कणकेची (गव्हाच्या पिठाची) धिरडी

Submitted by चेरी on 1 July, 2013 - 23:27

साहित्य: गव्हाचे पीठ (कणिक), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ (कणिक) घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, लसूण घाला. मग त्यात पाणी घालून दोस्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा.
२) तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी तेल लावलेल्या निर्लेप तव्यावर खोल डावाने घाला. झाकण ठेवा.
३) धिरडी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या आणि तूप/बटर घालून आवडेल त्या चटणी बरोबर वाढा.
(चटणी शिवायही तितकीच छान लागतात. म्हणून चटणी नसली तर नुसत्या तूपाबरोबरही छान लागतात.)

टिपः- या मिश्रणाची धिरडी घालताना थोडे विशेष कौशल्य अशासाठी लागते की धिरडी तव्यावर घातल्यानन्तर, एका कुंड्यात/बाउलमध्ये घेतलेल्या पाण्यात हात बुडवून त्या हाताने गरम धिरडे पसरावे लागते तरच ते पातळ आणि जाळीदार होते. अन्यथा ते जाडसर होते.
जर या पद्धतीने धिरडं हाताने पसरता येत नसेल तर धिरड्याचे मिश्रण थोडं पातळ बनवून मग खोल डावाने / ग्लासने (तव्याच्या परिघापासून मध्यापर्यंत डाव गोल गोल फिरवत) धिरडी घाला.

IMG_0427 - Copy.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे रेसिपी.

मी पण करते कणकेची धिरडी. आलं + लसूण + हिरवी मिरची भरड वाटुन घालते.

यात कधी कधी पालक/मेथी पण घालते.

वा! मस्त दिसतात जाळीदार धिरडी. मी पण करते, पण लसणाच्या ऐवजी हिरवी मिरची बारीक चिरुन टाकते. आता लसुण टाकुन बघेन. लाजो प्रमाणे मेथी, पालक टाकुन करुन पाहीन.

गूळ घालून कधी केली नाहीत, पण माझी आज्जी पोळ्या करून झाल्या की लावायला म्हणून खरकट्यात घेतलेली कणीक असायची त्यामधे चमचाभर बेसन, तिखट, मीठ आणि तेल घालून असं धिरडं बनवायची. कसलं सही मऊ लागायचं ते. मी पण आठवण आली की अधून्मधून तसं धिरडं बनवते.

शर्मिला, अंडी घालायची टीप छान आहे. Happy

छान दिसत आहेत धिरडी ..

नंदिनी म्हणते तसं आमच्याकडेही पोळीला लावायला घेतलेल्या कणकेचं इन्स्टंट फक्त मीठ घालून धिरडं करायची आई .. पण ते फक्त एकच असायचं Wink

कणकेच्या धिरड्यात चिमुट्भर मेथीची पुड घालुन पण मस्त चव येते.

यात थोडी तांदुळाची पिठी घातली तर >> किंवा रवा Happy

शर्मिला, अंडी घालायची टीप छान आहे Happy
गोड धिरड्याची आठवण करुन देणार्‍या सगळ्यांना धन्स Happy ...

चेरी, रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद. खंर तर ही सोपी रेसिपी. पण कधी कधी अशा साध्या सोप्या गोष्टी कित्येक वर्षात होतही नाहीत, विस्मरणात जातात. आई नेहमीच करायची. कारण मोठ्या कुटुंबात चपात्या कमी पडल्या की टाका एखादा घावण असे नेहमीच होत असे.
३-४ दिवसापुर्वी मला ताप आलेला ,तोंडाची चवच गेली. काही जातच नव्हते. तुझी ही रेसिपी पाहीली आणि केली. पण आई टाकते तसे जिरे टाकुन केले. चक्क १ पुर्ण घावण /धिरड मी खाल्ला. तोंडाला जरा तरी चव आली. खुप खुप धन्यवाद!

@अस्मिता१,
दोस्याच पीठ असतं साधारण तेवढं पातळ पीठ करायचं जर हाताने धिरडं घालायचं असेल तर.
जर डावाने धिरडं घालायचं असेल तर थोडं पिठ थोडं पातळ करायचं.

@विद्याक.
धन्यवाद Happy
>>३-४ दिवसापुर्वी मला ताप आलेला ,तोंडाची चवच गेली. काही जातच नव्हते. तुझी ही रेसिपी पाहीली आणि केली. पण आई टाकते तसे जिरे टाकुन केले. चक्क १ पुर्ण घावण /धिरड मी खाल्ला. तोंडाला जरा तरी चव आली. खुप खुप धन्यवाद!>>
तुला ही रेसिपी ऐन वेळी उपयोगी पडली हे ऐकून बरं वाटलं.

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद Happy

चेरी मी पर्वा हे केले पण मला त्यात थोडे तान्दुळ पिठ आणि रवा घालावा लागाला. त्याशिवाय नीट होत नव्हत.

@अनघा, असं का झालं असावं बरं. मला वाटतं की पिठाच्या मिश्रणाच्या कन्सिस्टन्सीवर अवलंबून असावं धिरडं नीट होणं. पुढच्या वेळेस जेव्हा धिरडं बनवेन तेव्हा जमलं तर विडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेन. किंवा निदान पिठाच्या मिश्रणाचा फोटो. ज्यावरून मिश्रणाच्या कन्सिस्टन्सीची आयडिया येईल.

मी हि धिरडी कणिक (१ वाटी) +तान्दुळ पीठ ( १/४ वाटी) + बेसन (१/२ वाटी ) पिठात वाटलेली आल मिरची घालुन करते. डोश्यासारखे पातळ पीठ असेल तर निट जाळी पडेल.

मी खुप वेळा ही धिरडी करते
गोड व तिखट दोन्ही करते. गोड धिरड्याला आमच्या घरी 'कणकेचे पोळे" म्हणतात.

गोड करताना पहिले पाण्यात गुळ मिसळुन अगदी एकजीव करायचा. त्यात कणिक घालायची. साधारण पळीवाढे झाले पाहिजे. मग हे पिठ नीदान एक तास तरी फ्रिज मधे ठेवावे. ( मी रात्रीच करुन ठेवते). सकाळी/ बाहेर काढल्यावर त्यात थोडे पाणी घालुन तव्यावर तूप सोडुन करायची. पिठ तव्यावर पसरल्यावर वरुन झाकण ठेवावे, मंद आचे वर शिजुन 'चुर्र' आवाज आला की झाकण काढुन परतावे. वाढताना तुप द्यावे. चांगली जाळी पडण्या साठी त्यात चिमुट्भर इनो घालावे. उत्तम जाळी पडते.
तिखट करताना मी कणकेत मेतकूट घालते. त्याने एक प्रकारचा खमंग वास येतो. कोथिंबीर, लसुण, मिरची वाटुनही त्यात घालते. ह्या घवनांशी मी खुप प्रकारे व्हेरीएशन्स करते. कधी कधी दूधी/गाजर्/सिमला मिर्ची किसुनही घालते. बहुतेकदा हे घावन मी ब्रेकफास्ट ला करत असल्याने व मुलीला डब्यात देत असल्याने शक्य तितक्या तर्‍हा वापरुन करते.

खुपच छान लागतात कणकेची धिरडी. धन्यवाद चेरी. सगळ्यांची व्हेरिएशन्स पण एकसे एक आहेत. मीही गोडाचीच करते. गुळाच्या पाण्यात कणीक आणि भरपूर ओलं खोबरं घालून. किंचीत मीठही. तू म्हणतेस तशी हातानेच पसरवावी लागतात. खोबरं-गुळामुळे थोडी जड होतात त्यामुळे फार पातळ करता येत नाहीत. नीट शिजण्यासाठी आचही मंद ठेवावी लागते. मगच नीट उलटता येतात. पण चव अप्रतिम असते. वरती साजूक तुप. खमंग लागतात आणि दमदमीत होतात. आता तिखटाचीही करून बघते. निव्वळ फॉर्म बदलून चव आणि रुटीन दोन्हीत बदल.

मागे एकदा 'मेजवानी'मध्ये शुभांगी गोखलेंनी सांगितलेली कणकेची पंचामृताची धिरडीही मस्त लागतात.

गोड धिरडी (मालपूवा) पाण्यापेक्षा दुधात गूळ वितळवून करून बघा छान होतात. रात्री पीठ करून ठेवण्याला अनुमोदन.

धन्यवाद प्रीति.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार Happy सगळ्यांच्या टीप्स पण छान. कणकेची गोड धिरडी करून पाहिन आता.

@हेमाली, याला कणकेचे थालीपीठ म्हणत नसावेत. कारण ही बरीच पातळ असतात.
पण कणिक + गूळ + गाजर घालून केलेली गोड थालीपीठं खाल्ली आहेत. ती छान लागतात.

आमच्याकडे याला 'आयते' म्हणतात. कणिक + ताक (नसल्यास पाणी ) + चवीनूसार मीठ + (हवे असल्यास हळद व तिखट) यांचे पळीवाढ मिश्रण करून तव्यावर तेल टाकून मंद आचेवर होवू द्यायचे. छान लागतात.

Pages