परीक्षेतील अपयश (?) आणि पुष्पज औषधे

Submitted by अमितकरकरे on 2 May, 2013 - 09:59

दहावी-बारावीच्या निकालाचे दिवस जवळ आले की साधारणत: आपल्याला आठवतात ते कौतुकाचे बोल, पेढे आणि पुष्पगुच्छ. पण परीक्षेत मिळवलेल्या यशाबरोबरच शक्यता असते अपयशाची. अगदी वर्षभर अभ्यासू वृत्तीने मेहनत घेऊन चाचणी परीक्षेत पैकीच्यापैकी गुण विद्यार्थ्यापासून ते काही कारणांमुळे मनाजोगता अभ्यास न होऊ शकलेल्या विद्यार्थ्याला भेडसावणारा राक्षस म्हणजे अपयश; आणि हे अपयश म्हणजे फक्त परीक्षेत नापास होणे नाही, तर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळणे हे सुद्धा एक प्रकारे अपयशच.

वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने वाढणारी सर्वच क्षेत्रातील स्पर्धा, त्यात टिकून राहण्यासाठी पाडावे लागणारे गुण, पालक-शिक्षक-मित्र व इतर ओळखीच्या व्यक्तींच्या असलेल्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा, जर अपेक्षेइतके यश मिळाले नाही तर काय गहजब होईल याच्या नुसत्या कल्पनेनेच सतत मनात येणारे नकारात्मक विचार, कुठल्या-ना-कुठल्या हुश्शार मुलाशी सततची होणारी तुलना, आणि याच्यावर कडी म्हणजे टीव्ही व सिनेमातून अपयशानंतर व्यसनाधीनतेचे अथवा आत्महत्येचे रंगवले गेलेले अतिरंजित प्रसंग... या सगळ्याचा परीणाम म्हणजे अपयश हे एक मर्यादित काळापुरते न समजता, बारीकसारीक अपेक्षांनाही आयुष्याचा आणि पर्यायाने जीवन-मरणाचा प्रश्न करण्याची लागलेली वाईट खोड, यामुळे मुले अपयशाला सकारात्मक दृष्टीने सामोरे जाऊच शकत नाहीत. ‘आता सारे संपले’ हीच भावना प्रबळ होते आणि हातून बरे वाईट घडण्याची भीती वाढते.

अपयशाने खचून जाऊन हातून बरेवाईट करून घेण्याच्या वाढत्या केसेस बघता, त्यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षापासून समुपदेशनाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून बऱ्याच मुलांना या गर्तेतून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. याच दिशेने अजून एक पाऊल म्हणजे ‘पुष्पज औषधांचा’ वापर करून मनातील नकारात्मक विचारांवर मात करणे.

निसर्गात उपलब्ध असलेल्या काही विशिष्ठ फुलांपासून बनविलेल्या या ३८ औषधाच्या योग्य वापराने आपण वरील प्रकारच्या भावनिक / मानसिक समस्यांवर अगदी खात्रीलायक मात करू शकतो. प्रसिद्ध ब्रिटीश वैद्यक-चिकित्सक डॉ एडवर्ड बॅच यांनी १९३८ साली जगासमोर सादर केलेल्या या वैद्यकपद्धतीद्वारे रोजच्या जीवनात आपणास भेडसावणाऱ्या नकारात्मक मानसिक भावनांचा इलाज केला जातो. यातील प्रत्येक औषध हे एका विशिष्ठ नकारात्मक भावनेसाठी वापरता येते. नैसर्गिक अवस्थेतील फुलांना पाण्यात उकळून अथवा त्या पाण्याचे भांडे काही काळ उन्हात ठेवून ही औषधे तयार केली जातात. या प्रकारे त्या फुलातील औषधी गुणधर्म पाण्यात उतरून त्यामुळे विशिष्ठ प्रकारच्या सकारात्मक संवेदना जागृत होतात. प्रत्येक औषधाचा योग्य वापर माहित असेल तर अगदी कोणालाही या औषधांचा वापर करता येतो. आपल्याला अथवा आपल्या घरातील व्यक्तीला त्रास देणाऱ्या विशिष्ठ नकारात्मक भावना ओळखून त्यानुसार निवड केलेल्या पुष्पज औषधांचे काही थेंब पाण्यात मिसळून त्यातील थोडे थोडे पाणी घेतल्याने या नकारात्मक भावना कमी होण्यास मदत होते.

गेल्याच वर्षी याच सुमारास अजिंक्य (नाव बदलले आहे) ला घेऊन त्याचे आई-वडील माझ्याकडे आले. अजिंक्य अतिशय हुशार मुलगा म्हणून सर्वत्र ओळखला जात होता. वर्षभर सर्व परीक्षांमध्ये त्याला ९० ते ९४% मार्कस पडले होते. अर्थातच सर्वांनाच बोर्डाच्या परीक्षेत तो किमान ९०-९२ % मिळवेल अशी अपेक्षा होती. पण मिळाले अवघे ७७%. अजिंक्यच्या तर पायाखालची जमीनच हादरली. पुन: गुण-पडताळणी साठी अर्ज करू अशी समजूत घालूनही त्याच्या मनावरचे नैराश्येचे सावट जाईना. त्याने खाणेपिणे सोडले, स्वत:ला खोलीत कोंडून सारखा रडत बसू लागला आणि कोणाशीच बोलेनासा झाला. अशा अवस्थेसाठी निवडलेल्या ‘गोर्स, जेन्शीअन आणि क्रॅब अॅपल’ यांसारख्या पुष्पज औषधांचा योग्य वापर केल्यामुळे काही आठवड्यात त्याच्या आई-वडिलांना त्यांचा नेहमीचा आशावादी व उत्साही अजिंक्य परत मिळाला.

अशा प्रसंगी येणाऱ्या नैराश्यासाठी गोर्स, सततच्या अपयशामुळे हताश होणाऱ्या लोकांसाठी जेन्शीअन, अपयशामुळे स्वत:बद्दल घृणास्पद विचार येण्यावर क्रॅब अॅपल, यामुळे बसलेल्या धक्क्यासाठी स्टार ऑफ बेथलेहेम... आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे आत्महत्येचे विचार टाळण्यासाठी स्वीट चेस्टनट.

पुष्पज औषधांमधील अशा काही निवडक औषधांचा योग्य वापर केल्यामुळे अजिंक्य सारख्या अनेक मुलांना अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढण्यात आजवर यश आले आहे. परीक्षेत निर्भेळ यश मिळवल्यावर आपण पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतोच, पण त्याच सारखी काही फुले वापरून केलेली ही पुष्पज औषधे अपयशाला भविष्यातील यशामध्ये बदलण्याची क्षमता बाळगतात यात शंकाच नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर, ही औषधे देण्यापुर्वी कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ( विचारले जावेत ) आणि त्यावरून औषधाचे प्रमाण आणि प्रकार कसा ठरवतात, यासंबंधी अवश्य लिहा.
स्वतःच अशी औषधयोजना करावी का ? कि तज्ञांच्याच सल्ल्याने करावी याबाबतही अवश्य लिहा.