पत्रास कारण की… (कथा)

Submitted by डीडी on 9 July, 2013 - 05:44

ते दिवस मला आजही जसेच्या तसे आठवतायत. त्यावेळी ब-याच पोस्टल कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या होत्या. माझी ही झाली आणि माझं संकट आणखी मोठं झालं. उतार वयामुळे माझ्या आईची तब्येत खूप खालावली होती. पण नशिबाने मला माझ्या त्या वेळेच्या राहत्या घरापासून तसं जवळच हलवलं गेलं. मी मूळचा राजापूरचा. राजापूर कोंकणातलं एक टुमदार गाव. आता त्याला शहर अशी ओळख मिळाली असेल, पण १९८९ मध्ये ते एक गावच होतं. माझी बदली भांबेडला झाली होती. भांबेड तसं खूप छोटं गाव, पण आजूबाजूच्या दुर्गम भागात तेच एक मोठं.

भांबेड आणि आजूबाजूची पाच-सात गावं सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली. कोंकणाचा पूर्वेकडील अगदी शेवटचा भाग. गावातून समोरच विशाळगडचा भव्य कडा दिसायला.

भांबेडचे पोस्टाचे मास्तर होते हरी वैद्य. मध्यम वयाचे. त्यांनीच मला त्यांच्या ओळखीने पळशीकरांच्या घरामागील एक खोली भाड्याने मिळवून दिली. पोस्टही तिथून जवळच होतं. पोस्टात माझ्या व्यतिरिक्त अजून एक पोस्टमन होते – रघुवीर माळवदे. वैद्य साहेबांनी पहिल्या दिवशीच मी आणि माळवदे कोणते प्रभाग करणार हे निश्चित केलं. मला आजूबाजूचा परिसर तसा ऐकून माहीत होताच. दिवसात वाटायची पत्रही खूप नसायची. हा, फक्त आजूबाजूच्या दोन-चार मैलांवर असलेल्या गावतही सायकल ताबडवत जायला लागायचं एवढंच.

हळू हळू मी रुळत होतो, परिसराशी जमवून घेत होतो. थोड्याफार ओळखीही होत होत्या. चहावाला किसन, भुसारी किराणावाले सतारशेठ वगैरे मंडळी जवळची झालेली. आसपासची गांवही एक दोनदा फिरून झालेली.

असंच एक गाव होतं.. प्रभानवल्ली. भांबेडपासुन ४ मैलांवर. मुचकुंदि नदीच्या काठी वसलेलं, सहा सात वाड्यांचं एक छोटंसं गाव.

मला आठवतंय, त्या दिवशी प्रभानवल्लीला जायची माझी पहिलीच वेळ होती. प्रभानवल्लीच्या पोलिस पाटीलांचं एक रजिस्टर्ड पत्र आणि त्याच मार्गावर असलेल्या कोर्ले ह्या गावची काही पत्रं होती. मी ती घेतली आणि माझ्या दप्तरात भरली. किसन कडे एक चहा घेऊन आलो आणि मार्गस्थ झालो. कोर्लेतील पत्रं वाटून, प्रभानवल्लीला पोलिस पाटील जमदाडेंच्या घरी पोचलो.

जमदाडेंशी ती माझी पहिलीच भेट. माणूस मोठा उमदा वाटला. मी ह्या भागातील नवीन पोस्टमन म्हटल्यावर, त्यांनी माझी विचारपूस केली.
“कुठले तुम्ही?”
“मी राजापुरचा. दोन वर्षांमागेच नोकरी सुरू केली.”
“घरी कोण असतं राजापूरला?”
“आई आहे,बायको आहे, धाकटा भाऊ आहे. वडील गेले दोन वर्षांमागे.”
“मग बायको तिकडेच का?”
“हो. आईची तब्येत बरी नसते. बाकी कामं पण आहेत. म्हशी आहेत, चार घरचा रतीब आहे. माझी आठवड्याला फेरी असते.”
“बरं, भांबेडला कुठे राहता?”
“पळशीकरांच्या खोलीत.”
“पळशीकर म्हणजे दिगंबर पळशीकरांपैकी?”
“हो हो.”
“माझं आठवड्याला येणं असतं भांबेडला. गुरुवारचा बाजार असतो ना भांबेडला.”
“हो.”
“जेवण्या खाण्याचं कसं मग?”
“शिजवतो खोलीवर मीच.”
“बापरे हालच की हो एकट्याने राहायचं, जेवण-खाण करायचं.”
“काय करणार. पर्याय नाही.”

जमदाडेंनी आपुलकीने चहा पाजला. पत्र देऊन, मी त्यांचा निरोप घेतला. उंबरठा ओलांडताच मला लक्षात आलं की मी पोच पावतीवर जमदाडेंची सही घेतली नव्हती. मी तसाच मागे वळलो. सही घेण्यासाठी दप्तरातील वही काढली आणि मला थोडं आश्चर्य वाटलं. दप्तरात एक पोस्टकार्ड होतं. प्रभानवल्लीत तर एकच पत्र होतं, जे मी जमदाडेंना सुपूर्त केलेलं. कोर्ले मध्ये पत्र द्यायचं राहिलं असेल असं समजत मी पत्र बाहेर काढलं. पण त्यावर प्रभानवल्लीचाच पत्ता होता.
“कसं शक्य आहे?”
माझं पुटपुटणं जमदाडेंच्या कानावर पडलं. “काय झालं?”
“विशेष काही नाही, मी पोस्टातून निघताना हे पत्र दप्तरात नव्हतं. आणि आता.. द्यायचं तुमचं एकच पत्र होतं. मग हे कुठून आलं. कोर्लेत पत्रं वाटताना आणि तुमचं पत्र देताना हे पत्र दप्तरात नव्हतं. मला खात्रीशिर आठवतंय.”
जमदाडेंनी हसण्यावारी नेलं. “ही तर भुताटकीच म्हणायची.” ते पुन्हा एकदा मोठ्यांदा हसले.
मी पण जास्त विचार न करता त्या कार्डावरील नाव पाहिलं.
“पाटील साहेब, हे नरेंद्र गणू सातपुते कुठे राहतात?”
“म्हणजे ते भुताटकीचं पत्र न-याचं आहे होय.” जमदाडेंची थट्टा अजून सुरूच होती.
मीही अवघडून स्मित केलं.
“इथनं सरळ जा ग्रामपंचायतीपर्यंत. तिथून खालच्या अंगाला नदीपर्यंत जा. तिथच आहे सातपुतेचं घर.”

मी ग्रामपंचायतीपर्यंत पोचलो. सायकल तिथे उभी करून, चालतच सुतारवाडी मधलं सातपुतेचं घर शोधलं.
घर, अगदी जुने, ओबढधोबड खांबांनी टेकू दिलेले, जीर्णशीर्ण भिंतीचे, घर. मी निवडुंगाच्या वेशीलगोलग असलेल्या बांबुच्या फाटकातून आत गेलो. बाहेरील ओसरीवर एक इसम बसला होता.
“नरेंद्र सातपुते, पत्र..”
तो निर्विकारपणे जागचा उठला.
“पत्र.”
मी कार्ड त्याच्या हातात ठेवलं. तितक्यात एका बाईने, बहुदा त्याची बायको असावी, दारातून डोकावलं. मी न बघितल्यासारखं केलं आणि तिथून चालू पडलो.

का कुणास ठाऊक पण ते घर एकदम निर्जीव वाटलं. त्या घराची अवकळा, तिथली उदास माणसं की आणखी काही, मला नव्हतं माहित. सायकल घेतली आणि थेट भांबेड गाठलं.

त्या दिवशी मी थोडा बेचैनच होतो. संध्याकाळी, तिथली ग्रामदेवता, आदिष्ठीदेवीच्या देवळात जाऊन बसलो. मनाची घालमेल थोडी कमी झाली. रात्री लवकरच झोपलो.

त्यानंतर दोन एक दिवस झाली असतील. मी सकाळीच पोस्टात गेलो होतो. नवीन पत्रांचं स्टॅम्पिंग करून, किसनकडे सकाळच्या चहाला गेलो.
“किसनभाऊ चहा द्या.” किसनने चहा दिला.
“अहो तुम्हाला कळलं असेलच ना?” किसनच्या प्रश्नाचा रोख मला समजला नव्हता.
“कशाबद्दल बोलतोयस?”
“प्रभानवल्लीतले सातपुत्यांबद्दल.”
“त्यांचं काय झालं?”
“त्यांना परवा पत्र आलं म्हणे.”
“हा मग?”
“अहो काल बाजाराचा दिवस होता, प्रभानवल्लीतील बरीचशी लोकं येतात बाजाराला. त्यांनी सांगितलं की ते पत्र आबा सातपुतेंचं पत्र होतं.”
“नाही रे, ते नरेंद्र का कुणी.. हा नरेंद्रच.. नरेंद्र सातपुतेचं होतं.”
“नाही नाही, तसं नाही. ते आबा सातपुतेंनी पाठवलेलं म्हणे. त्यांच्या लेकाला.”
“असेल. मग त्यात काय एव्हडं?”
किसन आवासून माझ्याकडे बघत होता.
“बापाने पोराला पत्र लिहिलं तर त्यात काय? लोकं पण ना..” मी उपहासात्मक हसलो आणि चहाचा घोट घेतला.
“तुम्ही आताच इकडे बदलून आलात, तुम्हाला माहीत नसेल. आबा म्हणजे गणू सातपुतेचा महिन्याभरापूर्वी खून झालाय.”
“काय?”
“पंचक्रोशीतला पहिला खून. माहितेय.” किसन बोलतच होता.
मला एकदम धक्काच बसला. माझ्या हातातला कप खाली पडला.
“अर्रर्र. असूदेत.”
“कशावरून त्याच्या बापाचं पत्र? कुणीपण लिहू शकतं ना बापाच्या नावाने.” मी स्वतःच्या समाधानासाठी शंका काढली.
“आपल्याला काय माहीत बा. लोकं बोलत होती ते सांगितलं. पण कोण कशाला करेल ना असला उद्योग तो पण गेलेल्या माणसाच्या नावानं.” किसनने पडलेला कप उचलला आणि इतर गि-हाईकांमध्ये गुंतला.

किसनचं म्हणणं खरंच होतं म्हणा. कोण कशाला करेल असलं काय. पण जर इतर कोणी हे नसेल केलं तर?.. ह्याचा अर्थ जो काही होत होता तो मानायला मन बिथरत होतं. शक्यच नव्हतं… की… होतं?

होता होता ही बातमी वा-यासारखी चहुबाजूला पसरली. वैद्य, सतारशेठ, पणशीकर, आजूबाजूचे इतर सगळ्यांकडून प्रकाराची विचारणा होत होती.
वैद्यांनी माझ्याकडून परत परत खात्री करून घेतली की त्या दिवशी ते पत्र आधी दप्तरात नव्हतं, पोलिस पाटिलांच्या घरात मला त्याचा उलगडा झाला होता वगैरे.
काही लोकांना हा कुणाचातरी हलकटपणा वाटला, तर भूत पिशाच्च मानणा-या ब-याच लोकांना हे काहीतरी विपरीत आहे असं वाटलं.

हे सगळं होत असताना पत्रात नक्की काय लिहिलंय हा प्रश्न वैद्य सोडता कुणालाच पडला नाही. दुस-या दिवशी त्यांना पडलेल्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर त्यांना मिळालं. त्या दिवशी जमदाडे पोस्टात आले, ते पत्र सोबत घेऊनच.

वैद्यांनी ते पत्र नीट न्याहाळलं आणि वाचलं.
“मास्तर, हा काय प्रकार आहे नक्की. गावात सगळीकडे ह्याचीच चर्चा.”
“कार्डावर दोन्ही मोहर आहेत. ही त्या दिवशीची, ह्याच पोस्टाची. पण दुसरी मोहर स्पष्ट नाही तेव्हडी. कुठून आलं हे सांगणं कठीण आहे.”
“काल सरपंच आलेले माझ्याकडे. झाला प्रकार ऐकून ते न-याकडे गेलेले, त्यांनी हे कार्ड त्याच्याकडून आणलं आणि मला देऊन, इकडे पाठवलं आणि काय ते छडा लावायला सांगितला. आता मी काय छडा लावणार?”
“हम्म्म्म.” वैद्यांनी सुस्कारा सोडला.

वैद्यांनी ते पत्र माझ्याकडे दिलं. त्यातील मजकूर साधारण मला आठवतोय.

चि. नरेंद्र,

मी तुझा आबा. तुझा विश्वास बसणार नाही. कसा आहेस पोरा? मी गेल्याने खूप दुःख झालं असेल ना. पण कोलमडून जाऊ नकोस. तुझ्या आईला सांभाळ. मी गेल्याने ती एकटी पडली असेल. तिची काळजी घे रे पोरा. तुझ्यासाठी खूप काही करू नाही शकलो. माफी कर मला.
सूनबाईला आणि पोरांना सांभाळ.

तुमचा,
आबा

ते मोडक्या तोडक्या अक्षरातील कार्ड वाचून मी बावचळलो. माझ्या समोर जे होतं त्यावर माझा विश्वास नव्हता.
“हे कसं शक्य आहे, पाटीलसाहेब?”
“माझ्या घरी आलेलात त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात, की हे पत्र आधी नव्हत आणि अचानक ते दप्तरात गावलं तुम्हाला. काय समजत नाही. हे काहीतरी विपरीत आहे.”
“हो. मी पण खात्री करून घेतलीय ह्याची.” वैद्यांनी खुलासा केला.
“मला वाटतं की म्हाता-याचा जीव अडकलाय कशाततरी. त्याच्या पिंडाला पण कावळा नव्हता शिवला.” जमदाडेंची नजर शून्यांत हरवलेली.
“बरं मी असं ऐकलं की त्यांचा खून झाला होता. कोणी केलेला?” वैद्यांच्या प्रश्नाने ते भानावर आले.
“अं… ते… नाही कळाल. तालुक्याहून पोलिस आलेले, पण काही नाही सापडलं.”
जमदाडे निघून गेले.

नंतर काही दिवस सगळं शांत होतं. लोकं विसरले होते किंवा विषय चघळून चघळून अगदी चोथा झाला होता. दरम्याने माझंही प्रभानवल्लीला जाणं नव्हतं झालं.

पंधरा तीन आठवडे झाले असतील, प्रभानवल्लीत कुणाचीतरी मनिऑर्डर आली होती. ती द्यायला मी गेलो होतो.
मनिऑर्डर योग्य माणसाच्या हाती सोपवून दप्तरात पाहिलं तर… माझ्या काळजाचा थरकाप उडाला, मी फक्त कोसळायचाच शिल्लक होतो. मनिऑर्डर घेणा-याने मला आधार दिला.

त्या दिवशीही नरेंद्र गणू सातपुतेच्या नावाने अजून एक पत्र माझ्या दप्तरात होतं. काय करावं मला सुचेना. सातपुतेच्या घरी जावं का सरळ भांबेड गाठावं मला कळेना.

पण पहिल्या पत्रानंतर ज्या शंकाकुशंका काढल्या जात होत्या त्या पाहता, ते पत्र सातपुतेच्या हाती न देण्याची हिंमत माझ्या ठायी नव्हती. मी सातपुतेच्या घरी गेलो. त्या दिवशी मात्र घराचं दार बंद होतं. मला एका अर्थाने माझी ती सुटकाच होत. मला कोणाला सामोरं जायचं नव्हतं. मी दार न वाजवता पत्र दाराखालून आत सरकवलं. आणि लगबगीने तिथून चालू पडलो.

ग्रामपंचायतीकडे आलो ते दोन चार नजरा कुतूहलाने मला हेरत होत्या. बहुदा त्यांना काही अंदाज आला होता. मी तिथून चालू पडलो, एकच अपेक्षा होती, ते पत्र आबा सातपुतेंचं नसावं, ज्याची शक्यता नगण्य होती.

दुस-या दिवशी किसनकडेच मला बातमी लागली, मी आदल्या दिवशी देऊन आलेल्या पत्राची. ते पत्रही आबा सातपुतेचं होतं. ह्यावेळी मला खूप आश्चर्य नाही वाटलं. किसनला मी पत्रातील मजकुराबद्दल काही ठाऊक आहे का विचारलं पण त्याला काही ठाऊक नव्हतं.

संध्याकाळच्या सुमारास वैद्यांनी मला बोलावलं. विषय अर्थातच सातपुते, आणि ते पत्र.
“हो कालही तेच. मी तिकडे असतानाच दप्तरात पत्र दिसलं.” मी हतबल होत वैद्यांना म्हणालो.
“कालच्या पत्रात काय लिहिलं होतं माहितेय, तू वाचलंस?”
“कसं शक्य आहे, कोणाचं पत्र वाचणं?”
“हम्म्म्म.. मलाही मघाशीच कळालं, एकजण आला होता प्रभानवल्लीहून. त्यात लिहिलं होतं की मी, म्हणजे आबा सातपुतेंनी सरपंचाकडून काही कर्ज घेतलं होतं पोरीच्या लग्नासाठी, जमीन गहाण ठेवून.”
“सरपंचाकडून कर्ज?” ती गोष्ट मला तितकी रुचली नव्हती.
“अरे, सरपंचाचा सावकारी हा मुख्य व्यवसाय असं ऐकलंय मी. आजूबाजूच्या सगळ्या गावात तो एकच सावकारी करणारा. तर आता इतकी खासगी बाब पत्रात लिहिलीय म्हणजे बघ.”
मी निरुत्तर होतो. बोलायला काहीच नव्हतं.

“हे सगळं जे चाललंय, ते एका गोष्टीकडेच बोट दाखवतायत.” वैद्य खूप गंभीरपणे म्हणाले.
“कोणत्या?” त्यांना नक्की काय म्हणायचं मला समजलं नव्हतं.
“आबा घुटमळतोय.”

जे काही चाललं होतं ते बुद्धीच्या पलीकडचं होतं आणि मी ही त्याचा एक भाग होतो. मला भांबेडात थोडं अस्वस्थ वाटू लागलं. ह्याची कल्पना मी वैद्यांना दिली आणि चार दिवसाची रजा टाकून राजापूरला आलो. घरच्या लोकांसोबत सगळ्याचा थोडा विसर पडायला मदत झाली हे जरी खरं होतं तरी, कामावर रुजू व्हायला मन धजावत नव्हतं, पण नाईलाज होता. मी ठरल्या दिवशी भांबेडला परतलो.

“मला आता प्रभानवल्ली नको. कृपा करा.” मी वैद्यांसमोर फक्त हात जोडायचा बाकी होतो.
त्यांनी आधी आढेवेढे घेतले. मला आणि माळवदेला नवीन भाग म्हणजे कामं सावकाश होणार, ह्याच्यावरच ते अडून बसले. पण सरते शेवटी माझी विनंती त्यांनी मान्य केली.
माळवदेला थोडे दिवसांसाठी प्रभानवल्ली, कोर्ले दिलं आणि मला नेरवणे च्या आसपासचा भाग मिळाला.

त्या दिवसात माळवदेला प्रभानवल्लीला जायची गरज पडली नाही. मी पण नवीन भागात जमवून घेतलं. दरम्यान, त्याची चुलती का कुणीतरी आजारी पडली, तिला घेऊन त्याला शहरात जावं लागलं. माझ्यावर कामाचा ताण वाढला.

त्या दिवशी स्टॅम्पिंग करायच्या पत्रांत मला प्रभानवल्लीच्या प्राथमिक शाळेचं पत्र दिसलं. मी ते बाजूला काढलं आणि वैद्यांना माझी अडचण सांगितली.
“अरे काय बोलतोयस? पत्र द्यायचं नाही माळवदे येईपर्यंत?”
मी शांत उभा होतो.
“राज्य शिक्षण मंडळाकडून आलेलं पत्र आहे.” हातातील लखोटा नीट न्याहाळत वैद्य म्हणाले.
“मग गावातल्या कोणासोबत पाठवलं तर नाही का चाल्…..” वाक्य पूर्णं करण्याची माझी हिंमत झाली नाही .
“काय बोलतोयस. जरा जबाबदारीने बोल. तू प्रभानवल्लीला जातोयस आजच्या आज. ह्या पत्राचं गांभीर्य लक्षात घे.” माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. निमूटपणे इतर टपालांसोबत ते पत्र मी दप्तरात ठेवलं आणि पोस्टातून बाहेर पडलो.

प्रभानवल्लीला जाताना मनाची धाकधूक वाढत होती. शाळेच्या बाहेरच मला जमदाडे भेटले. थोडे गंभीर वाटले.
“बरेच दिवसांनी येणं झालं पोस्टमन.”
“हो. सध्या मला नेरवणे गावचा भाग दिलाय.” एव्हाना चार आठ गावक-यांनी आमच्या बाजूला कोंढाळं केलं होतं.
“आणि दुसरा रजेवर आहे म्हणून आज आलो.” मी शाळेचं पत्र काढण्यासाठी दप्तर उघडलं आणि…
“काय झालं?” माझा धास्तावलेला चेहरा पाहून जमदाडेंनी विचारलं.
मी कपाळावरील धर्मबिंदू शर्टाच्या बाहीने टिपले, माझ्या घशाला कोरड पडली. पाठीच्या कण्यातून एक शिरशिरी गेली. हातात बळ नसल्यासारखं, अत्यंत संथ गतीने, शाळेच्या लखोट्यासोबत असलेलं ‘ते’ पत्र मी बाहेर काढलं.
“आज पण?” – जमदाडे.
माझ्या तोंडून शब्द फुटेना. मी जड पावलांनी शाळेत जाऊन लखोटा देऊन आलो. तोपर्यंत अजून थोडे गावकरी जमलेले, त्यांत नरेंद्र सातपुते पण होता. ‘ते’ पत्र मी नरेंद्रच्या हाती सोपवलं. गावक-यांत कुजबूज सुरू झाली.
जमदाडेंनी सगळ्यांना मागे हटवलं आणि नरेंद्रच्या जवळ आले.
“काय लिहिलंय?” जमदाडेंनी बिथरलेल्या नरेंद्रला विचारलं.
“वाचतो.” नरेंद्रने आवंढा गिळत हळू आवाजात वाचायला सुरुवात केली.

चि. नरेंद्र,

खूप घुसमट होतेय रे माझी. खूप अस्वस्थ वाटतंय. तुमच्यासाठी रक्ताचा घाम करून, पै पै साठवून घेतलेल्या जमिनीलाच तुम्ही वंचित झालात. मी जे सावकाराकडून ८००० चं कर्ज घेतलं होतं, ते मी हळू हळू फेडलं होतं. पण तो काही जमिनीचे कागद द्यायला तयार नव्हता. खूप वेळ प्रयत्न केला आपण पण तो दाद देत नव्हता.

त्या संध्याकाळी, मी पोलिसात तक्रार नोंदवणार हे त्याला सांगितलं. पण त्याच रात्री, नदीकाठी, सावकार आणि त्याच्या दोन माणसांनी मला गाठलं. मला लाठ्यांनी मारलं. तुला खूप आवाज दिला पण तू नव्हतास. खूप वेदना झाल्या रे आणि नंतर… हळू हळू वेदना कमी पण झाल्या, मला झोप आली, खूप झोप आली.. इतकी की मला जागच राहता येईना..

मी आता परत नाही येऊ शकत. आता तुला खंबीर होऊन सगळ्यांना सांभाळायचं आणि त्याने बळकावलेली माझी जमीन परत मिळवायचीय..

तुझा,
आबा

सगळ्यांच्याच चेह-यावर विस्मयाचे भाव होते. जमदाडेंचा चेहरा मात्र धीरगंभीर. त्यांनी एक लांब सुस्कारा सोडला.
“म्हणजे हे पत्र वगैरे सगळं… आबांना आपल्याला हे सांगायचं होतं?” – नरेंद्र
जमदाडेंनी नरेंद्रच्या खांद्यावर हात ठेवला.

त्यानंतर कित्येक दिवस ह्याच विषयाची चर्चा रंगली. सरपंचही कुठे पळून गेला. लवकरच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कुठलाही साक्षीदार नव्हता, तरीही सरपंचाने गुन्हा मान्य केला. म्हणे आबा त्याला स्वप्नात दिसायला लागले होते. सगळ्या सांगोवांगी गोष्टी होत्या. कोर्टात त्याच्यावर खटला चालू होता.

दरम्यान माझी बदली पुन्हा राजापूरला झाली. बदलीसाठी वैद्यांनी विशेष प्रयत्न केले. माझीही ओढाताण संपली.
त्यानंतर खटल्याचा निकाल लागला. सरपंचाला गुन्हा मान्य असल्याने निकालात अडथळे नाही आले. त्याला आणि त्याच्या दोन माणसांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

मला आठवतंय, निकाल लागल्याच्या दुस-याच दिवशी संध्याकाळी राजापूरच्या घराचा दरवाजा वाजला. उघडला तर.. समोर एक बाई.. तीच जी मला प्रभानावल्लीत सातपुतेंच्या घरी दिसलेली.
मी तिच्याकडे नुसता बघत बसलो. आश्चर्याचा भर ओसरला तसे माझ्या तोंडातून शब्द फुटले.. “ताई तू?”
ती नुसतीच हसली.
“आणि इतक्या उशीरा संध्याकाळी? आणि भावोजी कुठे आहेत?”
“आलेत ना. हे काय आलेच.” घराच्या पाय-या चढून नरेंद्र आत आले.
“भावोजी, या.” मी त्यांच्या हातातील पिशव्या घेतल्या.
माझ्या पत्नीने पाण्याचा तांब्या आणला.
“कसं चालू आहे बाकी? ब-याच महिन्यांनी येणं झालं ना.”
“आबांच्या जाण्यानंतर आज, जवळ जवळ दिड-एक वर्षांनी गावाच्या बाहेर पडलोय.”
“हो. बरं तुम्ही हातपाय धुऊन घ्या, तोवर ही चहा टाकेल.”

चहापाणी झालं. ताई हिच्यासोबत आत आईकडे होती. मी आणि भावोजी खळ्यांत (अंगणात) बसलो.
बराच वेळ शांततेत गेला. मग मीच सुरुवात केली.
“माफ करा, पण आबांच्या वेळी तुम्हाला भेटायला यायला जमलं नाही मला आईच्या आजारपणामुळे. कोणाला तरी इथे थांबायचंच होतं, मग मी थांबलो इथेच आणि बंडूला पाठवला.”
“अरे माफी कसली मागतोयस? उलट त्यामुळेच हे रामायण घडू शकलं. तू जे केलंस, ते मला जन्मात शक्य झालं नसतं.” भावोजींच्या चेह-यावरसमाधान होतं.
“पण त्यामुळेच मला दिवसकार्याला पण येता नाही आलं.” माझी खंत मी बोलून दाखवली.
“मला इतके दिवस गुदमरल्यासारखं झालं होतं, तुला भेटता पण नाही आलं. आज तुझ्यामुळे तो खुनी सरपंच तुरुंगात आहे आणि माझी काहीच मदत नव्हती तुला.” भावोजी कृतज्ञेच्या सुरात म्हणाले.
“त्या दिवशी एकीकडे हातात बदलीची ऑर्डर आली आणि दुसरीकडे आबांचं हे अस झालं हे कळलं. दोन दिवसांनी बंडू ज्यावेळी प्रभानवल्लीहून परतला, त्यावेळी तुम्ही त्याला सांगितलेली सगळी हकिकत मला कळली.”
“खूप त्रास झाला रे. कर्ज फेडून सुद्धा आबांना जमिनीचे कागद देत नव्हता सरपंच. रस्त्यालगतची जागा, ती कशाला सोडतोय तो. आबांनी, मी खूप जोर दिला. पण तो कुठला दाद देतोय गरिबाला. त्या दिवशी नदीकाठी तडफडत होते रे, माझ्या समोर. डोकं खूप तापलं होतं माझं, पण मी दुबळा काय लढणार होतो सरपंचाशी? मी प्रत्यक्ष तर खून नव्हता ना पहिला. शेवटच्या क्षणांत आबांनी सांगितलेल्यावर काय न्याय देणार होतो मी त्यांना? खूप वाकडं पाऊल उचललं असतं, पण आई, तुझी ताई, दोन लेकरं ह्याचं पुढे काय, हि चिंता होतीच.. मी हतबल झालो रे.” भावोजींचे डोळे पाणावले.
“खरं आहे तुमचं भावोजी. त्यावेळी जे काही सुचलं ते तुम्हाला बंडूमार्फत लगेच कळवलं. वाटलं, इतका राकट, पैशाच्या ताकतीने माजलेला माणूस, अदृश्य शक्तीला नक्की घाबरेल, शरण येईल.”
“आणि तो आला.” भावोजी समाधानाने म्हणाले.
“बरं जमिनीचे कागद, गहाणखत मिळालं ना?”
“हो. पण मला एक नाही कळालं, शेवटचं जे पत्र तू दिलंस, त्यात तू कर्जाची रक्कम लिहिली होतीस. ती तर मलाही माहीत नव्हती. आबा म्हणायचे तू कशाला चिंता करतोस मी आहे ना तायडीचं लग्न करून देण्यासाठी, लेकीच्या लग्नाचं कर्ज मीच फेडणार. पुढे जेव्हा सरपंचाला पकडला आणि पोलिसांनी मला गहाणखत दिलं तेव्हा मला कर्जाची रक्कम समजली. पण मग तुला कशी समजली?”

मी काही क्षण निरुत्तर होतो.
“पहिली दोन पत्रं मी लिहिली, डाव्या हाताने. पण तिसरं पत्र मी नव्हतं लिहिलं.”
“म्हणजे?”
“काय लिहावं हे मला सुचत नव्हतं. मला अचानक प्रभानवल्लीला यावं लागलं, शाळेचं पत्र होतं म्हणून. आणि… आणि त्यावेळी ‘ते’ पत्र माझ्या दप्तरात होतं. ते कसं आणि कुठून आलं, हे मला आजपर्यंत समजलं नाहीये.”

त्यानंतर बराच वेळ आम्ही दोघेही शांत बसून होतो. तिन्हीसांज रात्रीकडे कधीच झुकली होती, रातकिड्यांची किरकिर सुरू झालेली, बाकी सगळीकडे निरव शांतता होती.

– समाप्त –

माझा ब्लॉग - http://fromdev.wordpress.com
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages