प्रॉन्स रवा फ्राय अर्थात 'बाजीगर प्रॉन्स'

Submitted by अमेय२८०८०७ on 17 April, 2013 - 14:58

एखादा दिवस असा नतद्रष्ट उगवतो, किरकोळ कारणावरून सकाळी सकाळी पत्नीशी प्रचंड वैचारिक मतभेद (!) होतात. मुलाला शाळेत पिटाळून घेत असलेल्या पहिल्या चहातही अबोल्याची माशी पडते आणि ऑफिसला लवकर जायचे असल्याने वाद न मिटवता पळावे लागते. पहिल्या दोनेक तासांचा कामाचा रगाडा जरा आवरला की फोन करून अंदाज घेऊ म्हणत मी कार गॅरेजच्या बाहेर काढतो. घरासमोर वळण घेताना सवयीने रिअर व्ह्यू मिरर पाहिला जातो, पण टेरेसचा रोजचा प्रसन्न कोपरा आज रिकामा दिसतो. आता कामाचा दिवस पुढे दिसायला लागलेला असतो आणि मोठ्या रस्त्यावर आल्याने गाडी चालवण्याकडे लक्ष द्यायला हवे असते.
आज नेमक्या किचकट मीटिंगा लागतात. चर्चेमध्ये आउट ऑफ द ब्लू असा काही मुद्दा येतो की वातावरण गरम होऊन जाते. तणतणलेली डोकी एकमेकांना साधे अभिवादनही न करता पाय आपटत आपापल्या कार्यक्षेत्रात निघून जातात. राग नावाच्या अडाणीपणापुढे उत्तमोत्तम संस्थांमध्ये घेतलेले तंत्र आणि व्यवस्थापनशिक्षण कसे फोल ठरते याचा जणू वस्तुपाठच दिसलेला असतो.
ऑफिसात ए.सी.पुढे बसून गारवताना फोनचे लक्षात येते. फोनची 'सायलेंटी' तोडून घराचा नंबर फिरवणार एवढ्यात हात थबकतो. "तिचा तरी कुठे फोन आलाय? नेहमी ब्रेकफास्टची आठवण करायला शॉर्ट किंवा मिस कॉल झालेला असतो यावेळेपर्यंत." माझे अकाली ओव्हरहीट व्हायला लागलेले सी.पी.यू. काहीबाही आऊटपुट देऊ लागलेले असते. इतक्यात पुन्हा कामाचे सत्र सुरू होते. तणातणीचा फील कायम राहणार असे दिसू लागल्यावर मात्र मी खडबडून जागा होतो. फाटे फुटत चाललेल्या कामावर नियंत्रण मिळवले जाते. क्विक लंच करून काम चालू राहते. तीन-साडेतीन पर्यंत दिवसाचे पहिले पॉझिटिव संकेत दिसू लागतात. पाच वाजेपर्यंत तर अगदी चमत्कार व्हावा तसा कायापालट झालेला असतो. बरेच मुद्दे सॉर्ट आऊट झालेले असतात. बाकीचे उद्यापर्यंत नक्की होतील अशी चिन्हे असतात. साडेपाचची मीटिंग आश्चर्यकारी खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडते. सकाळी एकमेकांच्या तोंडाकडे पाहण्याची इच्छा नसलेली टाळकी आता एकमेकांचे गुण गाईन आवडी करत असतात. श्रमपरिहार म्हणून घरी जाता जाता क्लबमध्ये 'फॉर अ क्विक वन' साठी जमण्याच्या गप्पा सुरू होतात. अपार बंधुभावाने ओथंबत शेवटच्या तासाभरात काम आवरताना मला घरातला अनफिनिश्ड बिझनेस आठवतो. "बस्स, गेल्या गेल्या मिटवून टाकायचे." काय केले म्हणजे पापक्षालन होईल हा विचार चालू होतो. माझ्या 'मेझरमेंट' प्रमाणे भांडण अगदी साडी-डिनर डेट-आऊटींग इतक्या तीव्रतेचे नसले तरी अगदी फक्त फुलांनी 'मांडवली' होईल इतके हलकेही नसते. "येस्स, आज काहीतरी साधा पण मस्त पदार्थ करून खिलवायचा. तिला किचनमध्ये येऊ द्यायचे नाही. अजून रागात असल्याचे सोंग करायचे आणि एकदम डिश तयार झाल्यावर समेट करायचा.काय करायचे ते घरी जाता जाता ठरवू". मी कार सुरू करतो. इतक्यात मित्राचा फोन येतो. "अरे प्रचंड ताजे प्रॉन्स मिळालेत. पाठवून देतोय. वा वा, मलाही आता भुकेची जाणीव व्ह्यायला लागली असते. घरी जाऊन मस्तपैकी प्रॉन्स रवा फ्राय करू. सिंपल, क्विक अ‍ॅंड टेस्टी! एखादे क्विक मॉकटेल मारू आणि लेट्स टेक इट अहेड फ्रॉम देअर म्हणत मी मित्राला धन्यवाद देतो आणि प्रॉन्स साफ करून पाठवायची रिक्वेस्ट करतो. त्याने आधीच ते केलेले असते. 'आय ओ यू वन, मेट' म्हणत मी स्टार्टर मारतो. घरात एंट्री प्रचंड नाटकी पद्धतीने करतो. गंभीर चेहरा करून बूट काढतो. किल्ल्या, बूट, बॅग सगळं जागच्या जागी ठेवतो. पत्नी निर्विकार चेहर्‍याने का होईना टेनिस मॅच बघितल्यासारखी माझ्याकडे बघत असते. वॉश घ्यायला बाथरूमात जातो. बाहेर येऊन आवरताना ड्रेसिंग टेबलाजवळ चहाचा कप दिसतो. चला बर्फ वितळायला सुरूवात झालीये म्हणत मी किचनमध्ये जातो. आता माझा झपाटा बघण्यासारखा असतो. टाईम अँड मोशन स्टडी, अरगॉनॉमिक्स याचे एक आदर्श प्रात्यक्षिक होईल अशा सफाईने मी प्रॉन्स रवा फ्राय बनवतो. झटक्यात मिनीबारजवळ जाऊन एकदम रंगीन लुकिंग फ्रेश मॉकटेल तयार करतो. जमेल तशी प्लेट सजवतो देखील. पत्नी एकदा फक्त आत डोकावून भुवया उंचावून गेलेली असते.
आता कसोटीचा क्षण. प्रसन्न चेहर्‍याने दोन्ही ट्रे सांभाळत मी बाहेर येतो. पत्नीसमोरच्या टी-पॉयवर सगळा सरंजाम मांडतो. टॉम क्रूझच्या स्टाईलने अदबीने पत्नीसमोर वाकताना लक्षात येते .. ती नॉन वेज खात नाही.
माझा चेहरा शरमेने लाल होतो, वाकलेले शरीर धनुर्वात झाल्यासारखे आखडते. मॉकटेल देण्यासाठी पुढे केलेला हात तसाच राहतो. पण... हळूहळू पत्नीचा चेहेरा मृदू होऊ लागलेला असतो. सगळा प्रकार तिच्या लक्षात आलेला असतो. टी.व्ही. चा आवाज कमी करून ती चक्क मोकळे हसायला लागते. मला बसायला जागा करून देता देता तिच्या प्रेमळ चर्येवर 'समेट' झाल्याच्या स्पष्ट खुणा दिसू लागतात. माझा सगळा स्ट्रेस निघून जातो, तिचा हात हातात घेऊन थोपटता थोपटता मी टी.व्ही.कडे पाहतो. दाखवून चोथा झालेला बाजीगर लागलेला असतो पण आज शाहरुखचा डायलॉग काळजात घुसतो.. "हार कर जीतनेवाले को ही बाजीगर कहते है."
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रॉन्स रवा फ्राय (बाजीगर प्रॉन्स)

साहित्य

प्रॉन्स
दोन अंडी
रवा + तांदळाचे पीठ (एक वाटी रव्याला एक मोठा चमचा पीठ या प्रमाणात)
हिंग, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, धणे-जीरे पूड : हे सर्व रव्याच्या प्रमाणात चवीनुसार, आवडत असेल तर चिमूटभर ओवा.
तेल

कृती

रव्यातांदळाच्या मिश्रणात हिंग, हळद आणि मसाले ई. मिक्स करून घ्यावेत.

prf1.JPG

दोन अंडी फोडून एकाचा पिवळा भाग टाकून द्यावा. राहिलेले दोन अंड्यांचा पांढरा आणि एक पिवळा भाग हलका फेटून घ्यावा.

प्रॉन्स अंड्यामध्ये बुडवून बाहेर काढावेत. नीट कोटींग झाले पाहिजे. असे प्रॉन्स रव्याच्या मिश्रणात घोळवावे. रवा सारखा लागेल असे पहावे.

prf2.JPG

प्रॉन्स सोनेरी होईपर्यंत चांगल्या गरम झालेल्या तेलात तळून घ्यावेत, ३-४ मिनिटात तळले जातात. आवडत्या सॅलड - सॉस बरोबर सर्व्ह करावेत.

prf3.JPGprf4.JPGprf5.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही जी पाकृ दिली आहे त्यातलं मला काहीच कळत नाही.टेस्टी असावी असं दिसतंय. ज्याअर्थी तुम्ही पाकृ वर पाकृ देताय त्या अर्थी तुमची बायको सुखी आहे. पण तुमच्या या लेखावरून कुठेतरी दंगल उसळलेली आहे. मी लिंक देणार नाही आणि स्क्रीन शॉट तर घेतच नाही. कारण आग लावायची सवय नाही. त्या बाफवरच्या चर्चेतून पुढे आलेले मुद्दे असे.

१. प्रस्तावना खूपच मोठी झाली
२. बायको व्हेज आहे हे शेवटच्या क्षणी कसं काय लक्षात आलं ?
३. लोक तरी पण तिथे छान छान प्रतिक्रिया का देताहेत ?
टीप: त्या बाफवरच्या प्रतिक्रिया इथे येताना शालजोडीमधे आलेल्या आहेत. तेव्हां बिटवीन द लाईन्स वाचण्याची सवय असणे उत्तम.

लेखकाला वाचकांना झोडायचे असल्यास सांगावे. लेखक समजूतदार असल्यास म्हणेल, "आपल्याला काय म्हणा त्याचं ?"
आपण कामाचं बघायचं. पाकृ चांगली आहे कि नाही इतकंच. नवा आहे लेखक. उत्साह असतो. होतात चुका. असं आपलं अडाण्यांचं म्हणणं. शहाणे आणि सेन्सीबल लोक असाच विचार करतील असं नाही.

हमारी तो आदत है कि हम कुछ नही कहते.

रेसिपी मस्त. फोटो तोंपासु आहे पण .... शेवट अजिबातच पटला नाही. एकवेळ दाण्याचं कूट, बेसन ह्यासारख्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असेल तरी चुकून तो पदार्थ वापरला गेला असं होऊ शकतं किंवा मग नेहेमी एखादा पदार्थ खाणारा ठराविक दिवशीच खात नसेल आणि लक्षात राहिलं नाही तर ते पटू शकतं.

एकतर प्रस्तावना काल्पनिक आहे किंवा मग स्मरणशक्तीत गंभीर बिघाड आहे Wink Light 1

च्यामारी!
बायको शाकाहारी आहे हे विसरूच शकत नाही असे गृहितक धरून धर प्रॉन्स-कुकर की बडव अस्लं चाल्लंय हितं.
अहो बायको 'आहे' हेच विसरले तर बरे होईल असा इच्चार करणारे किती नवरे माबोवर आहेत? असा धागा काढला तर आवाजी मतदानाने प्रस्ताव पास होईल.
उगं बिच्चार्‍याला धरून धोपटून र्‍हायलेत.
नवरा बायकूच्या भांडणात पडू नै म्हंतात ते विसरू नका लोकहो.

अमेय राव,
तुम्ही इग्गी मारा बाकीचे प्रतिसाद,
ती डिश जरा जवळ घ्या. मी पेग भरतो सोबतीला Wink

इब्लिस, आम्ही शहाणे लोक भांडणात नाही पडत. प्राॅन्स शाकाहारात चालत नाहीत हे विसरले असतील अमेय. त्यांना ते पाणशेंगा किंवा पाणकाजू वाटले असतील. खूष?
प्राॅन्स कोळीवाडा पण हेच ना? आम्ही तळलेली चिंगळं म्हणतो. मस्तं आहेत. मी कधी अंड नाही वापरलं. आलंलसूण पेस्टवर रवा चिकटतो. आता या पद्धतीने करून बघीन.

>> अहो बायको 'आहे' हेच विसरले तर बरे होईल असा इच्चार करणारे किती नवरे माबोवर आहेत?
यांनी तसाच विचार केला असावा अशी मला दाट शंका आहे. सकाळी चांगलं भांडण झालेलं असताना आणि मिटवायच्या नादात नवर्‍याने इतकं भारी कोलीत आयतं दिलेलं असताना झाला प्रकार विसरून मोकळे हसणारी स्त्री ही बायकोच नव्हे! Proud

पाकृ अन प्रचि अगदी सोनेरी सोनेरी.. बाकी वादग्रस्त शेवटाबद्दल इतकेच, की होतात अशा जजमेंटल चुका भावनेच्या भरात ! मी नाही का 'बॅड बॉय ऑफ बँड्रा ' अशा कॉन्व्हेंटी भावाला 'विंदांच्या प्रेमकविता' भेट देऊन बोलणे खाल्ले होते 'स्वतःच्या आवडी माझ्यावर लादतेस' म्हणून Happy

ओह !
आले वाटतं इथेच सगळे विथ रिअल प्रतिक्रियाज ! मी काही लिंक देणारच नव्हतो. आग लावणे आपल्याला जमता नाही. सगळ्यात जास्त धोका मला नाही का ?

बरं आता तिथल्या प्रतिक्रिया निधड्या छातीने इथं दिल्याच आहेत तर अभिनंदन करतो.

छान कृती आहे, विशेषतः सादरीकरण.:स्मित: आमच्या घरात मी आणी माझ्या साबा अशा आम्ही दोघीच शाका. त्यामुळे घासफुस ह्या क्याटेगिरीवर आमचाच हक्क.:फिदी:

तसे पाहिले गेले तर तुम्ही तुमची बायको शाकाहारी आहे हे पहिल्या १- २ रेसेपीतच सांगीतले आहे. खाली बघा.

<<<<<मूळ गुलाश मांसाहारी असतो पण सौ. शुद्ध शाकाहारी असल्याने आम्हाला खालील शाकाहारी व्हर्जनच भावलेली आहे.>>>>>

http://www.maayboli.com/node/41181

पण बहुतेक बायकोला शांत / खूश करण्याच्या नादात ते विसरलेला दिसता आहात्.:फिदी:

असो होते असे कधी कधी.:स्मित: पण परत अशी चूक करु नका, नाहीतर बायको लाटण्याने हाणेल्.:खोखो:

ह्यावेळी अंमळ धापच लागली... श्टोरी संपतच नाही... दोनदा चेक केले ललित मध्ये नाहीत ना.... शेवटी आली हो रेसीपे.

मला वाटले तुम्ही रेसीपीच लिहायला विसरलात.

रच्याकने, मला तळलेले प्रॉन्स प्रचंड आवडतात. कालच रेड लॉबस्टर मध्ये खाल्ले....

झंपी.:फिदी:

रेसीपी छानच , फोटो पण मस्त
पण शेवट मात्र गंडलाय.
' बायको व्हेज. आहे हे विसरलो' हे भारीच
आणि ह्या नंतर सुद्धा तुमची बायको समेट करते हे अधिक भारी.
त्यामुळे तुम्ही खुपच भारी

मला नाही आवडली यावेळची लिखाणशैली
मी फक्त तुमच्या शैलीसाठी तुमच्या रेसिप्या वाचते...

Pages