मनातील 'सल' 'अस्सल' पणे मांडणारा व्यथा सम्राट - अर्थात कविवर्य सुरेश भट

Submitted by किंकर on 14 April, 2013 - 16:59

आज १५ एप्रिल,विदर्भाच्या रणरणत्या परिसरात एक्क्याऐंशी वर्षांपूर्वी अमरावतीत एक मुल जन्मास आले. वडील प्रथिथयश वैद्यकीय व्यवसायिक, तर आई एक कवियत्री.आता त्यावेळची ही घटना म्हणजे,एका सुखवस्तू कुटुंबात एक मुल जन्मास आले,इतपतच महत्वपूर्ण होती.मुल वाढू लागले,सर्व काही चाकोरीत चालले होते.पण मुल जेमतेम अडीच वर्षाचे झाले आणि घरातच डॉक्टर असूनही पोलिओचा अघात मुलास जन्माचे अपंगत्व देवून गेला.
खरेतर सर्वच नियतीचे खेळ.असे का ? या अनुत्तरीत करणऱ्या प्रश्नाच्या मालीकेत कुटुंबाची दैनंदिन गुरफटत गेली.आणि त्या अपंगत्वाचे ओझे मनावर घेवूनच ते मुल वाढत गेले.मुलाच्या वाढीत घराचा हातभार होता पण तो भार हाताबाहेर गेला होता.
आर्थिक आघाडीवर ते मुल ओझे नसेल, पण त्याचे अपंगत्व ओझे झाले होते.त्यामुळे त्यास घराचे छप्पर होते पण सावली नव्हती.माउली अबोलपणे सर्व काही करत होती,पण कुटुंबातील अन्य घटक अजाणतेपणे मूक झाले होते.
माणसास दुर्लक्ष झालेले एक वेळ चालते, पण दखलच घेतली गेली नाही तर त्याची होणारी कुचंबणा त्यास अगदी आतून कोलमडून टाकते आणि असे उन्मळून पडणे जेंव्हा घडते, तेंव्हा ते घडते,पण इतरांना ते दिसत नाही.याचेच परिणाम त्या माणसाची परिमाणे बदलण्यात होतात,आणि हेच सर्व घडले.असे दुर्दैवी बालपण वाट्यास आले त्या जीवाचे नाव होते-‘ सुरेश श्रीधर भट.’
अर्थात यात सुरेशजींच्या कुटुंबियांच्या कर्तव्यपुर्तीवर कसलीही टीका करण्याचा जरासुद्धा मानस नाही,पण त्यांची भूमिका सुरेशजींच्या मनात काय द्वंद्व निर्माण करीत असेल,याची प्रचीती त्यांच्या वागण्यातून येत असे आणि हाच सल सुरेशजी मनात ठेवून जगले असे नेहमीच वाटते ,तरीपण म्हणून त्यांनी कधीच कुणाचा द्वेष केला नाही.
मनाच्या तळ कप्प्यात गाडलेले दुखः तो कोंडमारा त्यांच्या कवितेतून आपल्या समोर आला.वाट्यास आलेली अवहेलना, त्याची वेदना, त्यांना अंतर्मुख करीत वैचारिक पातळीवर समृद्ध बनवत गेली.आणि खरेच तसे घडले हेच बरे झाले,कारण स्वतःला व्यक्त करण्याचा सुरेशजींनी निवडलेला काव्य रचनेचा मार्ग,आज मराठी साहित्यातील कविता,काव्य,गझल ही दालने समृद्ध करून गेला.
सुरेशजी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला.गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला.हा त्यांचा प्रयास त्यांना 'गझल सम्राट' हा मनाचा किताब देवून गेला.पण कविता, गझल ह्या त्यात दडलेल्या अर्थासह समजावून घ्यावयाचे झाल्यास, मला तर ते खरेतर 'व्यथा सम्राट' वाटतात.आणि म्हणूनच जेंव्हा ते म्हणतात -
'वेदनेला अंत नाही अन कुणाला खंत नाही
गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी.'
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.

याठिकाणी मला या त्रासातून सोडव हि विनंती नियतीला करताना,त्यांचा सूर कोठेही "सोडव एकदा यातून" असा नसून त्यांना या सर्वापासून मुक्ती हवी आहे.आणि अशी मुक्ती हि मनात सल असले तरी द्वेष ठेवला नाही तरच मिळू शकते, याची त्यांना नक्कीच पुरेपूर जाण होती.
त्यांचे संवाद देखील स्वःमनाशी जेंव्हा चालत तेंव्हा त्यातील अंतर्मुखता पराकोटीची असल्याने आपोआप शब्द साकारतात -
समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !
मनातील खळबळ किंवा ज्याला आपण आतून तुटणे म्हणतो ते, अचूक शब्दात टिपताना केवळ शाब्दिक कसरत न करता भावनांना वाट करून देताना त्यांनी ज्या उपमा वापरलेल्या आहेत त्या खरोखरच शब्दातीत आहेत. त्यामुळे -
खरेच माझा जगावयाचा विचार होता …
या रचनेत त्यांनी जिवंतपणी भोगलेले मरणच मांडले आहे. वाट्यास आलेली दुजेपणाची वागणूक देणाऱ्या वृत्तीवर टीका करताना ते म्हणतात-

दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही,
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता!

पण या सर्व परिस्थितीवर उपाय सांगताना, केलेल्या कृतीचे समर्थन करताना,ते वास्तवावर इतके अचूक बोट ठेवतात कि, त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेली दुखेः त्रासदायक का तेथील परिस्थिती क्लेशदायक याचा आपणास प्रश्न पडावा, आणि त्यामुळेच जगायचा विचार हा देखील भूतकाळ बनतो आणि शब्द येतात-

अखेर गावामधून त्या मी निघून गेलो
तिथे उषेचा प्रकाशही जातवार होता!

वाट्यास आलेले आयुष्य जगताना त्यांनी खरोखरच सकारात्मक जगण्याचा प्रयत्न केला, पण त्यात सुद्धा कधी कधी अपयशच आले.जगण्यातील हे मैत्र त्यांच्या नजरेतून पाहताना, जीवनास मित्र मानत ते प्रश्न करतात आणि म्हणतात -
सूर मागू तुला मी कसा ?
जीवना तू तसा मी असा !

जे दान पदरात पडले त्याकडे, कवी नजरेने पाहिल्यामुळे, आपोआपच पुढील शब्द साकारतात-
एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा !

या खेळाच्या खेळीकडे वळून पाहताना,जरी हे सर्व मनासारखे झाले नाही तरी जग रीत म्हणून,मी कसा जगलो हे सांगताना -
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगले कि मज हसावे लागले !

या शब्दात ते अंतरंग उलगडतात .जगाचे मतलबी वागणे आणि त्याचा तिटकारा व्यक्त करताना, त्यांच्या 'केला करार त्यांनी' या रचनेत ते म्हणतात -

झाली जशी निकामी त्यांची जुनी हत्यारे ,
माझ्यावरी दयेचा केला प्रहार त्यांनी !

सुरेश भट एक प्रथित यश कवी म्हणून सिद्ध होण्याचा काळ आणि त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातील भोग यांचा एकूण प्रवास बराच काळ समांतर राहिला आहे. शालेय, महाविद्यालयीन व पदवी इथ पर्यंतचे शिक्षण हे अनेकदा अपयश पचवीत त्यांनी पूर्ण केले.मग घरावर भार नको म्हणून, ग्रामीण भागात जावून शिक्षकी पेशा स्वीकारून, जगणे सुरु ठेवले. त्या काळात बरोबरीचे अनेक जण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात स्थिर हॊउन इतरांना अनाहूत सल्ले देण्या इतके पुढे गेले होते.
याकाळातील कटू अनुभव नमूद करताना एका मुलाखतीत सुरेशजी म्हणतात -
" सांगू की नको? सांगतोच! त्या तशा अस्थिर काळात मी एकदा अमरावतीला गेलो होतो. प्रा. मधुकर केचे त्या रात्री स्टेशनवर भेटले. ते त्यावेळी सर्वार्थांनी फॉर्मात होते-म्हणजे प्राध्यापकाची नोकरी होती; त्यांचे लग्न झाले होते; चोहीकडे त्यांचे नाव झाले होते; आणि त्या पार्श्वभूमीवर , ते त्यावेळी ते मला अत्यंत उपहासाने हिणवीत म्हणाले होते: 'सुरेश, तू आता कवी म्हणून संपलास! तू आता अशीच गावोगावी मास्तरकी कर!' मी त्यावेळी त्यांना इतकेच म्हणालो, 'ते अजून ठरायचे आहे!' नंदनवार, आता परिस्थिती बदलली आहे. पण, मागची परिस्थिती मी विसरलेलो नाही. काही काळापुरती मला जीवनाच्या मोर्च्यापासून माघार घ्यावी लागली; पण कविता जगण्याचे युद्ध मी जिंकलो आहे! हे युद्ध जिंकल्यामुळे मी जीवनाचे युद्ध जिंकले आहे...
मला वाटतेय कि असे अनुभवच सुरेशजींच्या लेखाणीतून -

सल जुनेच सलता सलता सुखावून गेले
अन हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो

हे शब्द साकारण्यास कारणीभूत ठरले असतील
अर्थात 'रूपगंधा' आणि 'रंग माझा वेगळा ' या काव्य संग्रहास मिळालेले राज्य शासनाचे पुरस्कार ,विद्यापीठ स्तरावर त्यांच्या काव्य रचना अभ्यासक्रमास निवडणे, विदर्भीय साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड या घटनाक्रमाने त्यांच्यातील माणूस नक्कीच सुखावला गेला असेल, कारण त्यामुळेच दुभंगून जाता जाता त्यांना म्हणावे वाटले -

ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी
निमित्तास माझे गाणे ,निमित्तास टाळी
तरू काय ? इंद्रायणीचा मी तरंग झालो
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

आणि शेवटी या रचनेवर मला नक्कीच असे वाटते कि,"सुरेशजी खरोखरच तुम्ही, तरू काय ? असा प्रश्न विचारण्याची खरोखरच अजिबात गरज नाही.
तुमच्या कार्याचा 'एल्गार' च सांगतोय कि ,तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'रंग माझा वेगळा' हा आम्हाला नुसताच दिसत नाही, तर त्यातील 'रसवंतीचा मुजरा' आम्हास 'सप्तरंग' दर्शवित 'रूपगंधा'तील 'झंझावात' आम्हा रसिकांना खरोखरच आतून हलवत उन्मळून टाकण्यास समर्थ आहे"

आज तुमच्या जयंतीच्या निमित्ताने इतकेच म्हणावे वाटते कि,तुम्ही आम्हाला सोडून गेलात तरीही-

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे
अजुनी रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !
उष:काल होता होता काळरात्र झाली !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर लेख! ओळींची निवडही अतिशय समर्पक आणि त्या ओळींची गुंफण भावोत्कटपणे देण्यात आली आहे. सुरेश भटांवर वाचलेल्या अनेक लेखांपैकी या लेखाचे स्थान मनातल्या मनात खूप महत्वाचे ठरवून टाकले गेले. धन्यवाद!

भटसाहेबांना आदरांजली!

श्री, लालशाह,सहेली - मनपूर्वक धन्यवाद.
बेफिकीर- खरे तर गझल तांत्रिक दृष्टीने समजावून घेणे थोडे अवघड वाटते, पण त्याचा भावार्थ मनास भिडला कि ती भावते. त्यामुळे उतरला हा लेख,आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार.
mansmi18 - खूप लिहावे वाटत होते, पण अंतर्मुख होत थांबलो . धन्यवाद !

खुप छान... मनापासुन आवडला... Happy

सुरेश भटांची पार्श्वभुमी.. बालपण याबद्दल काहीच माहीत नव्हते!

भटसाहेबांना आदरांजली!

अतिशय सुंदर लिखाण. एका विराट प्रतिभेच्या कलाकाराला शोभेल अशी आदरांजली. निवडलेल्या ओळी आणि लेखन यांचा सुरेख मिलाप लेखाला उंचीवर नेऊन गेला आहे.

निवांत वाचावा म्हणून बाजूला ठेवला होता
त्याच सार्थक झाल

नेमक्या शब्दात खूप काही लिहीलत
भटांच्या ओळी पण समर्पक रित्या वापरल्यात

खरोखर सुंदर लेख!
एका विराट
प्रतिभेच्या कलाकाराला शोभेल
अशी आदरांजली.>>+1

किंकर, आज निवांतपणे लेख वाचला, कारण तुमचे लेख हे जाता-जाता वाचण्यासारखे नसतातच. वाचायला उशीर झाला, पण हरकत नाही, मनाजोगा शांतपणे वाचायला मिळाला. खूप छान लेख लिहिलाय. तुम्ही मोजकेच लेख लिहिता पण ते लेख मनावर कायम कोरून रहातात.

कविराजांना आदरांजली.. खूप सुंदर लिहिले आहे.. जीवनात कोणत्या कुरुपातून कसले सौंदर्य निर्मिले जाईल सांगता येत नाही.त्यांनी खूप सोसले म्हणून असे अस्सल शब्द शारदेने त्यांना बहाल केले..

सखी-माउली, स्वरूप ,मामी, गंगाधरजी, सुशांत- धन्यवाद !
अमेय- लेख चांगला होण्यामागे सुरेशजी यांची प्रतिभा कारणीभूत आहे.
जाई, प्रज्ञा १२३ - आपणास वाचनाचे समाधान लाभले,यातच आनंद वाटला.
भारती - नियती नेहमीच पारडे संतुलित करत असते, आपले मन माझ्यावर अन्याय झाला हा जप करत राहते.

किंकर, आज निवांतपणे लेख वाचला, कारण तुमचे लेख हे जाता-जाता वाचण्यासारखे नसतातच. वाचायला उशीर झाला, पण हरकत नाही, मनाजोगा शांतपणे वाचायला मिळाला. खूप छान लेख लिहिलाय. तुम्ही मोजकेच लेख लिहिता पण ते लेख मनावर कायम कोरून रहातात.>>>>>>>>>>>>>>>>>>+१०००००००००००००००००००००००००
प्रज्ञा, अगदी माझ्या मनातल बोललीस.
किंकर खूप छान लेख. माहिती आणि समर्पक गाणी छानच. तुम्ही लेहिलेल्या लेखात आम्हाला माहित नसलेली बरीच माहिती असते.

शोभा१२४- खरेतर लेख माहितीपूर्ण असावा असा प्रयत्न असतो. अभिप्राया साठी धन्यवाद!
केदार-आभारी आहे.

कविंच्याबद्दलचा आदर आणि सदभाव लेखातून ओसंडततो आहे .मागच्या वर्षी 'सह्याद्रिच्या पाऊलखुणा' मध्ये अचानक एक तासाची सुरेश भटांवरची चात्रफित पाहाण्यास मिळाली होती त्याची आठवणा झाली .रंग माझा वेगळा देवकि पंडीत गायली आहे .

Mandar Katre, Srd - अभिप्रायासाठी मनपूर्वक आभार !