Only a genius...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"ये, ये मोना, बस."
मोना बसली. जामकाकांच्या ऑफीसमध्ये ती बर्‍याच वर्षांनी येत होती. जामकाकांचं ऑफीसही त्यांच्यासारखंच, फार फरक नाही. काका त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसले होते, फक्त आज फरक एवढाच की बाजूला गिरीकाकाही बसले होते. एकंदरीत सेटींग तिला सूचक वाटलं.
"मोना, परवा तुझ्याशी बोलणं झालंच होतं. तर तुझ्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात सांगितल्याप्रमाणे आज आपण इथे जमलो आहोत." जामकाकांचा सूर वकील-अशील असा औपचारिक लागला होता. गिरीकाकांचा चेहरा निर्विकार होता. "मी आणि गिरी दोघं एकत्रितपणे त्यांच्या मृत्यूपत्राचे executors आहोत याची तुला कल्पना आहेच. या मृत्यूपत्राचं वाचन करण्यासाठी आपण तिघं आज इथे जमलो आहोत," असं म्हणून जामकाकांनी एक सीलबंद केलेलं पाकीट फोडलं, त्यातून ३-४ कागद काढले आणि मोठ्याने वाचायला सुरुवात केली.

"प्रिय मोना, माझी सर्व मालमत्ता मी रितसर तुझ्या नावाने केली आहे (ती कागदपत्रे याच पाकीटात आहेत) पण माझी एकच अट आहे. ही अट स्विकारायची की नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. या मालमत्तेचा तुला अजिबात लोभ नाही आणि गरजही नाही हे मी पूर्णपणे जाणतो. त्यामुळे तू एकवेळ सर्व मालमत्ता लाथाडशील, पण कोर्टात जाणार नाहीस याची मला (आणि जाम व गिरीलासुद्धा) खात्री आहे. पण 'तुला जर ही मालमत्ता मिळाली तर तू काय करशील' या माझ्या प्रश्नाला तू दिलेलं उत्तर माझ्या लक्षात आहे....तुझ्या संशोधनाशिवाय आणखी त्याच एकाच बाबतीत तू अत्यंत passionate आहेस. त्या तुझ्या passion साठी तरी तू हा खेळ खेळशील असं मला वाटतं. यात तुझी कुठली परीक्षा घ्यायचा उद्देश नाही. बाबाने केलेली शेवटची गंमत असं बघत यात भाग घेशील अशी मी आशा करतो.
माझ्या मालकीच्या मालमत्तेत ४ घरं आहेत - कोथरूडमधला बंगला, शनिवारातला वाडा, डोंबिवलीतला फ्लॅट आणि कार्ल्याचं फार्महाऊस. यापैकी एका ठिकाणी मी आपल्या बंगल्याची एक किल्ली लपवून ठेवली आहे. तेव्हा बंगला, फ्लॅट, फार्महाऊस आणि वाडा यातली बरोबर प्रॉपर्टी तू ओळखलीस तर ते सर्व तुझे. हे कसं ओळखायचं यासाठी आपण एक खेळ खेळणार आहोत. मी एक गोष्ट लिहीली आहे, ती लक्षपूर्वक ऐक. ही गोष्ट म्हणजेच तुला दिलेला क्लू आहे. ही गोष्ट ऐकून तू फक्त विचार करून बरोबर ठिकाण ओळखायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा विचार तू जाम आणि गिरी यांच्यासमोर मोठ्याने करायचा आहेस. थोडक्यात, तू जो काही विचार करशील तो करता करताच त्यांनाही सांगायचा आहे."
जामकाकांनी मोनाकडे बघितलं. मोनाची नजर कुठेतरी शून्यात होती. "मोना...?" मोना भानावर आली. "ठीक आहे जामकाका, मी तयार आहे." जामकाका पुढे वाचू लागले.
"आता मी गोष्ट सुरू करतो. गोष्टीचं नाव आहे 'ट्रॅफिक जॅम'. जकातनाक्यावरून दिनूने गाडी पुढे आणली आणि अचानक समोर एक रिक्षा आली. गाडीला चांगला वेग होता, तेव्हा ब्रेक वगैरे दाबूनही धडक टळण्यासारखी नव्हती. तेव्हा दिनूने सटकन् गाडी उजवीकडे वळवली. समोरून येणार्‍या गाडीशी दिनू अगदी हातघाईचा हुतूतू खेळला आणि गाडी परत योग्य बाजूला आली. सर्व बाजूंनी हॉर्नचे आवाज उठले. त्याकडे दुर्लक्ष करत वेग फारसा कमी न करता दिनू थोडं पुढे आला असेल नसेल तर त्याला ट्रॅफिक जॅम भिडला. मनातल्या मनात भकाराचा भूप आवळत त्यानं गाडी हळू केली आणि समोरच्या गाडीच्या मागे काही इंचांचे अंतर ठेवून गाडी थांबवली. ट्रॅफिक जॅम जबरदस्तच होता. बर्‍याच पुढेपर्यंत गाड्यांची रांग दिसत होती आणि वाईट म्हणजे सर्व वाहने एका जागी ठप्प होती. जराही पुढे सरकण्याचा काही चान्स दिसत नव्हता. दिनू लगेच विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गाडी घालणार एवढ्यात त्याच्या शेजारी अजून एक गाडी येऊन उभी राहिली. मागे बघतो तर मागेही एक रिक्षा. दिनूचा वैताग वैताग झाला.
पाचेक मिनिटांनी परिस्थितीत काहीच फरक नव्हता. तेव्हा दिनू गाडीतून उतरला आणि शेजारच्या ड्रायव्हरपाशी गेला.
'साहेब, घाला गाडी त्या बाजूला. किती वेळ बसून रहायचं असं?'
'नको.'
'अहो, काय घोळ झालाय काय माहिती ! किती वेळ अडकून पडायचं असं ? मला जरा घाई आहे जाण्याची. घाला, तुमच्यामागून मीही घालतो.'
'घाई आहे ते दिसलंच मघाशी. तेव्हा नियम पाळले नाहीत, आता तरी पाळा.'
'मघाशी ?..... ओह ! त्या नाक्याच्या तिथे ? अहो, तो रिक्षावाला अचानकच समोर आला. त्याला उडवायचं की काय ?'
'तिथे फाटा आहे, त्या बाजूने वाहनं येतच असतात. एक तर तुम्ही फाट्याकडे लक्ष दिलं नाही, शिवाय तुमचा वेग कमी असता तर ब्रेक दाबता आला असता तुम्हाला.'
आता दिनूचा धीर सुटला. 'ओ, तुम्हाला येऊन धडकलो का ? तुमचं काही नुकसान केलंय का? उगीच आपलं भाषण लावलंय ते...'
यावर काही न बोलता त्या गाडीवाल्यानं खिडकीची काच वर केली आणि शांतपणे पुढे बघत बसून राहिला. दिनूचा खूप चडफडाट झाला, पण करतो काय ! त्यानं मोबाईल काढला डॉ. काळ्यांना फोन लावण्यासाठी. तर मोबाईल आउट ऑफ रेंज ! त्याला काय करावं सुचेना. शेवटी निदान कारण काय आहे, किती वेळ लागेल याचा तरी अंदाज घ्यावा म्हणून तो पुढे गेला. पण कोणालाच नक्की कारण माहिती नव्हते.... खूप मोठा अपघात झालाय... गावात कुठेतरी बॉम्बस्फोट झालाय म्हणे (त्याचा अन् इथल्या ट्रॅफिक जॅमचा काय संबंध असा अगदी ओठांवर आलेला प्रश्न दिनूने परतवून लावला)...कुठेतरी मोठ्ठी आग लागली असेल (आणि बम्ब, अँब्युलन्स वगैरे गाड्या रस्त्यात उभ्या असल्याने जॅम झाला असेल असा दिनूने मनातल्या मनात लावलेला संबंध)... अशी विविध कारणे ऐकल्यावर त्याने 'कारण शोधा' मोहीम आटोपती घेतली आणि तो परत त्याच्या गाडीपाशी आला. त्या चर्चेतून त्याने एवढाच निष्कर्ष काढला की ज्या अर्थी तिकडच्या दिशेने गाड्या आलेल्या दिसत नाहीयेत त्या अर्थी रस्ता दोन्ही बाजूंनी बंद दिसतोय.
मग त्याने इकडे तिकडे फिरून मोबाईलला रेंज येते आहे का हे बघण्याचाही प्रयत्न केला. शेवटी त्याच्या गरजेने त्याच्या इगोवर मात केली आणि त्याने शेजारच्या गाडीच्या खिडकीवर टकटक केलं. खिडकीची काच खाली झाली.
'हे बघा साहेब, माफ करा तुमच्यावर चिडलो. पण मला खरंच घाई आहे हो. माझ्या बायकोला मोठा ऍक्सीडेंट झालाय, ती कोमात आहे. मला कळाल्या कळाल्या निघालो. म्हणून मी तशी चालवत होतो गाडी...' दिनूला पुढे बोलवेना.
गाडीवाला मात्र शांत होता. पुढे बघतच त्यानं बोलायला सुरूवात केली, 'घाई मलाही आहे. उद्या लग्न आहे माझं. आज दिवसभर खूपच अर्जंट कामात अडकलो, ते करून काही झालं तरी आज पूजेला पोहोचतो असं सांगितलंय तिला. आता डायरेक्ट कार्यालयावरच निघालो होतो.... तर असा अडकलोय. काय सांगू तिला आता ?'
'हे बघा, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून त्यांना कॉल का नाही करत ?'
त्या गाडीवाल्याने विमनस्कपणे त्याचा मोबाईल दिनूच्या हातात दिला. तोही आउट ऑफ रेंज होता. दिनूने तो परत केला आणि तो मागे उभ्या असलेल्या रिक्षाकडे गेला. रिक्षावाला 'हे रोजचंच आहे' अशा थाटात आरामात मागच्या सीटवर पसरला होता.
'साहेब, मला एक खूप अर्जंट कॉल करायचा आहे. माझ्या मोबाईलला रेंज नाहीये. प्लीज, तुमचा मोबाईल वापरायला देता का? मी तुम्हाला १०० रुपये देतो.'
रिक्षावाला उठून बाहेर आला. त्याच्या चेहर्‍यावर हलकसं स्मित होतं. 'साहेब, तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं. त्या नाक्यावर आपली धडक होता होता वाचली ना पहिल्यांदा तोच रिक्षावाला मी.'
'ओह ! सॉरी हो, माझं चुकलं तेव्हा. पण मी खूप घाईत आहे...'
दिनूला अर्ध्यावरच तोडत रिक्षावाला म्हणाला,'हो, मी ऐकलं तुमचं बोलणं. साहेब, तुम्ही इथे पहिल्यांदाच अडकलेले दिसताय. खरं सांगू का, मीसुद्धा तुमच्यासारखंच एकदम बेक्कार चालवतो... त्यापायी मी इथे असा बर्‍याच वेळा अडकलोय.... त्यामुळे आता माझ्या ध्यानात राहतात काही गोष्टी. तुमची पहिलीच वेळ असल्यानं तुम्हाला आता काही कळलं नसेल म्हणून सांगतो. तुम्ही नाक्यावर मला धडक बसू नये म्हणून बाजूला घातलीत खरं गाडी, पण समोरून येणार्‍या गाडीला जाऊन धडकलात अन् काय जोरात धडकलात म्हंताय ! तुम्ही दोघं जाममध्ये आहात याचंच आश्चर्य आहे... असं बघू नका, तो तुमच्या शेजारचा गाडीवालाच तर होता समोरून येणारा. तर काय सांगत होतो... हां, तुम्ही त्या गाडीला धडकलात, तोही जोरात होता.... अन् त्याचं असं झालं की दोन्ही गाड्या चिकटून जो काय गोळा झाला तो आला मागे फरफटत... अन् तुमच्या मागेच होतो ना मी. आल्या ना तुमच्या दोन्ही गाड्या माझ्या अंगावर दाणकन्.... सांगायची गोष्ट ही साहेब की तुम्ही, मी, ते दुसरे साहेब असे सगळे कोमात आहोत आता. तुम्हाला खरं वाटत नाही तर विचारा कोणालाही, त्यांचा मोबाईल रेंजमध्ये आहे का म्हणून. नाहीतर हायवेवर तेही शहराच्या इतक्या जवळ रेंज नाही असं कधी होतं का ? पण साहेब, तुम्हाला याहूनही भारी गोष्ट सांगतो... हा जो जाम आहे ना तो सगळ्या कोमावाल्यांचा जाम आहे, म्हणजे ही खरंतर लाईन आहे मोठ्ठी. तिथं पुढे एक गेट आहे, तिथं ठरतं तुम्ही जगणार की जाणार हे. त्या गेटासाठी ही लाईन. तर साहेब, तुमची बायको जर कोमात असेल तर....'
पुढचं ऐकायला दिनू तिथे नव्हताच. 'सीमा, सीमा' असं ओरडत तो पुढे धावत सुटला होता."

जामकाकांनी मान वर केली, "गोष्ट संपली मोना."
मोनाने एक दीर्घ श्वास घेतला. "ठीक आहे. या गोष्टीतून मला क्लू शोधायचे आहेत. तेव्हा मी पहिल्यांदा या गोष्टीतल्या माणसांवर फोकस करते. नायकाचं नाव दिनू आहे आणि गिरीकाकांचं नाव दिनकर आहे. तेव्हा गिरीकाकांकडे बोट दाखवायचं आहे हा स्वच्छ अर्थ होऊ शकतो. त्याचवेळी कथा एका ट्रॅफिक जॅमबद्दल आहे असं म्हणता येईल. जॅम हे जामकाकांच्या नावाला जवळ जाणारे आहे. शिवाय रिक्षावाला 'जाम' असा उच्चार करत होता. या गोष्टीत तोच एक जाणकार माणूस दाखवला आहे, तेव्हा त्याच्या तोंडी 'जाम' हा उच्चार मला सूचक वाटतो. म्हणजे गिरीकाका आणि जामकाका यांच्याकडे सरळ बोट दाखवले आहे. आता जाम, गिरी आणि नीतू म्हणजे बाबा हे त्रिकूट होतं, त्यामुळे बाबा या गोष्टीत दिसतोय का हे बघते. तो मला रिक्षावाल्याच्या रुपात दिसतो. हा रिक्षावाला खूप बेदरकार आहे कारण तो बेक्कार गाडी चालवतो हे त्याला माहिती आहे, बर्‍याच वेळा या ट्रॅफिक जॅममध्ये येऊन गेलाय तरीही तो गाडी चालवणे सुधारत नाही.... या तिघांत सर्वात बेदरकार बाबाच होता. तेव्हा रिक्षावाला बाबाकडे बोट दाखवतोय. आता खुद्द कथानायक आणि जाणकार रिक्षावाला हे दोन्ही आधार म्हणून तुल्यबळ आहेत. कोणीएक वरचढ आहे असे नाही. तेव्हा मी त्यांच्या स्वभावाकडे, त्यांच्याबद्दल गोष्टीतून मिळणार्‍या इतर माहितीकडे पाहते.
रिक्षावाल्याबद्दल तो बेदरकार आहे एवढीच माहिती मिळते आणि मी ती आधीच लक्षात घेतली आहे. दिनूचं लग्न झालंय आणि त्याच्या बायकोचं नाव सीमा आहे. पण गिरीकाकांचं लग्नच झालेलं नाही. त्यांच्या पूर्वायुष्यात कोणी सीमा असेल तरी ती शक्यता मी विचारात घेत नाही. याचं कारण असं की बाबांनी हे कोडं घातलं तेव्हा त्यांनी मला काय माहिती आहे, काय माहिती असू शकेल याचा विचार केला असणार. मला प्रश्न विचारायची परवानगी नाही, मी छडा लावू शकत नाही, माहिती मिळवू शकत नाही. जर एके ठिकाणी बसून विचार करायलाच परवानगी असेल तर त्याबरोबर येणार्‍या मर्यादांचाही विचार त्यांनी केला असणार. या तिघांच्या आयुष्याबद्दल मला जे काय माहिती आहे, विशेषतः अतिशय खाजगी गोष्टी त्या मला या तिघांपैकीच कोणी सांगितल्या तर कळतील. गिरीकाका आणि कोणी सीमा याबद्दल मला कोणीच कधी काही सांगितलेले नाही. हे त्या तिघांनाही माहिती असणार. म्हणजे कोणी एकाने मला सांगितले असते तर ते इतरांनाही नंतर कळले असते. तेव्हा सीमा आणि गिरीकाका हे कनेक्शन मी मोडीत काढते. जर गोष्टीतल्या व्यक्तिरेखा लक्षात घेऊन या तिघांपैकी कोणा एकाचाच खास उल्लेख केला जातोय किंवा कोणी एक point out होतोय असे दिसले असते तर तो आणि एखादे घर यांचा विशिष्ठ संबंध आहे का हे बघता आले असते. पण तसा खास उल्लेख कोणाचाच होत नाही. मग या तिघांमध्ये काही common असे आहे का ? खरं पाहता, काहीच नाही. म्हणजे गोष्टीतले तिघं अनोळखी आहेत, तर मला माहिती असलेले तिघं लहानपणापासूनचे जीवश्च कंठश्च मित्र आहेत. तेव्हा एकीकडे पाहता काहीच common नाही आणि एकीकडे पहिले तर खूपच गोष्टी common आहेत.... नाही नाही, एक राहिलं. गोष्टीतल्या तिघांमध्ये एक गोष्ट समान आहे, ते तिघंही आता कोमात आहेत. ह्म्म्म.... याचा काही अन्वयार्थ माझ्या आता तरी लक्षात येत नाहीये, तेव्हा ही fact मी नोंदवून ठेवते. त्याउप्पर मला काही दिसत नाही. एकंदरीत व्यक्तीरेखा आणि त्यांचे अर्थ हे मी तूर्तास बाजूला ठेवते. डॉ. काळे म्हणून कोणी आहेत, पण त्यांचा उल्लेख इतका जाता जाता झाला आहे की त्यावर मी आता तरी विचार करणार नाही.
आता मी विचार करते की एक विशिष्ठ ठिकाण मला शोधायचे आहे, तेव्हा क्लू मिळवण्यासाठी कथेत उल्लेख झालेल्या ठिकाणांचा विचार करायला पाहिजे. गोष्टीत सुरुवातीलाच जकातनाक्याचा उल्लेख आहे. ४ घरांपैकी कुठलंच घर जकातनाक्याच्या जवळ नाही, त्याउप्परही काही संबंध असलाच तर तो मला माहिती नाही. त्यामुळे तो मी लक्षात घेत नाही. नंतर येतो फाटा... कार्ल्याचं फार्महाऊस एका फाट्याजवळ आहे. नंतर आहे ते हॉस्पीटल. हे खरंतर अप्रत्यक्षपणे येतं. म्हणजे डॉ. काळ्यांच्या रूपात आणि सीमा कोमात आहे हे कळते तेव्हा. ती अर्थातच ऍडमिट आहे. शनवारातल्या वाड्यामागेच एक हॉस्पीटल आहे. पुढे तो दुसरा गाडीवाला त्याच्या लग्नाचा उल्लेख करतो. म्हणजे मंगल कार्यालय किंवा सभागृह आले. कोथरूडच्या बंगल्याच्या जवळ काही वर्षांपूर्वी एक मंगल कार्यालय झालंय. थोडक्यात, तीन घरांकडे बोट दाखवता येतंय. डोंबिवलीच्या घराला मात्र असा काही आधार मिळालेला दिसत नाहे... म्हणजे point out न करून ते point out केलंय असं आहे का ? बरं, पण हे उल्लेख संपले तर एकंदरीतच घरांबद्दल कथेत इतरत्र कुठे काही दिसत नाहीये. common गोष्टी ? या तीन घरांमध्ये एकमेव अशी common गोष्ट कुठलीच नाही, apart from the fact की ती 'राहण्याची ठिकाणे आहेत'. त्याच दृष्टीने पाहता जकातनाका, फाटा, हॉस्पीटल आणि मंगल कार्यालय/हॉल यांच्यातही काही common असं मला दिसत नाही. तेव्हा डोंबिवलीच्या घराचा मुद्दासुद्धा मी फक्त नोंदवून ठेवतेय.
एकंदरीतच, व्यक्तीरेखा आणि ठिकाणे यांचा विचार करता मला असं दिसतं ते धागे खूपच छोटे आहेत... उदाहरण द्यायचं तर दिनू आणि गिरीकाका... या कनेक्शनला कथेत इतरत्र कुठेच पुष्टी मिळत नाही, त्याला supportive असे क्लूज कथेत बाकी कुठेच मिळत नाहीत. ही बाब ठिकाणांबद्दलही खरी आहे. statistically बघता एखाद्या theory साठी एकापेक्षा जास्त पुरावे पाहिजेत... आणि कथेचं रूप असले तरी एका कोड्यात तर ते नक्कीच असणार. इतर अनेकविध पुराव्यांनी एखाद्या argument ला पुष्टी मिळणे, repeatability असणे, सर्व पुराव्यांमध्ये consistency असणे हे मला या दोन्ही lines of enquiry मध्ये दिसत नाही. म्हणून या दोन्ही lines of enquiry मध्ये तथ्य नाही.
आता माझ्यापुढे दोन पर्याय आहेत - zoom in किंवा zoom out. झूम इन म्हणजे मी प्रत्येक घडलेली घटना लक्षात घेणे, तिचा अभ्यास करणे. झूम आऊट म्हणजे प्रत्येक घटनेचा विचार न करता संपूर्ण कथेचा समग्र विचार करणे. यात घडलेल्या घटनांची संख्या आणि वैविध्य बघता झूम आऊट होणेच परिणामकारक ठरेल असे दिसते. pattern शोधायचा असेल तर तो दुरूनच बघावा लागेल. म्हणून मी आता आख्या गोष्टीचा विचार करते.
यातलं वर्णन, धक्कातंत्र हे बाजूला केलं तर काय दिसतं ? या गोष्टीचं सार काय ? मी अगदी naked fact पासून सुरुवात करते. एक अपघात झाला. कसा झाला ? दिनू नावाच्या एका माणसाच्या घाईमुळे. काय झालं त्या अपघातात ? दिनू धरून तीन जण कोमात गेले. कुठे झाला ? जकातनाक्याजवळ. कधी झाला ? बहुधा संध्याकाळी... कारण दुसरा गाडीवाला म्हणाला की तो दिवसभर कामात अडकला होता. दिनू घाईत का होता ? त्याच्या बायकोला, सीमाला अपघात होऊन ती कोमात आहे.... सीमाला अपघात होऊन ती कोमात असल्याने दिनू घाईत आहे, त्यामुळे जकातनाक्याजवळ अपघात झाला, आता दिनू अनेक इतरांसारखा कोमात आहे.... बस्स ! 'सीमा अपघात होऊन कोमात असल्याने दिनू घाईत आहे, त्यामुळे जकातनाक्याजवळ अपघात झाला, आता दिनू अनेक इतरांसारखा कोमात आहे' हे एवढच सांगते ही कथा. यात कोणाकडे बोट जातंय का? की यात एखादी गोष्ट उठून दिसतीये ? मला एक गोष्ट थोडी खास वाटते, ती म्हणजे या अपघाताचं स्थळ... जकातनाकाच का ? कुठलंही ठिकाण चाललं असतं की. मग या ठिकाणात खास काही आहे का ? जकातनाका जकातवसुलीचं काम करतो. तो साधारणपणे शहराच्या वेशीपाशी असतो. Hold on ! वेस.... म्हणजेच सीमा ना ?!! हा योगायोग जरी असला तरी interesting आहे. सीमेशी संबंधीत दुसरे काही आहे का इथे ? हो, अपघाताची वेळ. ती वेळ म्हणजे संध्याकाळ हे मानायला जागा आहे आणि संध्याकाळ हीसुद्धा दिवस अन् रात्र यांच्यातली सीमाच आहे. आणखी एक आहे, कोमा ! कोमा म्हणजे जगणे-मरणे यांच्या सीमारेषेवरची स्थिती. कोमा ही एक सीमाच आहे. म्हणजे सीमा हा योगायोग नाही. आता मी कथेकडे बघते. दिनूबरोबरच कैक जण कोमात आहेत. म्हणजे दिनू, सीमा आणि ते इतर सर्व यांच्यात common गोष्ट कोमा. शिवाय अपघातस्थळ ही एक सीमाच. अपघातात सापडलेला तो दुसरा गाडीवाला आणि रिक्षावाला यांचं काय ? रिक्षावाल्याबद्दल तर सर्व आधीच माहिती आहे. पण त्या दुसर्‍या गाडीवाल्याचं दुसर्‍या दिवशी लग्न आहे आणि तो पूजेला कार्यालयात चालला आहे.... कुठली पूजा असेल ? लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी कुठली पूजा असते ? सीमंतीनीची... तो ज्या पूजेला चालला आहे ते सीमांतपूजन अगदी असू शकते. म्हणजे परत सीमा आलीच.
थोडक्यात, 'सीमा' या थिअरीला consistent असे एकापेक्षा जास्त पुरावे आहेत. त्यामुळे मी सीमा, boundary, border हे मध्यवर्ती सूत्र म्हणून स्विकारते. पण यातले कुठलेच घर कुठल्याच सीमेवर नाही. सीमा या नावाचाही काही संबंध मला दिसत नाहीये. मग या सीमेचा फोकस काय ? मी परत मागे वळते... सीमा हे सूत्र का स्विकारलं ? किंवा मुळात ते लक्षात कसं आलं ? कारण ते सामायिक आहे म्हणून. अपघातस्थळ, वेळ, दिनू, सीमा, दुसरा गाडीवाला, जॅममध्ये अडकलेले बाकी सर्वजण यांच्यात सीमा common आहे.... म्हणजे त्यांची बाउंडरी कॉमन आहे.... म्हणजे त्यांची बाउंडरी एकच आहे.... या सर्वांची बाउंडरी एक आहे....पण ही तर वाडा प्रॉपर्टी आहे ! जामकाका, हे मी काय बोलते हे तुम्हाला समजावून सांगते. गिरीकाकांना हे माहिती आहेच. गणितात 'संचांची बाउंडरी एकच असणे' या प्रॉपर्टीला वाडा प्रॉपर्टी असे नाव आहे. योनेयामा या जपानी गणितज्ञाने हे सांगितले, पण त्याने त्या शोधाचे श्रेय मात्र त्याच्या वाडा नावाच्या शिक्षकास दिले. तेव्हापासून त्या गुणधर्माला वाडा प्रॉपर्टी म्हणतात. मी अजून एक उदाहरण देते... भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात वाडा प्रॉपर्टी असेल तर त्या तिघांनाही एकच सीमा असेल. म्हणजे असे की, त्या सीमेवरचा प्रत्येक बिंदू हा तिन्ही देशांच्या सीमेवर असेल. ओके ? ठिक आहे.... तर वाडा प्रॉपर्टी ! आता वाडा हा शब्द मराठी म्हणून घेतला तरी तो प्रॉपर्टीच आहे.... इस्टेट अशा अर्थाने. म्हणजे ती किल्ली शनवारातल्या त्या वाड्यात आहे... in fact, non-linear dynamics मध्ये 'Wada basins of attraction' म्हणूनही एक प्रकार असतो, त्यावरून ती किल्ली त्या वाड्यातल्या कुठल्यातरी बेसिनखालच्या पायपात आहे." मोना थांबली.
दोन क्षण शांततेत गेले. मग जामकाकांनी कागदपत्रांतून मान वर केली आणि ते म्हणाले, "अभिनंदन मोना ! तू उत्तर तर अगदी अचूक दिलंस. पण तू केलेला विचार गिरीनेही पास करायला हवा. काय गिरी ?" गिरीकाकांनी होकारार्थी मान डोलावली. "गुड ! मोना, परत एकदा अभिनंदन ! ही सगळी प्रॉपर्टी आता तुझी. आता इथे दोन ठिकाणी सह्या कर, बाकीची डॉक्युमेंट्स घेऊन मी दोन दिवसांनी घरी येईन आणि सगळं काही तुला समजावून सांगेन."
मोनाने सह्या केल्या आणि ती उठली. दारापाशी जाऊन दार उघडायला पुढे केलेला हात तिने मागे घेतला आणि ती परत टेबलपाशी आली.
"जामकाका, गिरीकाका, तुम्ही तिघांनी माझ्यावर, माझ्या क्षमतेवर फार मोठा विश्वास टाकलात. त्या विश्वासाखातरच मला एक confess करायचंय. हे खेळाचं जेव्हा मी ऐकलं तेव्हाच माझ्या डोक्यात, का कोण जाणे, असा एक विचार आला की बाबा मला काहीतरी नक्की मदत करणार, म्हणजे कथा तर झालीच, त्याशिवाय आणखी काहीतरी हिंट तो देईल.... हे माझं intuition होतं आणि झालंही तसंच. कथा सुरू करण्याआधी बाबानी जे काय सांगितलं, त्यात तो सगळ्याला मालमत्ता असं म्हणत होता, फक्त एक वेळ सोडून... जेव्हा त्यानं बंगला, फ्लॅट, फार्महाऊस, वाडा अशी नावं सलग घेतली, त्यात वाडा हे नाव सर्वात शेवटी होतं, तेव्हा मात्र तो प्रॉपर्टी म्हणाला... तेव्हाच मी थोडी चमकले होते. तेव्हाच माझ्या डोक्यात वाडा प्रॉपर्टीचा किडा वळवळला. ते intuition खरं मानून मग मी त्या intuition ला फिट बसेल असा विचार केला... म्हणजे एका अर्थी मला उत्तर आधीच माहिती होतं आणि मी तुमच्यासमोर फक्त तसा विचार करण्याचा देखावा केला..."
तेव्हा त्या भेटीत पहिल्यांदा गिरीकाकांच्या चेहर्‍यावरची घडी मोडली. ते छान हसले आणि म्हणाले, "बेटा, आता खरा तू तो खेळ जिंकलीस. Brilliant people use intelligence. Only a genius dares to use her intuition."

(ही गोष्ट आयझॅक असिमॉव्हच्या A Problem of Numbers या जबरदस्त गोष्टीवर आधारित आहे. शेवटचं वाक्यही त्याचंच. खूप धन्यवाद असिमॉव्ह !)
वाडा प्रॉपर्टीबद्दल थोडेसे अधिक इथे वाचा - http://en.wikipedia.org/wiki/Lakes_of_wada
थोडंसं या गोष्टीबद्दल... असिमॉव्हशी माझी ओळख झाली तीच त्याच्या आर्मचेअर मिस्टरीजमधून. त्याची फाउंडेशन मालिका (महान !!) मी नंतर वाचली. आर्मचेअर मिस्टरीज म्हणजे होम्स, पॉयरॉसारखं इकडे तिकडे फिरून, क्लूज गोळा करून, लोकांशी बोलून अनुमान काढायचे नाहीत, तर दिलेल्या माहितीचं खुर्चीत बसून विश्लेषण करून अनुमान काढणे (मायक्रॉफ्ट होम्सची आठवण होते इथे). असिमॉव्हच्या अशा २ पुस्तकमालिका आहेत - Black Widowers Mysteries आणि The Union Club Mysteries. त्यातल्याही उत्कृष्ठ गोष्टी The Best Mysteries of Isaac Asimov या पुस्तकात संकलित आहेत, A Problem of Numbers ही कथा याच पुस्तकातील. कथाबीज असे - एका विद्यार्थी आणि त्याच्या रसायनशास्त्राच्या गुरूची मुलगी यांचं प्रेम जमतं. लग्न करायच्या आधी 'परवानगी' मागायला म्हणून तो त्या गुरूकडे जातो, तेव्हा परवानगी मिळवण्यासाठी परीक्षा म्हणून प्रोफेसर त्याला एक आकड्यांची लांब मालिका देऊन ती 'सोडवायला' सांगतो, अट ही की विचार प्रोफेसरच्या समोरच मोठ्याने करायचा.... फार रोचक आहे.
ती गोष्ट वाचून बरीच वर्षे झाली, पण ती डोक्यात ठाण मांडून बसलीये. ती वाचली, आवडली आणि लक्षात आलं की हे आवडून घेणं पूर्ण नाही झालं. मला वाटतं की काही साहित्य हे पत्त्यांच्या खेळासारखं असतं का ? पत्त्यांचे बरेच खेळ केवळ बघायलासुद्धा मजा येते, पण पूर्ण मजा कधी येईल ? तो खेळ स्वतः खेळल्यावरच... ही गोष्ट मला तशी वाटली. हिचा पूर्ण आस्वाद घ्यायचा असेल तर तिच्या सृजनप्रक्रियेत काही करून सहभागी होता आलं पाहिजे असं सारखं वाटत राहिलं. मग काही काळाने मास्तराने वाडा प्रॉपर्टीबद्दल काही पेपर्स दिले. आता कुठल्याही मराठी मनाला 'वाडा प्रॉपर्टी' या नावातली गंमत लगेच कळेल, पण माझ्या दुर्दैवाने मी जेव्हा ती शिकलो तेव्हा जवळपास कोणीच मराठी नव्हतं, त्यामुळे ही गंमत जाणून कोणालातरी टाळी द्यायची-घ्यायची राहून गेली. या दोन खुटखुटी/रुखरुखी काढून टाकण्यासाठी ही कथा लिहिली Happy (कथेच्या खाली 'प्रकार'मध्ये 'आस्वाद' असं दिसतंय ना त्याचं कारण हेच.)

विषय: 
प्रकार: 

वा! सुरेख! किती दिवसानी खिळवून टाकणारी गोष्ट वाचली. अजून येऊ द्या लवकर लवकर.

अप्रतीम, अतिशय उत्कंठावर्धक गोष्ट. अनेक धन्यवाद.
अश्या अ़जून खूप गोष्टी येऊदेत !!

जबरी लॉजिक!
मस्त गोष्ट!

स्लार्टी, जबरदस्त कथा. Happy

पुढची कधी?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Order is for idiots. Genius can handle chaos.

केवळ अप्रतीम! कथेचा वेग मस्तच आहे. मराठमोळे logic सुद्धा सुरेख.

मस्त कथा...
==================
मन उधाण वार्‍याचे

स्लार्टी, साष्टांग दंडवत.. लॉजिकच्या शिक्षकाला लेक्चर मध्ये वापरायला चांगली कथा आहे ही..

वा मस्त..........

तात्यानू मस्त लिहीलय.
लॉजीक पण आपल्या पध्दतीने व्यवस्थित मांडले आहेस. पण एक छोटासा घोळ माझ्या नजरेत आला.
तो म्हणजे तो रिक्षावाला म्हणतो "तुम्ही इथे पहिल्यांदाच अडकलेले दिसताय" यावरुन तो ईथे अनेकदा अडकल्याचे दिसतेय. जे मरणाचा खेळात (आणि त्या रांगेत) शक्य नाही. पण तसा रिक्षेवाल्याचा इंट्युशनशी संबध येत नाही म्हणून चलेगा.
वेगवान कथे बद्दल धन्यवाद.

asimove ची माहित नाहि पण हि नक्कीच जमलिये रे. asimove ची पण वाचायला हवी.

इथे shrInI chIकमी भरून काढतोयस तू !!!!

मस्त!!

झकास कथा ! एकदम खिळवून ठेवणारी !

समस्तांस धन्यवाद :).
केदार, 'दिनूला अर्ध्यावरच तोडत रिक्षावाला म्हणाला,...' इथपासून पुढच्या तीनेक ओळी वाच. तो रिक्षावाला फार भयंकर गाडी चालवतो, त्यामुळे त्याला अनेक वेळा जबरी अपघात झालाय आणि तो कोमात जाऊन परत बाहेर आलाय.... हे सर्व तो स्वतःच मान्य करतोय. त्यावरूनच मोना असा निष्कर्ष काढते की तो इतका बेदरकार आहे की जीवावर बेतूनसुद्धा त्याच्या वाहनचालनात काहीच सुधारणा नाही. (पुण्यातला असावा :)) खरंतर एक चूक झाली आहे. ज्या तर्काआधारे मोना डोंबिवलीच्या घराची नोंद ठेवते, त्याआधारे तिने जकातनाक्याचीसुद्धा तेव्हाच नोंद ठेवायला पाहिजे. म्हणजे कथेतल्या बाकी ठिकाणांचं कुठल्या ना कुठल्या घराशी नातं आहे, तसं नाक्याचं नाही... त्यामुळे तो वेगळा आहे. हे नोंदवून नंतर तिच्या थिअरीला अजून एक आधार म्हणून तिने हे वापरले पाहिजे. असो. अशा चुका आता हळूहळू सापडायला लागतील Happy

    ***
    The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.

    स्लार्टी, अंगावर काटे आले अक्षरशः, इतका 'काटा' आयटम आहे हा.
    एकदा कथा म्हणून वाचली, नंतर अभ्यास म्हणून वाचली!
    आणि कथा लिहिण्याच्या मागचं तुला झालेलं मोटिव्हेशनही भन्नाट.. मी स्वतःही कित्येकदा ही स्थिती अनुभवली आहे, म्हणून तुझ्या लॉजिकशी अगदी क्लोजली रिलेट करता आलं.
    फार पुर्वी रमेश भाटकरनं काम केलेलं एक थरार नाटक आठवलं. नाव आठवत नाही. एका विक्षिप्त म्हातार्‍याची भुमिका त्यानं केलीय. त्याच्या भल्या मोठ्या 'जंगल रिसॉर्ट' मध्ये राहायला आलेल्या एका जोडप्याशी तो पैज लावतो- ती म्हणजे 'तुझा लायटर सलग १० वेळा पेटवलास (प्रत्येक वेळी तो पहिल्याच क्लिकला पेटायला हवा!); तर ही भलीमोठी प्रॉपर्टी तुझी. नाहीतर लायटर पेटवणारी पाचही बोटं मी कापणार!!' स्वतःवर अन लायटरवर प्रचंड विश्वास असणारा तो तरूण पैज स्वीकारतोही (बायको घाबरून अडवते, कारण लायटर पेटवायला घेतल्यावर हा विक्षिप्त म्हातारा, लायटर न पेटण्याची वाट बघत, सुरा उगारून त्याच्यापुढे उभा राहतो..
    शेवटी थरार अन ताण एवढा वाढतो, की ९ वेळा लायटर पेटवून दाखवणारा तो तरूण १०व्या वेळेस घाम पुसत पैजेतनं माघार घेतो!
    तुझ्या कथेशी याचा काही संबंध नसला, तरी 'थरार' ही त्यातली 'वाडा प्रॉपर्टी' आहेच. इतक्या वर्षांनंतरही ते नाटक डोक्यातनं जात नाहीये, तेव्हा तुझ्यासारखंच काहीतरी करायचं म्हणतो मी..
    असाच भन्नाट लिहित राहा.

    च्यामारी, मेन्दून गिरमिटान भोक पाडाव तस वाटल ही कथा वाचून! Happy
    सुन्दर! अप्रतिम

    एकदम जबरी, खिळवुन ठेवणारी कथा.

    भन्नाट कथा..... पूर्ण सिरीज येऊ द्या लवकर..

    मस्तच! logic एकदम superb आहे. डोके एकदम भन्नाट चालते. मी तर कागदावर चक्क लिहून काढले तीचे clue की शेवटी कसे एकाच borderline वर येतात ते.

    झक्कास!! slarti ही घ्या टाळी! सही वापर्लाय वाडा प्रोपेर्तीचा सिधान्त्...मजा आ गया..
    फुलराणी.

    सहिच एकदम ...एकदम काळजीपुर्वक वाचलि कथा तेव्हा मजा आलि.

    महान आहे रे, स्लार्टी! Happy बर्‍याच दिवसांनी अशी छान डोकेबाज पद्धतीने विणलेली कथा वाचली.
    तळटिपेत लिहिलेला मजकूर वाचून मौजदेखील वाटली.. सही!
    तूही आता अशा डिझायनर कथांची मालिका लिहिणार आहेस का? लिहिलीस, तर पुस्तक छाप. Happy

    -------------------------------------------
    हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

    सुरेख कथा .. वाचत वाचता, आपल्या डोक्यात ही calculations सुरु होतात. मस्त गुंगवुन टाकले.

    मस्त कथा. अजून एकदा अभ्यासायला लागणार.

    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    Pages