कारल्याची भाजी.

Submitted by नंदिनी on 23 July, 2009 - 02:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. कारली
२. चिंचेचा कोळ
३. गूळाचा एक खडा
४. दाण्याचा कूट
५. तीळकूट
६. गोडा मसाला (कोकणस्थ लोकाचा)
७. तिखट
८. सुके खोबरे
९. हळद
१०. मीठ
११. तेल

क्रमवार पाककृती: 

१. कारल्याच्या चकत्या कापायच्या, मधला भाग पूर्णपणे काढायचा. या चकत्याना हळद मीठ लावून चार पाच तास ठेवून द्या.
२. हलक्या हाताने चकत्या पाण्यखाली धुवून घ्या. कडवटपणा निघून जातो. मधुमेह व्यक्तीसाठी कारली बनवत असाल तर असे धुवून घ्यायची नाहीत.
३. चिंचेचा अर्धी वाटी कोळ घेऊन त्यामधे गूळ, तिखट, गोडा मसाला, दाणेकूट, तीळकूट, सुके खोबरे(भाजलेले) घालून मिक्स करून घ्या.
४. या मिश्रणाला वरून फोडणी द्यायची.
५. नंतर हे मिश्रण कढईत घ्या. कारल्याच्या चकत्या घाला. कारली डुबतील इतके पाणी घाला. मीठ घाला.
६. घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर ठेवून द्या.
७. साधारण २० मिनिटात कारली शिजतील. आच बंद करा. कढई गार झाल्यावर झाकण काढा.

वाढणी/प्रमाण: 
पाव किलो कारली असल्यास दोघासाठी पुरेल.
अधिक टिपा: 

कारली अजिबात कडू लागत नाहीत.
चकत्या एकदम पातळ करू नये. सर्व लगदा होतो. वाटल्यास चौकोनी फोडी पण करता येतील.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००९ची कृती आज वर आलीये होय. काही केल्या मला आठवेना मी कारल्याची भाजी. अशी पाकृ कधी लिहिली होती ते. Happy

टुनटुन, नक्की करून बघ. मीच गेल्या कित्येक महिन्यांत कारली केली नाहीत.

नंदिनी छान आहे पाकृ. मला काचर्‍या खूप आवडतात. अशी भाजी क्वचित बनवली जाते. आता करून पाहीन.
बाय द वे, चौकोनी तुकडे कसे करायचे? दंडगोल म्हणायचंय का तुला?

नंदिनी आज तू लिहीलेल्या पद्धतीने कारली केली. एकदम सही झालीत्.:स्मित: गोड+आंबट+ तिखट अशा चवींचा मेळ जमल्याने कारली फार कडू झाली नाही. फक्त कारल्याचा मुळचाच कडवटपणा थोडासा होता, पण तो कडुझर वाटला नाही.:स्मित: धन्यवाद मस्त पाककृती. तुझ्या सासुबाईंना पण धन्यवाद सांग.

वेळेअभावी फोटो मात्र काढु शकले नाही त्याबद्दल सॉरी.

लोला, सार्वजनिक केली पाकृ.

साती, गोडा मसाला स्वातीच्या रेसिपीने परफेक्ट होतो. विकतचा आणशील तर राधेश्यामच्या कोपर्‍यामधे एक मसालेवाले कुळकर्णी आहेत त्यांच्याकडून आण.

टुनटुन, करून बघितल्याबद्दल धन्यवाद.

साती जूनी मायबोलीचा फाँट वाचता येत असेल तर बघा, तिथे बर्‍याच जणांनी मसाल्याच्या कृती दिल्या आहेत. त्या पाककृती विभागात विवीधा या सदरात आहेत त्या कृती.

जळ्ळा तो फाँट वाचता येत नाही ना!
मोबाईलवर तर नाहीच नाही.
त्या सगळ्या लेखनाचं फाँटांतर करायचं कुणीतरी मनावर घेतलं पाहिजे.

नंदिनी, कुळकर्ण्यांचे मसाले बेस्ट!

पण म्हाग, म्हणून घरीच करते आता.

साती मी ते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला ते जमले नाही. अ‍ॅडमीनना शक्य असेल तर दुधात साखर. नाहीतर वेळ काढुन मी एकेक करुन लिहीण्याचा प्रयत्न करेन.

विकतचा आणशील तर राधेश्यामच्या कोपर्‍यामधे एक मसालेवाले कुळकर्णी आहेत त्यांच्याकडून आण. >>> +१ आणि कैरी लोणचे मसालापण छान असतो. आई जेव्हापासून घरी मसाले करायची बंद झाली तेव्हापासून कुळकर्णी मसाले झिंदाबाद!

आज काचर्‍या केल्या. ही रेस्पी आवडेल का मंडळींना अशी शंका आली. आता एकदा संध्याकाळ्च्या जेवणात करून बघेन, आवडली तर डब्यात द्यायला होईल.

साती आणि टुनटुन, मुंबईतल्या मुसळधार पावसाने आज भरपूर वेळ दिला आहे, मी 'विविधा'मधले मसाले नव्या मायबोलीत आणते.

आरती,

मी, साती, प्रज्ञा९ आम्ही तिघी रत्नागिरीच्या माहेरवाशिणी. रत्नागिरीमघे राम आळी नावाची एक गल्ली आहे बाजारात. त्या गल्लीच्या एंडला हे मसाल्याचे अगदी छोटेसे दुकान आहे.
प्रज्ञा९, राम आळीचे आधीचे नाव काय होते गं?

मी हि भाजी थोड्या वेगळ्या प्रकारे करते, मसाला सेम (सुक्या खोबऱ्याऐवजी ओले खोबरे). मी जास्त तेलाची फोडणी करून त्यात कारल्याचे तुकडे परतते (जरा मोठे काप करते) आणि वरून सर्व मसाला टाकते, ( वांगी, भेंडी, सिमलामिरची घालून पण करते). थोडा तेलाचा तवंग येतो भाजीवर, चमचमीत होते.

आता ह्या पद्धतीने करून बघेन.

कार्लं कसंही आवडतं, पण काचर्‍या फेव्हरिट.
नंदिनी, मीठ लावल्यावर चारपाच तास नाही लागत ठेवायला. १५-२० मिनिटंही पुरतात पाणी सुटायला. ते पाणी काढून टाकलं तर पुन्हा फोडी धुवायची खरंतर आवश्यकता नाही. (तितकंही कडू चालत नसेल तर याच रेसिपीने दोडक्याची भाजी करावी. :P)

(तितकंही कडू चालत नसेल तर याच रेसिपीने दोडक्याची भाजी करावी. फिदीफिदी) << बरोबर आहे. थोडासा कड्वट नसेल तर कारल कारल वाट्णार नाही.:) एका मैत्रिणीने कारल्याचीच पण अतिशय साधी भाजी केलेली. कमीतकमी मसाले घालुन. तिच्यामते आपण कोणत्याही भाजीत खुप मसाले टाकुन तिची मुळची चव घालवुन टाकतो. तिने सांगीतलेली पाककृती अर्थात मला आठवत नाहीये पण चव अप्रतीम होती हे आठवतय.

स्वाती, हल्ली गेल्या काही वेळेला मी पण चार पाच तास ठेवत नाही. फोडी मात्र धुवून घेते. पित्तप्रकृती असल्याने कडवटपणा जितका जाईल तितके बरं पडतं मला. Happy

अंजू, या भाजीला तेल खूप कमी लागतं म्हणून मला करायला आवडते. मसाल्याला फोडणी दिली नाही तरी चालते या रेसिपीमधे आणि दिली तरी अगदी उलूशी तेलाची फोडनी पुरते.