वनभोजन

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

ऐन मार्गशीर्ष-पौषात जेव्हा बोचरी थंडी पडायची तेव्हा पावसाच्या पाण्यावर येणार्‍या पिकांची सुगी करून, त्याच जागी केलेली रब्बी पिके खुरपणीला आलेली असत. हवेत गारवा, सगळीकडे अजूनही असलेली हिरवळ, शेतात वार्‍याच्या लयीवर हलणारी गहू, हरभरा, वाटाणा यांची चिमुकली रोपं, खळाळत वाहणारे ओढे आणि गावाला सगळीकडून वेढणार्‍या डोंगरांवर वाढलेल्या कमरेइतक्या गवतावर अखंड लाटा उमटवणारा वारा... या सगळ्यांमुळे हे दिवस संपूच नयेत असं वाटायचं. पण म्हणतात ना- शाळू दिवस... कसे भुर्रकन निघून जातात.. आणि मग येतो रखरखीत उन्हाळा!

तर या शाळू दिवसांतच - खरेतर पावसाळ्यातल्या पिकांबरोबरच केलेले पण मुद्दाम या दिवसांची मजा चाखायला मागे रेंगाळणारे पीक म्हणजे पावटा! तो आपल्या हिरव्यागार पसरट पानांनी आणि पांढर्‍या शुभ्र फुलोर्‍याने शेताचा बांध न् बांध सजवून टाकायचा. आणि मग त्याच फुलांच्या घसाला त्याच्या शेंगा लागायच्या. या शेंगा म्हणजेच 'चिंबं' भरायला लागली की आमच्या शाळेत पुन्हा एक उत्साह भरून यायचा आणि आम्हाला निराळेच वेध लागायचे. ते असायचे वनभोजनाचे!

असे सगळीकडून जुळून आले म्हणजे गुरुजींच्या मागे आमची पिरपिर सुरू व्हायची- "गुरुजी वनभोजन!" "गुरुजी वनभोजन!" "गुरुजी मग केव्हा जायचे वनभोजनाला?".. गुरुजींच्या मागे हा धोशा लागला की मग आमच्या वनभोजनाचा दिवस पक्का व्हायचा. तो एका पूर्ण दिवसाचा कार्यक्रम असायचा. आमची चंगळ.

वनभोजनाच्या दिवशी अगदी अंथरुणातून उठल्यापासून आम्ही वेगळ्याच जगात तरंगत असायचो. त्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या घरातून भाकरी, तांदूळ, चटणी-मीठ इ. आणि मुख्य म्हणजे एका गाठोड्यातून कमीतकमी आपल्याला पुरतील एवढे शेतातून काढलेले पावटे घेऊन शाळेच्या गणवेषात नेहमीच्या वेळेआधी शाळेत हजर व्हायचे! शाळेत आल्यावर, वनभोजनाला गेल्यावर तिथे लागणार्‍या सामानाची बांधाबांध सुरू व्हायची. दोन मोठेच्या मोठे टोप, तेवढीच मोठी उलताणी, आणखी दोन जरा लहान टोप, मोठ्या पळ्या(डाव) आणि नेहमीचे कवायतींचे सामान-ढोल, पडघम, लेझिम, लाठ्या, Dumbbells वगैरे...

ही सगळी तयारी झाल्यावर मग शाळेतल्या वार्ताफलकावर मोठ्या झोकात 'वनभोजन' असे लिहून त्याखाली आम्ही वनभोजनाला कुठे जाणार आहोत त्या ठिकाणाचे नाव भिजवलेल्या रंगीत खडूने लिहिले जाई आणि प्रार्थना म्हणून झाल्यावर दोघादोघांच्या जोड्या करून रांगेत आमची सेना ढोलताश्यांच्या गजरात त्या दिशेने कूच करायची. सोबतीला बेंबीच्या देठापासून दिलेल्या साक्षरता, स्वातंत्र्य, देशभक्त यांच्यावरच्या घोषणा!

तिथे पोहोचेपर्यंत ऊन चांगलेच वर आलेले असायचे. आमचा तळ जवळच एखादी विहीर असणार्‍या दाट सावलीच्या मोठ्या झाडाखाली पडायचा. मग आपल्या पिशव्या ठेऊन थोडे हाशहूश करायचे आणि पुढच्या तयारीला लागायचे. सगळ्यात आधी चुलीसाठी योग्य आकाराचे दगड शोधून आणायचे. वार्‍याची दिशा बघून गुरुजी त्या दगडांच्या पाहिजे तेवढ्या उंचीच्या तीन मोठ्या चुली मांडायचे. (या चुली घरातल्या नेहमीच्या नाजूक, नक्षीदार आणि सारवून निगा राखलेल्या चुलींच्या पुढे अगदीच रांगड्या आणि ओबडधोबड वाटायच्या. म्हणून त्यांना तसलेच रांगडे आणि ओबडधोबड नाव-चुलवण!)

त्यानंतरचे काम म्हणजे सरपण जमवायचे. सगळ्यांनी आणलेले तांदूळ आणि पावटे यांचे वेगवेगळे ढीग करून महिलामंडळ त्याची नीटवाट करायला लागायचे. आणि आम्ही झाडांच्या वाळलेल्या फांद्या, वाळलेले शेण, काटक्या हे सगळे गोळा करण्यासाठी चारी दिशेला पांगायचो.

तोपर्यंत गुरुजी ते आणलेले मोठे टोप घासून त्यांना बाहेरून मातीचा पातळ लेप द्यायचे. (म्हणजे टोप जाळाने काळे होत नाहीत आणि पुन्हा स्वच्छ करायला सोपे पडते.)

ही सगळी व्यवस्था झाल्यावर बरीच खटपट करून ती चुलवणं पेटवली जायची. तांदूळ धुवून शिजायला टाकले जायचे आणि त्यानंतर या वनभोजनाच्या केंद्रस्थानी असलेल्या पावट्याला फोडणी दिली जायची! तोपर्यंत आमच्या पोटात कावकाव सुरू व्हायला लागायची. मग हे 'भोजन' शिजेपर्यंत झाडाखाली बसून आम्ही शाळेत बसवलेली सगळी गाणी म्हणून टाकायचो. (जागेवर बसूनच:-)) नक्कला वगैरे प्रकारांना ऊत येई. आमच्या शिक्षकांच्या नक्कला त्यांच्याचसमोर करण्याची ही एकमेव संधी आम्हाला मिळायची. आणि हसून हसून सगळ्यांची पुरेवाट व्हायची.

एव्हाना भाताचा आणि त्या शिजत आलेल्या कालवणाचा सुगंध जोरजोरात त्या जाळाच्या धगीसह आमच्यापर्यंत येऊ लागायचा आणि आमच्या माना पुन्हा पुन्हा त्या चुलवणांकडे वळायच्या. आयशप्पथ! भूक कसली खवळून उठायची! ..भात आणि कालवण शिजल्यावर वाढपे-पाणके नेमले जायचे आणि मग आपापल्या थाळ्या आणि तांब्यांचा ठणाणा करत आमची एकच एक गोलाकार पंगत पडायची.
सोबत दुमडून बांधून आणलेल्या भाकरीचे आतापर्यंत उन्हामुळे तुकडे झालेले असत. ती भाकरी, थाळीतच वाढलेले ते वाफाळते कालवण, वाट्टेल तसे वेडेवाकडे फोडलेल्या कांद्याचे तुकडे आणि अजून पाणीसुद्धा नीट न मुरलेला तो गरम गरम भात... अहाहा! त्या वनभोजनातला तो अक्षरश: परमोच्च बिंदू असायचा! या मोठ्या पंगतीनंतर वाढपे-पाणके आणि गुरुजींची एक छोटी पंगत बसायची. त्यानंतर सगळी भांडी स्वच्छ करून मग शिक्षकांसहीत आम्ही सगळे कबड्डी, खोखो खेळायचो. चार पाच वाजायला आल्यावर मग कवायती व्हायच्या आणि परत दोघादोघांच्या रांगा करून आम्ही शाळेत परतायचो. तिथे वन्दे मातरम् म्हणायचो आणि दमून भागून आपापल्या घरी जायचो.

विषय: 
प्रकार: 

अरे कोल्हापुराकडे पावट्याला "वरणं" असा शब्द आहे ना???
मस्त असते रे चव त्याची. शेताच्या बांधा बांधावर असलेल्या शेंगा बघुन मस्त वाटत.
आणि पावसाळ्यासाठी हेच वरण्याचे दाणे वाळावुन ठेवायचे. आणि त्याला मोड आणुन त्याची आमटी नाहितर भाजी अहाहा स्वर्ग सुख रे Happy

GD... छान लिहितोस रे तु!! आधी कधी पाहिले नाहि तुझे लिखाण!!

गजानन कुठल्या गावातले वर्णन आहे हे ?
माझ्या आजोळी पण पावटा मस्त पिकतो. वांगी पावटा रसभाजी आणि मक्याची भाकरी.
खुटावळं म्हणजे गुलाबी रंगाचे डबलबीन्स आणि आडिच मासा म्हणजे फरसबी.
पण या सगळ्या भाज्याना चव येतो ती तिथल्या पाण्यामुळे.

झकास, सुस्वागतम् [स्वागत. Happy तुम्हालाही खरेतर मी पहिल्यांदाच पाहिले इथे] धन्यवाद.
झकास, 'वरणं' मी ऐकलं नाही रे. पण तू म्हटलेस तसे, सालीसकट शिजवून, वाळवून ठेवतात त्या पावट्याच्या प्रकाराला 'चनुला पावटा' म्हणतात. [आम्ही तर ते वाळायला उन्हात ठेवल्यावरच फस्त करायचो म्हणून आमची आजी ते घराच्या कौलांवर वाळायला घालयची Happy ]
आणि त्याची उसळ.. किती चविष्ट.. शिळ्या चपातीबरोबर.. कोरड्या भाताबरोबर!

दिनेश, तुम्हाला बत्तीस शिराळा ठाऊक असेल ना, तिकडचेच आहे हे वर्णन.

आमच्याकडे गुलाबी, अतिशय चपट्या, गोलाकार आणि साधारण चार आण्याच्या आकाराएवढया पावट्याचा एक प्रकार करतात. याच्या वेली घरावर चढवल्या म्हणजे उन्हाळाभर शेंगा मिळतात. त्याला 'खुटवडा' म्हणतात.

मग तर तु गाववालाच म्हणायला हवा. Happy
कोल्हापुरपासुन जवळच आहे की.
मग किती नाग साप पकडलेस रे आतापात्तोर Happy

'वरणं' मी ऐकलं आहे. त्याच्या शेंगा पण वापरतात ना? नुसते दाणे नाही. 'खुटवडा' पण माहित आहे.
गुर्‍हाळाला कोण चाललंय? Happy

-लालू

झकास, हो कोल्हापुरापासून जवळच आहे. माझ्या पोतडीतले नाग/साप बघायला ये शिराळ्याला!

गजानना शाळेतील स्काऊटचे दिवस आठवले... सारवण पासून कवायती पर्यंत सगळं काही Happy
मस्तच लिहेले आहेस Happy

GD, किती छान वर्णन केलयस वातावरणाचं.. मी मनातल्या मनात ते डोळ्यासमोर आणलं अन पोचलेच त्या छानश्या वातावरणात. Happy छानच ना हे वनभोजन. कोकणात हि अशी रब्बी पिकं वगैरे घेत नाहित त्यामुळे ह्या अश्या वेगवेगळ्या पिकांची काही माहिती नाहि फक्त भातशेतीशिवाय.. कारण पाण्याचं दुर्भिष्य.
कॉलेजला असताना १० दिवसांचा कॅम्प केला होता त्यात हि अशी थोडीफार मजा अनुभवली.
मस्त लेखन जीडी! Happy

धन्यवाद इंद्रा, भावना, आयटी. भावना आमच्याकडेही पाऊस वेळेत आणि पुरेसा पडला नाही तर पाण्याचा खडखडाटच असतो. पण रब्बी पिकांना तुलनेत कमी पाणी लागते. एप्रिलपासून पुढे पाऊस पडेपर्यंत आमच्या दैनंदिन पिण्याच्या पाण्याची भिस्त सरकारी पाणीपुरवठ्यावरच.

मस्त वर्णन रे गजानन.. खूपच गोड..
आता तुझ्या पोरांना घेऊन जा डाऊन द मेमरी लेन मधे, वनभोजन कर
फोटो काढ आणी आम्हाला दाखवतरी तुझा गाव.. Happy

जीडी, मस्तच वर्णन रे Happy

ती भाकरी, थाळीतच वाढलेले ते वाफाळते कालवण, वाट्टेल तसे वेडेवाकडे फोडलेल्या कांद्याचे तुकडे आणि अजून पाणीसुद्धा नीट न मुरलेला तो गरम गरम भात... अहाहा! त्या वनभोजनातला तो अक्षरश: परमोच्च बिंदू असायचा!>>>> Happy Happy

गजानन, मस्तं जमलय वन्भोजन (असच म्हणायचं अस्तय.. आमच्या राधानग्रीकडं).
मी आख्खी मुंबईची.. पण सासरचम मोठं घर - राधानगरी. तिकडे चुलत-आत्ये दीरांच्या ऐकलेल्या गप्पांमधून हे वनभोजन ऐकलय.
आक्षी नंदरेसमोर हुबं केलत. आजुन यौन्द्या तर काय...

मस्त जमलाय लेख...
मी विचार करतेय आपल्या मुलांना कधी अनुभवायला मिळणार असे क्षण???

गजानन , मस्त वाटल वाचून एकदम,
आणि झकासराव म्हणतात ते बरोबर आहे. कोल्हापुरला "पावट्याला" बरेचदा वरणा म्हणतात. सांगली जिल्ह्यात पण तोच शब्द असतो.

वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

वर्षूताई, येत्या हंगामात वनभोजन करायचे असा आम्ही खरोखरच बेत आखला आहे. त्या वनभोजनाला आणि गाव बघायला हम आप को व्यक्तिशः आमंत्रिक करते हैं.

नंदिनी, अरे वा! तू होतीस काय गाईड? मागे एकदा माझ्या रंगीबेरंगीवरच मी स्काऊटकॅंपावर लिहिले होते.
गणोबा, दरवर्षी अड्डा वेगळा असायचा. कधी दरा तर कधी गायमुख तर कधी लोहारकी. त्यासाठी मुख्यतः ते मुलांनी पायी जाण्याच्या टप्प्यात असायला हवे; तिथे पिण्यायोग्य आणि सहज उपसता येईल अशा पाण्याची विहीर आणि मोठ्या दाट सावलीचे झाड असायला पाहिजे.

प्रतिसादांबद्दल पुन्हा धन्यवाद.