एक "ताप"दायी अनुभव

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दोन दिवस अंगातली कसकस जात नव्हती. मधून मधून ताप होता. अंगदुखी, घसादुखी,खोकला, सर्दी हे चालूच होतं. हं असेल थोडा फ्लू म्हणून Tylenol घेऊन थोडं दुर्लक्ष केलं. पण अगदीच बरं वाटेनासं झालं तेंव्हा डॉक्टरची भेट मिळतेय का म्हणून फोन लावला. नेहमीप्रमाणेच डॉ. च्या ऐवजी एक नर्स बाई फोनवर आल्या. मला काय काय होतंय, कधीपासून होतंय, इतर लक्षणं काय याची चौकशी केली. मी विचारायच्या अगोदरच त्या म्हणाल्या पुढच्या १५-२० मिनिटात येणार का? मी उडालोच. पण म्हटलं मिळतेय अपाँईंटमेंट तर का सोडा चान्स? म्हटलं येतो. तर पुढे म्हणाल्या, तू नेहमी येतो तेंव्हा गाडी कुठे ठेवतोस आणि तिथून आत इमारतीत कसा येतो? मी सांगितलं. मग त्यानी यावेळेस येण्यासाठी काही वेगळंच सांगितलं. त्या इमारतीला मागे एक वेगळं दार आहे. तिथून यायचं. तिथे एक स्पेशल फोन आहे. तो उचलायचा आणि फक्त नाव सांगून मी आलोय इतकंच सांगायचं. मला नक्कीच विचित्र वाटलं पण म्हटलं इथले डॉ. उगाच कसला कसला बाऊ करतात.

नर्स बाईनी सांगितल्याप्रमाणे त्या स्पेशल दारावरच्या फोनवर मी आलोय म्हणून सांगितलं. त्या वाट पहातच होत्या. त्या बाहेर आल्या त्या तोंडाला मास्क लाऊन. माझ्यासाठीही त्यानी एक मास्क आणला होता तो मला घालायला लावला. एका वेगळ्या जिन्याने त्या मला डॉ.च्या ऑफीसातल्या एका स्पेशल खोलीत घेऊन गेल्या. बर्‍याच वर्षांपासून माझे हेच डॉ. असल्यामुळे ते ऑफीस माझ्या माहितीचं होतं. पण तिथे जायला असा गुप्त रस्ता आहे, अशी खोली आहे हे कधी लक्षात आलं नव्हतं.

खोलीत आल्यावर माझ्यावर वेगवेगळ्या चाचण्या सुरु झाल्या. रक्त, थुंकी, लघवी या नेहमीच्या चाचण्या तर झाल्याच पण नाकात नळी घालून तिथलाही मसाला काढण्यात आला. डॉ. च्या दवाखान्यात इतकं पटकन सगळं होताना मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.

नंतर सांगण्यात आलं की आपल्याला क्ष-किरण यंत्रातून फोटो काढायचे. पण तो विभाग अजून रेडी नाही. म्ह्टलं त्यात नवीन काय. तिथे जाऊन आपला नंबर यायची वाट पहायची. हे तर नेहमीचच आहे. पण अहो आश्चर्यंम् ! ५ मिनिटात तेही रेडी झाले. पुन्हा नर्सबाई गुप्त मार्गाने मला तिथे घेऊन गेल्या. तेंव्हा रेडीचा अर्थ मला कळाला. मी येणार म्हणून तिथे आधी आलेल्या सगळ्यांना कुठेतरी दुसरीकडे बसवलं होतं. आल्या आल्या तातडीचे माझे फोटो काढले. पुन्हा माझी रवानगी गुप्त मार्गाने स्पेशल खोलीत.

आता एकदाचे माझे नेहमीचे डॉ. आले. तेही स्पेशल सूट आणि मास्क घालून आले होते. मला तपासलं.
एकदाचे ते बोलायला लागले.
"अजय तुझ्या आजाराच्या लक्षणांवरून आम्हाला असं वाटलं की तुला एक भयंकर संसर्गजन्य रोग झालाय. आम्हाला सगळी काळजी घेणं भाग होतं. चाचण्या करणं आवश्यक होतं. त्या चाचण्यांचे निकाल आताच मला मिळालेत"

"आणि मला काही झालं नाही, साधा फ्लू झालाय असंच ना !" मी पटकन म्हणालो.

"सॉरी. पण ते रिझल्ट पॉझीटीव्ह आलेत. तुला फ्लू झालाय पण तो नेहमीपेक्षा वेगळा आणि खूप संसर्गजन्य असू शकेल असा आहे. At this point you are considered a public health risk. I can't let you go home. We have to do more advanced tests. And we will decide whether to move you to isolation".

त्या नंतर मला जवळ जवळ दोन तास तिथेच थांबवून घेण्यात आलं. माझ्यावर केलेल्या चाचण्या आणि सँपल्स कायद्यानुसार कुठल्यातरी मोठ्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. (बहुतेक CDC : Center for Disease Control च्या जवळच्या प्रयोगशाळेत). डॉ. पुन्हा भेटायला आले. त्यांचा पहिला प्रश्न..

"घरी कुणी गरोदर आहे का?"

"कालपर्यंत तरी बायको काही म्हणाली नाही बुवा. पण मधे एक रात्र येऊन गेली की" मी जोक करायचा प्रयत्न केला.

"प्लीज. बी सिरीयस"

"नाही".

"ओके. You are still considered a public heath risk. पण तुझ्या फ्लूचा स्ट्रेन अगोदर वाटला त्यापेक्षा थोडा वेगळा, थोडा माईल्ड आहे. तुझ्या घरी कुणी गरोदर नाही म्हणून आम्ही तुला घरी जाऊ देऊ. पण काही अटींवर. एक म्हणजे पुढचे सात दिवस किंवा ताप उतरला नाही तर तो उतरेपर्यंत, अजिबात घराबाहेर पडायचं नाही. कुठल्याही गरोदर बाईच्या १० फुटांच्या जवळ जायचं नाही. आणि शक्यतो कुणाला भेटायचं नाही. "

घरातल्या माणसांना संसर्ग होऊ नये म्हणून काही सूचनाही डॉ. दिल्या. मला औषधं सुरु केली. पण ती घ्यायला फार्मसीत जायला मला परवानगी नव्हती म्हणून नर्सबाई स्वतः जाऊन घेऊन आल्या. अणि पुन्हा गुप्त दाराने मला त्यांनी बाहेर कार जवळ आणून सोडले.

या सगळ्या घटनेतून जाताना जरी सगळ्यांनी मास्क, सूट वगैरे घातले असले तरी कुठेही माणूसघाणेपणा जाणवला नाही. उलट सगळ्याना माझी काळजी असल्याचं जाणवलं. सगळ्या गोष्टी त्याना जमेल तितक्या पटपट होत होत्या.

खोटं कशाला बोलू, मला त्या थोड्या वेळेत मिळालेलं त्यांचं लक्ष, आपण त्यांची फर्स्ट प्रॉयॉरीटी आहोत ही भावना, हे सगळं मला आवडलं होतं

(संपूर्ण सत्य घटना. सध्या घरी बसून ताप उतरायची वाट पाहतोय. तोंडाला चव नाही म्हणून वेगवेगळ्या गावातल्या खादाडीच्या पानावर वाचून, क्वचित लिहून, भूक लागतेय का ते पाहतोय Happy )

विषय: 
प्रकार: 

अरे बापरेल, अजय लवकर बरं वाटू दे तुम्हांला.

बापरे .. सगळं वाचुन अन नंतर तुमचं ते स्वाईन फ्लु नाहि हे ऐकुन थोडं बरं वाटल.. काळजी घ्या.. लवकर बरे व्हा..

अर्रे, काय हा अनुभव! तुम्ही अगदी कॅज्युअली लिहिताय हे अजय. बरे झाला आहात का आता? टेक केअर.

बापरे.. काय पण एक एक अनुभव येतात..
अजय, ह्यातून लवकर बरे व्हा. Happy काळजी घ्या.

बरे व्हा लवकर !! फ्लु आहे तोवर वर्ल्डकप बघा छानपैकी Happy

~~
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे.
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

अजय, लवकर बरे व्हा.. Happy
काळजी घ्या

अजय,

लवकर बरे व्हा! काळजी घ्या..

लवकर बरे होण्यासाठी माझ्याही शुभेच्छा.
काळजी घ्या, अजय. Happy

काळजी घ्या, अन खोकल्यासाठी घरगुती औषधे घ्या. जस लवंग भाजून मधातून, सितोपलादि, लेंडीपिंपळी इ.इ.इ. अनेक आहेत, जे सुट होईल ते. माहित असतील म्हणा तुम्हाला.. Happy कारण खोकला मामुली दुखणं वाटलं तरी ज्याला १५ दिवस ते महिना टिकून रहातो त्यालाच कळतं किती त्रास होतो ते.. Sad

'ताप' दायी ताप उतरला की नाहि आता? कशी आहे तब्येत?

अजय, आता कशी आहे तब्बेत?

आता कशी आहे तब्येत, अजय ?

तापदायी .........तुमच्या साऱक्या वर्कओहोलिक माणसाला हे ७ दिवस पर्व्नणि चे वाट्ले अस्तिल नाहि?
आजारि असुन सुधा तुम्चि मायबोलि साठि जाग्रण चालुच असेल............रात्रि वेलेवर झोपत जा सर....
आणी हो कमी खाणे थोड टाळा..........

काळजी घे रे!!!!........

सगळ्याना धन्यवाद. आता तब्येत जवळ जवळ पूर्ण सुधारली आहे. खोकला अजून आहे पण औषध चालू आहे.

तापदाई अनुभवाचा ताप तुम्ही स्वत्;च सहजतेने हलका केला आहे .
अशाच सहजतेने पूर्ण बरे व्हा ही शुभेच्छा .

बरे झाले आहातच..."खोकला जावा लवकर" ही सदिच्छा!!
अनुभव कथन छान जमले आहे...:)

बापरे!! अजय, एवढया रामायणानंतर हे लिहिलेले वर्णन वाचून खुपच आश्चर्य वाटले. लवकर बरे व्हा.

Pages