थरांचे राजकारण सोसवेना

Submitted by बेफ़िकीर on 26 March, 2013 - 06:03

थरांचे राजकारण सोसवेना
मला माझेच मिश्रण सोसवेना

तिची जागेपणी पडतात स्वप्ने
जिला स्वप्नात जाग्रण सोसवेना

कधी होईल प्रत्यक्षात व्याधी
असे हे रोज लक्षण सोसवेना

स्वतःचाही जरा होईन म्हणतो
मला नुसते तुझेपण सोसवेना

तुझे सोडून जाणे सोसले पण
तुझे कुठलेच कारण सोसवेना

विचारावे कुणाला हे कळेना
कुणावाचून हा क्षण सोसवेना

पुन्हा मद्यात हा मेंदू धुवावा
विचारांचे प्रदूषण सोसवेना

सरींचा अर्ज दे ग्रीष्मास माझ्या
तुला कंगाल श्रावण सोसवेना

प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही
मला हे नांव भूषण सोसवेना

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःचाही जरा होईन म्हणतो
मला नुसते तुझेपण सोसवेना

तुझे सोडून जाणे सोसले पण
तुझे कुठलेच कारण सोसवेना

>> व्वा!!

कधी होईल प्रत्यक्षात व्याधी
असे हे रोज लक्षण सोसवेना

स्वतःचाही जरा होईन म्हणतो
मला नुसते तुझेपण सोसवेना

हे दोन शेर आवडले.

थरांचे राजकारण सोसवेना
मला माझेच मिश्रण सोसवेना>> दुसरा मिसरा खूप आवडला. 'राजकारण' ह्या काफियाशी रिलेट होता आले नाही

तिची जागेपणी पडतात स्वप्ने
जिला स्वप्नात जाग्रण सोसवेना>> बेफि स्टाईल!

स्वतःचाही जरा होईन म्हणतो
मला नुसते तुझेपण सोसवेना>> व्वा

तुझे सोडून जाणे सोसले पण
तुझे कुठलेच कारण सोसवेना>> व्वा व्वा

प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही
मला हे नांव भूषण सोसवेना>> जबरी, 'भूषण' असे वाचले.

धन्यवाद!

विचारावे कुणाला हे कळेना
कुणावाचून हा क्षण सोसवेना

व्वा.

पुन्हा मद्यात हा मेंदू धुवावा
विचारांचे प्रदूषण सोसवेना

मस्त. हे शेर अधिक आवडले.

तुझे सोडून जाणे सोसले पण
तुझे कुठलेच कारण सोसवेना ......... आवडले

थरांचे राजकारण सोसवेना
मला माझेच मिश्रण सोसवेना ....... परस्पर संबंध लक्षात नाही आला, त्यामुळे अर्थही नाही कळला

विचारावे कुणाला हे कळेना
कुणावाचून हा क्षण सोसवेना

पुन्हा मद्यात हा मेंदू धुवावा
विचारांचे प्रदूषण सोसवेना

सरींचा अर्ज दे ग्रीष्मास माझ्या
तुला कंगाल श्रावण सोसवेना

- वा! छानच, हे तीन शेर फारच भावले,
"काय देऊ प्रतिक्रिया मी, शब्द नेमका सापडेना "

>>
कधी होईल प्रत्यक्षात व्याधी
असे हे रोज लक्षण सोसवेना

तुझे सोडून जाणे सोसले पण
तुझे कुठलेच कारण सोसवेना
<<

मस्त. Happy

सरींचा अर्ज दे ग्रीष्मास माझ्या
तुला कंगाल श्रावण सोसवेना
अप्रतिम कल्पनाविलास!

प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही
मला हे नांव भूषण सोसवेना
शेर आवडला

मतल्यातील थरांचे राजकारण व माझे मिश्रण यांच्यातील नाते समजले नाही!
थर म्हणायचे स्तर म्हणायचे?

जगाला कार्यकारण सोसवेना!
मला माझेच मिश्रण सोसवेना!!
असे म्हटल्यास आपल्या मनातील अर्थ शेरात उतरतो का?

मतल्यातील थरांचे राजकारण व माझे मिश्रण यांच्यातील नाते समजले नाही!
थर म्हणायचे स्तर म्हणायचे?

जगाला कार्यकारण सोसवेना!
मला माझेच मिश्रण सोसवेना!!
असे म्हटल्यास आपल्या मनातील अर्थ शेरात उतरतो का?

<<< गझलप्रेमी, परवाच आनंदयात्रींना शब्द दिला होतात ना यापुढे पर्याय देणार नाही असा? Proud

असो! मतला कोणाला समजलेला नाही असे दिसते. प्रतिसाददात्यांचे आभार! मतल्यातील अभिप्रेत अर्थः

राजकारण हे वैयक्तीक फायद्यासाठी केले जाते असा समज दृढ आहे या बेसिसवर हा शेर (मतला) पाहिला जावा.

माझ्या व्यक्तीमत्वातील अनेक थर हे माझ्यावर सर्वाधिक प्रभाव पाडण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. मी नेमका कसा आहे, कसे व्हायला हवे आहे, कसा होत चाललो आहे यावर माझे नियंत्रण राहिलेले नाही. (आज असा तर उद्या तसा - असे झालेले आहे). (प्रत्येक कंगोर्‍याला, थराला असे वाटत आहे की मी त्याच्याप्रमाणेच असावे व राहावे). हे राजकारण सोसवत नाही. माझे मिश्रण (गा मा साहेब - धन्यवाद, कावळा - धन्यवाद) म्हणजे हे अनेक थर आहेत. मूळचा मी असे काही नाही. हे मिश्रण (त्यामुळे) मला सोसवत नाही.

पुन्हा आभार! Happy

-'बेफिकीर'!

तिची जागेपणी पडतात स्वप्ने
जिला स्वप्नात जाग्रण सोसवेना
.
स्वतःचाही जरा होईन म्हणतो
मला नुसते तुझेपण सोसवेना

जबर्दस्त शेर. खूप आवडले Happy

अख्खी गझल आवडली

मतल्याबद्दल मला वाटते की आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वावर आपल्याच अनेक कृत्रिम व्यक्तिमत्त्वांचे जे अनेक थर असतात आपल्याशीच राजकारण (सत्तागाजवण्याच्या उद्देशाने) करत राहतात व ते करता करता आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वात मिक्स होत जातात ..जे सोसवत नाहीत त्या बद्दल बेफीजी म्हणत आहेत
बेफीजींचा असा एक शेर वाचला होता त्याचा एक मिसरा बहुतेक असा होता (शेर पूर्णपणे व आठवत नाहीये तो भागही नेमका आठवत नाहीये क्षमस्व) <<आवरण खोलले की पुन्हा आवरण

गामाजींनी दिलेली "मिश्रण"च्या शेराची लिंकही योग्य संदर्भ देणारी वाटते आहे

एकंदर या कवाफीवर बेफीजींची बेमालूम हुकूमत चालते असे माझे निरीक्षन २४ मैत्रीणींच्या त्या गझलेतही अशीच कवाफी आहे
ही कवाफी बीफीजींसारखी अत्युत्तमपणे कुणी वापरू शकत असेल असे मलातरी वाटत नाही

तुझेपण सोसवेना>>>> माझा शेर आठवला

तुझ्या विश्वामधे स्वारस्य नाही
मला माझेपणा दे परत माझा

कधी होईल प्रत्यक्षात व्याधी
असे हे रोज लक्षण सोसवेना
मस्त...

स्वतःचाही जरा होईन म्हणतो
मला नुसते तुझेपण सोसवेना......सुरेख शेर..

पुन्हा मद्यात हा मेंदू धुवावा
विचारांचे प्रदूषण सोसवेना
व्वा..व्वा..

एकूण गझल सुंदरच...

भूषणराव,
थरांचे राजकारण सोसवेना
मला माझेच मिश्रण सोसवेना

दुसरी ओळ अप्रतिम! पहिली ओळ दुसरीला पुरेसा न्याय देणारी वाटली नाही, निदान तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणांवरून!
व्यक्तिमत्वातील थर, थरांचे राजकारण ते न सोसवणे...........नाही पटत व भावत! खूप तादात्म्य होऊन पाहिले!
पहिल्या ओळीत कुठल्या गोष्टीचे थर हे अव्यक्तच राहिले! पुन्हा या न माहित असले्या थरांचे राजकारण त्यामुळे गूढच राहिले! दुसरी ओळ वाचल्यावरही हे थर नेमके कशाचे व ते कोणते राजकारण करत आहेत जे शायराला सोसवत नाही याचा उलगडा होतच नाही!

आता आपल्या मनातील गद्य अर्थ आपण सांगितला आहे जो आम्ही असा व्यक्त करून पाहिला.....
कृपया एक चर्चा म्हणून त्याकडे पहावे! पर्यायी म्हणून नव्हे!

असा का मीच?.... कारण सोसवेना!
मला माझेच मिश्रण सोसवेना
>!!

थरांचे राजकारण सोसवेना
मला माझेच मिश्रण सोसवेना

आत्ताच वाचले, बेफिकीर,मतला दुर्बोध वाटला नाही.वाचताक्षणीच कळला व आवडला.
माझ्या एका कवितेत
- ' उत्खननाच्या शक्य थरांमधून
मिणमिणत रहावी जागती नजर
आणि वरच्या सपाटीवरून रहदारी
येतजात असतानाच
सणाणत एक पाखरू उडत जावे
निसरड्या उतारांवरून''-
असे लिहिलेय,याच अंतःस्तरांना उल्लेखून, ते आठवले.असो.

गझल नेहमीप्रमाणेच खणखणीत.

कधी होईल प्रत्यक्षात व्याधी
असे हे रोज लक्षण सोसवेना

पुन्हा मद्यात हा मेंदू धुवावा
विचारांचे प्रदूषण सोसवेना >>>> हे दोन सर्वात आवडले.

स्वतःचाही जरा होईन म्हणतो
मला नुसते तुझेपण सोसवेना.....वा वा !

तुझे सोडून जाणे सोसले पण
तुझे कुठलेच कारण सोसवेना.....क्या बात ! निव्वळ अप्रतिम !!!

विचारावे कुणाला हे कळेना
कुणावाचून हा क्षण सोसवेना... वाह!

मतलाच सर्वाधीक आवडला . चिंतनशील, खास बेफि स्टाइल Happy

धन्यवाद!