एक "ताप"दायी अनुभव

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दोन दिवस अंगातली कसकस जात नव्हती. मधून मधून ताप होता. अंगदुखी, घसादुखी,खोकला, सर्दी हे चालूच होतं. हं असेल थोडा फ्लू म्हणून Tylenol घेऊन थोडं दुर्लक्ष केलं. पण अगदीच बरं वाटेनासं झालं तेंव्हा डॉक्टरची भेट मिळतेय का म्हणून फोन लावला. नेहमीप्रमाणेच डॉ. च्या ऐवजी एक नर्स बाई फोनवर आल्या. मला काय काय होतंय, कधीपासून होतंय, इतर लक्षणं काय याची चौकशी केली. मी विचारायच्या अगोदरच त्या म्हणाल्या पुढच्या १५-२० मिनिटात येणार का? मी उडालोच. पण म्हटलं मिळतेय अपाँईंटमेंट तर का सोडा चान्स? म्हटलं येतो. तर पुढे म्हणाल्या, तू नेहमी येतो तेंव्हा गाडी कुठे ठेवतोस आणि तिथून आत इमारतीत कसा येतो? मी सांगितलं. मग त्यानी यावेळेस येण्यासाठी काही वेगळंच सांगितलं. त्या इमारतीला मागे एक वेगळं दार आहे. तिथून यायचं. तिथे एक स्पेशल फोन आहे. तो उचलायचा आणि फक्त नाव सांगून मी आलोय इतकंच सांगायचं. मला नक्कीच विचित्र वाटलं पण म्हटलं इथले डॉ. उगाच कसला कसला बाऊ करतात.

नर्स बाईनी सांगितल्याप्रमाणे त्या स्पेशल दारावरच्या फोनवर मी आलोय म्हणून सांगितलं. त्या वाट पहातच होत्या. त्या बाहेर आल्या त्या तोंडाला मास्क लाऊन. माझ्यासाठीही त्यानी एक मास्क आणला होता तो मला घालायला लावला. एका वेगळ्या जिन्याने त्या मला डॉ.च्या ऑफीसातल्या एका स्पेशल खोलीत घेऊन गेल्या. बर्‍याच वर्षांपासून माझे हेच डॉ. असल्यामुळे ते ऑफीस माझ्या माहितीचं होतं. पण तिथे जायला असा गुप्त रस्ता आहे, अशी खोली आहे हे कधी लक्षात आलं नव्हतं.

खोलीत आल्यावर माझ्यावर वेगवेगळ्या चाचण्या सुरु झाल्या. रक्त, थुंकी, लघवी या नेहमीच्या चाचण्या तर झाल्याच पण नाकात नळी घालून तिथलाही मसाला काढण्यात आला. डॉ. च्या दवाखान्यात इतकं पटकन सगळं होताना मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.

नंतर सांगण्यात आलं की आपल्याला क्ष-किरण यंत्रातून फोटो काढायचे. पण तो विभाग अजून रेडी नाही. म्ह्टलं त्यात नवीन काय. तिथे जाऊन आपला नंबर यायची वाट पहायची. हे तर नेहमीचच आहे. पण अहो आश्चर्यंम् ! ५ मिनिटात तेही रेडी झाले. पुन्हा नर्सबाई गुप्त मार्गाने मला तिथे घेऊन गेल्या. तेंव्हा रेडीचा अर्थ मला कळाला. मी येणार म्हणून तिथे आधी आलेल्या सगळ्यांना कुठेतरी दुसरीकडे बसवलं होतं. आल्या आल्या तातडीचे माझे फोटो काढले. पुन्हा माझी रवानगी गुप्त मार्गाने स्पेशल खोलीत.

आता एकदाचे माझे नेहमीचे डॉ. आले. तेही स्पेशल सूट आणि मास्क घालून आले होते. मला तपासलं.
एकदाचे ते बोलायला लागले.
"अजय तुझ्या आजाराच्या लक्षणांवरून आम्हाला असं वाटलं की तुला एक भयंकर संसर्गजन्य रोग झालाय. आम्हाला सगळी काळजी घेणं भाग होतं. चाचण्या करणं आवश्यक होतं. त्या चाचण्यांचे निकाल आताच मला मिळालेत"

"आणि मला काही झालं नाही, साधा फ्लू झालाय असंच ना !" मी पटकन म्हणालो.

"सॉरी. पण ते रिझल्ट पॉझीटीव्ह आलेत. तुला फ्लू झालाय पण तो नेहमीपेक्षा वेगळा आणि खूप संसर्गजन्य असू शकेल असा आहे. At this point you are considered a public health risk. I can't let you go home. We have to do more advanced tests. And we will decide whether to move you to isolation".

त्या नंतर मला जवळ जवळ दोन तास तिथेच थांबवून घेण्यात आलं. माझ्यावर केलेल्या चाचण्या आणि सँपल्स कायद्यानुसार कुठल्यातरी मोठ्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. (बहुतेक CDC : Center for Disease Control च्या जवळच्या प्रयोगशाळेत). डॉ. पुन्हा भेटायला आले. त्यांचा पहिला प्रश्न..

"घरी कुणी गरोदर आहे का?"

"कालपर्यंत तरी बायको काही म्हणाली नाही बुवा. पण मधे एक रात्र येऊन गेली की" मी जोक करायचा प्रयत्न केला.

"प्लीज. बी सिरीयस"

"नाही".

"ओके. You are still considered a public heath risk. पण तुझ्या फ्लूचा स्ट्रेन अगोदर वाटला त्यापेक्षा थोडा वेगळा, थोडा माईल्ड आहे. तुझ्या घरी कुणी गरोदर नाही म्हणून आम्ही तुला घरी जाऊ देऊ. पण काही अटींवर. एक म्हणजे पुढचे सात दिवस किंवा ताप उतरला नाही तर तो उतरेपर्यंत, अजिबात घराबाहेर पडायचं नाही. कुठल्याही गरोदर बाईच्या १० फुटांच्या जवळ जायचं नाही. आणि शक्यतो कुणाला भेटायचं नाही. "

घरातल्या माणसांना संसर्ग होऊ नये म्हणून काही सूचनाही डॉ. दिल्या. मला औषधं सुरु केली. पण ती घ्यायला फार्मसीत जायला मला परवानगी नव्हती म्हणून नर्सबाई स्वतः जाऊन घेऊन आल्या. अणि पुन्हा गुप्त दाराने मला त्यांनी बाहेर कार जवळ आणून सोडले.

या सगळ्या घटनेतून जाताना जरी सगळ्यांनी मास्क, सूट वगैरे घातले असले तरी कुठेही माणूसघाणेपणा जाणवला नाही. उलट सगळ्याना माझी काळजी असल्याचं जाणवलं. सगळ्या गोष्टी त्याना जमेल तितक्या पटपट होत होत्या.

खोटं कशाला बोलू, मला त्या थोड्या वेळेत मिळालेलं त्यांचं लक्ष, आपण त्यांची फर्स्ट प्रॉयॉरीटी आहोत ही भावना, हे सगळं मला आवडलं होतं

(संपूर्ण सत्य घटना. सध्या घरी बसून ताप उतरायची वाट पाहतोय. तोंडाला चव नाही म्हणून वेगवेगळ्या गावातल्या खादाडीच्या पानावर वाचून, क्वचित लिहून, भूक लागतेय का ते पाहतोय Happy )

विषय: 
प्रकार: 

अरे बापरे!
अन तुम्हाला याची कुठून लागण झाली असेल याची चौकशी केली नाही का ?
ऑफिसवाल्यांनी दीड पान लांब मेसेज नाही का पाठवला - आजारी असतानाची काळजी , कामावर परत जाण्याअगोदरचे सोपस्कार वगैरे ? आमच्या इथे प्रत्येक आजारी व्यक्तिला असा मेसेज पाठवत आहेत एच आर वाले ( अगदी सायकलवरुन पडुन पाय मुरगळलेल्यांना सुद्धा हात धुवा वगैरे )

अरे देवा! मी मास्क न लावताच सगळे वाचले! आता?
Happy Light 1

काळजी घ्या...लवकर बरे व्हा.

अजय, म्हणजे स्वाईन फ्लू बरोबरच इतर भरपूर स्ट्रेन्स आहेत असं दिसतंय! तुमचा तर तिथे उन्हाळा सुरु होत असेल्/झाला असेल ना?
असो, काळजी घ्या. अन बरे व्हा!

ओह्ह.. काळजी घ्या!
अनुभव आजाराचा असला तरी छान लिहीला आहे मात्र!

www.bhagyashree.co.cc

अजय, तुम्हाला लवकर बरं वाटो!
घरी बायको आणि मुलगी ठीक आहेत नं? त्यांना प्रिव्हेंटिव काय दिलंय?
तुमचे सी डी सी चे रिपोर्ट्स किती दिवसात आले?

तू रंगांशी बरेच चाळे करतोस ना म्हणुन काहीतरी वेगळेच 'स्ट्रेन' दिसत असतील Light 1 लवकर बरा हो!

लवकर बरं वाटून खादाडीतले सगळे पदार्थ खावेसे वाटू देत, अगदी साऊथची पाणीपुरीसुध्दा. Happy

ओहो! ajay आणि ajai मध्ये घोळ झाला माझा! लवकर बरे व्हा अजय!

अबे टण्या, तो "अजय" अरेतुरे करण्या येवढा लहान नाही बे!
(बहुधा माझ्यायेवढा किन्वा माझ्यापेक्षा थोडा मोठाच असेल Happy )
असो,
अजय, थोडक्यात तुम्ही हा "ताप"दायी अनुभव थोडाफार एन्जॉय देखिल केलात तर!
पहिला पॅरा वाचून, स्पेशल फोन, मागिल दार, मी आलोय, हे वाचून मला भलतीच शन्का येऊ लागली होती की तुमचा फोन खरोखरीच्या नर्सनेच उचलला ना!
त्यान्ना कोणत्या फ्ल्युची शन्का आलेली? स्वाईन तर नव्हे?
बर, येवढ्या सगळ्या टेस्टच बील किती झाल? बील तुमच्याच बोकाण्डी ना?

जाऊदे, आता गोळ्या औषधे घ्या, लौकर बरे व्हा! Happy

लवकर बरं वाटू दे तुम्हांला अजय.

अरेच्चा. अजय लवकर बरा हो. Happy

मस्त लिहीलेय! Happy

गेट वेल सून मामू ! ..........काळजी घ्या! Happy Happy

वल्डकप मॅचेस बघायची इतकी चांगली संधी परत येणार नाही. पॅकेज घ्या अन वल्डकप बघा. Happy

अन हो जागच्या जागीच जरा, बटाटेवडे, चहा, पोहे, दहिवडे हे सर्व मागवा म्हणजे कस तोडांलापण चव येइल. Happy लवकर बरे व्हा.

गेट वेल सून मामू >> अरे प्रकाश ते पुरंदर्‍यांचे भक्त असनारे हेच मामा का? Proud

अ‍ॅडमिन, तुम्हांला लवकर बरं वाटो.
वर ज्यांनी ज्यांनी वडापाव, दही वडे असलं चमचमीत खायचा सल्ला दिलाय तो अमलात आणा आणि सक्तीची सुट्टीही एंजॉय करा.
बायकोला, मुलीला घराबाहेर पडलेलं चालतंय की त्याही घरी?

केदार,नाही रे बाबा ! Proud

अ‍ॅडमीन ना लवकर बरं वाटावं म्हणुनची सदिच्छा होती ती ! Happy

सगळ्याना मनापासून धन्यवाद. तब्येत सुधारते आहे. अजून खोकला मात्र जास्त आहे. औषध चालू आहे.
@शोनू,
अजून मला लागण कशी झाली पत्ता नाही. माझ्या मुलीच्या शाळेत लागण झाली होती. तिही २ दिवस आजारी होति पण ४८ तासाच्या आत बरी झाली म्हणून आम्ही डॉ. पण घेऊन गेलो नव्हतो. कदाचीत ऑफीसातून असेल.
@भाग्य
हो हा स्वाईन फ्लू नसून वेगळा पण तसाच जोरात पसरणारा स्ट्रेन आहे.

@मृण्मयी,
हो घरी सगळे ठीक आहेत. माझे मोठ्या लॅबमधले रीपोर्ट २ तासात आले. तोपर्यंत मला ठेवले होते. यावर Vaccine नसल्याने preventive काही नाही. लांब रहाणे.

@लिंबूटिंबू
बील किती आले माहिती नाही. माझी विमा कंपनी ते भरेल अशी मी आशा करतोय. सध्या काहीच घेतले नाही (म्हणजे उद्या घरी येऊन वसूल करणार नाहीतच असे नाही.). मलाही सहज उत्सुकता आहे. Public Safety चा प्रकार असल्याने सरकार (म्हणजे इथले सगळे Tax भरणारे मायबोलीकर) भरतात की काय कोण जाणे. १.२ ट्रीलीयन डॉलर्स वाटतायत त्यातले काही हजार माझ्या नावावर. म्हणजे मीच पूर्वी भरलेले थोडे वसूल होतील.

अजय लवकर बरे व्हा. ताप उतरला का? मस्त मऊ भात तूप घालुन किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर खाऊन बघा. Happy
_______________________________
"शापादपि शरादपि"

साधारण पंधरा दिवसापूर्वी मला ताप आला तेव्हा.. मला स्वाईन फ्लु झालाय बहुतेक असे ओरडून मी घरात गोंधळ घातला होता. Happy मात्र तो साधा व्हायरल होता, आता असा काही स्ट्रेन असल्यास इतकी धडाधड ट्रीटमेंट मिळत जाते हे समजले.

भरपूर चांगले चांगले पिक्चर बघितल्यास डोक्याला ताप होतो आणि त्यामुळे अंगातला ताप पळून जातो असा स्वानुभव आहे, (फारेंड् अँकी श्रद्धा असे "चांगले चांगले" पिक्चर सुचवू शकतात) Proud

--------------
नंदिनी
--------------

:फिदी:लोकांना कशाकशाच कौतुक आणि मज्जा वाटेल काही खरं नाही... बरा हो बर लवकर.. Happy

ही पिडा लवकर टळो आणि तुम्हाला चांगले बरे वाटो!

बापरे अजय. कुठल्या फसिलीटीत गेला होतास तू? परवा मी नीरजला डेंटीस्टकडे घेऊन गेले होते तर ती बया तोंडाला मास्क लावून बसली होती आणि येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाला, तुम्हाला आज सकाळपासून सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत का विचारत होती. क्षणभर कळलेच नाही डेंटीस्टला काय करायचे आहे ह्या सगळ्याशी ते. Happy

आभाच्या शाळेत ती 'सात दिवस घरी' पॉलिसी नाही का? वेस्टफर्डच्या शाळांमध्ये सध्या शिंक आली तरी सात दिवस घरी राहायचे असला नियम केलाय.

बरं, खोकल्यासाठी काढा हवा असेल तर कळव. Happy

Pages