ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (५)

Submitted by तुमचा अभिषेक on 9 July, 2013 - 00:05

दिवसभर पायाला भिंगरी लावलीय, असे धावपळीचे आयुष्य आम्हा मुंबईकरांचे. संध्याकाळी परतताना मात्र पळत सुटायचे काम ट्रेनवर सोपवून आम्ही निवांत बसतो.. नेहमीचेच कंपार्टमेंट, अन आवडीचीच जागा, पण नेहमीच काही गप्पा मारल्या जात नाहीत किंवा पुरेश्या मारून झाल्या की आपापल्या आवडीनुसार हाताला चाळा अन बुद्धीला खाद्य पुरवायला सुरुवात होते. ती मोबाईल गेम्स उघडते, तर मी माझ्या तोडक्यामोडक्या ईंग्रजीच्या भरवश्यावर न्यूजपेपरमध्ये शिरतो. आजही तसेच काहीसे..

मांडीवर ठेवलेल्या पेपर वरून नजर भिरभिरवत सहज सवयीनेच एक नजर उजवीकडे तर एक नजर डावीकडे.. तर फिरून पुन्हा आणखी एक नजर उजवीकडे फिरवली.. अंह, ट्रेनमध्ये रस्ता वगैरे क्रॉस करत नव्हतो.. तर, त्यानंतर मी माझ्या दोन्ही हातांची बोटे दुमडली.. सहजच.. सवयीनेच.. जसे एखादी मुलगी आपले नेलपॉलिश चेक करते, अगदी तसेच.. एक एक बोट निरखून पाहता अचानक एका बोटावर नजर पडली तसा माझा चेहरा उजळला. मला माझे खाद्य मिळाले होते. त्या बोटाचे वाढलेले नख खायला म्हणून मी ते तोंडाजवळ नेणार, तो इतक्यातच.......

फाssट्ट करून एक फटका त्या हातावर पडला.. चारशे चाळीसचा झटकाच जणू, हात पुन्हा खाली गेला.. ओशाळून बाजुला पाहिले, तर जिथून तो फटका आला होता ती पुन्हा आपल्या गेममध्ये मग्न, जणू वेगळे असे काही घडलेच नव्हते.

काही सवयींचे कालांतराने स्वभावात रुपांतर होते. अन माझा हा स्वभाव ती पुरता ओळखून होती. जेव्हा मी बोटांचे निरीक्षण करायला सुरूवात केली, तेव्हाच तिने पुढे काय होणार हे ताडले होते, अन ते होऊ नये म्हणून वेळीच पावले.. अंह.. हात उचलला होता.. असाच हात ती घरीही उचलते जेव्हा मी चकचक चकचक, आवाज करत कानात बोटे घालतो.. असाच हात ती बाहेरही उचलते, जेव्हा मी सवयीनेच नाक खाजवायला घेतो.. असाच हात ती हॉटेलमध्येही उचलते, जेव्हा मी जेवणाची ऑर्डर करायच्या आधी, केल्यानंतर, आणि ती ऑर्डर येईपर्यंत, याच्या त्याच्या टेबलावर नजर टाकत बसतो..

ठरवलं तर या छोट्यामोठ्या चुकीच्या सवयी बदलण्यासारख्या असतात.. थोडासा प्रयत्न करावा लागतो इतकेच.. पण सवयींची दखल घेणारे कोणी असेल तर त्या जोपासण्यातही एक सुखच असते.. जसं ते दाग अच्छे होते है म्हणतात नं.. अगदी तस्संच ! नेहमीच तिचा न चुकता फटका खाणं, हे ही एक अस्संच !

पण आजचे हे सुख एवढ्यावरच संपले नाही हं..!

माझी चुळबुळ अजूनही चालूच होती. अतृप्त आत्मा अजूनही आतल्याआत तळमळत होता. थोड्यावेळाने काही सुचल्यासारखे झाले.. खिशातला फोन काढून कानाला लावला अन तिला आलोच जरा म्हणत जागेवरून उठलो.. तिथे तिच्या नजरेच्या पार पलीकडे, ट्रेनच्या दारावर थंडगार वारा खात उभा राहिलो.. कानाला लावलेला फोन केव्हाच परत खिशात गेला होता, आणि खिशात घातलेला हात मात्र तोंडात आला होता.. एका हाताने ट्रेनचा दांडा पकडून दुसर्‍या हाताची नखे खायची इच्छा मी अखेर पुर्ण करत होतो.. ही सवय नव्हती, हे व्यसन नव्हते, आवडीच्या ही पलीकडे असलेला, हा खरा छंद होता.. खर्रच, स्सालं सुख म्हणजे आणखी काय असते !!

.
.
.

२६ जुन २०१३

काल ऑफिसमधून किंचित उशीरा घरी परतत होतो. बरोबर नेहमीसारखी बायको नव्हती. सानपाड्याला ट्रेन पकडली जी पनवेलहून येत होती, त्यामुळे पुरेशी भरलेली होती. बसायला काही आता मिळत नाही या विचारात नजर फिरवली असता एका बेचक्यात कॉलेजच्या मुलांचा ग्रूप बसलेला दिसला. एका सीटवर तीन तर त्याच्या समोरच्या सीटवर दोन. त्या दोन्ही मुली असल्याने काही प्रवासी जवळच उभे होते पण संकोचाने त्यांच्या सीटवर बसायला मागत नव्हते. परिणामी त्या मुलीही मस्तपैकी त्या सीटवर बॅग वगैरे शेजारी ठेऊन, ऐसपैस बसल्या होत्या. मी मनातल्या मनातच, "जरा जागा देता का?", "बॅग मांडीवर घेता का?", इथपासून ते "चल ग्ग सरक.." पर्यंत शब्दांची जुळवाजुळव करत तिथवर पोहोचलो तसे त्यांनीच माझ्या मनीचे भाव ओळखून स्वत:हून जागा करून दिली.

सुरक्षित अंतर राखून मी बसलो तर खरा, पण आत्ता खरा खेळ सुरू झाला. इतरवेळी असल्या कॉलेज ग्रूपचे निरीक्षण करणे हा माझ्या आवडीचा छंद., जो त्या ग्रूप मध्ये मुलींची संख्या लक्षणीय असेल तर जरा जास्तच आवडीने जोपासला जातो. पण आज मात्र झोप अनावर होत होती.. कारण होते ऑफिसमधील संध्याकाळची बोअर मीटींग.. मी बसल्या जागीच पेंगू लागलो. मला कल्पना होती की बाजूला मुलगी बसली आहे त्यामुळे कितीही पेंगलो तरी तिच्या खांद्यावर लुडकायचे नाहिये. हेच डोक्यात पक्के बसवून मी डोळे मिटले.. हळूहळू झोपेच्या स्वाधीन झालो.. पण डोक्यात तेव्हाही घोळत होते की नाही अभिषेक, तुला डाव्या बाजूला लुडकायचे नाहिये, तिथे मुलगी बसलेली आहे.. अगदी झोपेतल्या स्वप्नात वगैरे शिरलो तरी कोणीतरी माझ्या निद्रिस्त मनाला बजावत होते, की नाही अभिषेक नाही.. तोल जाऊ द्यायचा नाहिये.. आणि इतक्यात, अचानक.. कानावर एक आवाज खनखनला, "स्क्यूSSज मीS..." ..

ऐकताच क्षणी मी खाडकन जागा झालो. डोळे उघडतानाच मला अंदाज आला होता की हा आवाज कुठून आला असावा. डावीकडे झुकलेली मान सरळ करत तिथे न पाहताच मी कसेबसे सॉरी पुटपुटलो. चेहर्‍यावर ओशाळलेले भाव नैसर्गिकरीत्या आल्याने फारसा अभिनय करावा लागला नाही. ट्रेनमधील इतर प्रवांश्यांच्या माझ्याकडेच रोखलेल्या नजरेला नजर न देता जवळपास कुठे रिकामी जागा दिसते का हे पाहिले. दुर्दैवाने कुठेच नव्हती. मी डोळे मिटायचे नाटक करून तिथेच बसून राहिलो, कारण झाल्या प्रकारानंतर डोळे उघडून इथे तिथे पहायची सोय उरली नव्हती. अजूनही डोळ्यांवर झापड होतीच, त्यामुळे नाटक करता करता पुन्हा खरोखरची झोप लागू नये याची कसरत करावी लागत होती.

पुढे कुर्ला आले, तिथे अर्धीअधिक ट्रेन खाली झाली. मी लागलीच बाजूच्या सीटवर शिफ्ट झालो, अगदी सहजच.. अजूनही मी त्या मुलीकडे वा तिच्या ग्रूपकडे पाहिले नव्हते, बघायची हिंमत होत नव्हती. कान टवकारून त्यांचे बोलणे मात्र ऐकत होतो, सतत असेच वाटत होते की माझ्याबद्दलच कुजबूजत असणार, पण तसे नव्हते.. नसावे..

वडाळा आले, ते उतरले.. बरोबर ती सुद्धा..! अगदीच राहावले नाही तसे शेवटचे म्हणून, थोडी मान तर थोडी नजर, तिरपी करून, तिच्यावर एक कटाक्ष टाकला... आणि काय आश्चर्य.. उतरता उतरता ती माझ्याकडे बघून चक्क हसली.. अपनी तो निकल पडी.. चुकीचा का असेना, तिच्या हसण्याचा मी सोयीस्कर अर्थ काढला.. आता उद्यापासून तीच ट्रेन आणि तोच डब्बा.. स्साला सुख म्हणजे.. अर्रररररर.... घरी वाट बघत असलेल्या बायकोची आठवण झाली आणि सार्‍या स्वप्नरंजनाला तिथेच ब्रेक लागला !

.
.
.

संध्याकाळच्या चहाबरोबर घडलेला किस्सा बायकोला चवीचवीने सांगायला घेतला. मुलगी दिसायला जितकी छान होती त्यापेक्षा जास्त रसभरीत वर्णन रंगवले. माझी झालेली फजिती सांगायला लाजलो नाहीच, तर शेवटाचे तिचे हसणे, शक्य तितका मुद्राभिनय करून दाखवले.. त्या हसण्यात बायकोनेही आपले हसणे मिसळले, आणि म्हणाली..., "आता काय बाबा, रोज रोज तीच ट्रेन, तोच डब्बा..." .. आणि आम्ही दोघेही खळखळून हसायला लागलो.. हेच तिचे मला आवडते.. माझ्यावर डोळे झाकून, विश्वास टाकून माझा विश्वास जिंकते.. माझ्या विचारांची साखळी पकडून माझ्या डोक्यात शिरते अन बघता बघता थेट मनात घर करते.. आयुष्यात घडणारे आंबटगोड किस्से, तिच्या जोडीने चघळणे.. स्सालं सुख म्हणजे आणखी काय असते..

- तुमचा अभिषेक

---------------------------------------------------------------------------------------------------------
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (१) - http://www.maayboli.com/node/43411
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२) - http://www.maayboli.com/node/43482
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३) - http://www.maayboli.com/node/43589
ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४) - http://www.maayboli.com/node/43694
---------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला किस्सा वाचुन यकsss झालं अगदी !
दुसरा पण ठिकठाक पण शेवटच्या चार ओळींनी पुर्ण लेखाला उंचीवर नेऊन ठेवलं Happy

चित्रु ___ तुम्हाला अश्शेच फटके रोजच बाय्कोच्या हातून मिळो आणि तुमचं सूख द्विगुणित होत राहो
<<<<<<<<
वरच्या वाक्यात बायकोच्या पुढेही `च' जोडा .. Wink

रिया ___ पहिला किस्सा वाचुन यकsss झालं अगदी !
<<<<<<<<
तुला भावी जीवनासाठी शुभेच्छा Happy

सर्वच प्रतिसादांचे आभार Happy

रिया तुला शुभेच्छा एवढ्यासाठीच की तू जोडीदार निवडताना कितीही काळजी घेतलीस तरी चित्रविचित्र ते घाणेरड्या, म्हणजे तुला यकsss व्हाव अगदी अश्या काही सवयी तुझ्या त्याच्यातही निघणारच..

त्या कमीत कमी निघाव्यात तसेच तुला झेपाव्यात यासाठी शुभेच्छा Happy

शेवटचा पॅरा उच्च!! माझ्यावर डोळे झाकून, विश्वास टाकून माझा विश्वास जिंकते.. माझ्या विचारांची साखळी पकडून माझ्या डोक्यात शिरते अन बघता बघता थेट मनात घर करते.. आयुष्यात घडणारे आंबटगोड किस्से, तिच्या जोडीने चघळणे.. स्सालं सुख म्हणजे आणखी काय असते.. खरंच!! Happy

वरच्या वाक्यात बायकोच्या पुढेही `च' जोडा .>>> Lol

रिया तुला शुभेच्छा एवढ्यासाठीच की तू जोडीदार निवडताना कितीही काळजी घेतलीस तरी चित्रविचित्र ते घाणेरड्या, म्हणजे तुला यकsss व्हाव अगदी अश्या काही सवयी तुझ्या त्याच्यातही निघणारच..
त्या कमीत कमी निघाव्यात तसेच तुला झेपाव्यात यासाठी शुभेच्छा >> Lol

फार सह्हीये...मज्जा आली वाचताना...! Happy

जेव्हा मी बोटांचे निरीक्षण
करायला सुरूवात केली, तेव्हाच तिने पुढे
काय होणार हे ताडले होते, अन ते होऊ
नये म्हणून वेळीच पावले.. अंह.. हात
उचलला होता..<<:हाहा:

ड्रिमगर्ल अन सुशांत ___ धन्स Happy

चिन्नू ___ डाऊट मला नाही तर बायकोला आहे, आज न उद्या ती इथे प्रतिसाद वाचायला येणारच, म्हणून तुम्हाला नक्की काय बोलायचे होते हे तुमच्या तोंडूनच कन्फर्म करून घेतले, आगाऊ काळजी.. Happy

ओहो, मग मी वाक्य बदलून देत आहे- तुम्हाला तुमच्या बायकोच्याच हातचे (अनेकानेक) फटके खायला मिळून, तुमचे सूख द्विगुणित होत राहो Happy
जोक्स अपार्ट पण ही छोटी छोटी सुखं आजुबाजू कुठंकुठं सांडलेली असतात्-याची तुम्ही आठवण करून देतात. मस्त वाटतं. जियो!

माझ्यावर डोळे झाकून, विश्वास टाकून माझा विश्वास जिंकते.. माझ्या विचारांची साखळी पकडून माझ्या डोक्यात शिरते अन बघता बघता थेट मनात घर करते.. >>>>>>>>>>

+१०००

आजकाल " सारे समय केवल महिलाओं के लिए" डबा बंद झालाय का? कॉमन डब्यात चढल्याबद्द्ल त्या कॉलेजकन्यकेच्या हिंमतीची दाद द्यावी का कीव करावी ते मला कळत नाहीये......मुलगी/ बाई शेजारीच आहे म्हणून सावरून बसणे / वाट देणे अशी बेसिक डिसेंसी अजूनही नाहीच हे तर वरील प्रसंगावरून कळलेच आहे, अपेक्षा पण नाहीच (कारण अपेक्षा करून उपयोग काय?). होपफुली, ती कॉलेजकन्यका Underage नव्हती, fantasy असली म्हणून काय झाले? वरील प्रसंग vice-versa झाला तर "दु:ख म्हणजे आणखी काय असते कळेल का?"( बायको अतिश्रमाने ग्लानि येऊन शेजारच्या TDHH च्या खांद्यावर विसावली.... पुरूषच तो "excuse me" म्हणायच्या ऐवजी गालावर आलेली बट हलकेच बाजूला केली ...इत्यादी .... मी म्हणालो..., "आता काय बाबा, रोज रोज तीच ट्रेन, तोच डब्बा..." .. जमेल का?

विजय देशमुख, चैत्राली ___ धन्यवाद
चिन्नु ___ Happy

rajasee ___ आजकाल " सारे समय केवल महिलाओं के लिए" डबा बंद झालाय का? कॉमन डब्यात चढल्याबद्द्ल त्या कॉलेजकन्यकेच्या हिंमतीची दाद द्यावी का कीव करावी ते मला कळत नाहीये......
>>>>>>>>>>>
आमची मुंबई लोकल फर्स्टक्लासमध्ये महिलांचा डबा जेमतेम असल्याने बरेचदा (खचाचखच गर्दी नसल्यास) त्या कॉमन डब्यात चढतात, तसेच वर माझ्या अनुभवात असल्याप्रमाणे कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रूप असेल तर त्यांना कॉमन डब्यातच चढावे लागते कारण मुलांना महिलांच्या डब्यात प्रवेश नसतो... Wink अर्थात "कॉमन" किंवा "जनरल" या शब्दातच आले ना की तो डबा मुलीदेखील वापरू शकतात. Happy

बाकी आपल्या पुढच्या उतार्‍याचे उत्तर म्हणून माझा माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!
लेख वाचा,

जर मी ते बायकोशी शेअर करू शकतो तर हे का नाही याचे उत्तर तुम्हाला आपसूकच मिळेल. Happy

छान लिहिता तुम्ही......संपुर्ण लेखमालिका वाचनिय आहे....