंकावर खूप प्रेम. आजीने त्याला अगदी तळहातावरच्या फोडासारखं जपलं होतं. आणि पांडूही तिची तशीच काळजी घेत होता. पांडू एक वर्षाचा असतानाच वारीला जातानाच अपघातात त्याचे आई-बाबा गेले होते. आणि पांडू नशिबाने वाचला होता. त्यामुळेच आजीने त्याला तेव्हापासून पांडूरंग अशी हाक मारायला सुरुवात केली. पण तेव्हापासून तिने ठरवलं होतं की भले पांडूरंगाच्या कृपेने पांडू वाचला तरी पोराच्या आई-बापाला हिरावून घेणा-या या वारीला ती कधीच जाणार नव्हती. आणि पांडूनेही कधी जायचं नाही असा शिरस्ता तिने बांधला होता. पण वेळच अशी आली होती की पांडूला पडक्या वाड्याच्या विठ्ठलाच्या समोर वारीला येण्याचं आश्वासन द्यावच लागलं….
गावात काविळीची साथ पसरली होती आणि म्हातारी आठवडाभर अंथरुणाला खिळून होती. ती आता काही वाचत नाही, हे जवळ जवळ पक्क झालं होतं. पण पांडूला मात्र विश्वास होता की आजी वाचणार. त्यामुळे तो निश्चिंत होता. पण एकदा शाळेतुन येताना घरासमोर एवढी मोठी गर्दी दिसल्यावर पांडूचं अवसान तिथेच गळलं. आणि तिथुनच तो पळून गेला….तो फक्त धावत होता……त्याला बाकी काही दिसत नव्हतं…..तो फक्त धावत होता. धावता धावता गावाच्या बाहेर कधी पडला हे त्याला कळलंही नाही. मनात विविध विचारांचं थैमान होतं आणि त्याच अवस्थेत तो पडक्या वाड्यापाशी आला. धावून धावून पांडू खुप दमला होता. आणि त्याने त्या वाड्याच्या पडवीवरच बसकण मारली. आजीची खूप आठवण येत होती. शर्टाच्या बाहीने सतत डोळे पुसत होता. आता कोणाला सांगु असं त्याला झालं होतं. कोणापाशी तरी मन मोकळं करायचं होतं. पण तो सगळं तर आजीलाच सांगायचा. आता कोणाला सांगणार? अशा विचारांच्या वादळातच तो पडवीवर टिपं गाळत बसला होता. तेवढ्यात त्याला समोर घंटानाद झाल्यासारखं वाटलं. अर्ध छप्पर पडलेल्या अवस्थेत एक देऊळ असाव असा भास निर्माण करणारी वास्तू तिथे उभी असलेली त्याला जाणवली. त्याच्या आजूबाजूला पारंब्याचं जाळ पसरलेलं होतं. त्याने जवळ जाऊन झाडाच्या पारंब्या बाजूला केल्या आणि समोर पाषाणात कोरलेली एक छानशी चार फूटी विठ्ठलाची मुर्ती त्याला तिथे दिसली. त्याने अलगदपणे बाजूला असलेल्या रानटी झुडपाची दोन फुलं काढली आणि त्याला वाहिली.
‘तु रागावलायेस का तिच्यावर? ती तुझ्या वारीला, दर्शनाला येत नाही म्हणून?’ त्याने अगदी भाबडेपणाने विचारलं.
‘मी येईन. नक्की! पूढच्या वर्षी वारीला मी स्वतः येईन. मी तुला वचन देतो. पण मला माझी आजी परत दे, मला एकटं नको पाडूस!’ पांडूला हुंदका आवरेना आणि त्याने रडतच मुर्तीच्या पायावर डोकं ठेवलं. तोच एक डेरेदार फुलं पांडूच्या डोक्यात पडलं. विठ्ठलाने आपलं म्हणणं ऐकलं. आजी परत आली. असं ओरडतच तो गावाच्या दिशेने पळायला लागला. आणि घरी जाऊन बघतो तर काय आजी अथंरुणात उठुन बसलेली आणि पांडूकडे बघून हसत होती. पांडूने मनोमन देवाचे आभार मानले. आणि तेव्हापासून तो रोज त्या पडक्या वाड्याच्या देवळात जायला लागला.
खरतर पडक्या वाड्याच्या आडोशाला असणा-या त्या देवळाकडे कोणी फिरकायचच नाही. त्यामुळे तो विठ्ठल फक्त पांडूचा होता. गावाच्या बाहेर असणा-या त्या पडक्या वाड्याकडे कोणी जायचच नाही. १०० वर्षांचा इतिहास त्या वाड्याला लाभला होता. त्या गावच्या सावकारानेच विठ्ठलाच्या मुर्तीची स्थापना केली होती. तो सावकार दररोज न चूकता त्या विठ्ठलाच्या मुर्तीची यथासांग पूजा करायचा. एके दिवशी त्या सावकाराची पूजा चूकली आणि तो आजारी पडला. आणि त्यातच त्याचा अंत झाला. त्याचा मृत्यु झाला त्याच्या दुस-याच दिवशी त्याच्या वाड्याला आग लागली आणि त्यात तो वाडा पूर्ण जळून खाक झाला. काहीही मागे उरलं नाही. त्यामुळे तेव्हापासून पडक्या वाड्याच्या देवळाची पूजा करायची नाही असं गावक-यांनी ठरवलं आणि तो वाडा त्या देवळासकट गावाबाहेर पडला. पण पांडूला मात्र त्या विठ्ठलाचं वेड होतं. कधी एकदा शाळा संपून त्याच्याकडे जाईन असं व्हायचं त्याला.

आषाढी- कार्तिकी जवळ येत होती. आणि गावातही दिंडीची तयारी मोठ्या झोकात चालली होती. गावकरी वारीच्या तयारीला लागले होते. पांडूच्या घरापासून कोप-यावर रहाणारा रामु फुलवाला विठ्ठलाचा मोठा भक्त. दरवर्षी नेमाने वारीला जायचा. आणि न चुकता म्हातारीला प्रसाद आणून द्यायचा. जाण्याआधी हमखास घरी यायचा आणि यावर्षी तरी चल म्हातारे! असं दरवेळी म्हणायचा. पण म्हातारी मात्र कधीही ढळली नाही. वारीला जाण्यासाठी दोन दिवस उरले होते आणि तोच रामु घरी आला. पांडू अभ्यास करत बसला होता. पण त्याच्या डोक्यात वेगळेच विचार घोळत होते. रामूने नेहमीप्रमाणे म्हातारीला बरोबर येण्याचा आग्रह केला.
‘म्हातारे आता तरी विठ्ठलावरचा राग स्योड! तो जे करतो ते भल्यासाठीच करतो’
‘राम्या कोणाचं भलं झालं रे त्यामुळे? माझं? की माझ्या पांडबाचं?आई बापाचं सुख नाही पोराला. आरं मी मेले अस्त्ये तरी चाललं असतं. पण पोराला आई बापाची माया हवीच’
‘जाऊ दे. तु काय ऐकणार नाहीस.येतो म्या. सांभाळ’
‘थांब राम्या. ह्यो दोन रुपयाचं नाणं घे आणि टाक त्याच्या झोळीत.’
‘त्याच्या झोळीत टाकुन काय मिळवणार तु म्हातारे. तुझ्या झोळीत जो सोन्यासारखा पोरगा दिलाय, त्याला तरी दाखव वारी म्हणजे काय असत्ये ते. ते सुख तरी पोराच्या पदरात घाल’
‘तु निघ राम्या. मी काही ऐकायची नाही.’
‘थांबा रामू काका. मी येतोय ह्यावर्षी तुमच्याबरोबर’ पांडूने एकदम बाहेर येऊन सांगितलं.
‘अरे ए पांडबा. तुला बजावलं होतं ना मी की वारीला तु नाय जायचं म्हणून’
‘आजी ऐक माझं. मी वचन दिलय त्याला. मला जाऊदे. अगं तुझी काविळ त्यानेच बरी केलती’
‘कोनी बरी केल्यती?’ राम्याने न रहावून विचारलं.
‘विठ्ठलाने. पडक्या वाड्याच्या विठ्ठलाने. मी वचन दिलय त्याला की ह्यावर्षी मी वारीला त्याच्या दर्शनसाठी जाणार.’
‘काय? तु पडक्या वाड्याच्या विठ्ठलाला गेलता? त्याला वचन दिल्यात? अरे ए वाटोळं होईल रे आपलं’
‘आजे तो विठ्ठल चांगला हाय गं, त्यानं माझं ऐकलं. त्याने तुला बरं केलं. मला माझी आजी परत दिलती गं. मला त्याला भेटायला गेलच पाहिज्ये.
‘म्हातारे ऐक आता तरी.’
‘म्या तुला पाठवायची नाय पांडबा. सांगून ठेवत्येय. तु परत हा इषय माझ्याकडे काढू नकोस. आणि त्या पडक्या वाड्याच्या विठ्ठलाकडे जाच. तंगडं मोडून ठेवत्येय बघ तुझं. वारी होईस्तोवर तु त्या विठ्ठलाकडे जायचं नाय’ असं म्हणून आजी आत स्वयंपाक खोलीत निघून गेली.
राम्याने पांडूला डोळ्यांनीच फक्त शांत रहायला सांगितलं. म्हातारीने दिलेले ते दोन रुपये त्याच्या हाती सोपवले आणि खांद्यावर थोपटून तो निघून गेला.
पांडूला हे वारीचं खूळ कुठून लागलं, ह्याचा विचार करत स्वतःशीच बडबडत ती भाक-या थापत होती. पांडू ते दोन रुपये घेऊन दाराशीच बसुन होता. संध्याकाळपासून तो आजीशी एकही शब्द बोलला नव्हता.
‘पांडबा, जेवायला चल.’
‘मी नाही येणार’
‘असं नग रे करुस. बघ तुझ्यासाठी गरमा गरम भाकरी आणि भाजी केलीय. तुझ्या आवडीची’
‘मला नकोय ते’
‘असं रागवतात का आजीवर? मी वारीला जाऊन देत न्हाय म्हणून?’
‘हो म्हणूनच. तु फक्त स्वतःचा विचार करतेयेस.’
म्हातारीच्या काळजात ते शब्द रुतले. पळत जाणा-या पांडबाच्या पाठमो-या आकृतीकडे ती बघत बसली. संपूर्ण रात्र पांडू घराबाहेरच राहिला. आणि आजी इथे काळजीने रात्रभर येरझा-या घालत होती. पोरगं माझ्यावर रागवून गेलय. त्याला सांभाळ. असं मनोमन घरातल्या पांडूरंगाच्या मुर्तीला बजावत होती.
सकाळी बाहेर पावलांचा आवाज आला. आजीने धावत जाऊन दार उघडलं. पांडू न बोलताच आत आला. हात पाय धुवुन आजीसमोर येऊन उभा राहिला. आजीने त्याला जेवायला वाढलं. रडून रडून पांडूचे डोळे लाल झाले होते. रात्रभर पांडू गावाबाहेर पडक्या वाड्याच्या विठ्ठलापाशीच होता. आजीला त्याच्या मनाची अवस्था कळत होती. कोणी काहीच बोलत नव्हतं. पांडूने जेवण संपवलं, चूळ भरुन तो पडवीत आला. खिशातल्या दोन रुपयांकडे बघत होता. हे पैसे आता रामू काकांना परत करावे लागणार. तो त्याच्या निर्णयापर्यंत आला होता. तेवढ्यात आजीची चाहूल त्याला लागली.
आजीने गाठोड्यातुन ठेवणीतले कपडे आणले होते. चांगले दोन जोड होते. एका कापडात बांधून ती त्याचे बाकीचे कपडे भरत होती.
‘आजे ह्ये काय चाललय?’
‘ आरं, विठ्ठलाच्या दर्शनाला तु काय असे मळकं कपडं घालणार व्ह्य?’
‘ म्हणजे मी वारीला जातोय?’
‘ हो रं माझ्या पांडबा. तु जा. डोळं भरुन बघून घे त्याला. त्याच्यामुळेच तु वाचलास. तुला त्याच्यापासून अडवणारी म्या कोन?’
पांडूने आजीला घट्ट मिठी मारली. पांडू आनंदाने नाचत राम्याकडे गेला. राम्यालाही तो येणार हे बघून खूप बरं वाटलं.
‘पांडू लवकर सामान घेऊन चल. गावातुन दिंडी निघेल थोड्यावेळात.’
पांडू भरभर धावत घरी येत होता. आजीने भाकरी तयार करुन ठेवली असेल. गाठोड बांधून ठेवलं असेल. आता पाणी घ्यायचं आणि निघायचं.
‘आजे निघतो. उशीर होतोय. आजे अगं लवकर बाहेर ये. पांडूला आजी घरात कुठेच दिसेना..,…आजे कुठेयेस? असं हाक मारत परसदारी बघण्यासाठी पांडू गेला. अजून पाणी घ्यायचं होतं कारण. आजी पाणी घेत असेल विहीरीतुन….

पांडू पाण्यासाठी परसदारी गेला. तिथे आजी काही त्याला दिसली नाही. ‘माडीवर असेल’ असं म्हणून पांडू स्वतःच विहीरीजवळ गेला. विहीरीच्या इथे खूप निसरडं झालं होतं…..पांडू हलक्या पावलाने रहाटाजवळ पोचला…तिथे रहाटावरुन कळशी आधीच सोडलेली त्याला दिसली. त्या रहाटाचा येणारा खडखड आवाज शांततेत घुमत होता. पांडूने ती कळशी घेण्यासाठी विहीरीत डोकावलं. आता दोरीने कळशी वर घेणार…पाणी घेणार…आणि निघणार…ह्या विचारातच तो दोर खेचत होता. तोच त्याला पाण्यात काहीतरी तंरगताना दिसलं….आजीची साडी?…पाण्यात…त्याने अजून डोकावून पाहिलं….. विहीरीच्या त्या काळ्या पाण्यात आजी तळाशी विसावलेली त्याला दिसली..….त्याच्या हातातुन कळशी धपकन पाण्यात पडली…आणि पाण्याच्या आवाजाचा तरंग शांतता चिरत गेला…

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजी एकदम जुने खोड, हट्टी आहे. नातवावर पण तिचा फार जीव आहे. एक दिवस्पण ती त्याला न पाहिल्याशिवाय घालवत नसणार. वारीला मुलगा आणि सुन गमाविलेल्या म्हातारीने नातु पण तिथेच चालला म्हणुन हाय खाल्ली असणार. आता नातु महिनाभर दिसणार नाही या विचारात पाणी भरताना बहुतेक तिचा तोल गेला असावा.
कथा छान जमली आहे.