Only a genius...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"ये, ये मोना, बस."
मोना बसली. जामकाकांच्या ऑफीसमध्ये ती बर्‍याच वर्षांनी येत होती. जामकाकांचं ऑफीसही त्यांच्यासारखंच, फार फरक नाही. काका त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसले होते, फक्त आज फरक एवढाच की बाजूला गिरीकाकाही बसले होते. एकंदरीत सेटींग तिला सूचक वाटलं.
"मोना, परवा तुझ्याशी बोलणं झालंच होतं. तर तुझ्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात सांगितल्याप्रमाणे आज आपण इथे जमलो आहोत." जामकाकांचा सूर वकील-अशील असा औपचारिक लागला होता. गिरीकाकांचा चेहरा निर्विकार होता. "मी आणि गिरी दोघं एकत्रितपणे त्यांच्या मृत्यूपत्राचे executors आहोत याची तुला कल्पना आहेच. या मृत्यूपत्राचं वाचन करण्यासाठी आपण तिघं आज इथे जमलो आहोत," असं म्हणून जामकाकांनी एक सीलबंद केलेलं पाकीट फोडलं, त्यातून ३-४ कागद काढले आणि मोठ्याने वाचायला सुरुवात केली.

"प्रिय मोना, माझी सर्व मालमत्ता मी रितसर तुझ्या नावाने केली आहे (ती कागदपत्रे याच पाकीटात आहेत) पण माझी एकच अट आहे. ही अट स्विकारायची की नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. या मालमत्तेचा तुला अजिबात लोभ नाही आणि गरजही नाही हे मी पूर्णपणे जाणतो. त्यामुळे तू एकवेळ सर्व मालमत्ता लाथाडशील, पण कोर्टात जाणार नाहीस याची मला (आणि जाम व गिरीलासुद्धा) खात्री आहे. पण 'तुला जर ही मालमत्ता मिळाली तर तू काय करशील' या माझ्या प्रश्नाला तू दिलेलं उत्तर माझ्या लक्षात आहे....तुझ्या संशोधनाशिवाय आणखी त्याच एकाच बाबतीत तू अत्यंत passionate आहेस. त्या तुझ्या passion साठी तरी तू हा खेळ खेळशील असं मला वाटतं. यात तुझी कुठली परीक्षा घ्यायचा उद्देश नाही. बाबाने केलेली शेवटची गंमत असं बघत यात भाग घेशील अशी मी आशा करतो.
माझ्या मालकीच्या मालमत्तेत ४ घरं आहेत - कोथरूडमधला बंगला, शनिवारातला वाडा, डोंबिवलीतला फ्लॅट आणि कार्ल्याचं फार्महाऊस. यापैकी एका ठिकाणी मी आपल्या बंगल्याची एक किल्ली लपवून ठेवली आहे. तेव्हा बंगला, फ्लॅट, फार्महाऊस आणि वाडा यातली बरोबर प्रॉपर्टी तू ओळखलीस तर ते सर्व तुझे. हे कसं ओळखायचं यासाठी आपण एक खेळ खेळणार आहोत. मी एक गोष्ट लिहीली आहे, ती लक्षपूर्वक ऐक. ही गोष्ट म्हणजेच तुला दिलेला क्लू आहे. ही गोष्ट ऐकून तू फक्त विचार करून बरोबर ठिकाण ओळखायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा विचार तू जाम आणि गिरी यांच्यासमोर मोठ्याने करायचा आहेस. थोडक्यात, तू जो काही विचार करशील तो करता करताच त्यांनाही सांगायचा आहे."
जामकाकांनी मोनाकडे बघितलं. मोनाची नजर कुठेतरी शून्यात होती. "मोना...?" मोना भानावर आली. "ठीक आहे जामकाका, मी तयार आहे." जामकाका पुढे वाचू लागले.
"आता मी गोष्ट सुरू करतो. गोष्टीचं नाव आहे 'ट्रॅफिक जॅम'. जकातनाक्यावरून दिनूने गाडी पुढे आणली आणि अचानक समोर एक रिक्षा आली. गाडीला चांगला वेग होता, तेव्हा ब्रेक वगैरे दाबूनही धडक टळण्यासारखी नव्हती. तेव्हा दिनूने सटकन् गाडी उजवीकडे वळवली. समोरून येणार्‍या गाडीशी दिनू अगदी हातघाईचा हुतूतू खेळला आणि गाडी परत योग्य बाजूला आली. सर्व बाजूंनी हॉर्नचे आवाज उठले. त्याकडे दुर्लक्ष करत वेग फारसा कमी न करता दिनू थोडं पुढे आला असेल नसेल तर त्याला ट्रॅफिक जॅम भिडला. मनातल्या मनात भकाराचा भूप आवळत त्यानं गाडी हळू केली आणि समोरच्या गाडीच्या मागे काही इंचांचे अंतर ठेवून गाडी थांबवली. ट्रॅफिक जॅम जबरदस्तच होता. बर्‍याच पुढेपर्यंत गाड्यांची रांग दिसत होती आणि वाईट म्हणजे सर्व वाहने एका जागी ठप्प होती. जराही पुढे सरकण्याचा काही चान्स दिसत नव्हता. दिनू लगेच विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गाडी घालणार एवढ्यात त्याच्या शेजारी अजून एक गाडी येऊन उभी राहिली. मागे बघतो तर मागेही एक रिक्षा. दिनूचा वैताग वैताग झाला.
पाचेक मिनिटांनी परिस्थितीत काहीच फरक नव्हता. तेव्हा दिनू गाडीतून उतरला आणि शेजारच्या ड्रायव्हरपाशी गेला.
'साहेब, घाला गाडी त्या बाजूला. किती वेळ बसून रहायचं असं?'
'नको.'
'अहो, काय घोळ झालाय काय माहिती ! किती वेळ अडकून पडायचं असं ? मला जरा घाई आहे जाण्याची. घाला, तुमच्यामागून मीही घालतो.'
'घाई आहे ते दिसलंच मघाशी. तेव्हा नियम पाळले नाहीत, आता तरी पाळा.'
'मघाशी ?..... ओह ! त्या नाक्याच्या तिथे ? अहो, तो रिक्षावाला अचानकच समोर आला. त्याला उडवायचं की काय ?'
'तिथे फाटा आहे, त्या बाजूने वाहनं येतच असतात. एक तर तुम्ही फाट्याकडे लक्ष दिलं नाही, शिवाय तुमचा वेग कमी असता तर ब्रेक दाबता आला असता तुम्हाला.'
आता दिनूचा धीर सुटला. 'ओ, तुम्हाला येऊन धडकलो का ? तुमचं काही नुकसान केलंय का? उगीच आपलं भाषण लावलंय ते...'
यावर काही न बोलता त्या गाडीवाल्यानं खिडकीची काच वर केली आणि शांतपणे पुढे बघत बसून राहिला. दिनूचा खूप चडफडाट झाला, पण करतो काय ! त्यानं मोबाईल काढला डॉ. काळ्यांना फोन लावण्यासाठी. तर मोबाईल आउट ऑफ रेंज ! त्याला काय करावं सुचेना. शेवटी निदान कारण काय आहे, किती वेळ लागेल याचा तरी अंदाज घ्यावा म्हणून तो पुढे गेला. पण कोणालाच नक्की कारण माहिती नव्हते.... खूप मोठा अपघात झालाय... गावात कुठेतरी बॉम्बस्फोट झालाय म्हणे (त्याचा अन् इथल्या ट्रॅफिक जॅमचा काय संबंध असा अगदी ओठांवर आलेला प्रश्न दिनूने परतवून लावला)...कुठेतरी मोठ्ठी आग लागली असेल (आणि बम्ब, अँब्युलन्स वगैरे गाड्या रस्त्यात उभ्या असल्याने जॅम झाला असेल असा दिनूने मनातल्या मनात लावलेला संबंध)... अशी विविध कारणे ऐकल्यावर त्याने 'कारण शोधा' मोहीम आटोपती घेतली आणि तो परत त्याच्या गाडीपाशी आला. त्या चर्चेतून त्याने एवढाच निष्कर्ष काढला की ज्या अर्थी तिकडच्या दिशेने गाड्या आलेल्या दिसत नाहीयेत त्या अर्थी रस्ता दोन्ही बाजूंनी बंद दिसतोय.
मग त्याने इकडे तिकडे फिरून मोबाईलला रेंज येते आहे का हे बघण्याचाही प्रयत्न केला. शेवटी त्याच्या गरजेने त्याच्या इगोवर मात केली आणि त्याने शेजारच्या गाडीच्या खिडकीवर टकटक केलं. खिडकीची काच खाली झाली.
'हे बघा साहेब, माफ करा तुमच्यावर चिडलो. पण मला खरंच घाई आहे हो. माझ्या बायकोला मोठा ऍक्सीडेंट झालाय, ती कोमात आहे. मला कळाल्या कळाल्या निघालो. म्हणून मी तशी चालवत होतो गाडी...' दिनूला पुढे बोलवेना.
गाडीवाला मात्र शांत होता. पुढे बघतच त्यानं बोलायला सुरूवात केली, 'घाई मलाही आहे. उद्या लग्न आहे माझं. आज दिवसभर खूपच अर्जंट कामात अडकलो, ते करून काही झालं तरी आज पूजेला पोहोचतो असं सांगितलंय तिला. आता डायरेक्ट कार्यालयावरच निघालो होतो.... तर असा अडकलोय. काय सांगू तिला आता ?'
'हे बघा, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून त्यांना कॉल का नाही करत ?'
त्या गाडीवाल्याने विमनस्कपणे त्याचा मोबाईल दिनूच्या हातात दिला. तोही आउट ऑफ रेंज होता. दिनूने तो परत केला आणि तो मागे उभ्या असलेल्या रिक्षाकडे गेला. रिक्षावाला 'हे रोजचंच आहे' अशा थाटात आरामात मागच्या सीटवर पसरला होता.
'साहेब, मला एक खूप अर्जंट कॉल करायचा आहे. माझ्या मोबाईलला रेंज नाहीये. प्लीज, तुमचा मोबाईल वापरायला देता का? मी तुम्हाला १०० रुपये देतो.'
रिक्षावाला उठून बाहेर आला. त्याच्या चेहर्‍यावर हलकसं स्मित होतं. 'साहेब, तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं. त्या नाक्यावर आपली धडक होता होता वाचली ना पहिल्यांदा तोच रिक्षावाला मी.'
'ओह ! सॉरी हो, माझं चुकलं तेव्हा. पण मी खूप घाईत आहे...'
दिनूला अर्ध्यावरच तोडत रिक्षावाला म्हणाला,'हो, मी ऐकलं तुमचं बोलणं. साहेब, तुम्ही इथे पहिल्यांदाच अडकलेले दिसताय. खरं सांगू का, मीसुद्धा तुमच्यासारखंच एकदम बेक्कार चालवतो... त्यापायी मी इथे असा बर्‍याच वेळा अडकलोय.... त्यामुळे आता माझ्या ध्यानात राहतात काही गोष्टी. तुमची पहिलीच वेळ असल्यानं तुम्हाला आता काही कळलं नसेल म्हणून सांगतो. तुम्ही नाक्यावर मला धडक बसू नये म्हणून बाजूला घातलीत खरं गाडी, पण समोरून येणार्‍या गाडीला जाऊन धडकलात अन् काय जोरात धडकलात म्हंताय ! तुम्ही दोघं जाममध्ये आहात याचंच आश्चर्य आहे... असं बघू नका, तो तुमच्या शेजारचा गाडीवालाच तर होता समोरून येणारा. तर काय सांगत होतो... हां, तुम्ही त्या गाडीला धडकलात, तोही जोरात होता.... अन् त्याचं असं झालं की दोन्ही गाड्या चिकटून जो काय गोळा झाला तो आला मागे फरफटत... अन् तुमच्या मागेच होतो ना मी. आल्या ना तुमच्या दोन्ही गाड्या माझ्या अंगावर दाणकन्.... सांगायची गोष्ट ही साहेब की तुम्ही, मी, ते दुसरे साहेब असे सगळे कोमात आहोत आता. तुम्हाला खरं वाटत नाही तर विचारा कोणालाही, त्यांचा मोबाईल रेंजमध्ये आहे का म्हणून. नाहीतर हायवेवर तेही शहराच्या इतक्या जवळ रेंज नाही असं कधी होतं का ? पण साहेब, तुम्हाला याहूनही भारी गोष्ट सांगतो... हा जो जाम आहे ना तो सगळ्या कोमावाल्यांचा जाम आहे, म्हणजे ही खरंतर लाईन आहे मोठ्ठी. तिथं पुढे एक गेट आहे, तिथं ठरतं तुम्ही जगणार की जाणार हे. त्या गेटासाठी ही लाईन. तर साहेब, तुमची बायको जर कोमात असेल तर....'
पुढचं ऐकायला दिनू तिथे नव्हताच. 'सीमा, सीमा' असं ओरडत तो पुढे धावत सुटला होता."

जामकाकांनी मान वर केली, "गोष्ट संपली मोना."
मोनाने एक दीर्घ श्वास घेतला. "ठीक आहे. या गोष्टीतून मला क्लू शोधायचे आहेत. तेव्हा मी पहिल्यांदा या गोष्टीतल्या माणसांवर फोकस करते. नायकाचं नाव दिनू आहे आणि गिरीकाकांचं नाव दिनकर आहे. तेव्हा गिरीकाकांकडे बोट दाखवायचं आहे हा स्वच्छ अर्थ होऊ शकतो. त्याचवेळी कथा एका ट्रॅफिक जॅमबद्दल आहे असं म्हणता येईल. जॅम हे जामकाकांच्या नावाला जवळ जाणारे आहे. शिवाय रिक्षावाला 'जाम' असा उच्चार करत होता. या गोष्टीत तोच एक जाणकार माणूस दाखवला आहे, तेव्हा त्याच्या तोंडी 'जाम' हा उच्चार मला सूचक वाटतो. म्हणजे गिरीकाका आणि जामकाका यांच्याकडे सरळ बोट दाखवले आहे. आता जाम, गिरी आणि नीतू म्हणजे बाबा हे त्रिकूट होतं, त्यामुळे बाबा या गोष्टीत दिसतोय का हे बघते. तो मला रिक्षावाल्याच्या रुपात दिसतो. हा रिक्षावाला खूप बेदरकार आहे कारण तो बेक्कार गाडी चालवतो हे त्याला माहिती आहे, बर्‍याच वेळा या ट्रॅफिक जॅममध्ये येऊन गेलाय तरीही तो गाडी चालवणे सुधारत नाही.... या तिघांत सर्वात बेदरकार बाबाच होता. तेव्हा रिक्षावाला बाबाकडे बोट दाखवतोय. आता खुद्द कथानायक आणि जाणकार रिक्षावाला हे दोन्ही आधार म्हणून तुल्यबळ आहेत. कोणीएक वरचढ आहे असे नाही. तेव्हा मी त्यांच्या स्वभावाकडे, त्यांच्याबद्दल गोष्टीतून मिळणार्‍या इतर माहितीकडे पाहते.
रिक्षावाल्याबद्दल तो बेदरकार आहे एवढीच माहिती मिळते आणि मी ती आधीच लक्षात घेतली आहे. दिनूचं लग्न झालंय आणि त्याच्या बायकोचं नाव सीमा आहे. पण गिरीकाकांचं लग्नच झालेलं नाही. त्यांच्या पूर्वायुष्यात कोणी सीमा असेल तरी ती शक्यता मी विचारात घेत नाही. याचं कारण असं की बाबांनी हे कोडं घातलं तेव्हा त्यांनी मला काय माहिती आहे, काय माहिती असू शकेल याचा विचार केला असणार. मला प्रश्न विचारायची परवानगी नाही, मी छडा लावू शकत नाही, माहिती मिळवू शकत नाही. जर एके ठिकाणी बसून विचार करायलाच परवानगी असेल तर त्याबरोबर येणार्‍या मर्यादांचाही विचार त्यांनी केला असणार. या तिघांच्या आयुष्याबद्दल मला जे काय माहिती आहे, विशेषतः अतिशय खाजगी गोष्टी त्या मला या तिघांपैकीच कोणी सांगितल्या तर कळतील. गिरीकाका आणि कोणी सीमा याबद्दल मला कोणीच कधी काही सांगितलेले नाही. हे त्या तिघांनाही माहिती असणार. म्हणजे कोणी एकाने मला सांगितले असते तर ते इतरांनाही नंतर कळले असते. तेव्हा सीमा आणि गिरीकाका हे कनेक्शन मी मोडीत काढते. जर गोष्टीतल्या व्यक्तिरेखा लक्षात घेऊन या तिघांपैकी कोणा एकाचाच खास उल्लेख केला जातोय किंवा कोणी एक point out होतोय असे दिसले असते तर तो आणि एखादे घर यांचा विशिष्ठ संबंध आहे का हे बघता आले असते. पण तसा खास उल्लेख कोणाचाच होत नाही. मग या तिघांमध्ये काही common असे आहे का ? खरं पाहता, काहीच नाही. म्हणजे गोष्टीतले तिघं अनोळखी आहेत, तर मला माहिती असलेले तिघं लहानपणापासूनचे जीवश्च कंठश्च मित्र आहेत. तेव्हा एकीकडे पाहता काहीच common नाही आणि एकीकडे पहिले तर खूपच गोष्टी common आहेत.... नाही नाही, एक राहिलं. गोष्टीतल्या तिघांमध्ये एक गोष्ट समान आहे, ते तिघंही आता कोमात आहेत. ह्म्म्म.... याचा काही अन्वयार्थ माझ्या आता तरी लक्षात येत नाहीये, तेव्हा ही fact मी नोंदवून ठेवते. त्याउप्पर मला काही दिसत नाही. एकंदरीत व्यक्तीरेखा आणि त्यांचे अर्थ हे मी तूर्तास बाजूला ठेवते. डॉ. काळे म्हणून कोणी आहेत, पण त्यांचा उल्लेख इतका जाता जाता झाला आहे की त्यावर मी आता तरी विचार करणार नाही.
आता मी विचार करते की एक विशिष्ठ ठिकाण मला शोधायचे आहे, तेव्हा क्लू मिळवण्यासाठी कथेत उल्लेख झालेल्या ठिकाणांचा विचार करायला पाहिजे. गोष्टीत सुरुवातीलाच जकातनाक्याचा उल्लेख आहे. ४ घरांपैकी कुठलंच घर जकातनाक्याच्या जवळ नाही, त्याउप्परही काही संबंध असलाच तर तो मला माहिती नाही. त्यामुळे तो मी लक्षात घेत नाही. नंतर येतो फाटा... कार्ल्याचं फार्महाऊस एका फाट्याजवळ आहे. नंतर आहे ते हॉस्पीटल. हे खरंतर अप्रत्यक्षपणे येतं. म्हणजे डॉ. काळ्यांच्या रूपात आणि सीमा कोमात आहे हे कळते तेव्हा. ती अर्थातच ऍडमिट आहे. शनवारातल्या वाड्यामागेच एक हॉस्पीटल आहे. पुढे तो दुसरा गाडीवाला त्याच्या लग्नाचा उल्लेख करतो. म्हणजे मंगल कार्यालय किंवा सभागृह आले. कोथरूडच्या बंगल्याच्या जवळ काही वर्षांपूर्वी एक मंगल कार्यालय झालंय. थोडक्यात, तीन घरांकडे बोट दाखवता येतंय. डोंबिवलीच्या घराला मात्र असा काही आधार मिळालेला दिसत नाहे... म्हणजे point out न करून ते point out केलंय असं आहे का ? बरं, पण हे उल्लेख संपले तर एकंदरीतच घरांबद्दल कथेत इतरत्र कुठे काही दिसत नाहीये. common गोष्टी ? या तीन घरांमध्ये एकमेव अशी common गोष्ट कुठलीच नाही, apart from the fact की ती 'राहण्याची ठिकाणे आहेत'. त्याच दृष्टीने पाहता जकातनाका, फाटा, हॉस्पीटल आणि मंगल कार्यालय/हॉल यांच्यातही काही common असं मला दिसत नाही. तेव्हा डोंबिवलीच्या घराचा मुद्दासुद्धा मी फक्त नोंदवून ठेवतेय.
एकंदरीतच, व्यक्तीरेखा आणि ठिकाणे यांचा विचार करता मला असं दिसतं ते धागे खूपच छोटे आहेत... उदाहरण द्यायचं तर दिनू आणि गिरीकाका... या कनेक्शनला कथेत इतरत्र कुठेच पुष्टी मिळत नाही, त्याला supportive असे क्लूज कथेत बाकी कुठेच मिळत नाहीत. ही बाब ठिकाणांबद्दलही खरी आहे. statistically बघता एखाद्या theory साठी एकापेक्षा जास्त पुरावे पाहिजेत... आणि कथेचं रूप असले तरी एका कोड्यात तर ते नक्कीच असणार. इतर अनेकविध पुराव्यांनी एखाद्या argument ला पुष्टी मिळणे, repeatability असणे, सर्व पुराव्यांमध्ये consistency असणे हे मला या दोन्ही lines of enquiry मध्ये दिसत नाही. म्हणून या दोन्ही lines of enquiry मध्ये तथ्य नाही.
आता माझ्यापुढे दोन पर्याय आहेत - zoom in किंवा zoom out. झूम इन म्हणजे मी प्रत्येक घडलेली घटना लक्षात घेणे, तिचा अभ्यास करणे. झूम आऊट म्हणजे प्रत्येक घटनेचा विचार न करता संपूर्ण कथेचा समग्र विचार करणे. यात घडलेल्या घटनांची संख्या आणि वैविध्य बघता झूम आऊट होणेच परिणामकारक ठरेल असे दिसते. pattern शोधायचा असेल तर तो दुरूनच बघावा लागेल. म्हणून मी आता आख्या गोष्टीचा विचार करते.
यातलं वर्णन, धक्कातंत्र हे बाजूला केलं तर काय दिसतं ? या गोष्टीचं सार काय ? मी अगदी naked fact पासून सुरुवात करते. एक अपघात झाला. कसा झाला ? दिनू नावाच्या एका माणसाच्या घाईमुळे. काय झालं त्या अपघातात ? दिनू धरून तीन जण कोमात गेले. कुठे झाला ? जकातनाक्याजवळ. कधी झाला ? बहुधा संध्याकाळी... कारण दुसरा गाडीवाला म्हणाला की तो दिवसभर कामात अडकला होता. दिनू घाईत का होता ? त्याच्या बायकोला, सीमाला अपघात होऊन ती कोमात आहे.... सीमाला अपघात होऊन ती कोमात असल्याने दिनू घाईत आहे, त्यामुळे जकातनाक्याजवळ अपघात झाला, आता दिनू अनेक इतरांसारखा कोमात आहे.... बस्स ! 'सीमा अपघात होऊन कोमात असल्याने दिनू घाईत आहे, त्यामुळे जकातनाक्याजवळ अपघात झाला, आता दिनू अनेक इतरांसारखा कोमात आहे' हे एवढच सांगते ही कथा. यात कोणाकडे बोट जातंय का? की यात एखादी गोष्ट उठून दिसतीये ? मला एक गोष्ट थोडी खास वाटते, ती म्हणजे या अपघाताचं स्थळ... जकातनाकाच का ? कुठलंही ठिकाण चाललं असतं की. मग या ठिकाणात खास काही आहे का ? जकातनाका जकातवसुलीचं काम करतो. तो साधारणपणे शहराच्या वेशीपाशी असतो. Hold on ! वेस.... म्हणजेच सीमा ना ?!! हा योगायोग जरी असला तरी interesting आहे. सीमेशी संबंधीत दुसरे काही आहे का इथे ? हो, अपघाताची वेळ. ती वेळ म्हणजे संध्याकाळ हे मानायला जागा आहे आणि संध्याकाळ हीसुद्धा दिवस अन् रात्र यांच्यातली सीमाच आहे. आणखी एक आहे, कोमा ! कोमा म्हणजे जगणे-मरणे यांच्या सीमारेषेवरची स्थिती. कोमा ही एक सीमाच आहे. म्हणजे सीमा हा योगायोग नाही. आता मी कथेकडे बघते. दिनूबरोबरच कैक जण कोमात आहेत. म्हणजे दिनू, सीमा आणि ते इतर सर्व यांच्यात common गोष्ट कोमा. शिवाय अपघातस्थळ ही एक सीमाच. अपघातात सापडलेला तो दुसरा गाडीवाला आणि रिक्षावाला यांचं काय ? रिक्षावाल्याबद्दल तर सर्व आधीच माहिती आहे. पण त्या दुसर्‍या गाडीवाल्याचं दुसर्‍या दिवशी लग्न आहे आणि तो पूजेला कार्यालयात चालला आहे.... कुठली पूजा असेल ? लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी कुठली पूजा असते ? सीमंतीनीची... तो ज्या पूजेला चालला आहे ते सीमांतपूजन अगदी असू शकते. म्हणजे परत सीमा आलीच.
थोडक्यात, 'सीमा' या थिअरीला consistent असे एकापेक्षा जास्त पुरावे आहेत. त्यामुळे मी सीमा, boundary, border हे मध्यवर्ती सूत्र म्हणून स्विकारते. पण यातले कुठलेच घर कुठल्याच सीमेवर नाही. सीमा या नावाचाही काही संबंध मला दिसत नाहीये. मग या सीमेचा फोकस काय ? मी परत मागे वळते... सीमा हे सूत्र का स्विकारलं ? किंवा मुळात ते लक्षात कसं आलं ? कारण ते सामायिक आहे म्हणून. अपघातस्थळ, वेळ, दिनू, सीमा, दुसरा गाडीवाला, जॅममध्ये अडकलेले बाकी सर्वजण यांच्यात सीमा common आहे.... म्हणजे त्यांची बाउंडरी कॉमन आहे.... म्हणजे त्यांची बाउंडरी एकच आहे.... या सर्वांची बाउंडरी एक आहे....पण ही तर वाडा प्रॉपर्टी आहे ! जामकाका, हे मी काय बोलते हे तुम्हाला समजावून सांगते. गिरीकाकांना हे माहिती आहेच. गणितात 'संचांची बाउंडरी एकच असणे' या प्रॉपर्टीला वाडा प्रॉपर्टी असे नाव आहे. योनेयामा या जपानी गणितज्ञाने हे सांगितले, पण त्याने त्या शोधाचे श्रेय मात्र त्याच्या वाडा नावाच्या शिक्षकास दिले. तेव्हापासून त्या गुणधर्माला वाडा प्रॉपर्टी म्हणतात. मी अजून एक उदाहरण देते... भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात वाडा प्रॉपर्टी असेल तर त्या तिघांनाही एकच सीमा असेल. म्हणजे असे की, त्या सीमेवरचा प्रत्येक बिंदू हा तिन्ही देशांच्या सीमेवर असेल. ओके ? ठिक आहे.... तर वाडा प्रॉपर्टी ! आता वाडा हा शब्द मराठी म्हणून घेतला तरी तो प्रॉपर्टीच आहे.... इस्टेट अशा अर्थाने. म्हणजे ती किल्ली शनवारातल्या त्या वाड्यात आहे... in fact, non-linear dynamics मध्ये 'Wada basins of attraction' म्हणूनही एक प्रकार असतो, त्यावरून ती किल्ली त्या वाड्यातल्या कुठल्यातरी बेसिनखालच्या पायपात आहे." मोना थांबली.
दोन क्षण शांततेत गेले. मग जामकाकांनी कागदपत्रांतून मान वर केली आणि ते म्हणाले, "अभिनंदन मोना ! तू उत्तर तर अगदी अचूक दिलंस. पण तू केलेला विचार गिरीनेही पास करायला हवा. काय गिरी ?" गिरीकाकांनी होकारार्थी मान डोलावली. "गुड ! मोना, परत एकदा अभिनंदन ! ही सगळी प्रॉपर्टी आता तुझी. आता इथे दोन ठिकाणी सह्या कर, बाकीची डॉक्युमेंट्स घेऊन मी दोन दिवसांनी घरी येईन आणि सगळं काही तुला समजावून सांगेन."
मोनाने सह्या केल्या आणि ती उठली. दारापाशी जाऊन दार उघडायला पुढे केलेला हात तिने मागे घेतला आणि ती परत टेबलपाशी आली.
"जामकाका, गिरीकाका, तुम्ही तिघांनी माझ्यावर, माझ्या क्षमतेवर फार मोठा विश्वास टाकलात. त्या विश्वासाखातरच मला एक confess करायचंय. हे खेळाचं जेव्हा मी ऐकलं तेव्हाच माझ्या डोक्यात, का कोण जाणे, असा एक विचार आला की बाबा मला काहीतरी नक्की मदत करणार, म्हणजे कथा तर झालीच, त्याशिवाय आणखी काहीतरी हिंट तो देईल.... हे माझं intuition होतं आणि झालंही तसंच. कथा सुरू करण्याआधी बाबानी जे काय सांगितलं, त्यात तो सगळ्याला मालमत्ता असं म्हणत होता, फक्त एक वेळ सोडून... जेव्हा त्यानं बंगला, फ्लॅट, फार्महाऊस, वाडा अशी नावं सलग घेतली, त्यात वाडा हे नाव सर्वात शेवटी होतं, तेव्हा मात्र तो प्रॉपर्टी म्हणाला... तेव्हाच मी थोडी चमकले होते. तेव्हाच माझ्या डोक्यात वाडा प्रॉपर्टीचा किडा वळवळला. ते intuition खरं मानून मग मी त्या intuition ला फिट बसेल असा विचार केला... म्हणजे एका अर्थी मला उत्तर आधीच माहिती होतं आणि मी तुमच्यासमोर फक्त तसा विचार करण्याचा देखावा केला..."
तेव्हा त्या भेटीत पहिल्यांदा गिरीकाकांच्या चेहर्‍यावरची घडी मोडली. ते छान हसले आणि म्हणाले, "बेटा, आता खरा तू तो खेळ जिंकलीस. Brilliant people use intelligence. Only a genius dares to use her intuition."

(ही गोष्ट आयझॅक असिमॉव्हच्या A Problem of Numbers या जबरदस्त गोष्टीवर आधारित आहे. शेवटचं वाक्यही त्याचंच. खूप धन्यवाद असिमॉव्ह !)
वाडा प्रॉपर्टीबद्दल थोडेसे अधिक इथे वाचा - http://en.wikipedia.org/wiki/Lakes_of_wada
थोडंसं या गोष्टीबद्दल... असिमॉव्हशी माझी ओळख झाली तीच त्याच्या आर्मचेअर मिस्टरीजमधून. त्याची फाउंडेशन मालिका (महान !!) मी नंतर वाचली. आर्मचेअर मिस्टरीज म्हणजे होम्स, पॉयरॉसारखं इकडे तिकडे फिरून, क्लूज गोळा करून, लोकांशी बोलून अनुमान काढायचे नाहीत, तर दिलेल्या माहितीचं खुर्चीत बसून विश्लेषण करून अनुमान काढणे (मायक्रॉफ्ट होम्सची आठवण होते इथे). असिमॉव्हच्या अशा २ पुस्तकमालिका आहेत - Black Widowers Mysteries आणि The Union Club Mysteries. त्यातल्याही उत्कृष्ठ गोष्टी The Best Mysteries of Isaac Asimov या पुस्तकात संकलित आहेत, A Problem of Numbers ही कथा याच पुस्तकातील. कथाबीज असे - एका विद्यार्थी आणि त्याच्या रसायनशास्त्राच्या गुरूची मुलगी यांचं प्रेम जमतं. लग्न करायच्या आधी 'परवानगी' मागायला म्हणून तो त्या गुरूकडे जातो, तेव्हा परवानगी मिळवण्यासाठी परीक्षा म्हणून प्रोफेसर त्याला एक आकड्यांची लांब मालिका देऊन ती 'सोडवायला' सांगतो, अट ही की विचार प्रोफेसरच्या समोरच मोठ्याने करायचा.... फार रोचक आहे.
ती गोष्ट वाचून बरीच वर्षे झाली, पण ती डोक्यात ठाण मांडून बसलीये. ती वाचली, आवडली आणि लक्षात आलं की हे आवडून घेणं पूर्ण नाही झालं. मला वाटतं की काही साहित्य हे पत्त्यांच्या खेळासारखं असतं का ? पत्त्यांचे बरेच खेळ केवळ बघायलासुद्धा मजा येते, पण पूर्ण मजा कधी येईल ? तो खेळ स्वतः खेळल्यावरच... ही गोष्ट मला तशी वाटली. हिचा पूर्ण आस्वाद घ्यायचा असेल तर तिच्या सृजनप्रक्रियेत काही करून सहभागी होता आलं पाहिजे असं सारखं वाटत राहिलं. मग काही काळाने मास्तराने वाडा प्रॉपर्टीबद्दल काही पेपर्स दिले. आता कुठल्याही मराठी मनाला 'वाडा प्रॉपर्टी' या नावातली गंमत लगेच कळेल, पण माझ्या दुर्दैवाने मी जेव्हा ती शिकलो तेव्हा जवळपास कोणीच मराठी नव्हतं, त्यामुळे ही गंमत जाणून कोणालातरी टाळी द्यायची-घ्यायची राहून गेली. या दोन खुटखुटी/रुखरुखी काढून टाकण्यासाठी ही कथा लिहिली Happy (कथेच्या खाली 'प्रकार'मध्ये 'आस्वाद' असं दिसतंय ना त्याचं कारण हेच.)

विषय: 
प्रकार: 

स्लार्टी.........अप्रतिम कथा.......अगदी खिळवून ठेवलंस...... !!

जबरदस्त कथा.. मजा आली वाचताना..

अफाट लिहिलय तुम्ही स्लार्टी. खरच दंडवत तुम्हाला. जबरी मजा आली वाचताना.

कायच्या काय भारी आहे राव ही.
एकदम आवडली. Happy
ते मोठ्याने विचार करायची अट ऐकुनच जरा वेगळच वाटल.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

भन्नाट लॉजिक स्लार्टी -
च्यायला मी तर लॉजिक-गणित वगैरेच्या वाट्याला जातच नाही फारसा पण तुझ्या कथेत मस्त जाळं विणलयंस Happy

जुन्या स्वरुपातल्या माबो.त ही कथा आज नविन स्वरुपातल्या माबो.त दिसत आहे.
अशी जबरदस्त कथा पुन्हा लिहिलीच नाही तुम्ही.

वाह!!! काय मस्त लिहिलीय कथा. खुप दिवसानी काहीतरी भन्नाट वाचायला मिळालं.
-प्रिन्सेस...

मस्त स्लार्टी! डोक्याला खूप चालना द्यावी लागते.. Happy जेव्हा ती सगळे पडताळे करून पाहात असते. पुन्हा पुन्हा स्क्रोल करून वरचे संदर्भ घ्यावे लागतात...! थोडा मेंदूला ताणच पडला Wink पण शेवट वाचताना आपणच एका भूलभुलैयातून बाहेर पड्ल्यासारखे मोकळे वाटले!! Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

मस्त स्लार्टी !!! डोक्याला छान खुराक मिळाला !!! आवडलं बुवा.

मस्तच रे स्लार्टी. लॉजिक शी इतक्या रिलेटेड गोष्टी बहुतेकदा गूढ किंवा रहस्यकथा असतात. म्हणून त्यातली उकल आवडत असूनही बाकी गुन्हेगारी किंवा विकृत संदर्भ आवडत नसल्यानं हौसेनं वाचत नाही फारशा. पण ही जबरी आहे.
आणि मुख्य म्हणजे फ्लो आणि भाषा अगदी सफाईदार आहे. त्यामुळं वाचकही मोनाचा विचार पूर्ण होईपर्‍यंत खुर्चीतून उठत नाहीत.
पुढची लिही आता लौकर.

स्लार्टी, अप्रतिम कथा!!
एकदम खिळवुन ठेवणारि,

जेंव्हा मोना सर्व गणित उकलून मांडते तेंव्हा ही गोष्ट खूप छान वेग धरते. मला पण श्रिनी ची आठवण झाली ही कथा वाचताना Happy

खूपच छान स्लार्टी. ऑसिमोव्ह वाचायचे आहे पण झेपेल का हे पुस्तक मला हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

दे टाळी !!!!!!!!

मस्त आहे !!!!!

अप्रतिमच आहे दुसरा काही शब्द्च सुचत नाही. आवड्ली.

माझी कथा वाचायची सहनशीलता फार मर्यादीत आहे पण ही कथा वाचायला लागलो आणि पुर्ण करुनच टाकली.
अतिशय छान कथा.

आणखी असीमोव ची अशी रुपांतरे वाचायला आवडतील.

शुभेच्छा!

स्लार्ती एकदम मस्त.. खिळवून ठेवणारी कथा...

अभियांत्रिकीच्या दुसर्‍या वर्षाला असताना Discrete Structures and Graph Theory (DSGT) नावाचा विषय होता... त्यात असल्या लॉजिक वर आधारित गणिते असायची त्याची आठवण झाली Happy

    ================
    आज झालो तुझी मी वदंता नवी
    कालची बातमी काल होती खरी

      शेवटी शेवटी खूप आल्या सरी

        -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

        Slarti, very well written. Keep it up.

        In the first part I felt that she was using too much information that the readers are not privy to. But since she expands on those items without bringing in too many private ones, it becomes interesting.

        Reminded me a bit of a puzzle. (May be Martin Gardner's)
        Dr. Matrix is visiting his friend. He asks about his children.
        F: I have 3 sons, the product of their ages is 36. Can you tell me their ages?
        M: Thats not enough information
        F: The sum of their ages is the same as my house number.
        M; Still not enough.
        F: last clue: the eldest one is at least one year older than the others, and goes swimming.
        M: Now I know.

        aschig - अगदी अगदी मी जेव्हा DSGT चा उल्लेख केला तेव्हा मला हेच कोडे डोक्यात आले होते आणि ते मी माझ्या रंगिबेरंगी वर टाकणार होतो ... हे आम्हाला आमच्या सरांनी घातले होते क्लास मध्ये... अर्थात मला उत्तर माहित आहे पण मी सांगत नाही... Happy

          दुसरे कुणाला येतेय का बघा...

            ================
            आज झालो तुझी मी वदंता नवी
            कालची बातमी काल होती खरी

              शेवटी शेवटी खूप आल्या सरी

                -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

                सर्वांना धन्यवाद.
                आशिष, तू पहिल्या भागासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्याला पूर्ण अनुमोदन. खरं सांगायचं तर पहिले काही मुद्दे निकालात काढण्यासाठी मी थोडा चिडीचा डाव खेळलोय इथे, कारण मी असं काही वापरतोय जे वाचकाला माहितीच नाहीये. लेखकाने जादूगारासारखं पोतडीतून कधीही काहीही काढणे या प्रकारच्या कथेत अपेक्षितच नाहीये. असिमॉव्हच्या कथा अगदी चोख ठरतात कारण त्याच्या कुठल्याच कथेत हा कच्चेपणा दिसत नाही.
                मिल्या, संगणक अभि. ला असलेले मित्र ही असली कोडी कधी कधी आम्हाला घालायचे, मग बीसीवर बसून एकत्रित विचार चालायचा Happy त्याचा फायदा झाला नक्की. एकतर शुद्ध तार्कीक विचाराशी मस्त ओळख झाली, खुराक मिळाला आणि असलीच कोडी काही कंपन्या कॅम्पसला घालायच्या तिथेही मदत झाली Happy
                आता आशिषच्या कोड्याचं उत्तर (हे मात्र मला आधी माहिती नव्हतं, आताच सोडवलंय :)) :
                SPOILER : आशिषच्या कोड्याचे उत्तर
                ३६ चे मूळ विभाजक असे - ३, ३, २, २, १
                आता तिघांच्या वयाची बेरीज मित्राच्या घरक्रमांकाइतकी होते. तो घरक्रमांक डॉ.ला माहिती असेल का ? हो, नक्कीच, कारण कोड्याची सुरूवातच 'Dr. Matrix is visiting his friend.' अशी आहे. डॉक्टर त्याच्या मित्राकडे गेलाय याचा अर्थच हा संवाद सुरू असताना डॉ.ला घरक्रमांक माहिती आहे. परंतु, ही घरक्रमांकाबद्दलची माहिती मिळूनसुद्धा डॉ. ला वय कळत नाही. म्हणजेच त्या बेरजेकडे जायला एकापेक्षा जास्त मार्ग आहेत... दिलेल्या विभाजकांची विविध combinations केली (उदा. ६, ३, २ किंवा ४, ३, ३ इ.इ.) आणि यातील प्रत्येक संचाची बेरीज वेगळी असती, तर डॉ.ने घरक्रमांकाइतकी बेरीज होत असलेला संच निवडला असता आणि त्याला वय कळले असते. परंतु, त्याला अजूनही माहिती अपुरी वाटते याचाच अर्थ एकापेक्षा जास्त संच असे आहेत ज्यांची बेरीज सारखीच आहे. आपण जर सर्व शक्य संच तपासले (ते थोडेच आहेत) तर सारखी बेरीज असणारे संच दोनच आहेत - २, २, ९ आणि १, ६, ६.
                आता तिसरी माहिती अशी की 'the eldest one is at least one year older than the other'... आता त्या संचांकडे बघू. १, ६, ६ म्हणजे मोठी मुलं जुळी आहेत. पण हे शक्य आहे का ? नाही, कारण ते जुळे असतील तर सर्वात मोठा भाऊ आणि त्याचा जुळा भाऊ यांच्यातले अंतर १ वर्षापेक्षा (खूपच) कमी होईल. म्हणजे १, ६, ६ हा संच असणे शक्य नाही. म्हणून बरोबर उत्तर २, २, ९.
                पोहण्याचा फंडा का दिलाय ते कळले नाही नीट... माझा अंदाज असा आहे की विशिष्ठ वयाचे असल्याशिवाय पोहायला जाता येत नाही असा काही कायदा असावा, ते वापरणे अपेक्षित असेल.
                आशिष, कोड्याबद्दल आणि मिल्या, अजून काही कोड्यांची आठवण करून दिल्याबद्दल सपशेल धन्यवाद Happy

                  ***
                  Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.

                  स्लार्ती : अचूक उत्तर... पोहायचा क्लू बहुतेक गोंधळात टाकण्यासाठी असावा..

                    ================
                    आज झालो तुझी मी वदंता नवी
                    कालची बातमी काल होती खरी

                      शेवटी शेवटी खूप आल्या सरी

                        -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

                        छान. हुषार आहे हा मोना. Happy
                        गोष्ट ऐकताना मला तर असे intuition झाले असते की ही प्रॉपर्टी काही आपल्याला मिळणार नाही. Proud

                        :हाहा::D लालू, डिट्टो.

                          ***
                          Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.

                          मस्तच!
                          उकल वाचायला खूप मजा आली.

                          स्लार्टी बहुत मजा आया - खूपच उशीरा वाचली गोष्ट. पण जबरी जमली आहे.
                          तळटीपेबद्दल धन्यवाद. मी ती पुस्तके पण वाचेन आता.

                          Pages