अकाली म्हातारं झालेलं गांव

Submitted by डॉ अशोक on 5 July, 2013 - 12:43

अकाली म्हातारं झालेलं गांव

नांदेडच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मी बारा वर्षे प्राध्यापक म्हणून होतो (१९९४ ते २००५) या काळातली गोष्ट. माझ्या एका विद्यार्थ्यानं नांदेडलाच प्रॅक्टीस सुरू केली होती. त्याचा अर्जंट काम आहे, येता कां म्हणून विनंती वजा फोन आला. मी गेलो. तिथं आमचे एक वरीष्ठ सहकारी पण बसले होते. ते मेडीसीन विभागातून स्वेच्छानिवृत्ती घेवून नांदेडलाच प्रॅक्टीस करत होते. समोरच एका पेशंटचा एक्स-रे लावलेला होता. मी गेल्यावर त्या माझ्या विद्यार्थ्यानं सांगितलं की तो पूर्वी काम करायचा त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या वैद्यकिय अधिका-यानं हा पेशंट पाठवला होता. त्याचा हा एक्स-रे होता. मी एक्स रे पाहिला आणि मन भूतकाळात गेलं. विद्यार्थी असतांना असाच एक एक्स-रे आम्हाला दाखवला होता. निदान होतं "स्केलेटल फ़्ल्यूरोसिस" फ़्ल्युओराइड्ला वैद्यशास्त्रात दुधारी तलवार म्हणतात. हे पाण्यातून आपल्याला मिळतं. कमी मिळालं तर किडलेले दात आणि जास्त झाले तर दातांचा आणि हाडांचा फ़्ल्युरोसिस. निदान सरळसोट होतं. त्या पेशंटला बघितलं. तिशीतला तो पेशंट, पन्नाशीतला वाटत होता. त्याच्यापाशी विचारपूस केली तेंव्हा कळलं की सगळ्या गावात हे हाल होते. कुणाचे दात धड नव्हते. तरूणपणी पाठीला बाक आलेले. तरुणपण हंरवलेलं, अकाली म्हातारं झालेलं ते गाव....

रोगावर उपचारापेक्षा प्रतिबंध चांगलं असं शास्त्र सांगत होतं.पिण्याच्या पाण्यात फ्ल्यूओराइइड जास्त झालं की ते दातात जमा होतं आणि हाडावर परिणाम करतं. दात आणि हाडांवर परिणाम झाला की माणसं अकाली वृद्ध झाल्यासारखी दिसायला लागतात.

पण हा रोग इकडे नाही अशीच आमची माहिती होती आणि तसं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगत होतो आणि आता हे नवंच प्रकरण उदभवलं होतं. गावातल्या लोकांनी सरकारदरबारी खेट्या घातल्या पण पदरी निराशा पडली होती आणि आता आपण काही तरी करावं अशी माझ्या त्या विद्यार्थ्याची त्याच्या गुरूकडे (म्हणजे माझ्याकडे) मागणी होती. मला ही ते पटलं.

मी आमच्या डीनला भेटलो आणि आमच्या कॉलेजातल्या ऑर्थोपीडीशीअन, डेंटल सर्जन आणि पिडीएट्रीशीअनला घेवून ते गांव गाठलं आणि घरोघरी जावून पहाणी/ तपासणी केली पिण्याच्या पाण्यासाठी गावात चार हपशे होते. त्यांचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासायला दिले. त्यात फ्लुओराइडचं प्रमाण "प्रमाणाबाहेर" होतं. गावातल्या शाळेत जावून पाहिलं. मुलांच्या दातांची दुर्दशा पहायला मिळाली. दाताच्या "त्या" अवस्थेमुळे त्यांचं निरागस हंसू सुद्धा भेसूर वाटत होतं. बरीचशी मुलं तर हंसणं विसरल्यागत वागत होती.

वैद्यकिय तपासणी आणि पाण्याची तपासणी हा सगळा अहवाल घेवून जिल्हा परिषदेचे मुख्याधिका-यांना भेटलो. अहवाल बघून त्यांना ही परिस्थिचं गांभीर्य लक्षात आलं. पण त्यांनी कोणताही प्रशासक विचारेल तो प्रश्न विचारलं: "काय करता येईल?" मी तयारच होतो, कारण आम्ही यावर आधीच चर्चा केली होती. मी तांतडीची आणि दीर्घकालीन अशी द्वीस्तरीय योजना मांडली. तांतडीच्या योजनेत त्या गावाला टॅंकरनं पिण्याचं पाणी पुरवणं आणि दीर्घकालीन म्हणून जवळच्याच एका गावात होवू घतलेल्या नळयोजनेतून पाणी पुरवठा असा उपाय सुचवला. तांत्रिक सल्लागारानं नुसतीच समस्या मांडली नाही तर प्रशासकिय चौकटीत राहून पूर्तता करता येईल अशी उपाय योजना पण सुचवली म्हणून तो हाडाचा प्रशासक अतिशय खुश झाला आणि "आता इथून पुढची जवाबदारी माझी" म्हणून त्यांनी माझे आभार मानले.

मी ही घटना नंतर विसरून गेलो होतो. माझी औरंगाबादला बदली झाली आणि एक दिवस माझ्या त्या विद्यार्थ्याचा फोन आला. तो म्हणाला: "सर, आनंदाची बातमी आहे. त्या गावाच्या नळ योजनेचं उदघाटन आहे आणि तुम्ही यावं अशी गावक-यांची इच्छा आहे. " मला त्या गावचे गावकरी औरंगाबादला येवून भेटून गेले. मी नाही जावू शकलो त्या समारंभाला.

माझा विषय सार्वजनिक आरोग्य हा. इतर डॉक्टर वैयक्तिक आजाराचं निदान करून उपा्ययोजना करतात. माझ्या विषयात आरोग्याच्या सार्वजनिक समस्यांचे निदान आणि त्यावर उपाय योजना हा महत्वाचा भाग असतो. निदान होवून योग्य उपचार झाला की डॉक्टरला समाधान मिळते. सार्वजनिक आरोग्य समस्येचं निदान होवून त्यावर उपाय सांपडून, त्याची अंमलबजावणी होवून त्या समस्येचं निराकरण झालेलं पहाणं ही आमच्या विषयात दुर्मिळ बाब. पण या बाबतीत समस्येचं नुसतं निदानच झालं नाही तर उपाययोजनेची अंमलबजावणी झाली होती. ज्यांना या समस्येची बाधा झाली होती, त्यांच्या बाबतीत फार काही करता येण्यासारखं नव्हतं. पण आता त्या गावाला अकाली म्हातारपणाचा त्रास होणार नाही. त्या गावातली मुलं मनसोक्त हंसू शकतील आणि ते हंसतील तेंव्हा त्यांचे दात तुमच्या आमच्या सारखेच असतील. त्यांना कमी पणा वाटावा असं त्यात काहीच असणार नाही.

[टीप:नंतर शासनानं त्या भागात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण केलं. आता नांदेडच्या त्या भागात "फ्ल्युरोसिस बेल्ट" आहे याची सरकार दरबारी नोंद झाली आहे. आम्ही ही आता तसं आमच्या विद्यार्थ्यांना सांगू लागलो आहोत.]

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ अशोक , लवुन मुजरा .... वाकुन नमस्कार ...... समाज सेवा म्हणतात ति हिच कि ......खुप ,खुप शुभेच्छा

download.jpg

खरोखर ग्रेट जॉब...
डॉक्टर + स्वतःमधल्या माणसाच्या दृष्टीकोनातून समस्येकडे पाहिलंत....ग्रेट!!!

Pages