प्रेम करणं सोपंच असतं...!!!

Submitted by मुग्धमानसी on 1 February, 2013 - 00:23

प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतं एक मन
मनात थोडं ओलं काही
बीज कुणाचे रुजेल सहजी
अशी कोवळी जमिन काही
नातं रुजणं, उमलुन येणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतो एक पाट
पुजेचं ताम्हण नी नैवेद्य ताट
रिकामा गाभारा करावा स्वच्छ
सोवळ्या आशेची तेवावी वात
देवाचं येणं, श्रद्धेचं रुजणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतं एक घर
भिंती नसल्या तरी चालेल
घरापुढच्या अंगणात
कुणीही येऊन रोप लावेल
घर भरणं, बहर फुलणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

फक्त लागतं एक आभाळ
गद्गदणारं, गुदमरणारं
फक्त एका हाकेसाठी
आतल्या आत आसुसणारं
पाउस पडणं, माती भिजणं सारं सारं आपसुक घडतं...
प्रेम करणं सोपंच असतं...

प्रेम करणं सोपंच असतं...
सारंच आपसुक घडत असतं...
ठेवावी लागते नजर निर्मळ
फसलं काही तर इथंच फसतं!
मनाची मशागत करायला हवी
पाटाभवती विश्वासाची रांगोळी हवी
घराची कवाडे ठेवावी उघडी
आभाळाला साद तुझी पोचायला हवी
याहून वेगळं खरंच राजा काही काही लागत नसतं...
प्रेम करणं सोपंच असतं...!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर

व्वा ! खूपच आवडली !

पण फक्त फक्त म्हणता म्हणता बऱ्‍याच गोष्टी सांगितल्यात . त्या सांगतांना पुनरूक्त झालेलं फक्त वगळता आलं तर बघा .

आग्रह नाहीच .

सर्वांना धन्यवाद!
राजीवजी, तुमचे म्हणणे पटले. यापुढच्या लेखनात अंमलात आणिन नक्किच. धन्यवाद!