अकाली म्हातारं झालेलं गांव

Submitted by डॉ अशोक on 5 July, 2013 - 12:43

अकाली म्हातारं झालेलं गांव

नांदेडच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मी बारा वर्षे प्राध्यापक म्हणून होतो (१९९४ ते २००५) या काळातली गोष्ट. माझ्या एका विद्यार्थ्यानं नांदेडलाच प्रॅक्टीस सुरू केली होती. त्याचा अर्जंट काम आहे, येता कां म्हणून विनंती वजा फोन आला. मी गेलो. तिथं आमचे एक वरीष्ठ सहकारी पण बसले होते. ते मेडीसीन विभागातून स्वेच्छानिवृत्ती घेवून नांदेडलाच प्रॅक्टीस करत होते. समोरच एका पेशंटचा एक्स-रे लावलेला होता. मी गेल्यावर त्या माझ्या विद्यार्थ्यानं सांगितलं की तो पूर्वी काम करायचा त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या वैद्यकिय अधिका-यानं हा पेशंट पाठवला होता. त्याचा हा एक्स-रे होता. मी एक्स रे पाहिला आणि मन भूतकाळात गेलं. विद्यार्थी असतांना असाच एक एक्स-रे आम्हाला दाखवला होता. निदान होतं "स्केलेटल फ़्ल्यूरोसिस" फ़्ल्युओराइड्ला वैद्यशास्त्रात दुधारी तलवार म्हणतात. हे पाण्यातून आपल्याला मिळतं. कमी मिळालं तर किडलेले दात आणि जास्त झाले तर दातांचा आणि हाडांचा फ़्ल्युरोसिस. निदान सरळसोट होतं. त्या पेशंटला बघितलं. तिशीतला तो पेशंट, पन्नाशीतला वाटत होता. त्याच्यापाशी विचारपूस केली तेंव्हा कळलं की सगळ्या गावात हे हाल होते. कुणाचे दात धड नव्हते. तरूणपणी पाठीला बाक आलेले. तरुणपण हंरवलेलं, अकाली म्हातारं झालेलं ते गाव....

रोगावर उपचारापेक्षा प्रतिबंध चांगलं असं शास्त्र सांगत होतं.पिण्याच्या पाण्यात फ्ल्यूओराइइड जास्त झालं की ते दातात जमा होतं आणि हाडावर परिणाम करतं. दात आणि हाडांवर परिणाम झाला की माणसं अकाली वृद्ध झाल्यासारखी दिसायला लागतात.

पण हा रोग इकडे नाही अशीच आमची माहिती होती आणि तसं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगत होतो आणि आता हे नवंच प्रकरण उदभवलं होतं. गावातल्या लोकांनी सरकारदरबारी खेट्या घातल्या पण पदरी निराशा पडली होती आणि आता आपण काही तरी करावं अशी माझ्या त्या विद्यार्थ्याची त्याच्या गुरूकडे (म्हणजे माझ्याकडे) मागणी होती. मला ही ते पटलं.

मी आमच्या डीनला भेटलो आणि आमच्या कॉलेजातल्या ऑर्थोपीडीशीअन, डेंटल सर्जन आणि पिडीएट्रीशीअनला घेवून ते गांव गाठलं आणि घरोघरी जावून पहाणी/ तपासणी केली पिण्याच्या पाण्यासाठी गावात चार हपशे होते. त्यांचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासायला दिले. त्यात फ्लुओराइडचं प्रमाण "प्रमाणाबाहेर" होतं. गावातल्या शाळेत जावून पाहिलं. मुलांच्या दातांची दुर्दशा पहायला मिळाली. दाताच्या "त्या" अवस्थेमुळे त्यांचं निरागस हंसू सुद्धा भेसूर वाटत होतं. बरीचशी मुलं तर हंसणं विसरल्यागत वागत होती.

वैद्यकिय तपासणी आणि पाण्याची तपासणी हा सगळा अहवाल घेवून जिल्हा परिषदेचे मुख्याधिका-यांना भेटलो. अहवाल बघून त्यांना ही परिस्थिचं गांभीर्य लक्षात आलं. पण त्यांनी कोणताही प्रशासक विचारेल तो प्रश्न विचारलं: "काय करता येईल?" मी तयारच होतो, कारण आम्ही यावर आधीच चर्चा केली होती. मी तांतडीची आणि दीर्घकालीन अशी द्वीस्तरीय योजना मांडली. तांतडीच्या योजनेत त्या गावाला टॅंकरनं पिण्याचं पाणी पुरवणं आणि दीर्घकालीन म्हणून जवळच्याच एका गावात होवू घतलेल्या नळयोजनेतून पाणी पुरवठा असा उपाय सुचवला. तांत्रिक सल्लागारानं नुसतीच समस्या मांडली नाही तर प्रशासकिय चौकटीत राहून पूर्तता करता येईल अशी उपाय योजना पण सुचवली म्हणून तो हाडाचा प्रशासक अतिशय खुश झाला आणि "आता इथून पुढची जवाबदारी माझी" म्हणून त्यांनी माझे आभार मानले.

मी ही घटना नंतर विसरून गेलो होतो. माझी औरंगाबादला बदली झाली आणि एक दिवस माझ्या त्या विद्यार्थ्याचा फोन आला. तो म्हणाला: "सर, आनंदाची बातमी आहे. त्या गावाच्या नळ योजनेचं उदघाटन आहे आणि तुम्ही यावं अशी गावक-यांची इच्छा आहे. " मला त्या गावचे गावकरी औरंगाबादला येवून भेटून गेले. मी नाही जावू शकलो त्या समारंभाला.

माझा विषय सार्वजनिक आरोग्य हा. इतर डॉक्टर वैयक्तिक आजाराचं निदान करून उपा्ययोजना करतात. माझ्या विषयात आरोग्याच्या सार्वजनिक समस्यांचे निदान आणि त्यावर उपाय योजना हा महत्वाचा भाग असतो. निदान होवून योग्य उपचार झाला की डॉक्टरला समाधान मिळते. सार्वजनिक आरोग्य समस्येचं निदान होवून त्यावर उपाय सांपडून, त्याची अंमलबजावणी होवून त्या समस्येचं निराकरण झालेलं पहाणं ही आमच्या विषयात दुर्मिळ बाब. पण या बाबतीत समस्येचं नुसतं निदानच झालं नाही तर उपाययोजनेची अंमलबजावणी झाली होती. ज्यांना या समस्येची बाधा झाली होती, त्यांच्या बाबतीत फार काही करता येण्यासारखं नव्हतं. पण आता त्या गावाला अकाली म्हातारपणाचा त्रास होणार नाही. त्या गावातली मुलं मनसोक्त हंसू शकतील आणि ते हंसतील तेंव्हा त्यांचे दात तुमच्या आमच्या सारखेच असतील. त्यांना कमी पणा वाटावा असं त्यात काहीच असणार नाही.

[टीप:नंतर शासनानं त्या भागात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण केलं. आता नांदेडच्या त्या भागात "फ्ल्युरोसिस बेल्ट" आहे याची सरकार दरबारी नोंद झाली आहे. आम्ही ही आता तसं आमच्या विद्यार्थ्यांना सांगू लागलो आहोत.]

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या डेंटीस्टने लेकीला फ्लुरॉइडच्या गोळ्या प्रिस्क्राईब केल्यात. वर्षभर दिल्या पण मीच आता बंद केल्या. कारण पाण्यात असतंच अन टुथपेस्टपण फ्लुरॉईडचीच वापरतो. तुमचं काय मत?

कमी असेल तर कसं ओळखायचं?

फ्लुओराइडच्या कमतरतेनं दात-किड (केरीज) होतात. तसं असेल म्हणून इतर दातात कीड हो ऊ नये म्हणून गोळ्या दिल्यआससाव्यात मात्र फार जास्त दिवस हा उपाय ठीक नाही !!

छान वाटले वाचून. अभिनंदन तुमचे (आणि त्या प्रशासकीय अधिकार्‍याचे) या कामाबद्दल!

तांत्रिक सल्लागारानं नुसतीच समस्या मांडली नाही तर प्रशासकिय चौकटीत राहून पूर्तता करता येईल अशी उपाय योजना पण सुचवली>>> हे फार महत्त्वाचे आहे. सरकारी/निमसरकारी कार्यालयात एखादी आवश्यक गोष्ट जर घडवून आणायची असेल तर ती प्रशासकीय चौकटीत बसवावी लागते आणि बर्‍याच वेळा ते करणे किती अवघड असते हे जवळून पाहिलेले असल्याने याच्याशी लगेच 'रिलेट' करता आले.

डॉक्टर.... वरील अनुभवावरून सिद्ध होते की तुम्ही केवळ "डॉक्टर" या भूमिकेतून त्या परिसरातील दुखण्याकडे न पाहता त्यावर प्रभावीरित्या मात करण्यासाठी प्रशासकीय दृष्टिकोणही दाखविणे किती गरजेचे आहे हे त्या द्विस्तरीय योजनेत मांडल्यामुळे पाणी पुरवठा करणे ज्या प्रशासकाच्या अखत्यारीतील बाब आहे तो प्रभावित झाला. वास्तविक पाहता डॉक्टर व्यक्तीने सुचविलेले मार्ग सार्‍याच प्रशासकांना मान्य होतील असे बिलकुल नसते. कित्येक प्रसंगी 'तू मोठा की मी मोठा' असे शाब्दिक द्वंद्वही चालल्याचे मी अनेक प्रसंगी [शासकीय पातळीवर] अनुभवले असल्याने ज्या रितीने योजना तुम्ही कागदोपत्री मांडली होती तिचेच ते यश. यंत्रणेने तसेच ग्रामस्थानी तुमचे जे आभार मानले ते निश्चित्तच अस्थानी नाही.

"अकाली म्हातारे होत असलेल्या गावा" तील अनुभव शब्दबद्ध करण्याची तुमची धाटणी वाचकाला खिळवून ठेवते हेही जाताजाता सांगतो.

अशोक पाटील

फारच सुंदर! अतिशय मस्त वाचलं वाचून. तुमचं खूप अभिनंदन! त्या गावाला आता चांगलं आरोग्य लाभो ही शुभेच्छा!
btw, फ्लुओराइडचं प्रमाण "प्रमाणाबाहेर" हे एवढे वाईट परिणाम होतात हे माहितीच नव्हतं...ते या लेखा मुळे कळालं. आज पर्यंत फक्त अति फ्लुरॉईड वाईट एवढेच माहिती! धन्यवाद!

डॉक्टर अशोक,

तुमचे कार्य प्रशंसनीय आहे. सरकारी अनास्था हा जणू नियम असल्यागत परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर एक अपवाद निर्माण करण्याचे तुमचे परिश्रम विशेषत्वाने उठून दिसतात! Happy

अधिक वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद सर्वांचे !!
फारएन्ड आणि अशोक
प्रशासनात टेक्नोक्रॅट आणि ब्युरोक्रॅट हा वाद जुनाच आहे. दोघांनी आपापले "रोल" समजून-उमजून निभावले तर काहीच अडचण येत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव. विपरीत अनुभव पण आलेत, नाही असं नाही, पण तुलनेनं कमी !
*
रायगड..
हे गाव ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येतं तिथं आता माझा एक विद्यार्थी वैद्यकिय अधिकारी आहे. मी कथन केलेल्या घटनेला आता १७-१८ वर्षे झालीत. तिथल्या शाळेतल्या मुलांची वैद्यकिय तपासणी नुकतीच झालीय आणि आता तिथल्या मुलात ही समस्या मुळीच नाही ही आनंदाची बातमी!
*
दुसरी बातमी म्हणजे शासनानं तिथं आता "फ्ल्युरॉसिस नियंत्रण अधिकारी" नेमलाय !!
*
Srd..
पिण्याच्या पाण्यात फ्लुओराइडचं प्रमाण ०.५-०.८ मि.ग्रॅ. प्रति लिटरच्या वर असू नये असा दंडक आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर फ्लुरोसिस चा धोका असतो. फ्लुओराइड्स चे क्षार दात आणि हाडात जमा होतात आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम म्हणजेच फ्ल्युरोसिस

-डॉ अशोक

व्वा डॉक्टर ... एक विनंती - तुमचे अनुभव लिहित चला. खुप चांगलं वाटतं. हल्ली आशादायी वाचायला मिळत नाही फारसं... खुप चांगलं काम केलत. अभिनंदन.

डॉ अशोक

अभिनंदन !!

समस्येच मूळ हे पाण्यात नसुन पाण्याच्या स्तोत्रात आहे.

पाण्याची समस्या ईतकी भयंकर असल्याने भारतातील गावा खेड्यात सर्व ठिकाणी कुठचा ही धरबंध
नसल्यासारखे बोरवेल खोदले जात आहेत. त्यातुन मिळालेल्या पाण्याची टेस्ट करुन घ्यावी व ते पाणी शरीराला
योग्य अयोग्य हे ही पहाव लागत अस सांगणारे कोणीही नाही.

पिण्याच्या पाण्यात फ्लुओराइड हा एक प्रकार झाला त्याशिवाय आर्सेनिक पॉईझन असा दुसरा प्रकार आहे.
२००८ साली उजेडात आलेल हे पॉय् झनींग ओझापट्टी नावाच्या बिहार मधील एका गावात होत आहे. कारण पुन्हा एकदा बोरवेलच.

ह्या शिवाय आपण भारतात दररोजच्या जेवणात ४ मिग्रा किटकनाशक खात असतो. एका सर्व साधारण अमेरीनच्या ४० पटीने जास्त किटकनाशक आपल्या जेवणात जातात. ईतक्या जास्त प्रमाणात किटकनाशके अन्नात असताना ही आपल्याला आहे का त्याच काही ?

मात्र अमेरीकन लोकांना मात्र ऑरग्यानीक फुड च फॅड सध्या आहे कारण त्यात अन्न
उत्पादन करताना कोणतेही रसायनीक खत तसेच किटकनाशक वापरत नाहित. भारतातील अन्न पदार्थ ह्या
ऑरग्यानीक फूड कॅटेगोरीम्ध्ये येत नाहीत कारण पाण्यातच ईतके किटकनाशक आहेत.

कूठून येतात इतके किटकनाशक पाण्यात, फार पुर्वी भारतात कुठच्याही लगामा शिवाय DDT Powder वापरत होते त्याचाच परीणाम. अर्थात हा एक स्वतंत्र विषय आहे.

http://icmr.nic.in/ijmr/2008/october/1007.pdf
http://articles.timesofindia.indiatimes.com/keyword/arsenic-poisoning
http://www.freedocumentaries.org/teatro.php?filmID=118&lan=en&size=big

सरकार ला तर सर्वत्र आनंदी आनंदच आहे.

आभार प्रतिसाद देणा-या सर्व मित्रांचे

डॅंबिस१...

तुम्ही दिलेल्या सर्व लिंक्स डाऊनलोड करून वाचल्या. धन्यवाद. आंध्र प्रदेशात काही वर्षांपूर्वी ही समस्या जाणवली होती. मोठी धरणं बांधली त्याच्या लाभक्षेत्रात्ल्या विहिरीत पाण्याची पातळी वाढली. पण हे पाणी खालून फ़्ल्युओराईड घेवून आलं. विशेष म्हणजे धरणाच्या कालव्यात मात्र फ़्ल्युओराईडचं प्रमाण मर्यादेतच होतं. याला म्हणायचं मानव निर्मित आजार. मात्र सर्व धरणांच्या लाभ क्षेत्रात हा प्रकार होत नाही, कारण मुळात जमीमीच्या खालच्या स्तरात फ़्ल्युओराईडचं अस्तित्व हवं.

Pages