फूड स्टायलिंग आणि भूषण

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भूषण इनामदार हे नाव तीन वर्षांपूर्वी कधीतरी फेसबुकावर वाचलं होतं. कुठल्या तरी पानावर आईस्क्रीमचा एक अफलातून फोटो होता आणि त्या फोटोखाली ’स्टायलिंग - भूषण इनामदार’ असं लिहिलं होतं. इतकं उत्तम फूड स्टायलिंग करणारं कोणी पुण्यात असेल, याची त्यावेळी कल्पना नव्हती. फोटोखाली दिलेल्या नंबरावर मग त्याला एसएमएस पाठवल्याचं आठवतं. पुढे पाचसहा महिन्यांनी फूड स्टायलिंगबद्दल एखादा लेख लिहावा, असं डोक्यात आलं आणि भूषणची आठवण झाली. भूषणला भेटलो. त्याच्याबरोबर त्याच्या तीनचार शूटना गेलो. तो काम कसा करतो, हे पाहिलं. शूट सुरू असताना त्याची प्रचंड धावपळ सुरू होती. प्रखर दिव्यांमुळे इडल्या कोरड्या न दिसू देणं, सांबार्‍याचा रंग फिका न होऊ देणं, याकडे लक्ष ठेवत तो पनीर आणि चिकन शिजवत होता आणि वर मला त्यानं दोन दिवस अगोदर काय तयारी केली, त्या दिवशी पहाटे चारला उठून इडल्या कशा केल्या, चिकन किती शिजवणार आहे, कॅम्लिनचे रंग चिकनकरीसाठी कसे उत्तम, कोल्हापुरी तांबड्या रश्श्याला रंग आणायला तो कुठकुठली रसायनं वापरतो, असं सगळं सांगत होता. ते दोनतीन दिवस मीच थकलो. तो मात्र मजेत असायचा.

भूषण भारतातल्या आघाडीच्या फूड स्टायलिस्टांपैकी एक. जेमतेम तिशी ओलांडलेला. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीत पदवी मिळवल्यानंतर त्यानं हॉटेल ओबेरॉयसारख्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलांमध्ये शेफ म्हणून काम केलं. त्यानंतर काही काळ तो टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या केटरिंग कॉलेजात लेक्चरर म्हणून कार्यरत होता. त्याच वेळी पुण्यामुंबईत नवनवी हॉटेलं सुरू होत होती. कॅफे शोकोलादसारखे नवे प्रयोग होत होते. फूड स्टायलिंगची आवड होतीच, भूषणनं व्यवसाय म्हणून हे काम करण्याचं ठरवलं. त्याची पत्नीही शेफ आणि केटरिंग कॉलेजात लेक्चरर. तिनंही पाठिंबा दिला आणि भूषणची घोददौड सुरू झाली. अगदी थोड्या अवधीत त्यानं आपल्या कामानं नाव मिळवलं. भूषण पुण्याचा. इथल्या उद्योजकांना, हॉटेलमालकांना आपल्या उत्पादनांची जाहिरात करायची निकड नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्याच्या हातात फार काम नव्हतं. अनेकांनी त्याला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. पुण्यापेक्षा मुंबईत संधी खूप जास्त. पण भूषणनं पुण्यात राहून उत्तम काम करून दाखवलं. पुण्यात राहून त्यानं मुंबईतली कामं मिळवली. त्याच्या हातातलं कसब इतकं भन्नाट, की त्यानं केलेलं स्टायलिंग बघून पूर्वी कधीही स्टायलिंगच्या भानगडीत न पडलेल्या किंवा इंटरनेटवरून तयार फोटो घेणार्‍या पुण्यातल्या अनेक हॉटेलांनी, उद्योगांनी त्याच्याकडून आपल्या उत्पादनांचं स्टायलिंग करून घेतलं.

bhushan7.JPG

भूषण मस्त दिलखुलास माणूस. कधीही फोन केला तर मदतीला तत्पर. शिवाय ही मदतही निरपेक्ष.
’बोला, काय म्हणताय?’ ही त्याची फोनवरची सुरुवात.
’मायबोलीसाठी तू परीक्षक म्हणून काम करायचं आहेस, आम्ही मानधन देऊ शकणार नाही.’
’मानधन मागितलं आहे का मी?’
त्यानं परीक्षणाचं काम इतक्या गांभीर्यानं केलं, की त्याला ते काम सांगितल्याबद्दल मलाच कानकोंडं व्हायला झालं.

स्वीकारलेलं काम भूषण सर्व मेहनत पणाला लावून पूर्ण करायचा. किती लहान काम असू दे, त्याच्या लेखी ते त्याच्या आयुष्यातलं पहिलं काम असायचं. दुसर्‍यांच्या कामाचंही त्याला कौतुक असे. फोन झाला की ’अरे, ती हे जाहिरात बघितलीस का? मस्त केली आहे त्या अमक्याने’, असं मनापासून कौतुक करायचा. माझे लेख त्याला पाठवायचो. वाचून झाले, की त्याचा फोन किंवा एसएमएस यायचा. ’तू हे लेख इंटरनेटवर का टाकतोस?’ असं त्यानं एकदा विचारलं होतं, ’पुस्तक कर, किंवा मासिकात छाप. लोक चोरतात अरे इंटरनेटवरून’. त्याचं हे फार मोठं दु:ख होतं. त्यानं काढलेले फोटो लोक बिनदिक्कत त्याची परवानगी न घेता, मोबदला न देता वापरायचे. या चोरीकडे दुर्लक्ष करणं, त्याला शक्य नव्हतं. कामाची चोरी बघून तो कळवळायचा. पैसा न मिळाल्यापेक्षा लोक चोरी करतात, याचं दु:ख जास्त असायचं. मग तो, त्यानं ज्यांच्यासाठी स्टायलिंग केलं होतं ते, असे पोलिसांत तक्रारी करायचे, नोटिसा पाठवायचे. कधी उपयोग व्हायचा, कधी नाही. भूषण वैतागायचा. एकदोनदा मात्र त्यानं लेखासाठी स्वत:हून मला फोटो पाठवले होते. ते इतके सुंदर होते, की ते लेखासाठी वापरू नयेत, असंच वाटलं. त्याचं काम त्याला श्रेय न देता इतरांनी वापरू नये, असं मला वाटलं. माझ्या पुस्तकासाठी मात्र तोच स्टायलिंग करणार होता.

दर दिवाळीला तो अशाच सुंदर फोटोंचं शुभेच्छाकार्ड पाठवायचा. अतिशय देखणं आणि प्रचंड कल्पक अशी ती कार्डं असत. त्याच्या व्यवसायावर, खाण्यावर असलेलं त्याचं प्रेम त्या कार्डांमधून दिसायचं.

या दिवाळीत मी जवळच्या काही व्यक्तींच्या आजारपणामुळे रंजीस आलो होतो. त्यानं पाठवलेल्या एसएमएसला, इमेलीला उत्तर द्यायचंच राहिलं. मधल्या काळात फोनही झाले नाहीत. गेल्या महिन्यात त्याला फोन केला तो परत एका कामासाठीच. त्याच्याकडून मला काही पाककृती हव्या होत्या. एकही प्रश्न न विचारता तो कबूल झाला. ’तू ठीक आहेस ना?’ एवढंच विचारलं. मग आम्ही आमच्या कामांबद्दल वगैरे बोललो. तो नेहमीप्रमाणेच उत्साहात होता. ’नवीन काही लिहिलंस?’, असं विचारलं. डोक्यात असलेले आणि मिळालेले संदर्भ, माझे निष्कर्ष त्याला सांगितले. ’नको रे हे इंटरनेटवर टाकूस’, असं म्हणून त्यानं गेल्या काही महिन्यांत लोकांनी त्याचं काम कसं आणि कुठे चोरलं, हे सांगितलं. पण हे ऐकूनही का कोण जाणे, या वेळी मी त्याला स्वत:हून फोटो मागितले. ’तू अगदी सराव म्हणून केलेल्या कामाचे फोटो मला वापरायला दे, मला चालतील’.
’बरं, देतो. लगेच इमेल करतो. तू आत्ता सांबार्‍याबद्दल माहिती सांगितलीस नं, त्या भागासाठी माझ्याकडे एक मस्त फोटो आहे, तो तू वापर. पण पुस्तक नक्की ना? आपण मस्त स्टायलिंग करू. लिहून लवकर संपव’.

भूषणनं तीनचार फोटो लगेच पाठवले. सांबार्‍याचा फोटो जरा रिसाईझ करून पाठवतो म्हणाला.

मग आठवडाभरानं तो मला लक्ष्मी रस्त्यावर दिसला. चहाच्या एका टपरीसमोर उभा राहून पावसात चहा पीत होता. मी घाईत होतो, पाऊसही होता. मी थांबलो नाही.

शनिवारी, १३ तारखेला त्याला दुपारी फोन केला. त्याच्या पाककृती आणि सांबार्‍याचा तो फोटो मला अजूनही मिळाले नव्हते. ’आज रात्री नक्की पाठवतो, अर्रे, एका शूटमध्ये खूप वेळ गेला रे. सॉरी, पण आज नक्की पाठवतो’.

आज सकाळपर्यंत मला फोटो आणि लेख मिळाले नव्हते. गेले तीन दिवस मी रोज त्याला एसएमएस करत होतो. लेखाची आणि फोटोची आठवण करून द्यायला. त्याचं काहीच उत्तर नाही. मग सकाळी फोन केला, तो त्याच्या पत्नीनं उचलला. गेल्या शनिवारी संध्याकाळी, मी त्याच्याशी बोललो त्याच्या अवघ्या काही तासांनतर तो गेला होता. ’असं कसं शक्य आहे?’ एवढंच बराच वेळ मी फोनवर म्हणत राहिलो.

त्या दिवशी पावसात न थांबल्याची खंत आता किती काळ पुरेल, हे ठाऊक नाही.

bhushan2.jpg

’माहेर’च्या २०११ सालच्या ’अन्नपूर्णा विशेषांका’साठी मी एक लेख लिहिला होता. हा लेख लिहिण्यासाठी मला भूषणनं मदत केली होती. लेखातला बराचसा भाग हा अर्थातच त्याच्या कामावर आधारित होता. त्याचं काम लोकांपर्यंत पोहोचावं, म्हणून हा लेख इथे पुन्हा प्रकाशित करतो आहे. लेखाबरोबर प्रकाशित करण्यासाठी त्यानं खूप सुरेख फोटो दिले होते. पण आता हे फोटो मायबोलीवर वापरायची परवानगी द्यायला तो नाही. त्यामुळे ते फोटो या लेखात समाविष्ट केलेले नाहीत.

bhushan4.jpg

गेल्या आठवड्यात कितव्यांदातरी टीव्हीवर ’ज्यूली अ‍ॅण्ड ज्यूलिया’ हा चित्रपट बघत होतो. ज्यूलिया चाइल्ड आणि तिचा नवरा पॅरिसमधलं पहिलं जेवण घेण्यासाठी एका रेस्तराँमध्ये बसले आहेत. दोघांनाही हे शहर अगदी नवखं. ज्यूलिया तशी नाखूशच आहे. पॅरिसला येण्याची तिची फारशी इच्छा नव्हती. थोड्या वेळानं पुढ्यात जेवण येतं. सोल मनियेर आणि व्हाईट वाइन. काचेच्या सुरेख ताटलीत लोण्यात घोळवलेला गुलाबीसर मासा, त्यावर क्रीम, लिंबू आणि पार्स्ले. ज्यूलिया काही सेकंद त्या ताटलीकडे बघतच राहते. पाहताक्षणीच ती त्या पदार्थाच्या प्रेमात पडली आहे. त्या विलक्षण गंधानं तिच्यावर गारुड केलं आहे. ती पहिला घास घेते. माशाच्या त्या तुकड्यानं आता ज्यूलियाला पुरतं काबीज केलं आहे. तिची पंचेंद्रियं तो अद्भुत अनुभव आसुसून घेतात. "बरं, पॅरिसमध्ये राहून तुला नक्की काय करायला आवडेल?", पूर्णपणे अनोळखी असलेल्या पॅरिसमध्ये राहण्याच्या कल्पनेनंच वैतागलेल्या ज्यूलियाला तिचा नवरा विचारतो. "खायला", ती शांतपणे उत्तर देते.

पॅरिसमध्ये राहून ज्यूलियानं आपला वेळ सत्कारणी लावला. ती फ्रेंच पाककला शिकली. वेगवेगळ्या प्रकारचे चीझ, तर्‍हेतर्‍हेचे मासे, वाइन यांच्याशी तिनं नीटच मैत्री करून घेतली. समोर आलेला पदार्थ आकर्षक हवा, त्याच्या गंधानं खाणार्‍याला भारून टाकायला हवं, डोळे आणि नाक तृप्त झाले की जिभेला तृप्त करणं फारच सोपं, हा फ्रेंच पाककलेतला महत्त्वाचा सिद्धांत. पदार्थाची चव उत्तम असणं जितकं महत्त्वाचं, तितकंच महत्त्वाचं असतं तो पदार्थ उत्तम दिसणं, हे महत्त्वाचं सूत्र तिनं आत्मसात केलं. ज्यूलिया चाइल्डची गोष्ट सांगणारा ’ज्यूली अ‍ॅण्ड ज्यूलिया’ हा चित्रपट खाण्यासाठी जगणार्‍या माझ्यासारख्यांसाठी म्हणूनच मेजवानी आहे. ज्यूलियानं जपलेलं पदार्थांचं देखणेपण या चित्रपटातही राखलं आहे. फ्रेंच अनियन सुपातलं ते मखमली चीझ, ब्रूश्केतातले लालबुंद, रसरशीत टोमॅटो, मश्रूम आणि क्रीमबरोबर शिजवलेली लुसलुशीत कोंबडी, चॉकलेट सूफ्ले, रास्पबेरी बव्हेरियन क्रीम असं सारं विलक्षण जिवंत होऊन पडद्यावर उमटतं आणि प्रेक्षकांच्या सार्‍या जाणिवा जागृत होतात. डोळे सुखावतात, पण मनही सुखावतं. ते पदार्थ केवळ बघण्यातून अपरिमित सुख मिळतं. फूड स्टायलिस्ट असलेल्या सुझन स्पन्जेनची ही किमया आहे. या चित्रपटातले सगळे पदार्थ विलक्षण देखणे करण्यासाठी आणि ज्यूलियानं जे आत्मसात केलं, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली आहे.

फूड स्टायलिस्टाचं मुख्य काम पदार्थांना आकर्षक बनवणं. एखादा पदार्थ जेव्हा लोकांसमोर येतो, तेव्हा तो किती चविष्ट आहे, तो कसा आवर्जून खाल्लाच पाहिजे, हे लोकांना पटवून द्यावं लागतं. नुसतं सांगून किंवा लिहून हे होत नाही, लोकांची तशी खात्री पटायला हवी. त्यासाठी तो पदार्थ अतिशय आकर्षक स्वरूपात सादर व्हायला हवा. पाहताक्षणीच खावासा वाटायला हवा. गारेगार आइस्क्रीम, पित्झ्यातून ओघळणारं चीझ, कोंबडीच्या रश्श्यावरची तर्री बघूनच आपण अनेकदा नवा मसाला विकत घेतो, किंवा एखाद्या नव्या रेस्तराँमध्ये जातो. एखाद्या मासिकातली पाककृती इतकी भयंकर सुंदर दिसत असते की, तो पदार्थ लगेच केला नाही, तर आपल्याला मोक्ष मिळणार नाही, अशी समजूत करून घेऊन आपण लगेच ओट्याशी येतो. अर्थात कुठल्याही जाहिरातीचा हाच हेतू असतो. तुम्ही एखाद्या टीव्हीची जाहिरात करत असाल, तर त्या टीव्हीची उपयुक्तता ग्राहकाला पटायला हवी. तो टीव्ही सर्वोत्तम कसा, हे प्रेक्षकांना, वाचकांना कळायला हवं. पण त्यासाठी ती जाहिरात ’प्रेक्षणीय’ असावी लागते. पण रेस्तराँना, तयार खाद्यपदार्थ किंवा तेल-मसाले-मीठ-कणीक-केचप इत्यादी विकणार्‍यांना त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करताना ती जास्तीत जास्त आकर्षक कशी दिसेल, याची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. कारण जाहिरातीतले पदार्थ किंवा उत्पादनं आवडली नाहीत, तर पुन्हा ती कोणी विकत घेणार नाहीत. टीव्ही, कार अशा वस्तू सहसा दर आठवड्याला किंवा महिन्याला विकत घेतल्या जात नाहीत, पण खाद्यपदार्थांचं तसं नाही. त्यामुळं ग्राहकानं उत्पादनांकडे एकदा पाठ फिरवली की नंतर केलेल्या जाहिरातींचा उपयोग शून्य. म्हणूनच खाद्यपदार्थांच्या जाहिरातींना विशेष महत्त्व दिलं जातं. या जाहिरातींमधल्या पदार्थांचं नेत्रसुखद आणि दिलखेचक सादरीकरण करण्याची जबाबदारी फूड स्टायलिस्टाची असते. पाककलेची पुस्तकं, खाद्यपदार्थांची किंवा मसाल्यांची वेष्टनं यांत जी सुरेख छायाचित्रं असतात, ती या फूड स्टायलिस्टांची कामगिरी असते. चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये जे खाद्यपदार्थ दिसतात, त्यांचं सादरीकरणही फूड स्टायलिस्टच करत असतात.

bhushan1.jpg

नितीन टंडन, शुभांगी धाइमाडे, इंद्राणी दासगुप्ता, साबा गाझियानी, विश्वेश संत, भूषण इनामदार हे भारतातले आघाडीचे फूड स्टायलिस्ट. अनेक मोठ्या कंपन्यांसाठी, प्रकाशनसंस्थांसाठी, चित्रपटांसाठी या सर्वांनी काम केलं आहे. पुण्यात भूषण इनामदारांचा फूड स्टायलिंगसाठी स्टुडिओ आहे. फूड स्टायलिंगचं बरचसं काम ते इथेच करतात. स्टायलिंग, छायाचित्रण, त्यासाठीची तयारी, प्रकाशयोजना हे सारं वेळखाऊ तरी अतिशय रंजक असं प्रकरण आहे. "हॉटेलात स्वयंपाक करणं, आणि फूड स्टायलिंगसाठी स्वयंपाक करणं, यांत खूप फरक आहे. छायाचित्रणासाठी आम्ही जे पदार्थ तयार करतो, ते फक्त कॅमेर्‍यासाठीच असतात. खाण्यासाठी नव्हेत. हॉटेलातला शेफ ज्या पद्धतीनं एखादा पदार्थ सजवतो, त्यापेक्षाही अधिक आकर्षक असा पदार्थ आम्हांला पेश करायचा असतो. पदार्थ उत्कृष्ट दिसावेत म्हणून आम्ही मिरची-मसाले यांच्याबरोबरच अनेकदा कृत्रिम रंगांचा किंवा रसायनांचाही वापर करतो. फोटो काढण्याच्या किंवा चित्रीकरणाच्या बर्‍याच आधी तो पदार्थ तयार केला जातो. तो पदार्थ फोटोंमध्ये खुलून दिसावा म्हणून आम्ही अनेक युक्त्या वापरतो. प्रत्येक फूड स्टायलिस्टाच्या भात्यात अशा युक्त्या असतात. अनेक प्रयोग करून, बराच अभ्यास करून फूड स्टायलिस्ट या पद्धती तयार करत असतो, त्यामुळे प्रत्येकाची काम करण्याची पद्धत निराळी असते", भूषण इनामदार सांगतात. ज्या पदार्थाचा फोटो काढायचा आहे, त्याला स्टायलिंगच्या परिभाषेत ’हीरो’ असं म्हटलं जातं. सिनेम्यांमधला हीरो जसा सर्वांत देखणा आणि ताकदवान, तसाच इथला हीरोही देखणा असतो. या हीरोच्या रंगभूषेसाठी फूड स्टायलिस्ट वेगवेगळे ब्रश, ट्वीझर, फोरसेप, टूथपिक अशी आयुधं वापरतात. परवा भूषण इनामदारांच्या स्टुडिओत गेलो, तेव्हा एका मसाले बनवणार्‍या कंपनीसाठी फोटो काढण्याचं काम सुरू होतं. चिकन करी, छोले, इडली सांबार अशा पदार्थांचं स्टायलिंग त्या दिवशी भूषण करत होते.

चिकन करी, छोले यांसाठी ग्रेव्ही त्यांनी अगोदरच करून ठेवली होती. हॉटेलांमध्ये बरेचदा ग्रेव्ही आधी तयार करून ठेवलेली असते. आपण ऑर्डर दिली की, त्याप्रमाणे त्यात पनीर, भाज्या, चिकन इत्यादी घालून आपल्यासमोर ती डिश पेश केली जाते. फूड स्टायलिंग करतानाही हीच पद्धत वापरली जाते. भूषण म्हणाले, "चिकन, पनीर, भाज्या शिजवले की त्यांचा रंग बदलतो. आकार बदलतो. भाज्या निस्तेज दिसतात. चिकन सुरकुततं. म्हणून आम्ही चिकन, भाज्या पूर्ण कधीच शिजवत नाही. नक्की किती शिजवायचं, हे समजणं ही एक कला आहे. भाज्या कच्च्या आहेत, असं वाटायला नको आणि शिजवल्यामुळे त्यांचा रंगही जाता कामा नये. चिकनच्या, मटणाच्या बाबतीतही तेच. आता चिकन करीसाठी मी ग्रेव्ही अगोदरच तयार केली आहे. त्यात चिकनचा मोठा तुकडा घातला तर तो ग्रेव्हीमध्ये बुडेल आणि फोटोत नीट दिसणार नाही. म्हणून आम्ही अगोदर उकडलेल्या बटाट्यांचा थोडा लगदा त्या बोलमध्ये भरतो. त्यावर ग्रेव्ही घालतो. बटाट्याच्या लगद्याच्या आधारे चिकनचा लेगपीस बोलमध्ये व्यवस्थित राहतो. चिकन व्यवस्थित शिजलं आहे, हे दाखवण्यासाठी त्यावर थोडी ग्रेव्ही घातली जाते. पनीर किंवा इतर भाज्यांच्या बाबतीतही असंच केलं जातं. बोलभरून ग्रेव्ही घेण्याऐवजी भाज्या, पनीर ग्रेव्हीवर तरंगत आहेत हे दिसेल, इतकीच ग्रेव्ही घेतली जाते. बाकी सगळा बटाट्याचा लगदा असतो. फोटो काढण्याची काही मिनिटांआधी ही सगळी रचना केली जाते. कांदा, टोमॅटो, पुदिन्याची पानं सजावटीसाठी वापरायची असतील, तर ती अर्धा तास बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवलेली असतात. अगदी ऐन वेळी बाहेर काढून त्यांचा सजावटीसाठी वापर केला जातो. भाज्यांना लकाकी यावी म्हणून बेबी ऑइल किंवा ग्लिसरीन ब्रशच्या मदतीनं लावलं जातं. नारळाच्या चटणीतल्या मोहर्‍याही ट्विझरनं नंतर वर ठेवल्या जातात. त्या फोडणीतल्या मोहर्‍या दिसाव्यात, म्हणून वरून तेल चोपडलं जातं".

फूड स्टायलिंग करताना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्याशी थोडाफार परिचय आवश्यक असतो. फोटो काढताना प्रकाशयोजना कशी असावी, रंग छान दिसावेत म्हणून प्रकाश कसा असावा, कृत्रिम रंग कसे आणि किती वापरायचे, कमी आणि जास्त तापमानाला होणारं पदार्थांचं विघटन, मसाल्यांमुळे येणारा रंग या सार्‍यांचं ज्ञान असणं अत्यावश्यक असतं. शिवाय सौंदर्यदृष्टी हवी. पदार्थांबरोबर कुठले प्रॉप्स वापरायचे, ते नीट ठरवता यायला हवं. स्वयंपाकघरातल्या विज्ञानाची जाण असल्याखेरीज काम करताच येत नाही. उत्तम फूड स्टायलिस्ट होण्यासाठी पाककलेचा, खाद्यसंस्कृतीचाही सखोल अभ्यास आवश्यक असतो. भारतीय खाद्यसंस्कृती इतकी वैविध्यपूर्ण आहे की, या अभ्यासाला पर्यायच नसतो. अगदी कोंबडीच्या रश्श्याचं उदाहरण घेतलं तरी कोल्हापूर, पुणं आणि विदर्भ असा फरक असतो. नागपूरची पुरणपोळी ओल्या पुरणाची, किंचित जाड असते आणि दक्षिण भारतातल्या अस्सल रस्सममध्ये लाल भोपळा नसतो. त्यामुळे जाहिरातदाराला नक्की कुठे आणि कोणासाठी जाहिरात करायची आहे, हे ध्यानात घेऊन फूड स्टायलिस्ट काम करतात. पदार्थांचा रंग, पोत, सजावट हे सारं ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवूनच ठरवलं जातं.

अनेकदा कंपन्या, दुकानदार त्यांनीच तयार केलेले खाद्यपदार्थ फोटो काढण्यासाठी वापरण्याचा आग्रह धरतात आणि तसं करणं काही बाबतींत आवश्यकही असतं. उदाहरणार्थ, बर्गर, पित्झा, बाकरवडी, बिस्किट किंवा बंगाली मिठाई हे पदार्थ. हे पदार्थ दुकानात तयार मिळतात हे ग्राहकांना माहीत असतं. या पदार्थांचा आकार, त्यांचे घटकपदार्थ हे ते तयार करणार्‍या कंपन्यांप्रमाणे बदलतात. ’डॉमिनोज'चा पित्झा आणि ’पित्झा हट’चा पित्झा या दोन्हींमध्ये फरक असतो. चीझ, चिकन, भाज्या यांचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्यामुळे स्टुडिओमध्ये पित्झा तयार न करता या कंपन्यांच्या दुकानामध्ये तयार केलेला पित्झाच फोटोसाठी वापरतात. जाहिरातींमध्ये त्याचं मूळ स्वरूप बदलून चालत नाही. इतर पदार्थांच्या बाबतीतही हेच केलं जातं. अर्थात तयार पदार्थ आणले तरी फूड स्टायलिस्टाला भरपूर काम करावंच लागतं. बिस्किटं, बाकरवड्या, मिठाया आकारानं सर्वांत चांगले आणि सारखे निवडायला लागतात. शिवाय या पदार्थांचं सादरीकरणही उत्तम असायला लागतं. पित्झा, बर्गर हे पदार्थ असतील तर जास्त मेहनत घ्यावी लागते. पित्झ्याचे फोटो काढणं अतिशय कठीण. पित्झा गार झाल्यानंतर त्यावर असलेलं चीज सुरकुततं. रंगही पांढराशुभ्र राहत नाही. भाज्या, चिकन किंचित करपलेले असतात. म्हणून फोटो काढताना पित्झा किंचित कच्चा ठेवला जातो. फोटो काढण्याच्या काही सेकंद आधी ब्लोटॉर्च वापरून चीज थोडं वितळवलं जातं. त्यामुळे पित्झा अगदी नुकताच अव्हनमधून बाहेर काढला आहे, असं वाटतं. जाहिरातींमध्ये पित्झ्याचा तुकडा कापून उचलताना चीझच्या ज्या तारा सुटताना दिसतात, त्यासाठी फार पूर्वी च्युंइंग गम वापरलं जाई. आता मात्र खरं मोझरेला चीझच वापरलं जातं. नक्की किती तापमानाला चीझ योग्य प्रमाणात वितळतं, हे अनुभवी फूड स्टायलिस्ट जाणून असतो. नेमक्या तेवढ्या तापमानाला चीज वितळवून स्क्रॅपरच्या मदतीनं तारा काढल्या जातात. शूटिंग करताना हे सगळं जमवून आणणं महाकठीण असतं. एक उत्कृष्ट फोटो किंवा दृश्य मिळवण्यासाठी क्वचित दहापंधरा पित्झे वाया घालवावे लागतात. बर्गरचे फोटो काढतानाही अशीच काळजी घ्यावी लागते. ’मॅकडोनल्ड’सारख्या कंपन्यांच्या बर्गरांमध्ये वापरल्या जाणार्‍या बनचे, पॅटीचे आकार, मेयोनेजची चव, रंग ठरलेले असतात. त्यात बदल करून चालत नाही. पण बर्गर जसाच्या तसा वापरणंही शक्य नसतं, कारण पाच मिनिटांच्या आत बर्गर मलूल दिसायला लागतो. पॅटीतल्या तेलामुळे, टोमॅटोमुळे त्याचा आकार बदललेला असतो, मेयोनेज खाली ओघळायला सुरुवात झालेली असते. म्हणून फूड स्टायलिस्ट चिकन पॅटी किंवा आलू टिक्की पूर्ण शिजवत नाहीत. बाहेरच्या कडांवर फक्त ब्लोटॉर्चाच्या मदतीनं शिजल्याचा आभास निर्माण केला जातो. चीझच्या चकत्यांना चकाकी येण्यासाठी ग्लिसरिन लावलं जातं. मेयोनेजसुद्धा फक्त बाहेरच्या बाजूनं लावलं जातं. टोमॅटोच्या चकत्यांमधला मांसल भाग काढून टाकला जातो. लेटसची पानं बर्फाच्या पाण्यात ठेवून कडक केली जातात. बर्गर एकत्र बांधून राहावा, म्हणून टूथपिक खोचली जाते. यामुळं बराच वेळ बर्गराचा आकार बदलत नाही आणि दिसतोही आकर्षक. सॅण्डविचासाठीही हेच तंत्र वापरलं जातं.

आइस्क्रीमचं चित्रण करणंही तसं अवघड आहे. चित्रण करताना कराव्या लागणार्‍या प्रखर प्रकाशयोजनेमुळे आइस्क्रीम काही सेकंदांतच वितळतं. आइस्क्रीमचा रंग जितका गडद, तितकं ते लवकर वितळतं. अशा वेळी चित्रण करता येणं अशक्यच असतं. म्हणून कृत्रिम आइस्क्रीमचा वापर प्रचलित आहे. पूर्वी अ‍ॅक्रिलीकचं आइस्क्रीम वापरलं जाई. पण प्रगत कॅमेरे आल्यानंतर कॉर्नस्टार्च, आइसिंग शुगर, वनस्पती तूप इत्यादी वापरून आइस्क्रीम तयार केलं जाऊ लागलं. हे आइस्क्रीम अगदी खर्‍यासारखं दिसतं, शिवाय लवकर वितळत नाही. आइस्क्रीममधून निघणार्‍या वाफा म्हणजे सिगारेटीचा धूर असतो. दुधाचं चित्रण करतानाही कॉर्न स्टार्च घातलं जातं. बर्फ मात्र अजूनही अ‍ॅक्रिलीकचाच वापरतात.

’जोधा अकबर’ या चित्रपटासाठी फूड स्टायलिंग केलेल्या शुभांगी धाइमाड्यांसारखे काही मात्र शक्यतो नैसर्गिक पदार्थ वापरण्याच्या प्रयत्नात असतात. शुभांगी सांगतात, "चित्रपट किंवा मालिकांमध्ये वापरल्या जाणार्‍या पदार्थांमध्ये अनेकदा कृत्रिम घटक वापरता येत नाहीत, कारण चित्रपटातली पात्रं ते पदार्थ खाताना दाखवायचं असतं. हे खरे पदार्थ मलूल, निस्तेज, करपलेले न दाखवणं, हे खूप कठीण असतं. शिवाय एकाच वेळी अनेक पदार्थ करावे लागतात. त्यामुळे चित्रपटांच्या स्टायलिंगला खूप वेळ लागतो. टीव्हीवरच्या जाहिरातींच्या बाबतीतही तेच. तिथे तुम्हांला काही सेकंदांमध्ये तो पदार्थ लोकांच्या मनावर ठसवायचा असतो. पण मासिकांसाठी किंवा छापील जाहिरातींसाठी काम करतानाही खूप मेहनत घ्यावी लागते, कारण ती चित्रं वाचक खूप लक्षपूर्वक बघतात. अगदी लहानशी चूकही लगेच पकडली जाते. या क्षेत्रात काम करायला मात्र खूप मजा येते. सतत नवनवीन प्रयोग करावे लागतात, निरनिराळ्या देशांतल्या पदार्थांशी ओळख करून घ्यावी लागते. प्रत्येक फोटोशूट म्हणजे एक नवं आव्हान असतं."

प्रसिद्ध फूड स्टायलिस्ट नितीन टंडन यांनाही या नवनव्या आव्हानांमुळेच काम करायला आवडतं. चार्ली चॅप्लीनच्या ’गोल्डरश’ या चित्रपटात एक अविस्मरणीय प्रसंग आहे. खराब हवामानामुळं एका झोपड्यात अडकून पडलेला, भुकेजलेला ट्रॅम्प, म्हणजे चार्ली, शेगडीवर उकळणार्‍या पाण्यात चक्क बूट ’शिजवतो’ आणि ताटलीत एखादा राजेशाही पदार्थ आहे, अशा थाटात तो बूट खातो. बुटाची लेस, खिळे असं सगळं वेगळं करून चार्ली तो बूट फस्त करतो. दहाबारा वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका बूट बनविणार्‍या कंपनीला जाहिरात करताना या चित्रपटाची आणि त्यातल्या प्रसंगाची आठवण झाली. एखादी वस्तू खूप आकर्षक असेल, तर ती कायम आपल्याजवळ असावी, वापरावी असं साहजिकच कोणालाही वाटेल. आमचे बूटही तसेच, कल्पनातीत देखणे, इतके, की बघताक्षणी तुम्हांला ते खावेसे वाटतील, असं काहीसं त्या कंपनीला सांगायचं होतं. जाहिरात बनविणार्‍या कंपनीला आता यासाठी खाता येतील असे बूट बनवणं भाग होतं आणि म्हणून त्यांनी गाठलं नितीन टंडन यांना. ’गोल्डरश’मध्ये जे बूट होते, ते बनवले होते ज्येष्ठमधाच्या मुळांचा अर्क आटवून केलेल्या पोळीपासून. नितीन मात्र या पद्धतीनं बूट बनवू शकत नव्हते, कारण ज्येष्ठमधाची पोळी अतिशय गुळगुळीत, तिचा रंगही हलका तपकिरी आणि पृष्ठभाग अतिशय कोरडा. रंगीत छायाचित्रणाच्या जमान्यात हे बूट फारच कृत्रिम दिसले असते. नितीननं मग खाता येण्याजोगे बूट कसे बनवता येतील, याचा विचार सुरू केला. केक, चॉकलेट वापरून बूट तयार करून बघितले. पण चॉकलेटाच्या बूटाचा पृष्ठभाग फारच कोरडा दिसायचा आणि केकचा बूट हातात उचलताच येईना. कणीक, पपईची साल अशा अनेक गोष्टी वापरूनही दोन महिने झाले तरी बूट काही तयार होईना. एकदा नितीन बांद्र्याच्या माउंट मेरीच्या जत्रेला गेले होते. चर्चबाहेर त्यांना आंब्याच्या पोळ्यांची आणि पापडांची दुकानं दिसली आणि बूट कसा तयार करायचा, हा प्रश्न सुटला. वर्तमानपत्रांत जाहिरात छापून आली, तेव्हा तो बूट आंब्याच्या पोळीपापडाचा असल्याचा कोणाला संशयही आला नाही. अशाच प्रकारचं काम भूषण इनामदार आणि शुभांगी धाइमाडे यांनीही केलं आहे. खाद्यपदार्थ कल्पकरीत्या वापरून भूषणने दिनदर्शिकांसाठी फूड स्टायलिंग केलं आहे, तर शुभांगीच्या जाहिरातींमध्ये फळं, भाज्या यांचा अतिशय वेगळा वापर दिसतो.

bhushan5.JPG

भारतात सध्या खाद्योद्योगाला आलेल्या सुगीच्या दिवसांमुळे फूड स्टायलिस्टांना प्रचंड मागणी आहे. या व्यवसायाचं शिक्षण देणारी संस्था नसली, तरी कलात्मक जाण आणि स्वयंपाकाची आवड असलेली कुठलीही व्यक्ती फूड स्टायलिस्ट म्हणून काम करू शकते. साधारण वर्षभराच्या अनुभवाच्या जोरावर आठ तासांच्या शिफ्टसाठी पाच-सात हजार रुपये मानधन सहज मिळवता येतं. अनेक वर्षं या क्षेत्रात काम केलेल्यांना यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक मानधन मिळतं. मात्र तरीही या क्षेत्रात काम करण्याकडे तरुणांचा फारसा ओढा नाही. करावी लागणारी मेहनत, हे या मागचं मुख्य कारण. भूषण सांगतात, "फूड स्टायलिस्टाला स्टुडिओमध्ये, किंवा चित्रीकरणाच्या ठिकाणीच काम करावं लागतं. तिथे सर्व सोयी बहुधा नसतातच. त्यामुळे दोनतीन दिवसांपूर्वीच तयारीला सुरुवात करावी लागते. ऐनवेळी धावपळ होऊ नये, म्हणून अगदी काटेकोर नियोजन करावं लागतं. पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे जिन्नस, क्रोकरी, प्रॉप्स यांची यादी करून तशी खरेदी करावी लागते. बरेचदा सगळं सामान लगेच उपलब्ध होत नाही. जाहिरातदारांना विशिष्ट आकाराची, रंगाची क्रोकरी हवी असेल, तर त्यासाठी बरीच शोधाशोध करावी लागते. मागे एका पानाच्या दुकानाच्या जाहिरातीसाठी फोटो काढायचे होते. त्यासाठी मला पितळेचं नक्षीदार पानदान हवं होतं. या एका पानदानासाठी मी जवळजवळ महिनाभर पुण्यात फिरलो. शेवटी जुन्या बाजारात मला ते मिळालं. क्रोकरीप्रमाणेच स्वयंपाकासाठी लागणारे जिन्नसही अगोदर तयार ठेवावे लागतात. सर्व साहित्य उत्तम प्रतीचंच आणि उत्तम दिसणारंच असावं लागतं. सकाळी दहा वाजता शूट असेल, तर पहाटेपासूनच स्वयंपाकाला लागावं लागतं. सगळं सामान, सगळे पदार्थ काळजीपूर्वक शूटच्या ठिकाणी न्यावे लागतात. बहुतेक वेळी त्या ठिकाणी फारशा सोयी नसतातच. त्यामुळे अगदी पाणीसुद्धा बरोबर न्यावं लागतं. एकदा रांजणगावच्या औद्योगिक परिसरात फोटो काढायचे होते. या फोटोंसाठी लेटस, पुदिना, कोथिंबीर असं वापरावं लागणार होतं, त्यामुळे साहजिकच बर्फही लागणार होता. रांजणगावला पाण्याची बाटली मिळणंही अवघड, म्हणून आम्हांला पुण्याहून बर्फही बरोबर न्यावा लागला होता. अशा वेळी पूर्वतयारी करताना फार काळजी घ्यावी लागते. एखादी लहानशी वस्तू जरी विसरलो, तरी आपल्याला त्रास तर होतोच, पण मुख्य म्हणजे जाहिरातदाराचं नुकसान होतं. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातात. त्यामुळे या क्षेत्रात रोजच नवनवी आव्हानं असतात".

भारतापेक्षा अमेरिकेत आणि युरोपात फूड स्टायलिस्टांना अधिक मागणी आहे. अर्थात तिथली बाजारपेठ खूप मोठी आणि फूड स्टायलिंगला तिथेच सुरुवात झाली, ही कारणं त्या मागे असावीत. फूड स्टायलिस्ट हे नामाभिधान अमेरिकेत १९५०च्या सुमारास कधीतरी रूढ झालं. त्यापूर्वी कॅमेर्‍यासाठी (म्हणजे मासिकं, पाककलेची पुस्तकं, जाहिराती यांत वापरल्या जाणार्‍या छायाचित्रांसाठी) पदार्थ तयार करून ताटल्या सजवणार्‍यांना होम इकॉनमिस्ट असं म्हटलं जायचं. होम इकॉनमी, अर्थात गृहव्यवस्थापनशास्त्राची पदवी घेतलेल्या या स्त्रिया प्रकाशनसंस्थांच्या किंवा खाद्यपदार्थांशी संबंधित असलेल्या बड्या कंपन्यांच्या स्वयंपाकघरांत काम करत. १९५०-६० सालापर्यंत खरं म्हणजे खाद्यपदार्थांचे फोटो काढण्याची पद्धत रूढ नव्हती. होम इकॉनमिस्ट खाद्यपदार्थ तयार करत, आणि चित्रकार त्यावरून पदार्थांची चित्रं काढत. ही चित्रं मग जाहिरातींमध्ये, किंवा पाककृतींबरोबर वापरली जात. मात्र अशी चित्रंही क्वचितच वापरली जात. बहुतांश पाककलेच्या पुस्तकांमध्ये किंवा जाहिरातींमध्ये पदार्थांच्या चित्राला स्थान नसे. दुसर्‍या महायुद्धानंतर मात्र परिस्थिती झपाट्यानं बदलली. गल्लोगल्ली नवी सुपरमार्केटं निघाली. स्वयंपाक करणं सुलभ व्हावं, म्हणून नवनवी यंत्र उपलब्ध झाली. आर्थिक सुबत्ता आली तरी घरातले स्वयंपाकी नाहीसे झाले आणि अख्ख्या कुटुंबानं बाहेर हॉटेलांमध्ये जेवणं नेहमीचं झालं. गृहिणींनी स्वयंपाकघरात प्रवेश केला. त्यांच्या मदतीसाठी पाककलेला वाहिलेली अनेक मासिकं निघाली. फार कष्ट न घेता पदार्थ रांधता यावेत, म्हणून केक मिक्ससारखे इन्स्टंट मदतनीस अवतरले. होम इकॉनमिस्टांचं काम मग अर्थातच वाढलं. नवी उपकरणं आल्यावर ती उपकरणं किंवा इन्स्टंट मिक्स वापरून करता येतील असे पदार्थ शोधणं, हॉटेलांसाठी नव्या पाककृती तयार करणं, अशी काम पुढे आली. नव्या ग्राहकांना खूश करण्यासाठी प्रकाशनसंस्था, जाहिरातदार, कारखानदार, हॉटेलचालक मैदानात उतरले. आपला माल जास्तीत जास्त आकर्षक कसा करता येईल, याकडे त्यांचं लक्ष लागलं. जाहिरातींमध्ये किंवा पाककृतींच्या पुस्तकांमध्ये पदार्थांची भरपूर चित्रं वापरली जाऊ लागली. मग कॅमेर्‍यांचं राज्य आलं आणि होम इकॉनमिस्टांचा खरा कस लागायला सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात काढलेले फोटो अजिबातच आकर्षक नव्हते. होम इकॉनमिस्टांनी एखादा पदार्थ देखणा दिसावा म्हणून कसोशीनं प्रयत्न केले असले तरी खाद्यपदार्थांचे फोटो काढताना काय काळजी घ्यावी, हे छायाचित्रकारांना माहीत नव्हतं. मुद्रणकलाही आजच्या इतकी विकसित नसल्यानं पदार्थांचे रंग खुलून दिसत नसत. शिवाय त्या काळी पदार्थ ताटलीत गच्च भरला असेल, तरच तो चवीला आणि दिसायला चांगला, अशी काहीशी समजूत होती. चिकनचा किंवा केकचा एखादाच तुकडा, मोजकी चारपाच बिस्किटं ताटलीत ठेवून फोटो काढणं कमीपणाचं समजलं जाई. त्यामुळे थाळ्या भरभरून पदार्थ त्या फोटोत असत. त्या थाळ्यांशेजारी रंगीबेरंगी फुलं असलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या फुलदाण्या, किंवा खेळणी किंवा विणकामाचे नमुने ठेवलेले असत. अर्थात, हे कामसुद्धा अतिशय महत्त्वाचं आणि उल्लेखनीय होतं, कारण त्यांना शिकवणारं कोणी नव्हतं.

ज्यूलिया चाइल्डनं हे सारं बदललं. तिनं अमेरिकनांना फ्रेंच पदार्थ तर शिकवलेच, पण डोळ्यांना सुखावणारे पदार्थ खायला घालून तृप्त कसं करावं, हेही शिकवलं. आज फूड स्टायलिस्ट ज्या पद्धतीनं काम करतात, त्याचं बरचसं श्रेय ज्यूलियाकडे जातं. ती एकदा म्हणाली होती, "स्वयंपाक करणं, खाऊ घालणं म्हणजे एकप्रकारची सेवाच आहे. एखाद्याबद्दल आपुलकी वाटत असेल, तर त्याला या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी स्वत: स्वयंपाक करून खाऊ घालावं. पण हा स्वयंपाक परिपूर्ण असावा. चवीतही आणि दिसायलाही. तुम्ही केलेला स्वयंपाक नुसता बघूनच तुमची प्रिय व्यक्ती सुखावली, तर तुमचं प्रेम सच्चं, हे नक्की. मात्र या खर्‍या प्रेमाचा अनुभव घ्यायला आधी खाण्यावर प्रेम करायला हवं. ते सगळ्यांत महत्त्वाचं". खाण्यावरच्या प्रेमामुळं ज्यूलियानं जगभरात कितीतरी बदल घडवून आणले. जाहिराती बदलल्या, मासिकं बदलली. लोकांची खाण्याकडे बघण्याची दृष्टी बदलली. या पुढे पराठ्यांवर ओघळणारं लोणी आणि मध, किंवा आंब्याच्या फोडी घातलेलं आइस्क्रीम किंवा वाफाळणारं सिझलर बघून ते चित्रच खावंसं वाटलं, तर ज्यूलियाचे आभार मानायला हरकत नाही!

bhushan6.JPG

***

छायाचित्र क्र. २ आणि ४ भूषण इनामदार यांच्या खाजगी संग्रहातून. छायाचित्रकार अज्ञात.

***
प्रकार: 

ओह....... Sad Sad
अशी काय इतकी चांगली माणसं एकदम तडकाफडकी जातात कळत नाही Sad

oh... Sad

ManjuD +1
Chinoox, kitee vegaLee ch maahitee detos tu.. Many thanks for sharing such good work! Feeling sad about Bhushan Sad

या लेखावरुन कल्पना आली फ़ूड स्टायलीस्ट किती कौशल्याच आणि मेहनातीच काम करत असतील ते

आपल्याला दिसन्यार्या जाहिरातीमागे केवढी मेहनत आणि कला असते ते कळल

एवढा कुशल कलाकार फार लवकर गेला याची हुरहुर वाटुन राहिली
भूषण ईनामदार यांना श्रधान्जली

चिनुक्स फार फार धन्यवाद असा उत्ताम लेख इथे दिल्याबद्दल.

मा.बो. वरच्या मसाला स्पर्धेसाठीच त्यांनी परीक्षण केल होत ना?

ओह. लेख छान. माहिती छान दिलीयेस. तुझ्या आवडीचा विषय असल्याचे लक्षात येतेय.
भूषण इनामदार यांचा मृत्यू हे मात्र फारच वाईट. Sad

लेख मस्त झालाय. फूड स्टायलिंग आणि त्याची फोटोग्राफी हे खरंच एक स्किल आहे आणि खूप पेशन्सचं काम आहे. मी आमच्या कॅफेतील पदार्थांचे फोटो काढून घेतले होते तेव्हा अनुभवलंय.

अशी काय इतकी चांगली माणसं एकदम तडकाफडकी जातात कळत नाही >> +१

बापरे !! लेखात पुढे असं काही असेल असं वाटलच नव्हतं.. धक्काच बसला..
माहेरमधला लेख वाचला होता आधी.. फारच वाईट बातमी..

मस्त लेख चिनुक्स, लेखातून खुपच छान ओळख करुन दिलीस ह्या क्षेत्राची आणि कलाकारांची देखील.
भूषण इनामदार गेल्याच मात्र माहिती नव्हत Sad

लोकप्रभा, सकाळ साप्ताहिक वगैरे मासिकांच्या शेवटच्या पानावर हमखास असणार्‍या लोणची/मसाल्यांच्या जाहिराती मी आजही नीट बघत असते Happy आता पुन्हा बघीन तेव्हा त्या फोटोमागील मेहनतीची आठवण येईल. भूषण इनामदारांना श्रद्धांजली. किती वेगळं क्षेत्र आहे!
लेख छानच आहे. अ‍ॅज युज्वल!
फक्त " एखाद्या मासिकातली पाककृती इतकी भयंकर सुंदर दिसत असते की, ...." या वाक्यातील 'भयंकर सुंदर' बदललं तर बरं. Happy

Pages