भंडारा डोंगर

Submitted by ferfatka on 25 June, 2013 - 03:43


अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांनी गाथा लिहिली तो भंडारा डोंगरावर आवर्जुन गेलो. त्या विषयी...

DSCN3545.jpg

मराठी चित्रपटात तुकाराममहाराजांची पत्नी जिजाबाई एका डोंगरावर भोजन घेऊन जात असल्याचे दाखविले आहे. तोच हा भंडारा डोंगर. भल्या पहाटे उठून तुकाराममहाराज आपली आध्यात्मिक साधना, भजन, लिखाण, चिंतन करण्यासाठी येथे जात असत. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तोच हा भंडारा डोंगर. देहूगावातील संत तुकाराममहाराज व आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे सहा किलोमीटरवर असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत मोटार रस्ता तयार केलेला आहे.

DSCN3532.jpg

या डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी साºया विश्वाला मार्गदर्शक असणाºया गाथेची निर्मिती केली होती. भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे होतात. राज्याच्या कानाकोपºयांतून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यासाठी येतात. येथे येणाºया सर्व भाविकांना तसेच वारकºयांना सप्ताहकाळात रात्रीपर्यंत महाप्रसाद दिला जातो. नित्यनेमाने दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था केली आहे.
या डोंगराच्या नावाबाबत एक गोष्ट सांगितली जाते. एकदा छत्रपती शिवाजीमहाराज तुकाराममहाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. छत्रपतींच्या समवेत शेकडो मावळे वीर होते. एवढ्या माणसांना प्रसाद म्हणून जिजाबाईने आणलेल्या शिदोरीचे दोन दोन घास दिले तरीही ती शिदोरी संपली नाही. तरीही शेकडो मावळे छत्रपतींसह पूर्ण जेऊन तृप्त झाले. या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिले. भंडारा डोंगरावरही भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून दिले आहे. म्हणून या डोंगराला ‘भंडारा’ असे नाव दिले आहे.

DSCN3541.jpg

भंडारा डोंगरावर जाणारा घाट रस्ता मस्तपैकी नागमोडी वळणे घ्यायला लावणारा आहे. घाट चढताना दिसणारा आजुबाजूचा परिसर सुरेख दिसतो. एक मोठे वळण घेऊन आपण माथ्यावर पोहोचतो. तिथे गाडी पार्क करून मुख्य मंदिरात जाण्यास निघालो. येथे तुकाराममहाराजांचे एक मंदीर असुन, काही वारकरी मंडळी त्याची देखभाल करतात. मंदिरात संत तुकाराममहाराज, विठोबा-रखुमाई, गणपती, शिवलिंग अशा मुर्ती आहेत. डोंगरावरील एकांत, आजूबाजूचा सुंदर निसर्ग, वाºयाची झुळूक आपल्याला प्रसन्न करते. पावसाळा सुरू झाल्यामुळे आजूबाजुला हिरवाई दिसून येत होती.
तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. भंडारा डोंगराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडयात झाला असल्याने याही ठिकाणी विकासकामे सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून या क्षेत्राला निधी मिळतो. सध्या भंडारा डोंगरावर जाणारा रस्ता मोठा व प्रशस्त बांधलेला आहे. अंदाजे ४० फुट रुंद असा हा रस्ता आहे. सुमारे २ ते अडीच किलोमीटर रस्ता डोंगरपायथ्यापासून मंदिरापर्यंत तयार केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकºयांना पदपथ निर्माण केला आहे. शासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवडी केल्याचे दिसून आले. भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूला जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे, सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते.
ट्रीप, पिकनिक, मौजमजा, हुल्लाडबाजी करण्यासाठी येणार असाल तर हे ठिकाण नक्कीच नाही. असे करताना आढळल्यास भाविक भक्तांकडून ‘प्रसाद’ नक्की मिळेल.
डोंगर उंचावर असल्याने छान गार हवा वाहते. एकदा तरी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसगार्चा आनंद घ्यावा.

भंडारा डोंगर उतरून तळेगावकडे जाताना इंदोरी हे छोटे गाव लागते. तेथे इंदोरीचा भुईकोट किल्ला पाहिला.

इंदोरीचा भुईकोट किल्ला


दिसणारा परिसर :

भंडारा डोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भामचंद्र डोंगर, इंद्रायणी नदी, इंदोरीगाव, जाधववाडी धरण परिसर, तळेगाव परिसर, घोरावडेश्वर डोंगर व अय्यप्पा स्वामींचा डोंगर व त्यामागे पसरलेले पिंपरी-चिंचवड शहर दिसते.

कसे जावे :

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर तळेगाव हे रे

  • ल्वे स्टेशन आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर ५ किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूस कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वाहनाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.
  • देहूगावातून येथे जाण्यासाठी व्यवस्था आहे. स्वत:चे वाहन असल्यास गाडी वर पर्यंत नेता येते.
  • पायथ्यापासून पायी जायचे झाल्यास अर्धा ते पाऊणतास

लागतो.

अधिक फोटोसाठी :
http://ferfatka.blogspot.com/2013/06/blog-post_23.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, उत्तम परिचय करुन दिलात या तीर्थक्षेत्राचा.

"तेणे सुखे रुचे एकांताचा वास | नाही गुण दोष अंगा येत |
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी .... "

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज की जय..