कीज (पास्ट लाईफ रीग्रेशन) पुस्तकाविषयी

Submitted by मंजूताई on 1 July, 2013 - 05:16

१६ जून रोजी श्री संतोष जोशी लिखित 'कीज' ह्या पास्ट लाईफ रीग्रेशनवरचे पुस्तक अभिनेते श्री सुरेश ओबेरॉय ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाले. ह्या पुस्तकाविषयी (लेखकाचे विचार) व थोडे लेखकाविषयी

'कीज' म्हणजे काय

आज प्रत्येक माणसाला शांत समाधानी आयुष्य जगायला आवडतं. पण असं होत नाही . अमूल्य असे वर्तमान आनंदात घालवण्या ऐवजी आपण गत आयुष्यात केलेल्या चूका व भविष्याची चिंता करत दु:खात आणि खंत करण्यात घालवतो. आपला 'आज', 'वर्तमान' आनंदात घालवता येतो ह्यावर कुणाचा विश्वास बसत नाही. आमचं नशिबचं खोटं, आपलं प्रारब्ध दुसरं काय अशी दूषणं देत आपण आयुष्य ढकलत राहतो. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे?' सुखी माणसाचा सदरा नाही पण 'किल्ली' नक्कीच आहे असे श्री संतोष जोशी अध्यात्मिक गुरु, मार्गदर्शक आपल्याला सांगतात. पूर्वायुष्यात केलेल्या चूकांची अपराधी भावना नष्ट करुन व भविष्याचं योग्यप्रकारे नियोजन करून वर्तमान आयुष्य सुख-समाधान-शांतीत घालवण्याची दिशा उत्तमरित्त्या त्यांनी 'कीज' ह्या पुस्तकाच्या माध्यामातून वाचकांना दिली आहे.

पुस्तका विषयी

माणूस, भूत, वर्तमान आणि भविष्याचा ज्याप्रकारे विचार करतो त्यानुसार त्याचे व्यक्तिमत्व घडत असते. ह्या पुस्तकात त्यांनी ' एचएलपी - त्रिसुत्री' अश्याप्रकारे मांडली आहे जेणेकरुन आपल्या मनातली अपराधीपणाची बोच कमी करुन, उत्तम प्रकारे भविष्याच नियोजन करुन व सकारात्मक बदल करुन समृध्द जीवन जगण्याची गुरुकिल्लीच त्यांनी 'की' ह्या पुस्तकाद्वारे वाचकांना दिली आहे.

१. हील युवर पास्ट

२ लिव युवर प्रेझेंट

३. प्लॅन युवर फ्युचर

१. हील युवर पास्ट - आपल्या सद्य जीवनाचा पाया आपलं पूर्वायुष्य असतं. आपलं आयुष्य पूर्वायुष्यात केलेल्या चूकांची खंत करण्यात घुटमळत राहते. त्याऐवजी केलेल्या चूकांची खंत करत न बसता त्या स्वीकारून स्वतःला माफ करायला हवे. ह्या पहिल्या प्रकरणात श्री संतोष जोशी आपल्याला अनेक युक्त्या व क्लृप्त्या सांगतात ज्याद्वारे आपण त्याचा सहजतेने स्वीकार करुन, स्वतःला माफ करून, सुप्तमनातील अपराधी भावना नष्ट करुन सुखी समृध्द आयुष्याकडे वाटचाल करू शकतो.

२ लिव युवर प्रेझेंट - आज हा उद्याचा भूतकाळ असतो. असं म्हणतात 'का' जगावे हे कळलं तर कसे जगावे हे सांगांव लागत नाही. पण बहुतांश लोकांना आपल्या जीवनाचं उद्द्यीष्टंच माहीत नसतं आणि आपलं आयुष्य फुकट गेलं ह्याची खंत करीत आजचा दिवसही नासवून टाकतो. श्री संतोष जोशी दुसर्‍या प्रकरणात 'आजचा दिवस माझा' ह्या वृत्तीने जगून सुखी शांत, समाधानाने तृप्त आयुष्य कसे जगावे ह्याचे अतिशय संवेदनशीलतेने व सकारात्मकतेने मार्गदर्शन करतात. ह्या दुसर्‍या प्रकरणात त्यांनी आजच्या जगण्यातली गंमत कशी अनुभवावी हे अतिशय रंजकतेने मांडले आहे. आपलं आजचं आयुष्य सार्थकतापूर्ण व अर्थपूर्ण असायला हवं असं प्रत्येकालाच वाटतं असतं पण ती वाट दाखवायला वाटाड्याची गरज असते. संतोष जोशी आपलं अलगद बोट पकडून हा रस्ता चोखाळायला मदत करतात.

३. प्लॅन युवर फ्युचर - आजचं आपलं समृध्द जीवन हा भविष्याचा पाया असतो. तो जर मजबूत असेल तर भविष्याची चिंता करण्याची गरजच काय? तरी सर्वसाधारण मनुष्य आर्थिक व आरोग्याचं नियोजन हे करतच असतो. ह्या आर्थिक किंवा इतरांनी चोखळलेल्या मार्गाचेच/आकृतीबध्द आयुष्याचे आपण नियोजन करणे हे महत्त्वाचे आहेच पण त्याचबरोबर आपणच आपल्या आयुष्याचे वाटाडे कसे बनावे, आपला आतला काय म्हणतो ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करुन आपण आपलं आयुष्य सुखात, आनंदात कसं घालवाव हे तिसर्‍या प्रकरणात सहज सोप्या भाषेत सोदाहरणसह समजावून सांगतात. आपण आपल्या समृध्द आयुष्याचा खजिना बाह्य जगात शोधत असतो खरं तर तो आपल्या आतच दडला असतो, तो शोधून काढण्याचा मार्ग श्री संतोष जोशी दाखवतात.

सारांश

'कीज' ह्या पुस्तकाद्वारे श्री संतोष जोशी आपल्याला खंतमुक्त जगण्याची दृष्टी देतात. आपण गढुळलेल्या पुर्वायुष्याचा निचरा करत नाही आणि आपला आजचा दिवसही गढुळीत करीत जगत असतो. पण हे शक्य आहे का? हो, हे अगदी सहज शक्य आहे हे त्यांनी ' एचएलपी - त्रिसुत्रीतून' मांडले आहे. ह्या पुस्तकात अतिशय रंजकतेने व कथात्मकतेने तसेच त्यांनी केलेल्या प्रयोगातून, व लोकांना आलेल्या प्रत्ययातून मांडले आहे. सगळ्या वाचकांना समृध्द व समाधानी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली 'कीज' संतोष जोशींनी दिली आहे.

लेखकाचा परीचय

संतोष जोशी मेकॅनिकल इंजिनियर आहेत. पूर्णवेळ जीवन मार्गदर्शक व पीएलार उपचार तज्ञ होण्यापुर्वी त्यांनी १७ वर्ष अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम केले आहे. कॉरपोरेट जगाचा व मानवी स्वभावाचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. आजच्या जीवनशैलीत जगात प्रत्येक माणसाला अनेक प्रकारच्या ताण-तणावाला व भावनिक आंदोलनांना व आव्हानांना सामोरं जावं लागतं. लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांचे आयुष्य समृध्द करण्यासाठी त्यांनी पुर्णवेळ मार्गदर्शक व समुपदेशक म्हणून काम करण्याचे ठरविले आहे. संतोष जोशी ह्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. वय जसजसे वाढत गेले तसतशी त्यांची अध्यात्माची व ध्यानाची गोडी अभ्यासपूर्ण होत गेली आणि त्यांच व्यक्तिमत्व बहुआयामी बनत गेलं. त्यांचा पीएलआर व ध्यानाचा व्यासंग खूप मोठा आहे. ह्याविषयावर त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. त्यांनी आपले पुढील आयुष्य लोकांचे जीवन समृध्द करण्यासाठी व अध्यात्मिक जागृतीसाठी वेचण्याचे ठरविले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

khup sundar parikshan ahe....Santosh Joshi yancha contact no. milu shakel ka?