निळाई ( गीतासह)

Submitted by भारती.. on 27 July, 2012 - 08:58

निळाई
https://www.youtube.com/watch?v=Zx-FSyUuTMI&feature=youtu.be

किती धीरगंभीर लाटा उसळल्या
कुणी आत्मघाती तटाशी विखुरल्या
कुणी सोज्वला कोमला उर्मिला त्या
तरंगात काही उसासून गेल्या. .

कुणी मत्त कोणी जिव्हारीमनस्वी
कुणी मुक्त कोणी उदासीतमस्वी
कुणी चंद्रसाक्षी - धरे बिंब वक्षी
कुणी ऐन मध्यान्ही तळपे तपस्वी
निळ्या वैभवाच्या तर्‍हा वेगळाल्या

किती लक्षकोटीक लाटा सतंद्रा
जळ-अप्सरांच्या जणू भावमुद्रा
निळाई परि सागराची समग्रा
एकांतिका.. एकता .. रुपरुद्रा
क्षितीजास कक्षा तिच्या रेखलेल्या ..

निळाई अशी ही अपारा उदारा
न आटे न ओलांडते वा किनारा
येथेच ही नित्य डोळ्यांपुढारा
तरी मापवेना हिचा थांग सारा
युगांच्या खुणा खोल उदरी निमाल्या..

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खूप खूप आभार विभाग्रज,किरण,शशांकजी..निळाई ही माझीही आवडीची कविता.. तिचं गाणं करण्यासाठी घ्रुपदाला (यमकाने) कडवी जोडणार्‍या तीन ओळीही मी प्रत्येक कडव्याच्या शेवटी मागाहून टाकल्यात पण त्यातली एक आत्ता आठवत नाहीय म्हणून इतर दोन देता आल्या नाहीत ! कवीचा धांदरटपणा. आठवल्यावर edit करेनच . :))

२९-०७-२०१३
वॉव ! कम्मालीचा योगायोग असा की त्या (गीतरुपांतर करण्यासाठी मागाहून कडव्यांच्या शेवटी) जोडलेल्या तीन ओळी बरोब्बर एका वर्ष +एका महिन्यानंतर आज मिळाल्यात, हा माझ्यासाठी अलभ्य लाभच Happy धांदरट लोकांचे असलेच असतात अलभ्य लाभ. तर त्या आता टाकल्यात.

पारिजाता ही कविता वर आणल्याबद्दल धन्स

भारतीताई कधीकधी हेवा वाटतो तुमच्या शब्दयोजनाचा Happy

सुंदर रचना, मस्तच

जळ-अप्सरांच्या जणू भावमुद्रा.. वा

निळाई अशी ही अपारा उदारा
न आटे न ओलांडते वा किनारा
येथेच ही नित्य डोळ्यांपुढारा
तरी मापवेना हिचा थांग सारा ....खासच..

अस्सल शब्दकळेने नटलेली नितांतसुंदर कविता. शेवटचे कडवे खास जपून ठेवण्यासारखे. ग्रेट

वाहवा!
भारतीताई ह्या कवितेसाठी माझ्याकडून तुला खूप सारे मोदक!
अप्रतिम!! माझ्या आवडत्या दहात! Happy

ही कविता आधी वाचलीये असं का वाटावं ? कि देजावू फीलिंग आहे हे ?
भारतीतै.. पुन्हा एकदा निवांत वाचायला हवी कविता. आता प्रतिमा उमटल्या मनावर. (पुन्हा तेच ते देजावू फीलिंग)

शब्द नाहीत मत मांडायला....
निवडक 10 मध्ये.........
HATS OF TO YOU!

भारतीतै

माझ्यासारख्या एका सामान्य रसि़काचा हा रसास्वादाचा प्रयत्न तुमच्यासारख्या विलक्षण कवयित्रीच्या या असामान्य कवितेसाठी. चुकलो तर कान उपटावेत ही विनंती.

कवितेतली शब्दश्रीमंती, शब्दकळांनी आधीच भुरळ पाडली आहे. बापटांच्या कवितेत अशाच प्रकारे श्रीमंती शब्दांचा थाटमाट दिसतो पण गंमत म्हणजे हे शब्द घुसवल्यासारखे कधी वाटतच नाहीत. किती सहज, किती ओघवते, किती आशयसंपन्न आणि किती चपखल असंच वाटत राहतं. अगदी तस्संच वाटलं इथेही. बरं कडव्यागणिक किती प्रतिमा उभ्या कराव्यात ? पण इतक्या प्रतिमांचा हा पट ही कविता किती समर्थपणे पेलतेय. अगदी शब्दांप्रमाणेच एकही उसनी वाटत नाही. सहज अगदी सहज आणि आशय उलगडत जातो तेव्हां प्रणाम आमुचा हा घ्यावा असं काहीसं वाटतं.

पहिल्याच कडव्यात उर्मिला कोमला त्या लाटात विरून गेल्या हे सांगताना त्या लाटांप्रमाणेच या काळाच्या लाटात विरून गेलेल्या अनेक अनामिक स्त्रियांची आयुष्यं डोळ्यासमोर तरळून गेली. ( माझ्या एका कवितेत हा विषय मांडण्याचा अल्प प्रयत्न केला आहे). भारतात तरी स्त्री तिचं आयुष्य जगून जाते आणि मागे काहीच राहत नाही तिच्या नावाचं. सगळ्या खुणा मिटल्या जातात. अगदी त्या लाटांसारख्याच अशा स्त्रियांच्या आशा आकांक्षाच्या लाटा मनाच्या किना-यावर कितीकदा आदळून विरून गेल्या असतील, अगदी या लाटांसारख्या आणि त्यांच्या आयुष्यासारख्या !

पुढच्या कडव्यात अनेक प्रकृतींचे दाखले देताना आधी म्हटल्याप्रमाणे सहज आलेल्या शब्दकळांमधे हरवायला होतं. सागराची प्रतिमा आणि त्यातल्या अनेक प्रकारच्या लाटा या मला मनाच्या समुद्रात उमटणा-या वेगवेगळ्या भावनांच्या लाटांचीही आठवण करून देऊन गेल्या. पण अर्थातच समुद्रात अशा अनेक लाटा असल्या तरी त्याची निळाई एकाग्र चित्ताप्रमाणे कायम असते.

पण ही निळाई कशी आहे हिचं वर्णन किती सुरेख केलंय. मर्यादा न ओलांडणारी, अपार उदार, कणव असलेली ही अथांग निळाई. माझ्या माहितीप्रमाणे निळाई हे अंतिम सत्याचं होणारं ज्ञान होय. हे ज्ञान एकतर केवळ मृत्यूने होत असतं किंवा मग साधकाला अध्यात्माच्या मार्गावर अथक परिश्रमाने एकाग्र चित्ताने प्राप्त होत असतं. हे येरा गबाळ्याचे काम नोहे. जेव्हां सृष्टीतलं हे अंतिम ज्ञान प्राप्त होतं तेव्हां मनाला समुद्राच्या त्या निळाईप्रमाणे एकाग्रता, अखंडता प्राप्त होते. विचारांना खोली प्राप्त होते.. अगदी सागराइतकीच खोल, अथांग !!!

सागराच्या या चित्रातून, लाटांच्या माध्यमातून अनेक भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवून मनाच्या कैक अवस्था दाखवत शेवटी कुठून कुठे गेलीये ही कविता !. सा. दंडवत आपल्याला. आपल्या प्रतिभेची जसजशी ओळख होतेय तसतसं अवाक व्हायला होतंय.

वा किरण
छान रसग्रहण
__________________________

भारतीताई एकूणच ही निळाई तुमच्या करीयरची आजवरची सर्वात फेमस कविता ठरायच्या मार्गावर आहे असे दिसते आहे

भारती, नेहमीसारखंच शब्दसौंदर्य या कवितेतही जागोजागी दिसतंय Happy
किरण, छान रसग्रहण Happy

सर्वांचे खूप खूप आभार, आवडत्या दहा अन मोदकांसाठी अमेय,सुशांत अन अंजलीचे.
वैभव, Happy जे सामर्थ्य,तीच मर्यादा.

किरण, अप्रतिम रसास्वाद. मी काय लिहू ? आपले शब्द त्याच खोलीचे तरंग/आवर्त वगैरे वगैरे रसिकाच्या मनात उमटवतात तेव्हा ते समाधान खूप वेगळं असतं.एक कृतार्थतेची जाणीव त्याला व्यापून असते.माझ्या कवितेवर माझं ( इथे मी म्हणजे कुणीही एक कवी ) एक म्हणणं असू शकतंच., पण रसिकाकडून जेव्हा रसास्वाद येतो तेव्हा कवीला पुनःप्रत्ययाचा अन नवप्रत्ययाचाही आनंद मिळतो.

या निळाईच्या लाटांत तुम्ही शोधलेलं स्त्रीजीवनाचं वैविध्य,मानवी भावनांचं रूप अन अध्यात्माचं प्रतीक अप्रतिमच. त्याचप्रमाणे समुद्राच्या समग्रतेत एकूण मानवी जीवनाचं रूपक हेलकावत असतं.लाटा अनंत,मनोज्ञ रूपं धारण करणार्‍या,पण ही समुद्राची निळाई,समुद्राची समग्रता मात्र एकच,म्हणून 'एकांतिका,एकता,रूपरुद्रा' अशी. अथांग सुंदरतेतही रौद्ररुपिणी असा काहीसा भावार्थ होता.

ही कविता खूप सुंदर गायली जाते,ते तिच्या निळाईचं एक वेगळंच रूप..

प्रयत्न करेन किरण, म्हणजे गायचा नाही (इथे आनंदी आनंद आहे Happy ), गाणार्‍याचं गाणं रेकॉर्ड करून इथे टाकायचा.

नेहमीसरखीच शंकीत. भारतीकडे एवढी सुंदर शब्द संपदा येते कुठून? मला तर साधे वर्णन करायलाही शब्द सापडत नाहीत.

आणि आज हे निळाईचं गीतरूप मायबोलीकरांसमोर ठेवताना खूप आनंद होतोय . हे साधंच home production आहे,मिठबाव या कोकणातल्या गावच्या घरी सोमण बंधूंनी केलेलं रेकॉर्डिंग वगैरे.. तुम्हाला सर्वांना आवडेल अशी आशा करते.
हे एवढंही साध्य होण्यामागे दोन मायबोलीकर आहेत, के.अंजली आणि शाम, मला निळाईचं स्मरण देत रहाणारे.अंजली तर मागेच लागलेली होती. धन्यवाद कसे मानायचे या प्रेमासाठी ?

श्रीयु, सानी , खरंच का लिंक दिसत नाहीय? मला तर दिसतेय Sad , पण एका अर्थी बरंच झालं तसं असेल तर, गाण्यात अजून काही सुधारणा करायची आहे , ती झाल्यावरच पुन: संपादित करेन.

Pages