गहाणात ७/१२

Submitted by अभय आर्वीकर on 12 February, 2013 - 23:34

गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

अता अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

कधी झोप मोडेल सुस्तावल्यांची?
किती वाजवावा नगारा वगैरे

इथे पावलोपावली लाचखोरी
कुणाचाच नाही दरारा वगैरे

’अभय’ भोवती घे लपेटून धारा
प्रवाहास नसतो किनारा वगैरे

                                  - गंगाधर मुटे
------------------------------------------
(धन्यवाद वैभव जोशी)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

सत्यस्थिती छान मांडली आहे.

गझल आवडली.
ज्यांना आपण धन्यवाद दिले आहेत त्यांच्या गझलेतील "पुढे काय झाले निठारी वगैरे" शेर आठवला... त्या शेराप्रमाणे खरोखरच निठारी आता विस्मृतीत गेले आहे.
आपला "निवारा" खूप आवडला छान आहे जीवनावश्यक आहे

( भुजंगप्रयात खरोखरच क्वचित वापरलं जातं हल्ली )

कुणी काय सांगेल पर्याय आता
मला येथ आला शहारा वगैरे

वा मुटे सर मस्त गझल लिहिलीत
धन्यवाद

गझलुमिया तुम्हाला सगळीच वृत्ते दुर्मीळ कशी वाटतात हो ? Happy
जीवनावश्यक>>> मुटे सरांचाच डाय्लॉग त्यानाच काय बोलून दाखवताय कमाल आहे तुमच्यापुढे Wink

स्री. वैभव - दुर्मीळ असं नाही पण हल्ली खरोखरच हे वृत्त नाही दिसत फारसं. असं ( उगीच ) म्हणतात की नवशिक्यांनी वृत्तावरची पकड नीट व्हावी म्हणून ह्या वृत्तात सराव करावा. बहुधा हल्ली नवशिके अस्तित्वातच नाहीत त्यामुळे असेल पण फारस नाही वापरत हे वृत्त कोणी.

जीवनावश्यकबद्दल म्हणाल तर मी अगोदरच कबूल केले आहे की मला अर्थ समजला नसला तरी तो शब्द आवडला, त्यामुळे मी तो शब्द वापरतो. त्या शब्दावर मुटेसाहेबांचा स्वामित्व हक्क असल्यास त्यांनी तसे सांगावे. आम्ही ( म्हणजे मी ) तो शब्द वापरणे बंद करू.

आम्ही ( म्हणजे पुन्हा मीच) एक शेर वाढवलाय त्याबद्दल बोलला नाहीत काही ?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

फारच सुंदर
(पुन्हा वाचताना जाणवले हाही एक जबरदस्त शेर आहे. )

आम्ही ( म्हणजे पुन्हा मीच) एक शेर वाढवलाय त्याबद्दल बोलला नाहीत काही ?

हा घ्या पर्यायी
कुणी घेत नाहीच पर्याय हल्ली
तरी बेचतो.... मी बिचारा वगैरे

कधी झोप मोडेल सुस्तावल्यांची?
किती वाजवावा नगारा वगैरे

इथे पावलोपावली लाचखोरी
कुणाचाच नाही दरारा वगैरे
मुटेजी,
गझल आवडली !
सत्यस्थिती छान मांडली आहे.

छान.... बिघडलेल्या समाजव्यवस्थेवरचे शेर छानच झालेत.

'लक्ष्मी' आणि 'लाचखोरी' अधिक आवडले.

इथे पावलोपावली लाचखोरी
कुणाचाच नाही दरारा वगैरे

’अभय’ भोवती घे लपेटून धारा
प्रवाहास नसतो किनारा वगैरे<<

हे शेर विशेष वाटले आणि एकंदर गझल आवडलीच.

धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांचे आभार. Happy

बेफिकीरजी, आपला प्रतिसाद येईपर्यंत

’अभय’ भोवती घे लपेटून धारा
प्रवाहास नसतो किनारा वगैरे

हा शेर फसला की काय असे वाटत होते. Happy

मात्र

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

हा शेर फसलेलाच दिसत आहे. अभिप्रेत असलेला अर्थ थेट पोचत नसावा असे दिसते.

"राहिली" या शब्दाने घोळ झाला असावा.

छान

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

हा शेर

जिथे ढेप-सरकी तिथे थांबते ही
घरी खात नाहीच चारा वगैरे

असा वाचून पहावा.

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

हा शेर खूपच आवडला, पूर्ण गझल छान झाली आहे Sir

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

छान द्विपदी.

गझलमधील सामाजिकता भिडली. तुमच्या गझलांमध्ये आम्ही बघत आहोत की आम माणसाला भेडसावणारे प्रश्न येत राहतात. तेही मिश्कीलपणे. असाही एक गझलकार असायलाच हवा. नेहमीच काय आपले हुंदके, प्रेते, चिता आणि आसवे? प्रेयस्या आणि प्रियकर (अनेकवचन) कंटाळा आणून अंतर्धानही पावले. काहीतरी खरे लिहावे. जे आपण लिहिता. काही असो, विदर्भाच्या मातीत अस्सल गझल उगवते हे खोटे नाही.

पण म्हणून चढून जाऊ नका.

कळावे

गं स

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?...........मस्तच !!

गझल आवडलीच Happy

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

विशेषच !!!

वाह! अनुभव व आशय संपन्न गझल.. भिडतेच!
हे तर कईच्या कईच आवडलयः
>>खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. Happy

---------------------------------------------------
<< पण म्हणून चढून जाऊ नका. >>

गंभीर समिक्षक,
अकस्मात, अनपेक्षित किंवा पात्रतेपेक्षा जास्त मिळाले तर असे घडत असते. एरवी तसे घडण्याची सुतराम शक्यता नसते. Happy

(मला स्वतःला असे वाटत आहे की, मी आत्ता कुठे पहिली इयत्ता पार करून दुसर्‍या इयत्तेत पाऊल टाकत आहे. अजून बराच काळ, बरेच काही शिकायचेच आहे. तुम्ही म्हणता तशी अहंकाराची बाधा वगैरे झाली तर ते स्वतःच स्वतःच्या हाताने स्वतःचा कपाळमोक्ष करून घेण्यासारखे होईल. Sad )