प्रॉन्स रवा फ्राय अर्थात 'बाजीगर प्रॉन्स'

Submitted by अमेय२८०८०७ on 17 April, 2013 - 14:58

एखादा दिवस असा नतद्रष्ट उगवतो, किरकोळ कारणावरून सकाळी सकाळी पत्नीशी प्रचंड वैचारिक मतभेद (!) होतात. मुलाला शाळेत पिटाळून घेत असलेल्या पहिल्या चहातही अबोल्याची माशी पडते आणि ऑफिसला लवकर जायचे असल्याने वाद न मिटवता पळावे लागते. पहिल्या दोनेक तासांचा कामाचा रगाडा जरा आवरला की फोन करून अंदाज घेऊ म्हणत मी कार गॅरेजच्या बाहेर काढतो. घरासमोर वळण घेताना सवयीने रिअर व्ह्यू मिरर पाहिला जातो, पण टेरेसचा रोजचा प्रसन्न कोपरा आज रिकामा दिसतो. आता कामाचा दिवस पुढे दिसायला लागलेला असतो आणि मोठ्या रस्त्यावर आल्याने गाडी चालवण्याकडे लक्ष द्यायला हवे असते.
आज नेमक्या किचकट मीटिंगा लागतात. चर्चेमध्ये आउट ऑफ द ब्लू असा काही मुद्दा येतो की वातावरण गरम होऊन जाते. तणतणलेली डोकी एकमेकांना साधे अभिवादनही न करता पाय आपटत आपापल्या कार्यक्षेत्रात निघून जातात. राग नावाच्या अडाणीपणापुढे उत्तमोत्तम संस्थांमध्ये घेतलेले तंत्र आणि व्यवस्थापनशिक्षण कसे फोल ठरते याचा जणू वस्तुपाठच दिसलेला असतो.
ऑफिसात ए.सी.पुढे बसून गारवताना फोनचे लक्षात येते. फोनची 'सायलेंटी' तोडून घराचा नंबर फिरवणार एवढ्यात हात थबकतो. "तिचा तरी कुठे फोन आलाय? नेहमी ब्रेकफास्टची आठवण करायला शॉर्ट किंवा मिस कॉल झालेला असतो यावेळेपर्यंत." माझे अकाली ओव्हरहीट व्हायला लागलेले सी.पी.यू. काहीबाही आऊटपुट देऊ लागलेले असते. इतक्यात पुन्हा कामाचे सत्र सुरू होते. तणातणीचा फील कायम राहणार असे दिसू लागल्यावर मात्र मी खडबडून जागा होतो. फाटे फुटत चाललेल्या कामावर नियंत्रण मिळवले जाते. क्विक लंच करून काम चालू राहते. तीन-साडेतीन पर्यंत दिवसाचे पहिले पॉझिटिव संकेत दिसू लागतात. पाच वाजेपर्यंत तर अगदी चमत्कार व्हावा तसा कायापालट झालेला असतो. बरेच मुद्दे सॉर्ट आऊट झालेले असतात. बाकीचे उद्यापर्यंत नक्की होतील अशी चिन्हे असतात. साडेपाचची मीटिंग आश्चर्यकारी खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडते. सकाळी एकमेकांच्या तोंडाकडे पाहण्याची इच्छा नसलेली टाळकी आता एकमेकांचे गुण गाईन आवडी करत असतात. श्रमपरिहार म्हणून घरी जाता जाता क्लबमध्ये 'फॉर अ क्विक वन' साठी जमण्याच्या गप्पा सुरू होतात. अपार बंधुभावाने ओथंबत शेवटच्या तासाभरात काम आवरताना मला घरातला अनफिनिश्ड बिझनेस आठवतो. "बस्स, गेल्या गेल्या मिटवून टाकायचे." काय केले म्हणजे पापक्षालन होईल हा विचार चालू होतो. माझ्या 'मेझरमेंट' प्रमाणे भांडण अगदी साडी-डिनर डेट-आऊटींग इतक्या तीव्रतेचे नसले तरी अगदी फक्त फुलांनी 'मांडवली' होईल इतके हलकेही नसते. "येस्स, आज काहीतरी साधा पण मस्त पदार्थ करून खिलवायचा. तिला किचनमध्ये येऊ द्यायचे नाही. अजून रागात असल्याचे सोंग करायचे आणि एकदम डिश तयार झाल्यावर समेट करायचा.काय करायचे ते घरी जाता जाता ठरवू". मी कार सुरू करतो. इतक्यात मित्राचा फोन येतो. "अरे प्रचंड ताजे प्रॉन्स मिळालेत. पाठवून देतोय. वा वा, मलाही आता भुकेची जाणीव व्ह्यायला लागली असते. घरी जाऊन मस्तपैकी प्रॉन्स रवा फ्राय करू. सिंपल, क्विक अ‍ॅंड टेस्टी! एखादे क्विक मॉकटेल मारू आणि लेट्स टेक इट अहेड फ्रॉम देअर म्हणत मी मित्राला धन्यवाद देतो आणि प्रॉन्स साफ करून पाठवायची रिक्वेस्ट करतो. त्याने आधीच ते केलेले असते. 'आय ओ यू वन, मेट' म्हणत मी स्टार्टर मारतो. घरात एंट्री प्रचंड नाटकी पद्धतीने करतो. गंभीर चेहरा करून बूट काढतो. किल्ल्या, बूट, बॅग सगळं जागच्या जागी ठेवतो. पत्नी निर्विकार चेहर्‍याने का होईना टेनिस मॅच बघितल्यासारखी माझ्याकडे बघत असते. वॉश घ्यायला बाथरूमात जातो. बाहेर येऊन आवरताना ड्रेसिंग टेबलाजवळ चहाचा कप दिसतो. चला बर्फ वितळायला सुरूवात झालीये म्हणत मी किचनमध्ये जातो. आता माझा झपाटा बघण्यासारखा असतो. टाईम अँड मोशन स्टडी, अरगॉनॉमिक्स याचे एक आदर्श प्रात्यक्षिक होईल अशा सफाईने मी प्रॉन्स रवा फ्राय बनवतो. झटक्यात मिनीबारजवळ जाऊन एकदम रंगीन लुकिंग फ्रेश मॉकटेल तयार करतो. जमेल तशी प्लेट सजवतो देखील. पत्नी एकदा फक्त आत डोकावून भुवया उंचावून गेलेली असते.
आता कसोटीचा क्षण. प्रसन्न चेहर्‍याने दोन्ही ट्रे सांभाळत मी बाहेर येतो. पत्नीसमोरच्या टी-पॉयवर सगळा सरंजाम मांडतो. टॉम क्रूझच्या स्टाईलने अदबीने पत्नीसमोर वाकताना लक्षात येते .. ती नॉन वेज खात नाही.
माझा चेहरा शरमेने लाल होतो, वाकलेले शरीर धनुर्वात झाल्यासारखे आखडते. मॉकटेल देण्यासाठी पुढे केलेला हात तसाच राहतो. पण... हळूहळू पत्नीचा चेहेरा मृदू होऊ लागलेला असतो. सगळा प्रकार तिच्या लक्षात आलेला असतो. टी.व्ही. चा आवाज कमी करून ती चक्क मोकळे हसायला लागते. मला बसायला जागा करून देता देता तिच्या प्रेमळ चर्येवर 'समेट' झाल्याच्या स्पष्ट खुणा दिसू लागतात. माझा सगळा स्ट्रेस निघून जातो, तिचा हात हातात घेऊन थोपटता थोपटता मी टी.व्ही.कडे पाहतो. दाखवून चोथा झालेला बाजीगर लागलेला असतो पण आज शाहरुखचा डायलॉग काळजात घुसतो.. "हार कर जीतनेवाले को ही बाजीगर कहते है."
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रॉन्स रवा फ्राय (बाजीगर प्रॉन्स)

साहित्य

प्रॉन्स
दोन अंडी
रवा + तांदळाचे पीठ (एक वाटी रव्याला एक मोठा चमचा पीठ या प्रमाणात)
हिंग, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, धणे-जीरे पूड : हे सर्व रव्याच्या प्रमाणात चवीनुसार, आवडत असेल तर चिमूटभर ओवा.
तेल

कृती

रव्यातांदळाच्या मिश्रणात हिंग, हळद आणि मसाले ई. मिक्स करून घ्यावेत.

prf1.JPG

दोन अंडी फोडून एकाचा पिवळा भाग टाकून द्यावा. राहिलेले दोन अंड्यांचा पांढरा आणि एक पिवळा भाग हलका फेटून घ्यावा.

प्रॉन्स अंड्यामध्ये बुडवून बाहेर काढावेत. नीट कोटींग झाले पाहिजे. असे प्रॉन्स रव्याच्या मिश्रणात घोळवावे. रवा सारखा लागेल असे पहावे.

prf2.JPG

प्रॉन्स सोनेरी होईपर्यंत चांगल्या गरम झालेल्या तेलात तळून घ्यावेत, ३-४ मिनिटात तळले जातात. आवडत्या सॅलड - सॉस बरोबर सर्व्ह करावेत.

prf3.JPGprf4.JPGprf5.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
(शरमेनं मान खाली वगैरे झाली तरीही) बायको व्हेजिटेरियन आहे याचं तात्पुरतं विस्मरण होण्यामागे सकाळचा एपिसोडच कारणीभूत आहे असं वाटतं. उरलेला बाजि़गर बघत प्रॉन्स खाल्ले का? Proud

फोटो मस्तं!

वाचताना आता रेसिपी कधी येते म्हणून वाट पहात होते. शेवटी (एकदाची) आली तेव्हा आपण प्रॉन्स खात नाही याची आठवण झाली. Proud

बॉय ओ बॉय, अमेय, तुम्ही पाकृ सादरीकरणाचा नवीनच आणि छानच पायंडा पाडु लागलात त्या बद्दल,आणि तुम्हाला खुपच समजुतदार पत्नी मिळालीय म्हणुनही तसेच लास्ट बट नॉट लिस्ट ही पाकृ सुद्धा खुपच आवडली असे त्रिवार अभिनंदन करते.

रेसिपी सोप्पी वाटतेय आणि फोटो मस्तच.
पण मी म्हणते असं विसरतच कसं बायको व्हेजिटेरियन आहे ही महत्वाची गोष्टनिदान मग तिच्यासाठी काही व्हेज केलत की नाही? Happy

>>दोन अंडी फोडून एकाचा पिवळा भाग टाकून द्यावा. राहिलेले दोन अंड्यांचा पांढरा आणि एक पिवळा भाग हलका फेटून घ्यावा.
का? याने काय होते नेमके?

मृ काहीही प्रश्न विचारते. Proud शेवट वाचून एवढं कळत नाही का?

Lol

छान आहे रेसिपी आणि फोटो Happy

>>दोन अंडी फोडून एकाचा पिवळा भाग टाकून द्यावा. राहिलेले दोन अंड्यांचा पांढरा आणि एक पिवळा भाग हलका फेटून घ्यावा.<<< पुढच्यावेळेस पिवळा भाग टाकुन न देता लेकासाठी ऑमलेट करा Wink

अमेय.. प्रस्तावना खूप म्हंजे खूपच आवडली.. आणी ही रेसिपी ही !!
आवडत्या माबो रेसिपीज एका डायरी त संकलित करत आहे.. हो!!चक्क ओल्ड टैम फेव ,'डायरी' .. तुझ्याच कितीतरी रेस्पीज आहेत तीत अजून एकी ची भर पडली आज. Happy
रच्याकने.. फ्रेश प्रॉन्स च्या नादात बायको वेज आहे हे विसरलास?? लगेच वांग्याचे काप याच रव्यात बुडवून तळून द्यायचेस ना:, हाकानाका.. Wink Proud

अरे वा .. वाचनीय ..

पण अंड्यात बुडवाच्या आधी पिठात नाही का घोळवायचे? इकडे असाच क्रम असतो .. पीठात घोळवणे , मग अंड्यात (सहसा योक आणि व्हाईट्स १:१ च बघितलं आहे ;)) आणि मग ब्रेडक्रम्ब्ज् मध्ये ..

Biggrin

रेसिपी भारी प्रस्तावना भलीमोठी!

पण, 'तुमची पत्नी खुपच समंजस दिसतेय हां! ती नॉन-व्हेज खात नाही हे तुम्ही भांडण मिटवण्याच्या वेळीही विसरता आणि ती काहीही म्हणत नाही? लक्की यु!' असं बर्‍याच नवर्‍यांना वाटेल! Wink

रेसिपी चांगलीच आहे त्यात काही वाद नाही पण बायको अतिशय समजूतदार आहे. व्हेजिटेरियन बायकोला तळलेले प्रॉन्स समेटांतर्गत पेश केलेत! धन्य आहे. Happy

कृती, प्रचि, लिहिण्याची स्टाईल ... नेहमीप्रमाणेच मस्त!

सशल मला वाटतं पहिल्यांदी अंड्यात बुडवतात म्हण्जे पीठ चिकटायला मदत होते .चु भू दे घे Happy

अमेय रेस्पि नेहमीप्रमाणे खुसखुशीत लिहिली आहे पण कोळंबीचा वास जायला लसूण बिसूण काही नाही असं उगीच वाटतं. अर्थात अशाप्रकारे तळलेले आयटम्स जनरली चांगले लागतात...आमच्याकडे काही दिवस तळण कमी प्रस्ताव पास झाल्याने इतक्यात तर करणे होणार् नाही. Wink

मग आता पुढची रेसिपि आधी चुकून नॉनव्हेज केल्याने केलेलं व्हेजि स्टार्टर वगैरे असणार आहे का Happy

अमेया - इतके मस्त, खुसखुशीत लिहितोस आणि पाक-कौशल्यात ही इतका निपुण आहेस - तुझी लाईन चुकलीये असं वाटत नाही का तुला ?? बघ, अजून विचार कर, वेळ गेलेली नाहीये .... Happy Wink

मस्त रेसीपी, लवकरात लवकर नवरयाला वाचायला द्यायला पाहीजे.
बायको खरोखर समजूतदार आहे. हाच प्रसंग आमच्याकडे घडला असता (म्हणजे बायको वेज\नॉन्वेज आहे हे विसरणे वैगरे) तर नविन युद्धाला सुरवात झाली असती.

धनुर्वात!! Rofl

बायकोला काय खिलवलंत हे लिहाच आता. रेसिपीपेक्षा प्रस्तावना भारी आहे या वेळी Happy

ती नॉन वेज खात नाही.>> Rofl

मस्त मस्त.. लै भारीच. प्रस्तावना व रेसिपीपण. Happy

बायको खरोखर समजूतदार आहे>> +१०० मोदक.

सही..... Happy

किती मस्त लिहीलयं..प्रॉन्स पेक्षाही लिखाण खुसखुशीत एक्दम!!!
अगदी आपल्याच घरातला किस्सा वाचल्यासारखं वाटलं. अर्थात कोलंब्याही तोंपासूच!!!

रेसीपी छानच आहे, फोटो पण एकदम तोंपासु आहेत.
लिखाण नेहमीप्रमाणेच खुसखुशीत पण शेवट मात्र गंडलाय.' बायको व्हेज. आहे हे विसरलो' हे विधान कुठल्याही अ‍ॅंगलनी पटण्यासारखं नाही हो! तुम्ही जर बायकोचा उपासाचा दिवस हे विसरलो म्हणता तर ठीक होतं. असो.

Pages