उन्हाळी मेनु : काकडी भात

Submitted by सावली on 1 May, 2013 - 02:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन काकड्या
दोन वाट्या / साधारण पाव किलो दही.
कडीपत्ता
हिरवी मिरची
बारीक चिरलेली कोथिंबीर - असल्यास

फोडणीसाठी तेल - एक चमचा
मोहोरी
उडदाची डाळ - एक चमचा

चवीपुरते मिठ
एक वाटी तांदळाचा शिजलेला मोकळा भात थोडा गार करुन

क्रमवार पाककृती: 

दह्यात थोडे गार पाणी आणि चवीपुरते मिठ घालुन किंचित पातळ करुन घ्या. आणि पुन्हा फ्रिजमधे थंड करायला ठेवा.
काकड्या किसुन घ्या.
एका पसरट भांड्यात अगदी थोडे तेल टाकुन तापवा.
तापले की त्यात मोहोरी, कडीपत्ता, मिरच्या टाकुन फोडणी करा.
त्यात मोकळा शिजवलेला भात घाला. मिठ घालुन हलकेच ढवळुन घ्या.
आता गॅस बंद करा आणि किसलेली काकडी त्यात घालुन पुन्हा ढवळुन घ्या. काकडी शिजवायची नाहीये गरम भांड्यामुळे थोडी शिजल्यासारखी होईल तेवढी पुरे आहे.
असल्यास वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.

हे सगळे एका भांड्यात काढुन घ्या. थोडे निवले की त्यात दही मिक्स करा आणि थंड खायला घ्या.

अधिक टिपा: 

सगळे एकावेळी जेवणार नसतील तर सगळ्या भातात एका वेळी दही न मिसळता. खायच्या आधी ताटात भात घेऊन त्यावर पातळ केलेले दही वाढुन घ्या.
किंवा सगळ्या भातात दही कालवुन जरुरीपेक्षा थोडे पातळच ठेवुन तसेच फ्रिजमधे ठेवा आणि जेवायच्या वेळी थंडगार काकडी भात वाढुन घ्या.
उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना जेवायला थंडगार काकडीभात मस्त वाटतो.

माहितीचा स्रोत: 
बाबा
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा चुकून जपान मधे गेलाय.
अ‍ॅडमीन प्लिज हा धागा आहार आणि पाकॄ मधे हलवाल का?

व्वा! मस्तच .. दही बुत्ती साठी उडीद नि भाताची तयारी केली होती.. आता ते कॅन्सल.. पहिले हे करणार Happy

मस्त!! मला वाटतं दह्यात थोडीशी पुदिन्याची पानं, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर घातली तर आणखी वेगळा स्वाद येईल! या कॉम्बोमध्ये डाळिंबाचे दाणे कसे लागतील हेही पाहायला पाहिजे.

वरीचा काकडी-भात अगदी कूकरमध्येही वरीबरोबरच किसलेली काकडी,खवलेलं ओलं खोबरं,थोडं लाल तिखट,थोडी साखर,तूप,चवीपुरतं मीठ अन थोडं लिंबू पिळून लावता येतो. उतरल्यावर दूध घालून खायचा.मस्त लागतो. रात्रीच्या वेळी लाइट आहार उशिरा जेवणार्‍यांसाठी.

मी प्रथमच पहाते ही रेसीपी. नक्की करेल. उन्हाळ्यात छानच वाटेल अप्रतिम.

सावली, छान आहे पाकृ. उद्या ऑफिसमध्ये डब्यात करुन नेणार.
अपडेटः भात करुन नेला होता ऑफिसमध्ये. हिट आहे पाकृ.

मी ही करुन बघणार. दही भात तसाही आवडतोच.
बायदवे, ह्यात साऊथ इंडियन स्टाईलची दह्यात वाळवलेली आंबट मिरचीही छान लागेल असं वाटतंय.