आधी बीज एकले

Submitted by सई केसकर on 2 June, 2013 - 05:39

गेले काही दिवस मोन्सॅन्टो विरुद्ध चाललेल्या या चळवळीनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. याच्या मुळाशी बर्‍याच गोष्टी असल्या तरी सध्या प्रसिद्धी मिळालेली एक लक्षवेधी कोर्ट केस आहे. अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील ह्यु बोमन या शेतकर्‍याला मोन्सॅन्टो या मल्टी बिलियन डॉलर बायोटेक साम्राज्यानी कोर्टात नेले. त्याच्यावर पॅटंट व्हॉयलेशनचा दावा लावण्यात आला. ही केस हा शेतकरी हरला आणि त्याला मोन्सॅन्टोला ऐंशी हजार डॉलर चा दंड द्यावा लागला. पण या चळवळीमागचा जो मोठा तात्विक मतभेद आहे तो समजून घेण्यासारखा आहे. बायोटेक जगतातील ६० % बियाण्याचा व्यापार जगातील ५ मोठ्या कंपन्या बळकावून बसल्या आहेत. मोन्सॅन्टो, सिंजेंटा, बेयर, डाऊ आणि डु पॉन्ट या कंपन्या १९९० सालापासून बियाण्यांच्या व्यापारात पद्धतशीरपणे छोट्या बियाणे विक्रेत्यांना आणि शेतकर्‍यांना संपवण्याचे काम करत आहेत. जेनेटिक मॉडीफिकेशन केलेल्या बियांचे मालकी हक्क या कंपन्या पॅटंटच्या स्वरूपात स्वत:कडे ठेवतात. यामुळे शेतकरी आपल्या पिकातून उत्पन्न होणार्‍या बिया पुढच्या पिकासाठी वापरू शकत नाहीत. प्रत्येक पिकासाठी नवीन बियाणं वापरायला ते बांधील होतात. अमेरिकेतील दीडशे शेतकर्‍यांवर मोन्सॅन्टोनी गेल्या काही वर्षांत असे दावे लावले आहेत. भारतातही बी. टी कापूस बियाणे विकून अधिक उत्पादनाचे खोटे दावे करून कित्येक शेतकर्‍यांच्या दिवाळखोर बनवण्यात मोन्सॅन्टोचा काही प्रमाणात नक्कीच हात आहे. (फिल्म बघा)

छोट्या छोट्या बियाणे विक्रेत्यांना खलास करून जेनेटिकली मॉडीफाय केलेल्या बियाण्यांनी बाजारपेठ भरून टाकायची. आपणच तयार केलेल्या जहाल कीटकनाशकांचा सामना करू शकणार्‍या बिया जेनेटिकली मॉडीफिकेशन करून बनवायच्या आणि त्या मालकी हक्कानी शेतकर्‍याला विकायच्या. अशी एक दुष्ट साखळी तयार झाली आहे. या मॉडीफिकेशनचे दुष्परिणाम प्रकट होण्याआधीच हे बियाणे अमेरिकन बाजारपेठेत विकले जाते. आणि या मागे अमेरिकन सरकार आणि मोन्सॅन्टोचे मेतकूट हे एकमेव कारण आहे. युरोपियन युनियन, भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान अशा कित्येक देशांनी मोन्सॅन्टोच्या जी.एम खाद्य धन्याला बंदी केली आहे. भारतातील शेतकर्‍यांनी काही पिढ्यांपासून तयार केलेल्या वांग्याच्या जातीवर जी. एम. ओ. चा शिक्का लावून विकण्यापासून काही वर्षांपूर्वी मोन्सॅन्टोला रोखण्यात आलं.

अमेरिकेतील ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक मका आणि सोया हा जी. एम आहे. कुठल्याही प्रोसेस्ड खाद्य पदार्थात काही प्रमाणात मका वापरला जातो. सोयाबीन मुख्यत: गुरांना खायला देतात. परंतू, या प्रक्रियेचे दुष्परिणाम दूध आणि मासांहारावाटे फूड चेन मध्ये पसरतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर जी. एम. खाद्य धान्य सर्रास वापरणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. या धान्याच्या दुष्परिणामांवरच्या संशोधनावरदेखील या कंपन्यांनी रोख लावला आहे. (हा लेख जरूर वाचा)

अमेरिकन लेखक मायकल पोलान यांनी या अन्न बाजाराचे फार मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात की आपल्या शरिरात जाणार्‍या अन्नावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर स्वयंपाक करण्यासारखा उपयुक्त मार्ग नाही. पण ज्या धान्यापासून आपण स्वयंपाक करतो, ज्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात येतात, त्यांच्या मूळ
बांधणीतच जर निसर्गाच्या विरुद्ध जाऊन हस्तक्षेप करण्यात येत असेल तर विश्वास कशावर ठेवायचा? त्यामुळे
जी. एम खाद्यावर लेबल लावण्याची नितांत गरज आहे.

बिजातून रोप उगवण्याची क्रिया ही निसर्गानी मानवला दिलेली भेट आहे. त्यावर कुठलेही भांडवलशाही साम्राज्य असा अधिकार सांगू शकत नाही. तसे केल्यानी जगभरात शेतकर्‍यांचे बळी जातील यात वाद नाही. आणि या मूलभूत तात्विक मुद्द्यासाठी सामान्य माणसांनी लढायची गरज आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप चांगला लेख सई.
थोडं अजून सविस्तर यायला हवं होतं.
उदा. जी एम चे दुष्परिणाम लिंकमध्ये न देता या लेखातच समाविष्ट व्हायला हवे होते.

शेतकर्यांना जास्तीत जास्त मिंधं बनवणार्या या मोन्सॅटोगिरीला वेळीच रोखलं पाहिजे.

चांगला लेख! अजून विस्ताराने लिहा. आमच्या इथे हा फार जिव्हाळ्याचा विषय. एअरलुम बियाणे टिकवणे, जैव वैविध्य जपणे फार महत्वाचे आहे. एअरलुम सीड बँक्स बद्दल वाचायला आवडेल.

चांगला लेख सई. मुख्य म्हणजे मध्यंतरी मोठ्या प्रमाणात मोन्सान्टो विरुद्ध लोकांनी मोर्चे काढले, निदर्शने केली, परंतु मेनस्ट्रीम मीडियाने या बद्दलचे वृत्त दिलेच नाही!!

ही एक यूट्यूबवरची लिंक :

How GMO foods alter organ function and pose a very real health threat

ही माहिती एका स्नेह्यांनी फेबुवर शेअर केलेली : http://www.organicconsumers.org/monsanto/news.cfm

monsanto1.jpg

अकु, या वरच्या लोकांनी नक्की काय केले याची काही लिस्ट आहे का? की ते कुठूनतरी monsanto शी संबंधित होते/आहेत एवढेच? Happy काहींचे कनेक्शन तर जुनाट आहेत, आणि त्यांच्या नंतरच्या पोझिशन्स पाहता त्यांनी काय केले असावे याचा अंदाज येत नाही. रमस्फेल्ड काय करणार? Wink

लेखाचा फोकस ठरवायला पाहिजे किंवा जीएम चे दुष्परिणाम आणि बाकी राजकारण हे दोन वेगवेगळ्या भागात येऊदे.

लोला, सत्ताधीश सरकारातील मंडळींचा मोन्सान्टोच्या कोणत्याही निर्णयांमध्ये (त्यांची त्या कंपनीतील पदे बघू जाता) काहीच संबंध नाही असेही छातीठोकपणे कोणी म्हणत नाहीये. त्या वरच्या साईटवर बरेच लेख / हायलाइट्स आहेत अमेरिकन सरकार व मोन्सान्टोच्या परस्पर-संबंधांविषयी. त्यातच मोन्सान्टोचे निर्णय, त्यांचा अमेरिकन शेतकर्‍यांना भोगायला लागणारा त्रास, ग्राहकांना होणारा त्रास इ. बरीच माहिती एकत्रित स्वरूपात दिली आहे.

<< लेखाचा फोकस ठरवायला पाहिजे किंवा जीएम चे दुष्परिणाम आणि बाकी राजकारण >> अनुमोदन. पण तरी सध्या ते परस्परांशी संबंधित आहेत असेच चित्र दिसते आहे.

काही धोकादायक पद्धतींवर युरोपमध्ये बंदी घातली आहे तरी त्या अमेरिकेत अस्तित्त्वात आहेत. त्यांविषयी अमेरिकन सरकारचे काही स्पष्टीकरण असेल तर ते वाचायला जरूर आवडेल.

>>काहीच संबंध नाही असेही छातीठोकपणे कोणी म्हणत नाहीये
म्हणजे नुसते संशयाचे भूत सोडून दिले म्हणा की.. Wink

जीएम चे दुष्परिणाम आणि बाकी राजकारण
हे कसे काय संबंधित आहे? मी जीएम च्या दुष्परिणामांच्या शास्त्रीय माहितीबद्दल म्हणत आहे.

पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला का? भारतात काही वर्षांपूर्वी यावर घणाघाती चर्चा सुरू होती. मग सगळं मागेच पडलं. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहेच. चर्चा होऊ द्यात.

माझ्या वाचनात आलेल्या ह्या काही लिंक्स...

लिंक्समध्ये मोन्सान्टो, अमेरिकन सरकाव व मोन्सान्टो हितसंबंध आणि जी.एम.ओ. फूड अशी सरमिसळ आहे हे मान्य! पण या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्या मला तरी उपयुक्त वाटल्या.

Doctors Warn: Avoid Genetically Modified Food

First ever long-term study on GE food health effects

President Obama Signs ‘Monsanto Protection Act’

या आठवड्यात नक्की विस्तार करीन पण दुष्परिणामांसाठी योग्य माबो करांची मदत मिळाली तर जास्त आवडेल.हा माझा प्रांत नाही त्यामुळे त्यावर शास्त्रीय लेखन करायचा आत्मविश्वास कमी पडतो. मी अर्धा आ णि कुणी दुसर्‍या त्या शाखेतल्या माबो करा नी मिळून लिहिला तर जास्त छान होईल.

सई, चांगला आढावा घेतला आहेस.

>>या वरच्या लोकांनी नक्की काय केले याची काही लिस्ट आहे का? की ते कुठूनतरी monsanto शी संबंधित होते/आहेत एवढेच? काहींचे कनेक्शन तर जुनाट आहेत, आणि त्यांच्या नंतरच्या पोझिशन्स पाहता त्यांनी काय केले असावे याचा अंदाज येत नाही. रमस्फेल्ड काय करणार?
मॉन्सँटोच्या पेरोलवर असल्यामुळे डायरेक्टली-इन्डायरेक्टली कंपनीच्या हिताचं काम केलं असणार यात शंका नाही.

>>जीएम चे दुष्परिणाम आणि बाकी राजकारण हे दोन वेगवेगळ्या भागात येऊदे.
अनुमोदन.

सई चांगला लेख. इतक्यात एका नव्या जी एम गव्हाच्या जातीबद्दल रेडिओवर ऐकत होते. तो गहू जपानने स्विकारायला नकार दिलाय. आणि त्याचे काही दुष्परिणाम इ. बद्दल अर्थातच काहीच उल्लेख नव्हता. कुठे खपवणार काय माहित Sad

तुझ्या सगळ्ञा लिंक्स सविस्तर वाचेन. अजून विस्तृत मराठीत वाचाय्ला आवडलं असतं अर्थात तुझी वरची प्रतिक्रिया वाचली..ठीक आहे..निदान या विषयाचे बीज पेरलेस हेही महत्वाचे Happy

revolving door regulation मधील लुपहोल्स वापरुन बरेच काही घडते जे सामान्य ग्राहकापर्यंत पोह्चत नाही. छातीठोकपणे संबंध नाही हे दाखवून देण्याची जबाबदारी लॉमेकर्सची. Happy
http://ivn.us/2013/02/11/the-revolving-door-fda-and-the-monsanto-company/

सई छान आढावा .
मॉन्सँटोच्या पेरोलवर असल्यामुळे डायरेक्टली-इन्डायरेक्टली कंपनीच्या हिताचं काम केलं असणार यात शंका नाही. >>> +१ , लोला आता असतील किंवा पुर्वी असतील . पॉलिटिकल लोकांना मोठ मोठ्या कंपन्या कशासाठी मोठ्या पदावर घेतात हे काही आता लपुन राहिलेलं नाही.

ओके. अकुने एक रँडम इमेज टाकल्याने जे व्हायचे ते झाले आहे. "नुसता चार्ट" ते " केले नसेलच असेही कोणी म्हटलेले नाही" यावरुन पुढे "केले असणार शंकाच नाही" इथवर आलेलं आहे. Proud
अजून विषय भरकटू नये त्यामुळे पुढे सरकू.

वरच्या यादीतली काही आणि काही अ‍ॅडिशनल नावं, त्यांचा कंपनीशी थेट संबंध, राजकारणातला त्यांचा सहभाग, त्यामुळे कंपनीचा झालेला फायदा याची थोडक्यात माहिती खालच्या काही लिंक्सवर आहे. त्यातल्या माहितीची सत्यासत्यता पारखून घ्यायला आणखी काही विश्वासार्ह लिंका मिळाल्या तर बघा.

http://childrenofthelastgeneration.newsvine.com/_news/2012/01/30/1027029...

http://www.seattleorganicrestaurants.com/vegan-whole-food/political-corr...

http://www.organicconsumers.org/bytes/ob121.cfm#7 (How Did We Get Here: A Brief History of Monsanto and the US Government)

हे थेट कंपनीच्या वेबसाइटवरः. (यात अवैध काही नाही, कंपनीची पोलिटिकल काँट्रिब्यूशन्स जिथे लॉफुल आहे अशाच राज्यांत आहे.. पण अर्थातच कंपनीचा अजेंडा पुढे ढकलायला मदत करणारी, इंटरेस्टची जपवणूक करणारी आहे.) The Monsanto Good Government Fund
http://www.monsanto.com/whoweare/Pages/political-disclosures.aspx

उत्तम लेख!
अकुने दिलेली यादी फार महत्वाची आहे. मोन्सॅन्टोच्या याच 'रिव्हॉल्विंग डोअर पॉलिसी' मुळे अनेक महत्वाचे सरकारी निर्णय/पॉलिसिज त्यांच्या सोयीच्या बनवण्यात आल्या. यातील सर्वात शास्त्रीयदृष्ट्या सर्वात चुकीची पॉलिसी म्हणजे 'प्रिन्सीपल ऑफ सबस्टॅनशिअल इक्विव्हॅलेन्स' अर्थात 'जीएम फूड आणि नैसर्गिक अन्न यात काही फरकच नाही'
मॉन्सॅन्टोच्या भयाकारी ताकदीबद्दल कोणाला शंका असेल तर त्यांनी 'वर्ल्ड अकॉर्डींग टू मॉन्सॅन्टो' http://www.youtube.com/watch?v=N6_DbVdVo-k ही डॉक्युमेंट्री जरुर पहावी.

साधना +१
मला प्रश्न आहेत

...आपणच तयार केलेल्या जहाल कीटकनाशकांचा सामना करू शकणार्‍या बिया जेनेटिकली मॉडीफिकेशन करून बनवायच्या आणि त्या मालकी हक्कानी शेतकर्‍याला विकायच्या.

>>>> कोणत्याही बी बियाणांना जेनेटिकली मॉडिफाय करण्याचं कारण(णे) काय काय असतात?
फक्त कीटकनाशकांचा सामना करु शकायला हवीत हेच? इतकं कीटकनाशकांचं मार्केट मोठं आहे? की त्याला धक्का बसू नये म्हणून अशा जायंट कंपन्या बीया जेनेटिकली मोडिफाय करण्यासाठी लागणार्‍या रिसर्च्वर वेळ आणि पैसे खरच करतील?
जेनेटिकली मॉडिफाइड हे नेहेमी दुष्परिणामच करतं का? सेफ जेनेटिक मॉडिफिकेशन असं काही असू शकतं का?
भरताची किंवा भाजीची वांगी बिनबियांची मिळायला लागली तर फारच आवडेल की सर्वांना मग त्यासाठी जेनेटिक मॉडिफिकेशन करावच लागेल ना?

नॉन GMO विकत घ्यायचा नेहेमीच प्रयत्न करते पण ह्या बाबीच खूप विचार केला तर फार लवकर मी इन्सॅनिटीच्या लेवल ला जाते आणि मग मान्य करावच लागतं की माझा खूप कमी कंट्रोल ह्या गोष्टींवर आहे ..

मोन्सॅन्टोचे round up नावाचे तण नाशक आहे. त्यात glyphosphate हे रसायन असतं. जेनेटिकली मॉडीफिकेशन करून सोया पीक त्या तण नाशकामुळे मरणार नाही पण तण मात्र मरेल अशी करामत मोन्सॅन्टोने केली आहे. त्यामुळे शेतात वाट्टेल तेवढं round up मारून तण आटोक्यात ठेवण्याचा प्रघात पडतो आहे. यामुळे शेताच्या आजूबाजूची जमीन, त्यातील पाणी यात या केमिकलचा निचरा होतो. South अमेरिकेत अशी सोया लागवड करून सोयाबीन अमेरिकेत आणायचा आणि तिथल्या लोकांना glyphosphate चे दुष्परिणाम भोगायला लावायचे असा सोयीस्कर मार्ग मोन्सॅन्टोनी अवलंबला आहे. आणि आधी round up विकायचं (त्यातून ढीगभर पैसा) मग round up resistant बियाणं पेटंट वर विकायचं (त्यातूनही ढीगभर पैसा!). आणि अशा यथॆछ फवारणीचा परिणाम असा होतो की त्या रसायनाला resistant तणदेखील निसर्ग निर्माण करतो. अमेरिकेत सध्या चर्चेत असलेले सुपर बग्स सुद्धा याच श्रेणीतले. याबद्दल अर्थातच अमेरिकन मिडिया बोलणार नाही. म्हणून हा दुवा बघा. अल जजीरा मध्ये Al Gore ची गुंतवणूक आहे. CNN, FOX, MSNBC and all other popular news channels in the US are unlikely to ever broadcast this. But I encourage readers to go through their documentaries and make up their mind about it.

http://www.aljazeera.com/programmes/peopleandpower/2013/03/2013313134341...

सुंदर लेख.

सेफ जेनेटिक मॉडिफिकेशन असं काही असू शकतं का? >>>> हे पहा -सेल्फ जेनेटिक मॉडिफिकेशन - नॅचरल म्युटेशन ....

संशोधक शेतकरी - श्री. दादाजी खोब्रागडे.

रोजच्या निरीक्षणातून काहीतरी वेगळं घडत असल्याचं लक्षात येण्याची आणि यांतून चांगल्या गोष्टींचा दीर्घकाळ पाठपुरावा करण्याची क्षमता फार थोड्या लोकांना लाभलेली असते. अशी निरीक्षणक्षमता लाभलेले दादाजी खोब्रागडे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड गावचे कष्टाळू शेतकरी. त्यांनी नेहमीप्रमाणे पटेल-३ ही भाताची जात आपल्या शेतात १९८३ साली लावली. भाताच्या लोंब्या जेव्हा निसवायला लागल्या तेव्हा दादाजींची नजर वेगळ्या दिसणार्‍या तीन लोंब्यांवर गेली. शेतातील इतर लोंब्यांपेक्षा या तीनच लोंब्या इतक्या वेगळ्या का आणि कशा ?

या तीन लोंब्यांवर सतत नजर ठेवून कापणीच्या वेळेस वेगळ्या काढून, सुकवून निघालेलं धान्य जपून ठेवलं. पुढील पाच वर्षं कुणाला काहीही न सांगता दादाजींनी भाताचं हे बीजगुणन चालू ठेवलं. १९८३ मध्ये तीन लोंब्यांपासून प्रारंभ झालेला प्रवास १९८९मध्ये तीन क्विंटल उत्पादनापर्यंत पोहोचला आणि अनेक वर्षांच्या चुकांपासून शिकत शिकत अखेर एक नवीन वाण्(जात) निर्माण झालं. या वाणातील तांदूळ प्रचलित वाणापेक्षा वेगळ्या प्रकारचा, दिसायला आकर्षक, अत्यंत बारीक दाणे असलेला आणि चवदार होता. हातावरील मनगटी घड्याळाच्या हिंदुस्तान मशीन टूल्स नावावरुन या वाणाचं एच. एम. टी. असं नामकरण झालं.

घरच्या गरिबीमुळे त्यांना खूप अडचणी आल्या. पण त्यातूनही त्यांनी भाताच्या नऊ जाती शोधल्या. अशा या दादाजींना ५ जाने. २००५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या सोहळ्यात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या हस्ते ५० हजार रु., स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
अहोरात्र राबून उपेक्षित जीवन जगणारा एक अल्पभूधारक शेतकरी, ज्याच्यामुळे देशातील अनेक लोकांचे जीवन पालटले -अशा या व्यक्तिची दखल अमेरिकेतील फोर्ब्स या मासिकाने घेतली व २०१० साली त्याला प्रसिद्धी दिली.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेतली व त्यांना २५हजार रु. व ५० ग्रॅ सोन्याचे पदक देऊन सत्कार केला.
-साभार दै. लोकसत्ता पुणे आवृत्ती (४ जून २०१३, लेखिका- शुभदा वक्टे, मराठी विज्ञान परिषद, मुंबई २२)

जबरदस्त लिंक सई, अल जझीराचे कार्यक्रम अनेकदा खर्‍याखुर्‍या प्रश्नांना हात घालणारे असतात.
संभाव्य धोक्यांची पूर्ण कल्पना नसताना आणि प्रार्थमिक संशोधनातच दिसून आलेल्या धोक्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करुन केवळ आर्थिक फायद्यासाठी जिएमओला पुढे ढकलणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. याची तुलना रेडिएशनचा मानवावर काय परिणाम होऊ शकतो याची फारशी माहिती नसूनही हिरोशिमा-नागासाकीवर अ‍ॅटमबाँब टाकण्यात आले, याच्याशीच होउ शकते.
त्याचे फायदे असतीलही पण ते शास्त्रियदृष्ट्या सिद्ध तरी होउद्या.
नॉन जिएमओ प्रॉडक्ट निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाला हवे हा देखील यातला महत्वाचा मुद्दा आहे.

Pages