श्रावणघेवड्याची सुकी भाजी (उपीटाच्या फोडणीसहित)

Submitted by ललिता-प्रीति on 29 April, 2013 - 00:12
shrava-ghvada-suki-bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- श्रावणघेवडा (फरसबी) पाव किलो
- १ मोठा कांदा (बारीक चिरून)
- हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
- कढीपत्त्याची पानं ५-६
- किसलेलं आलं १ छोटा चमचा भरून
- उडीद डाळ १ मोठा चमचा भरून
- खोवलेलं खोबरं पाव वाटी
- चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे भरून
- मीठ (चवीनुसार)
- साखर (चिमटीभर)
- तेल, मोहरी, हिंग

क्रमवार पाककृती: 

- श्रावणघेवड्याच्या शेंगा धुवून, निवडून, चिरून घ्याव्यात.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. ती तडतडली, की हिंग टाकावा. उडीद डाळ टाकावी.
- डाळ जरा तांबूस, खरपूस झाली, की कढीपत्याची पानं आणि मिरच्यांचे तुकडे टाकावेत. त्यावर चिरलेला कांदा टाकून चांगला परतावा.
- कांदा तांबूस झाला, की किसलेलं आलं टाकावं.
- जरासं हलवून त्यात चिरलेला श्रावणघेवडा टाकावा.
- कांदा आणि श्रावणघेवडा चांगला हलवून एकत्र करून घ्यावा. मीठ, साखर घालून पुन्हा हलवावा.
- झाकण टाकून भाजी शिजू द्यावी. अधूनमधून हलवावी. आवश्यकता भासल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
- भाजी शिजल्यावर त्यात खोबरं-कोथिंबीर घालून पोळी / भाकरीबरोबर वाढावी.

Copy of DSC03806.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

- ३० मिनिटांचा वेळ हा सगळी कच्ची तयारी करण्यापासून ते भाजी शिजण्यापर्यंतचा धरलेला आहे.
- भाजी शक्यतो वाफेवरच शिजवावी. (गरजेनुसार १-२ चमचे पाणी घालावे.) शिजल्यावर रस राहता कामा नये.
- फोडणीत हळद घालायची नाही. (हळद घातल्यावर भाजीची सगळी मजाच जाते.)
- कांदा, खोवलेलं खोबरं, आलं - यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. पण यातला कुठलाही जिन्नस वगळायचा नाही. (खोबरं जितकं जास्त घालाल, तितकी भाजीची लज्जत वाढते.)
- ही भाजी नुसती (पचडीसारखी) खायलाही अप्रतिम लागते. पांढर्‍या भाताबरोबरही चविष्ट लागते.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl

घेवडाचर्चा वाचून माझाही कॉन्फिडन्स ढळलाय आता >> आत्ता आत्ता मला यांची नावं समजायला लागली असं वाटत होतं.. आता पुन्हा पहिले पाढे .... भाजी हातात घेऊन "हि कितीला दिली" असं विचारावं लागेल. वरच्या ढीगापर्यंत हात पोचत नाही ती भाजी घेता यायची नाही. Rofl
मिनोतीच्या ब्लॉगवर फक्त घेवडा फोटो आहे. श्रा.घे फोटो द्या कुणी तरी. आणि इतर घेवडा ए, घेवडा बी असेही सगळे द्या आता.

कॅबेज आणि वांग >> Rofl

>>कवे, हे काय्ये? शोनाहो! पोराच्या हातात द्यायला सांगत नाही. वारसे चालवायला सुनांना वेठीला धरा! बायका सुधारणार नाहीत..>><<
हो आणि बोंबलत बसायचे रुढी, अन्याय वगैरे वगैरे म्हणून.. एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीवर अन्याय करते. Proud

बाकी, श्रावणघेवडा एक वेगळं प्रकरण आहे हे नक्कीच. (आई पुण्यात काहीतरी वेगळी भाजी श्रा. घे. म्हणून आणायची..).

फरसबी(मुंबईवाले) हे श्रावणघेवडा नाही.

मस्त लागते अशी भाजी, कांदा आधी कधी घातला नाही या भाजीत आता कांदा घालून करुन बघेन Happy

फरसबी/श्रावणघेवडा आम्ही या भाजीला म्हणतो Happy

ही झाडावरची फरसबी/श्रावणघेवडा

मिनोतीच्या ब्लॉगवरती आहे त्याला मी वालपापडी म्हणते.
मीपु च्या फोटोतल्या भाजीला मी श्रावण घेवडा/ फरसबी म्हणते

आईगं किती कन्फ्युजन! मी पुणेकर (आयडी नव्हे) त्यामुळे मीपुणेकर (आयडी) ने दिलेल्या फोटोतल्या भाजीलाच घेवडा, फरसबी आणि श्रावण घेवडा म्हणतो आम्ही. वाल पापडी / पापडी/ उसावरच्या शेंगा हे सगळं वेगळं.

मीपुणेकर, बरोबर - यालाच आम्ही फरसबी ऊर्फ श्रावणघेवडा म्हणतो.
मिनोतीच्या ब्लॉगवर आहे ती वालपापडी ऊर्फ घेवडा.

या मीपुणेकरच्या फोटोतल्या भाजीला आम्ही फ्रेंच बीन्स किंवा श्रावणघेवडा म्हणतो. अन ती करायची बर्‍यात बरी पद्धत वर ललितानी लिहिलेली आहे तीच. बाकी सगळ्या महाबोअर.

लले छान आहे ग भाजी. मलाही अशा शेंगांच्या भाज्या हळद न घालता मिरचीवरच्या आवडतात. गवारही अशी छान होते.

घेवडा (नुसता!) = वालपापडी - यावर सर्वांचे एकमत आहे.
फरसबी = ग्रीन बीन्स(फारच सर्वसमावेशक नाव आहे). याला काही उर्फ "श्रावण घेवडा" म्हणू नका.

या चित्रात जे आहे ते श्रा घे च्या जवळ जाणारे आहे. कडा सरळच असतात, "डोंगर दर्‍या" नाही. श्रा घे ला "फ्लॅट बीन्स" म्हणता येईल. यातही जरा रुंद प्रकार येतात. श्रा घे फारश्या रुंद नसतात. श्रा घे आतून फोपसा नसतो आणि हे फरसबी तर चवीला श्रा घे च्या जवळपासही जात नाही! Proud

shraghe.jpg

अजून माहिती-
http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-42-41/6536-2013-02-02...

>>हिंदीत घेवड्याला 'सेम' (किंवा 'सेम की फली') म्हणतात.
म्हणजे फरसबी, श्रा घे सगळ्या शेंगा एकाच फळीवरच्या, असं का?
रेसिपीचे नाव बदलून "ग्रीन बीन्सची भाजी" ठेवले तर वादच रहाणार नाही. Wink

वाचवा ऽऽऽऽ....... केवढी ती चर्चा !!! Lol

(त्या चर्चेत माझी - अनेकांना ऑलरेडी माहिती असलेली - रेस्पी अग्दी झाकोळून गेली बै... Proud )

मृण्मयीनं म्हटलंय तसं - कुठल्याही शेंगांची अशी भाजी चांगली लागेल. तेव्हा आपापल्या घरांमधे ज्या कशाला श्रा.घे./ फरसबी म्हणतात, त्या भाजीला पकडा आणि अशी शिजवा! Wink
शेवटी जीभेला काय, चांगली चव हवी, मग ती फरसबी असो, नाहीतर गर असलेलं Lol पडवळ...

श्री, बरोबर आहे.

हाच तो ज्याचा शोध चालला होता. हा श्रा. घे, फरसबी(मुंबईकर म्हणतात ते) पेक्षाही ज्यास्त चविष्ट असतो. नुसते दाण्याची भाजी इंदोरला करतात तर कचोरी सुद्धा(लिलवा कचोरी प्रमाणे)

पापडी चपटी असते.

मी चित्र शोधून दमले.

लोला+११११११.... स्वारी लले Wink

मलापण फ्रेंच बीन्स ना श्रावणघेवडा म्हणत नाही असंच वाटतंय..

पर तेरी रेस्पी झक्कास है.. .. कालच केली.. बरच झालं इथे सेमी मिळतच नाही नाहीतर मलाही कन्फ्यूज होण्याचे चांसेस होते Proud

श्रीने दाखवलाय तो गावठी घेवडा. मी आता यालाच श्रावण घेवडा म्हणून फायनल करते माझ्यापुरतं. फरसबी इज फरसबी ओन्ली.

लले, तुझ्या कसल्याही लिखाणात कस्सल्ली ताकद आहे बघ!

पुण्यात दर्शनमध्ये जाऊन श्रावण घेवडा सँडविच खाऊनच या, म्हंजे श्राघे कोणता हे लग्गेच कळेल मुलींनो! Proud

हो, लोलाने दाखवलाय तोच श्रा. घे. पण गोल शेंगा पण त्याचीच एक व्हरायटी म्हणून वाटतात.
श्रीने दाखवलेला तो श्रा.घे नसून त्याला घेवडा म्हणतात का वालपापडी म्हणतात? मी वरती एकच लिहिलं असलं तरी मला आता ते वेगवेगळे वाटतायत. ज्या पावट्याच्या दाण्यांची उसळ होते तो कसा दिसतो?

ही चर्चा मला हिंदी-बंगाली प्रांतात घेऊन जायचा अनिवार मोह होतोय. अल्पनाने हिंदीत सेम की फली म्हण्जे घेवडा लिहिलंय. बंगालीत शीम म्हणतात ते खालीलप्रमाणे दिसतं. आता त्याला मराठीत नक्की काय म्हणायचं हा माझा घोळ झालाय
sim-indian-beans.jpg

वरदा, हा साधा घेवडा आहे.
वालपापडीची शेंग मधोमध रुंद असते करंजीसारखी. रुंद म्हणजे फुगीर नव्हे.

>>मीपुणेकरने दाखवलेली फरसबी आणी श्री यांनी दाखवलेलाच श्रावण घेवडा (भोगीला भाजी करतात तो) आणी ललिता यांनी जी भाजी केलीय ती फरसबीचीच.<<

बोल्ड केलेल्या +१

आईगं किती कन्फ्युजन! मी पुणेकर (आयडी नव्हे) त्यामुळे मीपुणेकर (आयडी) ने दिलेल्या फोटोतल्या भाजीलाच घेवडा, फरसबी आणि श्रावण घेवडा म्हणतो आम्ही. वाल पापडी / पापडी/ उसावरच्या शेंगा हे सगळं वेगळं.
<<<
मीपुणेकर, मैत्रेयी +१.
मीपुणेकर चा फोटोच बरोबर , बाकी सगळे पापडीचे प्रकार आहेत!
इतकी चर्चा झालीये तर एक पोल होउन जाउ द्या , फोटो मधला श्रावण घेवडा कुठला ते ओळखा Proud

अरे श्री च्या फोटोत वालाच्या शेंगा आहेत. तो श्राघे नव्हे Proud
त्याच्याच चपट्या उप प्रकाराला वालपापडी म्हणतो आम्ही. जी उंधियु मध्ये घालतात... वाल अन वालपापडी हिवाळा स्पेशल भाजी आहे. (पुण्यात वाल उन्हाळ्यातही दिसतात. कालच पाहिली मार्केटमध्ये.).
ही पोस्ट म्हणजे अगदीच टिपिकल झालीय Proud

वालपापडी म्हणतो आम्ही. जी उंधियु मध्ये घालतात... >>> ती सुरती पापडी. Happy

आमच्याकडे श्रावणघेवडा हे नावच नाही. मीपुणेकरने फोटोत दाखवलेत ते बीन्स उर्फ फरसबी. श्री च्या फोटोत आहेत ते घेवडा. वालपापडी त्यापेक्षा चपटी आणि रूंद, सुरतीपापडी एकदम लहान असते बोटाएवढी.

Lol
ललिता, झाकोळून कुठली, या चर्चेने उजळून निघाली तुझी रेस्पी Proud

तरी, घेवडा, श्रावणघेवडा, वालपापडी, फरसबी या वेगळ्या भाज्या आहेत आणि त्या नक्की कशा दिसतात ते माहीत असल्याचा मला अभिमान का काय म्हणतात तो आहे एवढे बोलून मी माझा चर्चेतला वाटा संपवते Lol

Pages