पुन्हा तोल जातो जरासा जरासा...

Submitted by मुग्धमानसी on 19 June, 2013 - 06:44

पुन्हा तोल जातो जरासा जरासा
मला भास होतो जरासा जरासा

मनाच्या तळी दाबलेला उमाळा
तुझा श्वास होतो जरासा जरासा

तुझे पाहणे नेमके या दिशेने
मी बेजार होतो जरासा जरासा

असा उंबरा काळ ओलांडताना
तुही हासला ना जरासा जरासा?

सभोती दिशा फाकल्या एवढ्या की
रडे पिंजराही जरासा जरासा...

पहा आजमावून दूरी जरा ही
पुन्हा लांब हो तू जरासा जरासा

मनाची दिशाभूल ही रोजची रे
तरी त्रास होतो जरासा जरासा...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझलेतील यमक =काफिया ह्या संकल्पनेचा अजून सखोल अभ्यास करावा

खयाल उत्तमोत्तम आहेतच आपली भाषाही ( वाणी )गझलेला अतीशय सूट होणारी असल्याने जे लिहिता ते मलातरी गझलच वाटते ...हे झाले माझे वैयक्तिक मत पण मी म्हटले म्हणून ही गझल झाली असे होत नाही

तंत्र फार महत्त्वाचे ते सराव करता करता जमेल

मी आज सौम्य भाषा वापरण्याचा प्रयत्न ठेवला आहे तरीही ही टिका आपल्याला सहन न झाल्यास अधिकच उत्तम कारण कवीची कविता अश्यानेच अधिकाधिक उत्तम होत जाणारा गझल हा काव्यप्रकारच असा आहे (कदाचित एकमेव) ....हे मी थोरामोठ्यांकडून ऐकले आहे व स्वतः अनुभवही घेतला आहे

धन्यवाद

काहीही होवो प्रयत्न सोडू नका गझलियत तुमच्या शब्दाशब्दात ठासून भरलेली आहे विठ्ठलाने
तुमच्या कडून थोडे अधिक प्रयत्न पाहिजेत बस!:)

'जरासा जरासा' ह्या शब्दसमूहाचा मोह झालेला दिसतोय.

बेफिकीरांचा गझल परीचय हा लेख, भटांचे एल्गार हे पुस्तक ह्याचा गंभीरपणे अभ्यास करावात.

कुणास ठाऊक अस वाटुन गेलं की गझलेचा अट्टाहास नसता तर ही "कविता" म्हणून अप्रतिम होऊ शकली असती.

पण हीही छान!मस्त तालासुरात म्हणली मी तर

मला गझलेमधले फारस कळत नाही,
ही कविता म्हणून मस्त लयीत वाटली

मी वाचलेल्या चांगल्या गझलांच्या शेरामध्ये पहिल्या आणि दुस-या वाक्यामध्ये साधारण विरोधाभास (असेलच असेही नाही) जाणवतो कदाचित असे शेर मला आवडत असतील,

पुन्हा तोल जातो जरासा जरासा
मला भास होतो जरासा जरासा याऐवजी

फक्त राहिला जो झेंडा रोवायचा जरासा
पुन्हा तोल जातो आज जरासा जरासा ... अस काहितरी

एकंदरीत आशय छान आहे.

पुन्हा तोल जातो जरासा जरासा
मला भास होतो जरासा जरासा
.
तुझे पाहणे नेमके या दिशेने
मी बेजार होतो जरासा जरासा

मस्तय. पुलेशू. Happy

मला ते गझलेतले फारसे (खरंतर काहीच ) कळत नाही .
पण कविता छान आहे. आवडली .
एखाद्या गाण्यासारखी आहे.
सुरेश भटांचे सुरेश वाडकरांनी गायलेले - 'आता राहिलो मी जरासा जरासा' - त्या गाण्यासारखेच याचेही १ छान गाणे होऊ शकेल.

गज़ल शायद अपने बस की बात नही<<<

गझलेचा गझलतंत्रामुळे होणारा बाऊ पाहून कसेतरीच वाटते. तो निव्वळ सरावाचा भाग आहे. गझलीयत कशातही असते.

पहा आजमावून दूरी जरा ही
पुन्हा लांब हो तू जरासा जरासा

मनाची दिशाभूल ही रोजची रे
तरी त्रास होतो जरासा जरासा...<<< चांगल्या द्विपदी आहेत.

मनापासून शुभेच्छा!

पहा आजमावून दूरी जरा ही
पुन्हा लांब हो तू जरासा जरासा >>> ही द्वीपदी विशेष वाटली.

पहिल्या ओळीत, दुरावा हा सहज वृत्तात बसणारा शब्द वापरण्याऐवजी दूरी या हिन्दी शब्दाची खास आवश्यकता
काय होती हे समजले नाही.

धन्यवाद.
उल्हासजी>>> ह्म्म. पटले मला तुमचे म्हणणे. ते गजलेच्या तंत्रात वगैरे बसवण्याच्या भानगडीत असे झाले असावे.