आधी बीज एकले

Submitted by सई केसकर on 2 June, 2013 - 05:39

गेले काही दिवस मोन्सॅन्टो विरुद्ध चाललेल्या या चळवळीनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. याच्या मुळाशी बर्‍याच गोष्टी असल्या तरी सध्या प्रसिद्धी मिळालेली एक लक्षवेधी कोर्ट केस आहे. अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील ह्यु बोमन या शेतकर्‍याला मोन्सॅन्टो या मल्टी बिलियन डॉलर बायोटेक साम्राज्यानी कोर्टात नेले. त्याच्यावर पॅटंट व्हॉयलेशनचा दावा लावण्यात आला. ही केस हा शेतकरी हरला आणि त्याला मोन्सॅन्टोला ऐंशी हजार डॉलर चा दंड द्यावा लागला. पण या चळवळीमागचा जो मोठा तात्विक मतभेद आहे तो समजून घेण्यासारखा आहे. बायोटेक जगतातील ६० % बियाण्याचा व्यापार जगातील ५ मोठ्या कंपन्या बळकावून बसल्या आहेत. मोन्सॅन्टो, सिंजेंटा, बेयर, डाऊ आणि डु पॉन्ट या कंपन्या १९९० सालापासून बियाण्यांच्या व्यापारात पद्धतशीरपणे छोट्या बियाणे विक्रेत्यांना आणि शेतकर्‍यांना संपवण्याचे काम करत आहेत. जेनेटिक मॉडीफिकेशन केलेल्या बियांचे मालकी हक्क या कंपन्या पॅटंटच्या स्वरूपात स्वत:कडे ठेवतात. यामुळे शेतकरी आपल्या पिकातून उत्पन्न होणार्‍या बिया पुढच्या पिकासाठी वापरू शकत नाहीत. प्रत्येक पिकासाठी नवीन बियाणं वापरायला ते बांधील होतात. अमेरिकेतील दीडशे शेतकर्‍यांवर मोन्सॅन्टोनी गेल्या काही वर्षांत असे दावे लावले आहेत. भारतातही बी. टी कापूस बियाणे विकून अधिक उत्पादनाचे खोटे दावे करून कित्येक शेतकर्‍यांच्या दिवाळखोर बनवण्यात मोन्सॅन्टोचा काही प्रमाणात नक्कीच हात आहे. (फिल्म बघा)

छोट्या छोट्या बियाणे विक्रेत्यांना खलास करून जेनेटिकली मॉडीफाय केलेल्या बियाण्यांनी बाजारपेठ भरून टाकायची. आपणच तयार केलेल्या जहाल कीटकनाशकांचा सामना करू शकणार्‍या बिया जेनेटिकली मॉडीफिकेशन करून बनवायच्या आणि त्या मालकी हक्कानी शेतकर्‍याला विकायच्या. अशी एक दुष्ट साखळी तयार झाली आहे. या मॉडीफिकेशनचे दुष्परिणाम प्रकट होण्याआधीच हे बियाणे अमेरिकन बाजारपेठेत विकले जाते. आणि या मागे अमेरिकन सरकार आणि मोन्सॅन्टोचे मेतकूट हे एकमेव कारण आहे. युरोपियन युनियन, भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान अशा कित्येक देशांनी मोन्सॅन्टोच्या जी.एम खाद्य धन्याला बंदी केली आहे. भारतातील शेतकर्‍यांनी काही पिढ्यांपासून तयार केलेल्या वांग्याच्या जातीवर जी. एम. ओ. चा शिक्का लावून विकण्यापासून काही वर्षांपूर्वी मोन्सॅन्टोला रोखण्यात आलं.

अमेरिकेतील ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक मका आणि सोया हा जी. एम आहे. कुठल्याही प्रोसेस्ड खाद्य पदार्थात काही प्रमाणात मका वापरला जातो. सोयाबीन मुख्यत: गुरांना खायला देतात. परंतू, या प्रक्रियेचे दुष्परिणाम दूध आणि मासांहारावाटे फूड चेन मध्ये पसरतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर जी. एम. खाद्य धान्य सर्रास वापरणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. या धान्याच्या दुष्परिणामांवरच्या संशोधनावरदेखील या कंपन्यांनी रोख लावला आहे. (हा लेख जरूर वाचा)

अमेरिकन लेखक मायकल पोलान यांनी या अन्न बाजाराचे फार मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात की आपल्या शरिरात जाणार्‍या अन्नावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर स्वयंपाक करण्यासारखा उपयुक्त मार्ग नाही. पण ज्या धान्यापासून आपण स्वयंपाक करतो, ज्या भाज्या आणि फळं आपल्या आहारात येतात, त्यांच्या मूळ
बांधणीतच जर निसर्गाच्या विरुद्ध जाऊन हस्तक्षेप करण्यात येत असेल तर विश्वास कशावर ठेवायचा? त्यामुळे
जी. एम खाद्यावर लेबल लावण्याची नितांत गरज आहे.

बिजातून रोप उगवण्याची क्रिया ही निसर्गानी मानवला दिलेली भेट आहे. त्यावर कुठलेही भांडवलशाही साम्राज्य असा अधिकार सांगू शकत नाही. तसे केल्यानी जगभरात शेतकर्‍यांचे बळी जातील यात वाद नाही. आणि या मूलभूत तात्विक मुद्द्यासाठी सामान्य माणसांनी लढायची गरज आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे लोक घरात पदार्थ शिजवून खातात त्यांना एक वेळ आपण कोणते धान्य - पदार्थ घरी आणतोय यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. पण काही कारणाने घराबाहेर जेव्हा तयार अन्न खावे लागते तेव्हा त्यात कोणत्या प्रकारचे धान्य वापरले आहे, कोणते घटक आहेत त्यावर आपले नियंत्रण उरत नाही किंवा कमी उरते. इतर कोणाच्या घरी, फंक्शन्सना, पार्टी किंवा अन्य प्रसंगी आपल्या समोर येणारे अन्न हे कोणत्या धान्यापासून बनले आहे हे कसे कळणार?
स्कूल लंचेस बद्दल अ‍ॅन कूपर यांचा हा टेड.कॉम वरचा संवाद जरूर पाहा.

छान लेख सई.

-जिएम बियाणं असलं कि पिक आल्यावर त्या पिकातुन पुढच्या पिकाचं बियाणं मिळत नाही. म्हणजे प्रत्येक पिकाचे बियाणे विकतच घ्यावे लागते. म्हणजे शेतकर्‍याचा खर्च वाढतो.>>>
अवांतर - १-२ वर्षांपूर्वी सकाळच्या रविवारच्या पुरवणीत (बहुदा राजन गवस) ह्यांचे लेख यायचे. त्यात एका लेखात त्यांनी हा बियाणांचा उल्लेख केला होता. पुर्वीच्या काळच्या बियाणे साठविण्याच्या पद्धतीवरही लिहीले होते.

उत्तम लेख..
विशेष म्हणजे, तात्विक चर्चेचा रोजच्या व्यवहारातील गोष्टींशी असणारा इतका घट्ट सहसंबंध फार कमी वेळा पहायला मिळतो..

हा आहे पेटंट कायद्याचा भस्मासूर .त्यांचेच कायदे त्यांनाच मारक ठरू लागले आहेत .युरोपातून नवीन जग अथवा सोने शोधायला बाहेर पडले आणि वसाहती केल्या .बंदुकीने तेथील रेड इंडिअनसना मारून मोठमोठ्या जमिनी बळकावल्या .सर्वात मोठा गुन्हा 'stresspassing' ठरवून (दुसऱ्याच्या खाजगी जागेत विनाअनुमती जाणे) मालक त्याला गोळी मारू शकतो .स्वत: त्यांनी हीच गोष्ट केलीय . इकडे भारतात चोराला पकडतांना जर त्याचा दात तुटला तर मालकावरच 'कायदा हातात घेणे' ,'जबरी मारहाण 'चा फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्याच्यावरच लगेच तुरुंगात जाण्याची वेळ येते . चोराला मात्र 'चोरीचा माल तुमचाच आहे का' ,साक्षीदार हे कोर्टात सिध्द झाल्याशिवाय शिक्षा होत नाही .सांगण्याचा मुद्दा की भरपूर फायदे उकळायच्या दृष्टीने व्यापारी ,प्रॉपटिधारक आणि सरकार यांनी जाचक कायदे करून घेतले आहेत .भारत आतरराष्ट्रिय व्यापार करारात सामिल झाल्यामुळे इकडेही बंधने लागू झाली आहेत .हळदीचे आणि बासमती चे पेटंट ,'अॅंटि डंपिग' 'अॅंटि सबसिडि' वगैरे त्यातलीच उदा:हरणे आहेत .

जिएम बियाणे,बायोकल्चर रोपे अथवा इतर संकरित कलमे यात एक मुख्य गोष्ट म्हणजे त्यांचे बी पुन्हा रुजत नाही त्यामुळे शेतकऱ्याला महागडे बियाणे विकत घ्यावे लागते जसे केळी ,कापूस ,ढोबळी मिरची .आणि ज्याचे बी पुन्हा बनू शकते ते शेतकरी पुन्हा वापरू नयेत म्हणून कायद्याचा बडगा .तसेच लागणारी खते ,औषधे यासाठी पुन्हा त्यांच्याकडेच जावे लागेल असे फिक्सिंग असते .(एकदा स्माटफोन घेतल्यावर एपस् साठी परत धंधा चालू राहातो तसा).

आयुर्वेदात पंचगव्याला खुप महत्व दिले आहे .पण चारा ,पाणी आणि गाय( संकरित नाही) देखील शुध्द आणि रसायनांपासून मुक्त असल्यासच पंचगव्याला काही गुण येण्याची शक्यता आहे .कर्नाटकातील एका शेतकऱ्याने प्रथम सुदूर खेड्यातून गायी आणल्या .शेतात खड्डे करून पावसाचे पाणी साठवले .चारा पिकवून फवारे न मारता तो गायींना देतो .त्यांना कोणतेही औषधे देत नाही .या गायींचे तुप ,गोमुत्र ,शेणाची राख (दंतमंजन) तो विकतो .

उत्तम लेख. असे लेख मी लोकसत्तेत वाचलेय, त्यात तुलनेचा लेख. अधिक वाचायला आवडेल, कृपया विस्तार करा किंवा दुसरा मोठा लेख ज्यात अनेक मुद्दे एकत्र असतील असं लिहा.

धन्यवाद.

अतिशय माहितीपूर्ण लेख! सध्या मी कोर्सेराचा Sustainability of Food Systems: A Global Life Cycle Perspective हा कोर्स करत आहे, त्यातही बरीच महत्त्वपूर्ण माहिती मिळत आहे.

Pages