निळाई ( गीतासह)

Submitted by भारती.. on 27 July, 2012 - 08:58

निळाई
https://www.youtube.com/watch?v=Zx-FSyUuTMI&feature=youtu.be

किती धीरगंभीर लाटा उसळल्या
कुणी आत्मघाती तटाशी विखुरल्या
कुणी सोज्वला कोमला उर्मिला त्या
तरंगात काही उसासून गेल्या. .

कुणी मत्त कोणी जिव्हारीमनस्वी
कुणी मुक्त कोणी उदासीतमस्वी
कुणी चंद्रसाक्षी - धरे बिंब वक्षी
कुणी ऐन मध्यान्ही तळपे तपस्वी
निळ्या वैभवाच्या तर्‍हा वेगळाल्या

किती लक्षकोटीक लाटा सतंद्रा
जळ-अप्सरांच्या जणू भावमुद्रा
निळाई परि सागराची समग्रा
एकांतिका.. एकता .. रुपरुद्रा
क्षितीजास कक्षा तिच्या रेखलेल्या ..

निळाई अशी ही अपारा उदारा
न आटे न ओलांडते वा किनारा
येथेच ही नित्य डोळ्यांपुढारा
तरी मापवेना हिचा थांग सारा
युगांच्या खुणा खोल उदरी निमाल्या..

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भारतीताई, मी नतमस्तक.. तुमच्या शब्दश्रीमंतीबद्दल मी वरच्यांपेक्षा निराळं काही लिहू शकत नाही..
तुमच्या कवितेच्या अलगद प्रेमात पडायला होतं एवढं मात्र सांगते!

गीतही श्रवणीय आहे.. इतक्या सामर्थ्यवान रचनेनं तितक्याच सुलभतेनं गेयही असावं हा दुग्धशर्करा योग आहे.. तुमच्याकडून तेही सहजतेनं होतं _/\_

सुंदर!! पुनःपुन्हा ऐकली.
फायनल टच मिळाला की अजून छान वाटेल ऐकायला!

हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद भारतीताई Happy

इतक्या सामर्थ्यवान रचनेनं तितक्याच सुलभतेनं गेयही असावं हा दुग्धशर्करा योग आहे.. >>> अगदी अगदी सई Happy

धन्यवाद सई, अंजली ',निळाई' ही तशी मूलत: कविताच, सोमणांनी तिला चाल देऊन तिचं गाणं केलं, खूप उत्कटतेने ते गायलं आहे. सध्या त्याचं स्वरूप एखाद्या घरगुती मैफिलीसारखं आहे याची कल्पना आहे पण या प्रोसेसमध्येही एक खरा जिव्हाळा आहे..म्हणून माझा हा व्यक्तिगत आनंद शेअर करावासा वाटला. सुधारित आवृत्ती नक्की संपादित करून देईन..

निळाई, सुधारित audio आणि video सह, मिलिंद आणि प्रसन्न हे सोमण बंधु , रत्नाकर आणि वंदना खरे या मित्रांचा कारभार , म्हणून शक्य झालं.. खरं तर आम्हाला चंद्रस्वप्ननंतर ही ध्वनिफीत करायची होती रीतसर, राहून गेलं. असो.
एका कवितेचं हे गीतरूप म्हणून 'अधिक ते सरते न्यून ते पुरते करून घ्यावे .. '' Happy
https://www.youtube.com/watch?v=Zx-FSyUuTMI&feature=youtu.be

Pages