गाण्यांच्या अनुषंगाने अधिक माहिती

Submitted by गजानन on 8 May, 2013 - 13:19

'सख्या रे घायाळ मी हरिणी' हे गाणं रेकॉर्ड करायच्या आधी लतानं ते फक्त एकदाच ऐकलं होतं म्हणे. ऐन रेकॉर्डींगच्या दिवशी दुसर्‍या एका गाण्याचे रेकॉर्डींग लांबल्यामुळे त्या या गाण्याच्या रेकॉर्डींगला येऊ शकल्या नाहीत. पण तोपर्यंत तुम्ही हे गाणं दुसर्‍या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड करा (तात्पुरते म्हणून) असे त्यांनी संगीतकारांना कळवले. म्हणून मग ते रवींद्र साठ्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतरच्या ठरलेल्या दिवशी लता मंगेशकर रेकॉर्डींगला आल्या. तोपर्यंत त्यांनी हे गाणं किंवा त्याची चाल अक्षरशः एकदाही ऐकली नव्हती. आल्यावर त्यांनी ते गाणं आपल्या अक्षरात लिहून घेतलं. मग त्यांनी रवींद्र साठ्यांच्या आवाजातलं रेकॉर्डींग लावायला सांगितलं आणि एकाग्रतेने ऐकलं. ऐकताना कागदावरच्या ओळींवर खुणा केल्या. ते गाणे संपल्यावर रेकॉर्डींगला सुरुवात करण्यास सांगितले. एकाच टेकमध्ये गाणं ओके. पंधरामिनिटांपूर्वी पहिल्यांदा ऐकलेले गाणे एका फटक्यात उच्चार आणि स्वरांचे चढउतार, वाद्यांचा मेळ हे सगळं अचूक साधत इतक्या चांगल्या दर्जात केवळ लतासारखी महान माणसंच देऊ जाणं!

हा किस्सा परवा लोकसत्तेत वाचला आणि मला जुन्या मायबोलीवरच्या बीबीची आठवण आली - http://www.maayboli.com/hitguj/messages/34/45568.html

तो धागा इथं 'पुढे चालू....' ठेवू...

एखाद्या गाण्याच्या निर्मितीदरम्यान / निर्मितीनंतरचा किंवा त्या एखाद्या गाण्याच्या चालीशी संबंधित असलेला किंवा त्या गाण्याच्या अनुषंगाने त्याच्या संगीतकारांचा/गायकांचा/गीतकारांचा आपण वाचलेला/ऐकलेला असे किस्से लिहिण्यासाठी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीडी, मी हि वाचला तो लेख Happy

माझ्याकडे रविंद्र साठेंच्या आवाजातील "सख्या रे घायाळ मी हरिणी" आहे. Happy

योगेश, खरेच काय! मला तो लेख वाचताना ते गाणं रवींद्र साठ्यांच्या आवाजात ऐकायची खूप इच्छा झाली होती. तुला कुठे मिळालं?

रविंद्र साठेंची एक सीडी होती माझ्याकडे त्यात हे गाणं होतं (सीडी कुणीतरी नेली ती परत दिलीच नाही Sad ). मी संगणकावर सेव्ह करून ठेवलं आहे. तुला पाहिजे असेल तर देतो. Happy

रवींद्र साठेंच्या आवाजातलं ते गाणं रेकॉर्डमध्येही समाविष्ट केलं गेलं (लताच्या सांगण्यावरून?). आकाशवाणीवर वाजवलं जातं. मला ते 'सख्या रे, घायाळ मी हणी' असं ऐकू येतं.

>> ते 'सख्या रे, घायाळ मी हरणी' असं ऐकू येतं.

असं रविंद्र साठ्यांच्या आवाजात ऐकायला येतं का?

जिप्सी, मलाही ऐकायला आवडेल .. Happy (चिनूक्स् अगदी इथेच आहे .. मला पाठव असंही म्हणणं कठिण .. Wink

BTW, वर अल्बम् म्हंटलंय तो कुठला अल्बम?

माझ्याकडे "घायाळ मी हरिणी" नावाचा अल्बम आहे त्यात फक्त लताचीच आहेत सगळी गाणी ..

माझ्याकडे असलेल्या सीडीचे नाव (बहुतेक) "माती भिडली आभाळा" (एचएमव्ही) त्यात खालील गाणी होती. Happy

१. मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना (चित्रपटः मुलगी झाली हो)
२. धिक तुला धिक मला धिक्कारतो जगाला
३. सख्या रे घायाळ मी हरणी (चित्रपटः सामना)
४. बंद ओठांनी निघाला पेटलेला एकला (चित्रपटः सर्वसाक्षी)
५. हा नंदाचा कान्हा घालतो कसा धिंगाना
६. गाव असा नि माणस अशी (चित्रपटः गारंबीचा बापू)
७. हा दैव गतीचा फेरा
९. पिक करपंल पक्षी दूर देशी गेल (चित्रपटः जैत रे जैत)
१०. अजब सोहळा माती भिडली आभाळा (चित्रपटः गारंबीचा बापू)

स्निग्धा, लिंक पाठवल्या. Happy

मागे एकदा "श्रावणात घननिळा बरसला" या सुरेख गाण्यावरचा "चाळीस श्रावण पाहिलेलं गाणं!" हा अनिरूद्ध भातखंडे यांचा एक अप्रतिम लेख वाचनात आला होता. तो मी माझ्याकडे सेव्ह करून ठेवलेला. आता आंतरजालावर त्याची लिंक शोधतोय तर सापडत नाहि आहे. Sad

तोच लेख इथे कॉपी/पेस्ट करतोय. अतिशय सुंदर आणि वाचनीय लेख आहे. Happy

चाळीस श्रावण पाहिलेलं गाणं!
- अनिरुद्ध भातखंडे

'सोन्याला सुगंध' ही कविकल्पना असेल, मात्र गाण्यांच्या दुनियेत खरंच तसं झालंय! आपापल्या क्षेत्रातील तीन दिग्गजांनी एकत्रित कलाविष्कार केला आणि ही कविकल्पना प्रत्यक्षात उतरली. हे सुगंधित सोनं गेली 40 वर्षे भावगीतांच्या दुनियेत अढळ स्थान राखून आहे. श्रावणात घननिळा बरसला... हे ते गाणं!

एक गाणं आहे. जुनं गाणं आहे. अगदी चाळीस वर्षांपूर्वीचं. बदलणाऱ्या दिवसांबरोबर त्याचा गोडवा कमी तर झाला नाहीच, उलट तो दिवसेंदिवस वाढतोच आहे.

ते गाणं आहे श्रावणावरचं. त्यातील बासरी, सतार ऐकताना अंगावर रोमांच उठतात. यातील गायिकेचा आवाज ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागते. त्याच्या चार अंतऱ्याच्या वेगवेगळ्या सुरावटी ऐकताना चक्रावून जायला होतं. अगदी बरोबर! "श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीमधारा... उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा' हेच ते गाणं.

एक मार्च एकोणीसशे अडुसष्टला हे गाणं ध्वनिमुद्रित झालं. कवी ः मंगेश पाडगावकर, संगीत ः श्रीनिवास खळे आणि गायिका साक्षात लता मंगेशकर! ज्यांना गाण्यांतून आनंद लाभतो अशा हजारो, लाखो कानसेनांना या त्रिवेणी संगमाने श्रीमंत केलं आहे. हे गाणं तुम्ही जितक्‍यांदा ऐकाल तेवढी ही श्रीमंती वाढतच जाणार. मुळात श्रावण हा सर्व महिन्यांचा राजा. श्रावणसरींच्या आगमनामुळे सर्वत्र कशी धुंदी येते, ही अनुभवण्याचीच गोष्ट. आणि नेमका हाच अनुभव हे गाणं देतं!

श्रावणावरचं हे गाणं (खरं तर कविताच) पाडगावकरांनी लिहिलं ते चक्क घामाच्या धारा लागल्या असताना. त्याला खळेसाहेबांनी चालत्या ट्रेनमध्येच अनवट चाल लावली आणि ती लता मंगेशकर यांनी सहजपणे गायली. ...आणि एक अविस्मरणीय, सदाबहार, गोड गाणं जमून आलं. गेली 40 वर्षे या श्रावणसरी आपल्या सर्वांच्याच कानात-मनात रिमझिमत आहेत. आता सुरू असलेला श्रावण हा या गाण्याचा एकेचाळिसावा श्रावण! पण ते खरंच नाही वाटत. अगदी काल ध्वनिमुद्रित झाल्यासारखं रसरशीत, तजेलदार गाणं वाटतं हे... कधीही ऐकलं तरी.

या कवितेला खळेसाहेबांनी गोड, परंतु तितकीच कठीण चाल बांधली आहे, हे ती गुणगुणतानाही लक्षात येतं. अनिल मोहिले यांनी या गाण्याचं अनुरूप असं संगीत संयोजन केलं आहे. या गाण्यात बासरी, सतार आणि तबला कोणी वाजवलाय ठाऊक आहे का? बासरी- हरिप्रसाद चौरासिया, सतार- जयराम आचार्य आणि तबला- मारुती कीर (बर्मन पितापुत्रांचे राईट हॅंड!) यांनी. हे गाणं निभावणं, त्याची लय सांभाळणं सोपं नाही. खळेसाहेबांनी या गाण्यात स्वरसम्राज्ञीची जणू परीक्षाच घेतली आहे आणि त्यांनीही पैकीच्या पैकी मार्क मिळवलेत! बासरी आणि सतारीने या गाण्यात केलेली वातावरणनिर्मिती अद्वितीयच. सहा मिनिटे आणि पंचेचाळीस सेकंदांचं हे गाणं ऐकून जी आत्मिक शांती, अनुभूती मिळते त्याला उपमा नाही. प्रत्येक अंतरा ऐकताना त्याची वेगळी चाल ऐकून पुन्हा धृवपदावर कसं लॅंड होणार, हा प्रश्‍न पडतो. पण त्याचं उत्तर अल्लादपणे गाठलेली सम देऊन जाते. तीच तर खळेसाहेबांच्या संगीताची जादू आहे, तेच त्यांचे वेगळेपण आहे. म्हणूनच तर वैशाखवणव्याच्या भरदुपारीही हे गाणं ऐकलं तर श्रावणाचा फील येतो!
सध्या रिमिक्‍सचा जमाना आहे असं म्हणतात. रिमिक्‍सवाले मात्र अद्याप या गाण्याच्या वाटेला गेल्याचे दिसत नाही (जाणारही नाहीत). कारण त्यासाठी मूळ गाणं समजावं लागेल...!
40 श्रावण पाहिलेलं हे गाणं असे अनेक श्रावण पाहील... पिढ्या न्‌ पिढ्या रुणझुणत राहील...!

शब्दच सुचवतात चाली
श्रावणात घननिळा या गाण्याचा मुखडा पाडगावकरांनी मला ट्रेनमध्ये ऐकवला. त्या वेळी मी आकाशवाणीत होतो. एखाद्या कवितेला अथवा गीताला चाल लावताना तो कवी समोर असेल, तर त्याला ती रचना वाचायला सांगण्याची माझी सवय. त्याप्रमाणे पाडगावकरांनी तो मुखडा वाचून दाखविला. सरस्वतीची कृपा असल्याने बोरीबंदरला उतरेपर्यंत माझ्याकडे चाल तयार होती. तिथं उतरल्यानंतर मी त्यांच्याकडे पुढच्या ओळी मागितल्या. त्यांनीही चार-पाच दिवसांनी पूर्ण गाणं लिहून दिलं. मुखड्याला चाल लागल्यानंतर अंतऱ्यांना चाली देणं आपसूक होतं, असा माझा आजवरचा अनुभव. त्याप्रमाणे अंतरेही झटपट बनत गेले. या गाण्याचं ऍरेंजिंग मी अनिलकडे (मोहिले) सोपवलं. ते गाण्यासाठी अर्थातच लता मंगेशकर यांच्याशिवाय पर्याय नव्हता. रेकॉर्डिंग ठरलं. त्यांनी ती चाल ऐकली आणि त्या म्हणाल्या, ""चाल खूपच गोड झाली आहे; पण किती कठीण आहे!''
मी त्यांना म्हटलं, ""मला शब्दच घेऊन जातात अशा चालींकडे, त्याला मी काय करू? आणि तुमच्यासारखी गायिका असताना अवघड चाली का नाही द्यायच्या?'' त्यानंतर चार-पाच तालमी झाल्या आणि गाणं रेकॉर्ड झालं. गाणं चांगलंच जमलं होतं; पण ते अवघड असल्यानं कितपत लोकप्रिय होईल, ही शंका होती. मात्र रसिकांनी अक्षरशः डोक्‍यावर उचलून घेतलं त्या गाण्याला. त्यानंतर लताबाईंचा फोन आला, ""खळेसाहेब, काय गाणं झालंय! असं गाणं मी आजवर गायले नव्हते.''
बस्स, आणखी काय हवं एखाद्या संगीतकाराला?
श्रीनिवास खळे

भावगीतातील मैलाचा दगड
काहींना गाणं किंवा कविता अनुभूतीमुळे सुचते. माझं मात्र तसं नाही. मी उत्कटपणे जगताना लगेच कविता सुचली, असं कधी झालं नाही. मी अनुभव टिपत असतो. काही दिवसांनी संबंध नसताना अचानक एखादी ओळ मनात येते आणि त्या दिशेने त्या रचनेचा मार्ग सुरू होतो.

तुम्हाला वाटेल, श्रावण महिना आहे, रिमझिम नाजूक धारा अंगावर पडत आहेत, कवी भिजत चाललाय आणि त्याला त्यातून "श्रावणात घननिळा बरसला' या ओळी सुचल्या असाव्यात. पण प्रत्यक्षात ते उन्हाळ्याचे दिवस होते व मी आगगाडी पकडायला घामांच्या धारांतून भिजत चाललो होतो... त्या अवस्थेत मला या कवितेचा मुखडा सुचला! गाडीत चढल्यावर पॅडवर उतरवला आणि खळेअण्णांना ऐकवला. त्यांनीही लगेच त्याला चाल लावली व नंतर टप्प्याटप्प्याने मी त्यांना पुढील अंतरे दिले. पुढे ते गाणं ध्वनिमुद्रित झालं आणि...
खळे हा प्रतिभाशाली संगीतकार आहे. त्याने आजवर अनेक उत्तमोत्तम रचना दिल्या आहेत आणि त्यातील सर्वोत्तम ठरेल असं हे गाणं आहे. मराठी भावगीतांना मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेत मैलाचा दगड ठरेल, अशी ही त्याची रचना आहे.
मंगेश पाडगावकर

नोटेशन काढताना त त प प
"श्रावणात घननिळा' या गाण्याच्या निर्मितीच्या वेळी मी व खळेसाहेब आकाशवाणीच्या स्टाफवर होतो. ते संगीतकार आणि मी वादक. या गाण्याच्या सीटिंगसाठी दादरच्या पोर्तुगीज चर्चजवळच्या आमच्या घरात खळेसाहेब आले होते, हे मला आजही आठवतंय. कोणत्याही गाण्याचं नोटेशन मी पटापट काढू शकतो, असा मला अभिमान होता. या गाण्याची चाल ऐकली आणि त्याचं नोटेशन काढताना अक्षरशः त त प प झालं. गाण्याच्या मुखड्याची चाल भूपाळीसारखी वाटली; पण त्यानंतरचा प्रत्येक अंतरा वेगळा! शास्त्रीय संगीतातील मुर्च्छना किंवा पाश्‍चात्त्य संगीतातील मॉड्युलेशनप्रमाणेच हा प्रकार. मात्र 15 व्या वर्षीच संगीत विशारद झाल्याने व शास्त्रीय संगीताची बैठक पक्की असल्याने मी या गाण्याचे नोटेशन काढू शकलो.

पाडगावकरांनी रचलेल्या उत्तम काव्याच्या तोडीची चाल खळेसाहेबांनी या गाण्याला दिलीय. प्रत्येक अंतऱ्यात वेगळ्या छटा त्यांनी दाखवल्यात. या छटा वाद्यांमध्येही दिसायला हव्यात, असं मी ठरवलं. अनिल मोहिले या गाण्यात डोकावता कामा नये, त्यात पूर्ण एकरूप व्हायला हवं, हा कटाक्ष बाळगला. या गाण्यासाठी हरिप्रसाद चौरासिया, जयराम आचार्य आणि मारुती कीर अशा दिग्गज वादकांना आमंत्रित करण्यात आलं. हा एकेक वादक 15-15 वादकांच्या तोडीचा. ते या गाण्याला पुरेपूर न्याय देतील, याची खात्री होतीच. लतादीदींनी त्यावर कळस चढविला. गाणं पूर्ण झाल्यानंतर दीदींनी माझी पाठ थोपटली. 1968 पासून हा श्रावण बरसतोय... माझ्या मते हे गाणं मराठी भावगीतांतील सर्वोत्तम गाण्यांपैकी एक आहे.
- अनिल मोहिले.

जिप्सी... तुला हज्जार गावं इनाम. दिलीच. (खिशात बघ) Happy किती आभार मानू...

मी गानभूली लिहायला घेतली ह्या गाण्यावर. गेली तीनेक वर्षं प्रयत्नं करतेय... खळ्यांच्या चालीचं, पाडगावकरांच्या शब्दांचं, लताबाईंच्या सुरांचं मोहन असं आहे की... माझे शब्दं अपुरे, असहाय्य वाटतात.. मनातलं काय ते सांगायला.
मला नाही वाटत मी कधी त्या गाण्यावर लिहू शकेन.
जिप्सी... खरच धन्यवाद. एक सुंदर लेख इथे दिलास.

जिप्सी, ऑनलाईन गाण्याची लिंक दिल्याबद्दल अनेक धन्यवाद .. Happy

"हरणी" ऐकायला येतं खरंच .. Happy

सामना म्हणजे भास्कर चंदावरकर का (ना)? पीक करपलं आणि कोणाच्या खांद्यावर पेक्षा "सख्या रे घायाळ मी हरणी" तला आवाज फारच वेगळा वाटतो .. पीक करपलं आणि कुणाच्या खांद्यावर ह्या दोन्हीं गाण्यात परिचीत, जड वजनदार आवाज वाटतो तर सख्या रे आणि कोणीतरी अशी पटापट च्या आवाजात वजन कमी वाटतं, वेगळाच वाटतो आवाज .. रेकॉर्डिंगमधला फरक की काय कोणास ठाऊक?

सख्या रे - रविन्द्र साठेंचं ऐकलं. हरणी'च गायलेत.

लताबाईंच्या गाण्यात सख्यारे जिथे उचललय ते केवळ अप्रतिम आहे. त्यामुळे ते "सख्ख्या रे" ऐकू न येता... सख्यारे (च) ऐकू येतय. (प्लीज... मी फक्तं गाण्याच्या ह्या दोन ट्रॅक्सविषयी बोलतेय. साठेंकडून जसं गाऊन घेतलय तसं ते गायलेत. तो ट्रॅक फायनल रेकॉर्डिंगचा नाही हे ध्यानात घ्या. त्यामुळे साठेंचं गाणं अन लताबाईंचं ही जनरल तुलना इथे नाही).

धन्स जिप्स्या! Happy

साठेंचा आवाज या गाण्यात वेगळा लागलाय खरा! कदाचित फिमेल वर्जन गात आहोत याची जाणीव असल्याने काही ठिकाणी उच्चार देखिल फेमिनाईन वाटताहेत.

सामना म्हणजे भास्कर चंदावरकर का (ना)?>>>येस्स Happy

लताबाईंच्या गाण्यात सख्यारे जिथे उचललय ते केवळ अप्रतिम आहे. त्यामुळे ते "सख्ख्या रे" ऐकू न येता... सख्यारे (च) ऐकू येतय>>>>> Happy अगदी अगदी.

मला हे सख्यारे... कमीतकमी १०% कमी लयीत ऐकायचय (अन ते ही लताबाईंकडून) Happy
त्या चित्रपटात नाचायचं असल्याने धपाधपा म्हटल्यासारखं वाटतय. सारेगमप मधे कुणीतरी गायली होती. गाणं खूप जड आहे कुणालाही... पण तिनं छान पेललं होतं.
मला एक जाणून घ्यायला आवडेल... तुम्हालाही माझ्यासारखं वाटतं का?
आजच्या डिजिटल ध्वनीमुद्रणाच्या जमान्यातही कणसूर काय... बेसूरही ऐकू येतात काहीजण. मग ते किती एडिटलं असेल... अन एडिटणारा वैतागून ".. पुरे इतकं.. " म्हणून थांबला असेल... असं वाटतं.
ज्या जमान्यात हे अख्खं गाणं, त्यातल्या ऑर्केस्ट्रासकट दोन-तीन टेक्स मधे करायचे... अन तरीही इतके सुरेल आहेत बरेचसे गळे बर्‍याचशा गाण्यांमधे.
गाता येतय(??) थोडफार म्हटल्यावर गायला लागतात का काय? (जुनं ते सोनं.. वगैरे म्हणायचं नाहीये मला). पण एकुणात सुराची शुद्धता राखण्यासाठी जी मेहनत लागते अन मेहनत जारी ठेवावी लागते, ते कमी झालय का?

कदाचित मी 'जुन्यातले बरेचसे गळे बर्‍याचशा गाण्यांमधे' म्हणतेय... तीच गत आजही असेल. माझ्याच ऐकण्यात 'उरलेलं' येत असेल... काय सांगता येत नाही.

घायाळ मी हरीणी... मधे हरवुणी... असा उच्चार झालाय. त्याची बहुतेक खास कारणे आहेत.

कदाचित फिमेल वर्जन गात आहोत याची जाणीव असल्याने काही ठिकाणी उच्चार देखिल फेमिनाईन वाटताहेत.>>>>>"कुठे लपु मी....कुठे लपु मी.....गेले मी हरवूनी........हरवूनी" या ठिकाणी वाटतोय खरा. Happy

जिप्सी, 'श्रावणात घननीळा...' मस्तच लेख. साठ्यांच्या (माझा अत्यंत आवडता गायक) आवाजातले गाणे शेवटी ऐकले. Happy

मधे हरवुणी... असा उच्चार झालाय. त्याची बहुतेक खास कारणे आहेत. <<< दिनेश, हो तसा ऐकू येतो खरा. तुम्हाला ठावूक आसतील तर खास कारणे लिहा ना.

Pages