वेदना

Submitted by UlhasBhide on 30 January, 2013 - 03:34

वेदना

एक होता काळ जेव्हा वेदना कुरवाळली
चोचले मी पुरवले अन् वेदना सोकावली

मुक्त करण्या वेदनेला सजवले काव्यातुनी
मुक्त ना आसक्त झाली मन्मनाला ग्रासुनी

वेदना-मुक्ती कधीही शक्य नाही ताडले
जू तिच्या मानेवरी मी जीवनाचे लादले

इष्ट आपत्तीप्रमाणे वेदनेला मानले
की म्हणू मी वेदनेला दावणीला बांधले

आज माझ्या वेदनेला मीच देतो वेदना
मी तिला बधतोच ना अन् ती मला बाधेच ना

.... उल्हास भिडे (३०-१-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

UlhasBhide,

रचना आशयघन आहे. 'वेदना'च्या जागी 'जाणीव' ठेवून परत वाचली. वेगळीच मिती उघडल्यासारखं वाटलं.

आ.न.,
-गा.पै.

छान!

आवडली !

आवडेश Happy

एक होता काळ जेव्हा वेदना कुरवाळली
चोचले मी पुरवले अन् वेदना सोकावली
>>वा !!माझा एक शेर आठवला उकाका..............

मी कडेवर घेतल्यावर कारटी सोकावते
विठ्ठलाच्या कंबरेचा हट्ट धरते काळजी

पुनःप्रत्ययाबद्दल धन्स काका

छान.

छानच..