बस थांबा

Submitted by मोहना on 24 June, 2013 - 20:49

"आई, पट्टा काढू?"
"काढ."
"पण पोलिस आला तर?"
"मग नको काढू."
"पण मला काढायचा आहे."
"कर बाई तुला काय करायचं असेल ते." नेहमीप्रमाणे संभाषणाचा अंत.
मी गाडी बसथांब्याजवळच्या सायकल लेनमध्ये थांबवली होती. बसथांब्यावरुन लेकाला आणायचं होतं. जवळपास गाडी थांबवायला जागा नव्हती त्यामुळे हा पर्याय. पण खात्री नव्हती असं थांबवणं कायदेशीर आहे की नाही, तितक्यात.
"आई, पण पोलिसानी पकडलं तर?" लेक पट्ट्याबद्दल विचार करत होती, मी चुकीच्या जागी गाडी थांबवली आहे त्याचा.
"बघू. खोटं बोलावं लागेल."
"पण तसं करायचं नसतं, खरं सांगितलं तर देतील तुला सोडून. तू मला तसंच सांगतेस ना की खरं सांग, मी ओरडणार नाही."
वास्तवात आयुष्य इतकं सरळ नाही वगैरे सांगत बसले असते तर दोन तासांची निश्चिंती. पुन्हा लेकीसमोर नाईलाजाने का होईना पण कधी कधी खोटं का बोलावं लागतं याचे धडे देणं म्हणजे जरा अतिच. तरीही घोडं दामटवत म्हटलं,
"ते नंतर बोलू. फक्त वेळ आलीच तर त्याच्यांसमोर तू खोटं का सांगते आहेस असं म्हणू नकोस."

नाराजीने तिने हुंकार भरला. या सगळ्या यातायातीपेक्षा कुठेतरी लांबवर नेऊन थांबवावी असा विचार करते आहे तोच बाजूला गाडी उभी राहिली. कोण थांबलं अगदी असं चिकटून म्हणून पहाते तोच गाडीवर रंगीबेरंगी दिवे चमकायला लागले आणि माझ्या डोळ्यांसमोर काजवे. आता दोनसे अडिचशे डॉलर्सचा भुर्दंड, घरी नवरा त्याला पोलिसांनी गाठल्यावर मी केलेल्या सरबत्तीचा सूड घेणार, मुलगी, तरी आईला मी म्हणतच होते.... सुरु करणार आणि मी, त्यावेळेस काय केलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणत सगळ्यांची डोकी काही दिवस खाणार. सगळ्या विचारांनी एकाच वेळी डोक्यात गर्दी केली. खरं तर त्या रंगीबेरंगी दिव्यांकडे मस्त पाहत बसावसं वाटतं एरवी, म्हणजे ते दुसर्‍यांचा पाठलाग करत असतात तेव्हा, पण आत्ता नुसते अंगावर धावून येत होते. सगळे विचार मनात खोलवर दडपून खिडकीतून बाजूच्या खिडकीत पाहिलं. चेहर्‍यावरची घाबरगुंडी गॉगलमुळे लपली असावी.
"गाडी बंद पडली आहे का?"
"नाही नाही." काय कारण द्यावं या विचारात मी फक्त एकाचवेळी तोंडाने आणि मानेने नाही नाही करत राहिले.
"मग काय झालं आहे?" पोलिस नावाच्या बागुलबुवांनी शांतपणे विचारलं.
आधी ते दिवे बंद करा ना असं म्हणावसं वाटत होतं. पोटात भितीने कसा गोळा आला आहे ते सांगावसं वाटत होतं त्याऐवजी शब्द बाहेर पडले,
"पायात एकदम गोळा आला म्हणून थांबले आहे दोन मिनिटं." असं कसं सुचलं अचानक? मला खोटं बोलायला जमलं या आनंदात माझा चेहरा घरातल्यांचा पचका झाल्यावर खुलतो त्यापेक्षा कितीतरीपटीने खुलला. खोटं पचलं तर तो आणखी खुलणार हे निश्चित, मग कदाचित त्या चमचमत्या दिव्यांपेक्षा माझाच चेहरा चम चम चमकणार... एकदम काळजी वाटली. म्हटलं, मग पायात गोळा आला आहे असं वाटणारच नाही पोलिसमहाशयांना. केविलवाणा चेहरा करत पाय बाहेरुन दिसत नसला तरी हलवून, आई गं, ओ, अं, ऊ...असे वेगवेगळे आवाज काढत कण्हत राहिले. पोलिसांनाही तशी घाई नसावी. शांतपणे पूर्ण शब्द कधी बाहेर येतात याची वाट पहात ते बसून.
"मी दोन मिनिटं थांबते इथेच." आता कण्हणं पुरे असं वाटल्यावर चेहर्‍यावर पृथ्वीवरचं सगळं दु:ख एकवटलं.
"बरं बरं. कितीही वेळ थांबा. पायात गोळा ठेवून गाडी चालवू नका." चमचमणारे दिवे मालवून पोलिस महाशय मार्गाला लागले.

"आई, माझा श्वास थांबला."
"काय?...." थरथरणारे हात, पाय स्थिर करत घाबरुन मागे बघितलं.
"पोलिस बघून. आणि ते काका तुला घेऊन गेले तर म्हणून."
लेकिचा श्वासच थांबल्याने मी खोटं बोलले ते तिच्या लक्षात आलं नव्हतं. नाहीतर इथे भूमिका उलट्या होऊन अर्धा तास खोटं का बोलू नये ह्याचे धडे आईला लेकिकडून. ते टळलं या विलक्षण आनंदाने मी गाडी भरधाव सोडली. एखाद्या अतिमहत्वाच्या व्यक्तीला जायला जागा देतात त्याप्रमाणे रस्त्यावर माझी एकट्याचीच गाडी आहे असं वाटत होतं, कसले आवाज नाहीत, आजूबाजूला कुणी नाही. शांतता एकदम. दोनशे डॉलर्स वाचले, खोटं पचलं, लेकिला खोटं बोलले हे कळलं नाही... आनंद नुसता मनात उसळी मारत होता.

घरी पोचले आणि लक्षात आलं. मी लेकाला आणायला तिथे गेले होते. गाडीत तो नव्हताच. पुन्हा गाडी वळवली. परत जाताना मात्र या वेळेला सुटले पण मागच्यावेळेस एकदा (नव्हे दोनदा) पोलिसांनी कसं पकडलंच ते आठवत राहिलं.

ते किस्से या इथे...

http://www.maayboli.com/node/25635

http://www.maayboli.com/node/25720

http://www.maayboli.com/node/25818

Group content visibility: 
Public - accessible to all site users