श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित)

Submitted by ललिता-प्रीति on 29 April, 2013 - 00:12
shrava-ghvada-suki-bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- श्रावणघेवडा (फरसबी) पाव किलो
- १ मोठा कांदा (बारीक चिरून)
- हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
- कढीपत्त्याची पानं ५-६
- किसलेलं आलं १ छोटा चमचा भरून
- उडीद डाळ १ मोठा चमचा भरून
- खोवलेलं खोबरं पाव वाटी
- चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे भरून
- मीठ (चवीनुसार)
- साखर (चिमटीभर)
- तेल, मोहरी, हिंग

क्रमवार पाककृती: 

- श्रावणघेवड्याच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी.
- डाळ जरा तांबूस, खरपूस झाली, की कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा.
- कांदा तांबूस झाला, की किसलेलं आलं टाकावं.
- जरासं हलवून त्यात चिरलेला श्रावणघेवडा टाकावा.
- कांदा आणि श्रावणघेवडा चांगला हलवून एकत्र करून घ्यावा. मीठ, साखर घालून पुन्हा हलवावा.
- झाकण टाकून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून हलवावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
- भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून पोळी / भाकरीबरोबर वाढावी.

Copy of DSC03806.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

- ३० मिनिटांचा वेळ हा सगळी कच्ची तयारी करण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
- भाजी शक्यतो वाफेवरच शिजवावी. (गरजेनुसार १-२ चमचे पाणी घालावे.) शिजल्यावर रस राहता कामा नये.
- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)
- कांदा, खोवलेलं खोबरं, आलं - यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण यातला कुठलाही जिन्नस वगळायचा नाही. (खोबरं जितकं जास्त घालाल, तितकी भाजीची लज्जत वाढते.)
- ही भाजी नुसती (पचडीसारखी) खायलाही अप्रतिम लागते. पांढर्‍या भाताबरोबरही चविष्ट लागते.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.>> हो माझ्या लेकीलाही कोबिच्या भाजीत हळद नाही आवडत.

मामी, घेवडा म्हणजे श्रावणघेवडा नव्हे गं. ललिने बरोबर लिहिलंय >>>> हायला, खरं की काय! म्हणजे इतकी वर्षानुवर्षं मी अज्ञानातच होते की. ज्ञानदीप उजळल्याबद्दल ललीचे आणि वरदाचे आभार्स! फरसबीला श्रावणघेवडा म्हणतात हे मला खरंच अज्जिबात माहित नव्हतं. Happy

मस्त भाजी! फोटो पण छान आलाय.
जुन्या मायबोलीत पूनमने ही भाजी लिहिली आहे, फक्त कांदा वगळून. ती वाचल्यापासून मी फरसबीची भाजी अशीच करते.

मंजू Happy

मस्त होते ही भाजी (अर्थात, कांद्याशिवायच केली आहे नेहेमी, पण एकदा करून पाहिन कांदा घालूनही.)

मस्त लागते ही भाजी! Happy
माझ्या साउथइंडीयन बॉसिणीने सांगितली होती. त्यात शेवटी भाजी उतरवतांना अर्धा लिंबु पिळायचा. छान चव येते.

आमच्याकडे यालाच बीन्सची भाजी असं पण म्हणतात. माझ्याकडे कांदा वगळून इतर सर्व जिन्नस घातले जातात. (कांदा चिरायचा आळस अजून काही नाही) Happy

लले, लगे रहो!!!

फरसबी हा फ्रेंच बीन्सचा अपभ्रंश असावा बहुतेक.

अरे वा! छान व सोपी पाकृ. श्रावणघेवड्याची भाजी आता या कृतीने करून बघणार.

आमच्याकडे सध्या श्रावणघेवड्याची कोशिंबीर टाईप भाजी लोकप्रिय आहे : उकडलेला, बारीक चिरलेला श्रावणघेवडा + मीठ + साखर + लिंबाचा रस + थोडंसं दाण्याच कूट, वरून ओलं खोबरं - भरपूर कोथिंबीर. आणि हवीच असली तर नाममात्र तेलातली मोहरीची फोडणी वरून घालायची. नुसती खायलाही ही श्रावणघेवड्याची भाजी/ कोशिंबीर मस्त लागते. घेवड्याची जी अंगची गोडी असते ती जिभेवर मस्त रेंगाळते.

या भाजीचा मसालेदार प्रकार मोड आलेल्या मटकीबरोबरचा. ती एकदम तिखट, मसालेदार भाजी आहे. कँटीन - मेस, खानावळ इत्यादी ठिकाणी हमखास केली जाते.

छान आहे भाजी. मी कानडी मित्राकडे खाल्ली होती. त्यांच्याकडे अनेक भाज्या ( तोंडली, कोबी) अशाच करत असत.

छानच.
याच कृतीने कानडी लोकं चवळीच्या शेंगांचीही भाजी करतात.
मी या श्राघेच्या भाजीत गाजर बारीक चिरुन टाकते आणि चमचाभर दाण्याचा कुट + लिंबु पिळुन, नारळ घालत नाही हेल्दी व्हर्जन मध्ये.
मस्त लागते.

मी कानडी मित्राकडे खाल्ली होती.>>> हो! कर्नाटकी सारस्वत लोकांची खासियत आहे ही. त्यांच्याकडे कोबीची भाजी पण हळद न घालता भरपूर ओलं खोबरं घालून करतात. कोबी अगदी बारीक बारीक बारीक चिरलेला असतो. मस्त लागते ती भाजी.

लले हे काय्ये स्वयंपाक घराची किल्ली सुनेच्या हातात द्यायचं वय झालं तुझं आणि आता रेस्प्या कसल्या टाकत्येस? Wink की म्हणूनच रेस्प्या नोंदवून ठेवत्येस वारसा पुढे सरकवायला? Wink

ऐसी भी करके देखी जायेगी अभी. मी बरिचशी अशीच करते फक्त आधी फरसबी वाफवून घेते

मस्त.
मलाही नेहमीची गोडा मसाला घालून करतो त्यापेक्षा अकुने लिहिली आहे तशी पचडी आवडते. (हिरवी मिरची घालत नाहीस का अकु त्यात?)
आता अशीही करून बघेन.

मला बीन्स प्रचंड आवडतात ( आणि श्रावणघेवडा आवडत नाही असं इतके दिवस वाटायचं. जी भाजी आवडत नाही तिचं नाव काय असावं असा प्रश्न पडलाय आता :अओ:). ह्या पद्धतीने करून बघेन एकदा.

>>सुनेच्या हातात द्यायचं वय झालं

कवे, हे काय्ये? शोनाहो! पोराच्या हातात द्यायला सांगत नाही. वारसे चालवायला सुनांना वेठीला धरा! बायका सुधारणार नाहीत..

फोटोत जे काय आहे ते श्रावण घेवड्यासारखे दिसत नाही. ती फरसबी आहे. श्रा घे लांब असतात अश्याच पण चपट्या असतात, या गोल दिसतायत (इथे ग्रीन बीन्स मिळतात तश्या). श्रा घे कोल्हापुरात श्रावणात मिळतात. मामे, श्रा घे म्हणजे घेवडा नव्हे! घेवडा इथे फोटोत आहे - http://www.maayboli.com/node/19333?page=3
हे सगळे दिनेशदांनी सांगायचे नाही का?

रेसिपी चांगली आहे.

जुन्या मायबोलीत पूनमने ही भाजी लिहिली आहे, फक्त कांदा वगळून. >>> मंजू, छत्रे सुना असतातच प्रयोगशील Wink Proud

इथल्या प्रतिसादांवरून असं दिसतंय, की ही रेसिपी म्हणजे कर्नाटकी खासियत आहे. पण मी ज्या मैत्रिणीकडून ही भाजी शिकले, ती मराठीच आहे, पण मध्यप्रदेशात लहानाची मोठी झालेली आहे. तिच्या लहानपणापासून त्यांच्या घरात ही भाजी केली-खाल्ली जाते. त्यामुळे मी समजत होते की भाजीचा हा प्रकार मध्यप्रदेशी आहे.

लोला, यू आर म्हणिंग द राईट.
'श्रावण'घेवडा जरा चपटा, मांसल असतो. अधिक चविष्ट असतो. त्याचा रंगही जरा गडद हिरवा असतो. पण तो वर्षभर मिळत नाही, फोटोत जी आहे ती त्याची एक पोटजात आहे, वर्षभर उत्पन्न मिळत असल्याने ती अधिक पहायला मिळते. सांगली-कराडच्या भागात सरसकट त्याला श्रावणघेवडा म्हटलं जातं.
(जसा केसर, नीलम हा पण आंबाच आणि हापूस हा ही आंबाच, तसाच हा प्रकार आहे.)

कवे, लली स्वयंपाकघरात रेसिपी टाचून ठेवते आणि आद्याला ते बघून करायला सांगते. तिने लिहिल्याप्रमाणे आदित्य भाजी करतो.

मला श्रा घे = फरसबी हेच माहिती होतं आत्तापर्यंत. आणि साध्या घेवड्याला उसावरच्या शेंगा असंही म्हणतात असं साबांनी सांगित्लं.
असो. भाजी छान होईलसं वाटतंय. करून बघेन.

फोटोत जे काय आहे ते श्रावण घेवड्यासारखे दिसत नाही. ती फरसबी आहे. श्रा घे लांब असतात अश्याच पण चपट्या असतात, या गोल दिसतायत (इथे ग्रीन बीन्स मिळतात तश्या). श्रा घे कोल्हापुरात श्रावणात मिळतात. मामे, श्रा घे म्हणजे घेवडा नव्हे! घेवडा इथे फोटोत आहे - http://www.maayboli.com/node/19333?page=3
>>>>>>>>>>> घ्या! आता जवस-आळशीला जोरदार टशन आली. लालू, हा घेवडा माहिताय गं पण या साधारण घेवड्याची मावसचुलत बहिण लागेल अशी अजून एक भाजी असते. जास्त हिरवी, जास्त लांब, जास्त सरळ, जास्त फुगिर आणि आतून फोफशी. त्याला श्रावणघेवडा म्हणतात असं मला वाटतं. मी म्हणतेय त्या शेंगा साधारण अशा दिसतात : http://www.floracafe.com/Search_PhotoDetails.aspx?Photo=Top&Id=1091

हे सगळे दिनेशदांनी सांगायचे नाही का? >> लोल लोला.

मी घेवडा आणि श्रा घे एकच समजत होते. >>> ये सायो बोटीत बसायला. Proud

एक चपटा, रुंद आणि किंचीत खरखरीत घेवडा असतो. तो जरा बेचव पचपचीत असतो. दुसरा फुगीर, अरुंद आणि तुळतुळीत घेवडा असतो. हा चविष्ट असतो. ह्याला गावठी घेवडाही म्हणतात. गावठी घेवड्यालाच बरेचजण श्रावण घेवडा म्हणताय का?

फरसबी अजून वेगळीच. हिला पण घेवडाच म्हणायचं असेल तर पिटुकल्या बिया असलेला, उंच स्लिम आणि आतून पोकळी नसलेला, उकलू शकणार नाही असा घेवडा म्हणावं लागेल.

Pages