पद्म पुरस्कार २०१३ : सध्या निकष काय आहेत ?

Submitted by असो on 25 January, 2013 - 22:39

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार मिळालेल्यांची ही संपूर्ण यादी.
http://zeenews.india.com/news/nation/padma-awards-full-list-of-winners_8...

सर्वांचे अभिनंदन !

पुरस्कारांचे निकष काय असतात / असावेत यावर इथे चर्चा करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या काही वर्षात पद्म पुरस्कारांसाठी लोकप्रियता हा निकष बनत चालला आहे का अशी शंका या यादीवरून नजर टाकल्यावर येते. पद्मविभूषण पुरस्कार मात्र याला अपवाद ठरताहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. विशेषतः चित्रपट आणि क्रिकेटपटूंना मोठ्या प्रमाणावर पुरस्कार देण्यात येतात. दादासाहेब फाळकेंनी चित्रपटसृष्टीचा पाया घातला तेव्हां ते लोकप्रिय काम नव्हते. मळलेल्या वाटेवरून न जाता काट्याकुट्यांचा तो प्रवास होता. त्यांना पद्यच काय भारतरत्न दिलं तर तो यथोचित सन्मान होईल. या वाटेचा राजमार्ग करताना खस्ता खात, थोडंसं लोकशिक्षण थोडं मनोरंजन आणि कलेला वाव असा दृष्टीकोण स्विकारलेल्या प्रभात फिल्म कंपनीच्या धुरंधरांना, शांताराम बापूंना, राज कपूर सारख्या शोमनला पद्य मिळणे हे ही समजू शकते. या काळात कलेचा प्रसार होत गेला. हिंदी सिनेमा ही व्याख्या पक्की होत गेली. आज हा एक व्यवसाय झालेला आहे. त्यात काम करणा-यांना वाजवून मानधन मिळतं. कलेचा प्रसार हा दृष्टीकोण ठेवून कुणी सिनेमात करतं असं वाटत नाही. ते काम सत्यजित राय, शाम बेनेगल, अपर्णा सेन, अमोल पालेकर इ. केलंच आहे.

आमीरखानने ऑस्कर मिळवलं असतं म्हणून त्याला पद्य मिळालं असतं तर समजण्यासारखं होतं. सिनेमात काम करणे किंवा सिनेमा बनवणे यात पद्य पुरस्कार देण्यासारखं काय आहे ? तो इतर अनेक व्यवसायांप्रमाणे एक व्यवसाय नाही का ? अभिनयासाठी हा पुरस्कार देताना नाट्यक्षेत्रात कितीतरी दिग्गज कलाकार आज असतील ज्यांच्यामुळे अभिनयाची शाळा चालू राहत असते त्यांना पुरस्कार देऊन संपले का असं विचारावंसं वाटतं.( दोन चार नावे सांगा असे निरुत्तर करणारे प्रश्न उपस्थित होतील. अशी नावं सांगता येणं पोटापाण्याच्या व्यवसायामुळे सध्या शक्य नाही. पण अशा व्यक्ती अस्तित्वात आहेत याबद्दल शंका नसावी ). गुणी कलावंतांना पुरस्कार देताना कलेच्या वाढीसाठी मेहनत घेणा-या गुणवान कलाकारांचा सन्मान आणि प्रोत्साहन असा दृष्टीकोण असावा का असं या निमित्ताने विचारावंसं वाटतं. मागे एकदा एका रिअ‍ॅलिटी शो मधे भाग घेण्यासाठी दिल्लीहून एक शास्त्रीय संगीताशी निगडीत घराण्याशी संबंधित एक स्पर्धक आलेला होता. इतर स्पर्धक किंवा गुरुंपेक्षाही तो तयारीचा होता. त्याला त्याच्या गुरूने ही कला व्यवसायासाठी किंवा स्वस्त प्रदर्शनासाठी नाही असं बजावल्याने तो द्विधा मनःस्थितीत होता. अखेरीस स्वतःहून त्याने आपली एण्ट्री बाद केली. त्याच्या गुरूचं नाव ऐकताच तिथल्या सर्वांनीच कानाला हात लावले होते. चेलाच इतका तयारीचा होता तर गुरू काय असेल असं वाटून गेलं. अशांना डावलून गुरू म्हणून मिरवून घेणा-यांवर होना-या पुरस्कारांच्या खिरापतीचं कारण काय असावं ? लोकप्रियता, माहितीचा अभाव कि सेटिंग ?

शास्त्रीय संगीत जपणारी त्याचं संवर्धन करणारी घराणी आजही आहेत. अनेक संगीतकार, गायक अशा अनेक उस्तादांकडे आजही हजेरी लावत असतात. या कलाकारांना प्रसिद्धी कधीच मिळत नाही. प कलेच्या प्रसारासाठी ज्यांनी आयुष्य वाहीलंय त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी पद्य पुरस्कार प्राधान्याने दिले जावेत असं मत प्रत्येक वेळी व्यक्त होतं. त्यावर चित्रपटसृष्टीशी संबंधितांना पुरस्कार मिळाले तर तुमच्या पोटात काय दुखतं अशा प्रतिक्रिया देखील पहायला मिळतात. खरंच अशा भावना व्यक्त करणे म्हणजे पोटात दुखणं असतं का ? सारासार विवेक बाळगला तर परंपरेनं कलेचा वारसा जपताना येणा-या अडचणींवर मात करून अभिजात कलांचं संवर्धन करणा-या मंडळींना पुरस्कार देताना प्राधान्य द्यावं या मागणीत काही गैर नसल्याचं मत पटतं.

इतर क्षेत्रात भरीव योगदान देणा-यांना मिळालेले पुरस्कार त्यातल्या त्यात समाधानकारक आहेत असं वाटतं. बाकि फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही असं मत झालं आहे. एक दिवस पद्म पुरस्कारांचं मोल गल्लीबोळात दिल्या जाणा-या कै. भिमाबाई धोंडूबाई कावळे पुरस्कारासमान होऊ नये इतकीच अपेक्षा !

जिथे पैसा आणि प्रसिद्धी असते तिथेच जास्तकरुन असे पुरस्कार दिले जातात. त्यांना दोष देऊन काय उपयोग आपण जेवढं सिनेमा आणि क्रिकेटला डोक्यावर घेतो त्याच्या ५ टक्के तरी इतर कला / खेळांना विचारतो का ?

वृत्तवाहिन्या पद्म-पुरस्कारांची बातमी देताना चित्रपट अभिनेते आणि खेळाडूंचीच नावे देताना दिसल्या. त्यांना अन्य क्षेत्रांतील पुरस्कारप्राप्त व्यक्तींबद्दल माहिती नसावी.
पद्मविभूषण मिळालेल्यांपैकी रघुनाथ मोहापात्रा - मूर्तिकार, रझा - चित्रकार, प्रा यशपाल : शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, आर. नरसिंह- शास्त्रज्ञ आहेत.
पद्मभूषण मिळालेल्या २४ पैकी ८ कलावंत (यातले २ चित्रपट अभिनेते), २ खेळाडू आहेत. टीव्हीवर शर्मिला टागोर, राजेश खन्ना यांचे नाव फ्लॅश होत होते पण डॉ कनक रेळेंचे नाव दिसले नव्हते. ६ शास्त्रज्ञ, २ उद्योगपती आहेत.
पद्मश्रीने सन्मानित मराठी मंडळींमध्ये नाना पाटेकर आहेत तसेच जयमाला शिलेदार, सुरेश तळवलकर आहेत.
८० पद्मश्री सन्मानितांपैकी २४ कलावंत आहेत, त्यातले ३ हिंदी चित्रपटांशी संबंधित आहेत.

फारएण्ड - मनापासून माफी ! योग्य ती डागडुजी केली आहे.
भरत - पटलंच. (शटाचं नाव खटकलं होतं.)

नुकतंच नानाने बास झाले पुरस्कार असं भाषण एक पुरस्कार स्विकारतानाच केलं होतं त्याची आठवण झाली.

नन्दकुमार लाड यांच्या कार्याबद्दल किती मराठी लोकाना माहिती आहे ? इव्हन मायबोलीकरांना ? अमळनेर जि .जळगावच्या निलीमा मिश्रा? पण दोघांचेही काम अतुलनीय आहे. चार दोन बुणग्याना सवंग पुरस्कार मिळाले असतील पण वर सांगितलेल्या दोन उदाहरणासारख्या गाडून घेऊन निष्काम कर्मयोग करणार्‍या अनेकांनाही सन्मानीत केलेच आहे ना? आपल्ता 'धंद्याला बसलेल्या" माध्यमांकडे यांचे फोटो तरी आहेत काय? सरकारी यंत्रनांना देखील कुठून तरी फीङबॅक मिळल्याशिवाय कार्य कसे समजणार? कला क्रीडा मध्ये पॉपुलॅरिटीचा भाग आहेच. या मंडळीनी दुर्लक्षीत गुणवानांच्या शिफारशी त्यांच्या संघटनांमार्फत द्यायला काय हरकत आहे?

आमीरखानने ऑस्कर मिळवलं असतं म्हणून त्याला पद्य मिळालं असतं तर समजण्यासारखं होतं.>>> याबाबतीत सहमत नाही. ऑस्कर ही "वरची पायरी" नाही - म्हणजे देशांतर्गत स्पर्धा व ऑलिम्पिक सारखा तो प्रकार नाही. वेगळ्या संस्कृतीतील, वेगळ्या चवीच्या लोकांनी भरवलेली ती स्पर्धा आहे. एखाद्या चित्रपटाची त्यात निवड झाली तर आनंद होणे योग्यच आहे. पण तो मुळात आपल्या वातावरणातील लोकांना आवडलेला असला तरच त्याला अर्थ आहे. नाहीतर केवळ ऑस्करसाठी बनवलेला चित्रपट म्हणजे काही फार ग्रेट नाही.

राहुल द्रविडची निवड मात्र निर्विवाद असावी (वाद असलाच तर पद्मभूषण पेक्षा वरचे का नाही दिले यावरच होईल).

मराठी साहित्य सम्मेलनं जशी काही न काही वाद झाल्याविना पुरी होत नाहीत तसच काहीस पद्म पुरस्कारांचही झाल आहे.
कालच पद्म पुरस्कार जाहीर झाले. पुरस्कार देतांना दक्षिण भारतीयांवर अन्याय होतो अस "दक्षिणेची लता" म्हणून ओळखल्या जाणार्‍या एस. जानकी. म्हणाल्या आहेत. त्यांनी पद्मभूषण पुरस्कार घ्यायच नाकारलय.

http://navbharattimes.indiatimes.com/singer-s-janaki-refuses-to-accept-p...

एक गायिका म्हणून त्या किती श्रेष्ठ आहेत? याची मला खरोखरच कल्पना नाही. संगीत विषयात कुणाची योग्यता ठरवावी इतक ज्ञान ही मला नाही. पण लता, आशा, यांच्या सारखाच एस. जानकी यांचा ही आवाज सुंदर आहे याची कल्पना मला https://www.youtube.com/watch?v=ShCLkr_bVpk हे गाण ऐकून आली. त्यांनी दक्षिणेतील भाषांप्रमाणेच हिंदीतही अनेक गाणी गायीली आहेत. त्यांच्या गायनाचा खरा परिचय आपल्याला करुन घ्यायचा झाला तर दक्षिणेतल्या भाषा/संगीत जाणणारा कुणी मराठी भाषिकच गाठायला हवा.

राहता राहिली दक्षिण भारतीयांवर अन्याय होतो अस म्हणण्याची बाब तर मला भारतरत्न एम.एस.सुब्बलक्ष्मी यांच नाव लगेच आठवल. अधिक काही लिहुन कलावंतांचा आपल्या कडून अवमान घडू नये अस मला वाटत. तुम्हाला काय वाटत?

एस.जानकी यांच्याबद्दल केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर संपूर्ण देशातील ज्या करोडो रसिकांच्या मनी आदर आहे त्यामध्ये मी स्वतःला एक गणत असलो तरी 'पद्मभूषण' पुरस्कारासंदर्भातील त्यांच्या भूमिकेबद्दल मी तीव्र नापसंती तर व्यक्त करतोच पण 'मला भारतरत्न द्यायला हवा होता...' अशी मागणी स्वतःच करणे तर फार अपरिपक्वतेचे लक्षण असून वयाची ७५ गाठत आलेल्य इतक्या उच्च दर्जाच्या कलाकाराच्या संपूर्ण कारकिर्दीला अशोभनीय असेच आहे.

'पद्म पुरस्कार' मधील निवड पद्धती किती छिद्रान्वेषी असते हे सर्वसामान्यांना कधीच उमगत नसते [मिडियाच्या कॉमेन्ट्समध्येही थिल्लरपणाच ओतप्रोत भरलेला असतोच....म्हणजे या देशात सर्वात महत्वाचे काय असेल तर चित्रपटसृष्टी आणि क्रिडाविश्व या व्यतिरिक्त अन्य काही घटक अस्तित्वातच नाही...म्हणून पद्म पुरस्कार जाहीर झाल्याझाल्या स्क्रीनवर पट्टी फिरू लागते ती नटनट्यांची आणि त्यातही क्रिकेटपटूंची...]. 'राष्ट्रपती भवन' कार्यालयाशी संलग्न असलेल्या या विभागाकडे पद्म पुरस्कारासाठी अगदी वर्षभरात राज्यपाल, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, केन्द्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव, केन्द्रीय मंत्री, खासदार, विविध क्षेत्रात जनसेवेचे कार्य करणार्‍या शासनमान्य संस्था, लायन्स, रोटरी आणि तत्सम संस्था यांच्याकडून व्यक्तींच्या नावांची शिफारस होत असते. इतकेच काय एखादी व्यक्ती स्वत:च्या नावाने स्वतःसाठीही शिफारसपत्र पाठवित असते. अशा हजारो शिफारसपत्रांची छाननी, त्या त्या व्यक्तीचे संबंधित क्षेत्रातील कार्य, त्या कार्याला मिळालेली शासन आणि लोक पावती, समाजावर झालेले परिणाम आदी बाबींचा सकल विचार केला जातो.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 'पद्म समिती' स्थापन करण्यात येते. जिचा कालावधी पाच वर्षाचा असून 'कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, राजकीय, सामाजिक सेवा, वैद्यक' अशा क्षेत्रात लक्षणीय योगदान दिलेल्या नागरिकाच्या कार्याची शासनाने दखल घेतल्याची 'पोचपावती' म्हणजेच हा पद्म पुरस्कार असल्याने त्याची व्याख्या व्यक्तीच्या मानाशी असून कसलाही आर्थिक धागादोरा या सन्मानाशी मुद्दाम जोडण्यात आलेला नाही.

या समितीमध्ये पंतप्रधानाचे खास सचिव, राष्ट्रपतींचे प्रतिनिधी, कॅबिनेट सचिव, गृहखात्याचे सचिव, साहित्य अकादमीचे अध्यक्ष, क्रिडा मंत्रालयाचे प्रतिनिधी, भारतीय उद्योग आणि विज्ञान संस्थेचे अध्यक्ष, सिनेमा सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष यांच्याशिवाय राष्ट्रपतीनी प्रत्येक वर्षी नियुक्त केलेले तीन सदस्य असतात. कमिटी कितीही सदस्यांची असली तरी त्यात किमान तीन महिलांचा समावेश असतोच (विशेष म्हणजे एकाही मंत्र्याचा या समितीमध्ये समावेश नसतो). या कमिटीपुढे आलेल्या अशा हजारो [अक्षरशः हजारो नावे असतात....] नावांवर त्यासोबत आलेल्या कागपत्रांच्या आधारे महिनोनमहिने विचार चालू असतो. मग शेवटी गटवार यादी तयार केली जाते आणि ती एच.आर.डी. तर्फे राष्ट्रपतींच्या मंजुरीकरीता सादर करण्यात येते. यामध्ये अर्थातच या समितीला 'भारतरत्न' पुरस्काराची शिफारस करण्याचा अधिकार नाही. त्यासाठी थेट राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान हे तिघे खास पंचकाची नियुक्ती करून [ही नावे जाहीर होत नाहीत....] 'भारतरत्न' वर विचार करतात. 'हो' की 'नाही' यावरच फक्त चर्चा होते. या विषयाची....भारतरत्न....फाईल केवळ राष्ट्रपतींच्याच दप्तरी ठेवण्यात येते.

चला....पद्मची शंभरएक आदरणीय व्यक्तींची यादी तयार झाली....ती नावे मंजूर झाली की मग राष्ट्रपतींचे प्रमुख सचिव....प्रिन्सिपल सेक्रेटरी व गृह खाते यांच्या संयुक्त विद्यमाने या व्यक्तींना नोव्हेम्बर/डिसेम्बर दरम्यान या निवडीबद्दल कल्पना देवून त्यांचा तो पुरस्कार घेण्याबाबत होकार/नकार मागविला जातो....[हे काम व्यक्ती ज्या जिल्ह्यात वास्तव्य करीत आहे, तेथील कलेक्टर करीत असते....]

....म्हणजे कलेक्टर थेट त्या व्यक्तीच्या घरी जाऊन प्रथम ही माहिती 'मौखिक' देतो आणि 'पुरस्कार स्वीकृतीबद्दल आपल्या होकाराची आम्हाला आवश्यकता आहे...' असे केन्द्रिय कार्यालयातर्फे विनंती करतात. त्याच ठिकाण त्या व्यक्तीला नकार देण्याचाही अर्थात अधिकार आहेच हाच त्याचा अर्थ. म्हणजेच एस.जानकी यांचे नाव ज्याअर्थी 'पद्म पुरस्कारा' च्या यादीत आले त्याअर्थी त्यानी प्रथम स्वीकारण्याचा होकार दिला आहे हे नि:संशय. तेव्हा एकदा स्वीकृती दिल्यानंतर आता तो जाहीररित्या नाकारून बाईनी काय प्रघात पाडला ? विनाकारण आता त्या कलेक्टरच्या मागे चौकशीची चांडाळचौकडी लागणार की त्याने एस.जानकी यांचा होकार लेखी स्वरूपात घेतला होता की नाही ? घेतला नसल्यास मग कशाच्या आधारे त्यांचे नाव 'स्वीकृती' च्या यादीत आले ? वगैरे वगैरे.

'लेखी होकारा'ची ही पद्धत पडली ती उत्पल दत्त या अभिनेत्याने केलेल्या नाटकामुळे. १९७६ मध्ये उत्पल दत्त याना 'पद्मश्री' जाहीर झाली. त्यांचे नाव बंगाल फिल्म असोसिएशनकडून शिफारस केले गेले होते, ते मान्य झाले. २६ जानेवारी १९७६ रोजीच या दत्त महाशयांनी...जे कम्युनिस्ट विचारसरणीचेच होते...एक भलेमोठे पत्रक काढून 'मी ही पद्मश्री स्वीकारत नसून मला न विचारता ती दिली गेल्यामुळे मी केन्द्र सरकारचा जाहीर निषेध करतो...' वगैरे वगैरे थाटातील भाषा त्या पत्रकात होती. तो गृह खात्यासाठी एक वैतागाचाच प्रकार. त्यातही चेष्टेचा भाग असा झाली की, काही पत्रकारांनी त्याना विचारले होते, 'बंगाल फिल्म असोसिएशनने तुमच्या नावाची शिफारस केली होती ते तुम्हाला माहीत होतेच मग त्याचवेळी असोसिएशनला का कळविले नाही की, माझे नाव यादीत घेऊ नका म्हणून..?" याला निलाजर्‍यासारखे उत्पल दत्त यानी उत्तर दिले होते, "...मग मला प्रसिद्धी कशी मिळाली असती ?" म्हणजे नकार देणे हा भाग कलाकाराने प्रसिद्धीच्या हव्यासापोटीही केलेला भाग असू शकतो हाच याचा अर्थ.

एस.जानकीबद्दलही असेच म्हणताना मनस्वी वाईट वाटते.

अशोक पाटील

म्हणजे नकार देणे हा भाग कलाकाराने प्रसिद्धीच्या हव्यासापोटीही केलेला भाग असू शकतो हाच याचा अर्थ.
----- अशी प्रसिद्धी फार कमी काळ रहाते.... चार दिवसात जनसामान्य विसरुन जातात. लक्षात केवळ पद्म पुरस्कार मिळालेलेच रहातात.

अशोकजी नेहेमी प्रमाणेच माहितीपुर्ण पोस्ट.

पद्मश्री नाना पाटेकर... अभिनंदन...

आज कुणातरी जवळच्या आणि डीझर्विंग माणसाला सन्मान मिळाल्यासारखा अतिशय आनंद झाला.
(आता उशीरा मिळाला अन्याय झाला इ. चर्चा केली तरी ती निरर्थक आहे..म्हणुन आपण नानाला पद्मश्री मिळाल्याचा फक्त आनंद साजरा करुया).

केवळ कलाकार न रहाता भ्रष्ट शासन व्यवस्थेबद्द्ल वेळोवेळी सरकारला कोणाचीही तमा न बाळगता मुलाखतींतून (आणि आता वर्तमान पत्रातूनदेखिल) बोल सुनावणारा नाना पद्मश्री केंव्हा नाकारतो ते बघायचंय.

आज कुणातरी जवळच्या आणि डीझर्विंग माणसाला सन्मान मिळाल्यासारखा अतिशय आनंद झाला.
----- अगदी...

बातमी वाचल्यावर मला पण खुप आनंद झाला. अभिनंदन नाना.

असो, चांगला विषय घेतला चर्चेला. आणि योग्य चर्चा चालू आहे. श्री व फारएन्ड >>> +१
अशोकजी नेहेमी प्रमाणेच माहितीपुर्ण पोस्ट. >>> +१
अजून एक. असो तुम्ही जो पहिलाच प्रतिसाद दिला आहे त्यात "पद्म" च्या ऐवजी बर्‍याच ठिकाणी "पद्य" असं टाईप झालंय, कृपया ते दुरूस्त करणार का ?

सैफला मागल्या वर्षी पद्मश्री...यंदाच्या वर्षी त्याच्या आईला पद्मभूषण्...एवढी महान अभीनेत्री आहे का ती?

<जिथे पैसा आणि प्रसिद्धी असते तिथेच जास्तकरुन असे पुरस्कार दिले जातात.> पद्मपुरस्कारांसंबंधाने असेच होते अशी आकडेवारी आहे का?

शंभराहून अधिक व्यक्तींना यंदाचे पद्म पुरस्कार घोषित झाले आहेत. त्यातल्या एका व्यक्तीचे नाव घेऊन 'चर्चा' चालू आहे. ज्या अन्य लोकांना पद्म पुरस्कार मिळालेत त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याची गरजही कुणाला वाटत नाही.
मनोरंजनाच्या क्षेत्रतील प्रसिद्ध, लोकप्रिय व्यक्तींना पद्मपुरस्कार मिळाला की तो अस्थानी असे म्हणणे फॅशनेबल आहे का?

<राहुल द्रविडची निवड मात्र निर्विवाद असावी (वाद असलाच तर पद्मभूषण पेक्षा वरचे का नाही दिले यावरच होईल).> वाद घालायचाच तर अनिल कुंबळेची पद्मश्रीवर बोळवण आणि राहुल द्रविडला पद्मभूषण का? असा घालता येईल.

माहिती करून घ्यायची इच्छा नाही >>

आपल्या इच्छेला किंमत आहे का ? माहिती कुठली द्यायची हे कोण ठरवतं. २०१० साली आमीर खान, वीरेंद्र सेहवाग, सैफ अली खान, रसूल पोकुट्टी, मल्लिका साराभाई अशांना पद्म पुरस्कार मिळाल्याच्या बातम्या होत्या. तेव्हां माध्यमातच ही चर्चा रंगल्याचे आठवत असेल. सामान्य माणसाच्या दृष्टीने अशा चर्चा ऐकल्यावर पद्म पुरस्कारांमधे गांभिर्य नाही असा समज होणे चुकीचे आहे असं वाटतं का ?

इथे हा विषय मांडल्यानंतर भरत मयेकरांनी माध्यमांचा हा चावटपणा लक्षात आणून दिल्यावर त्यांना अनुमोदन त्यासाठीच दिलं होतं. माझं समाधान झालं. सिनेमा, क्रिकेट यांना पद्म देऊ नका असं म्हणणं नाही. अभिजात कला जोपासणा-यांना डावलून असं होतं का हा माझा चिंतेचा विषय होता. याबाबतीत माझं समाधान झाल्याने निवृत्ती ! श्री यांना देखील अनुमोदन. अशोक पाटील यांना माहितीबद्दल अनेक धन्यवाद !

(१२० कोटीच्या या देशात शर्मिला टागोर, सैफ अली खान , मन्सूर अली खान पतौडी यांना पद्य पुरस्कार मिळणे म्हणजे हे एक घराणं कलेच्या दृष्टीने देशात अग्रेसर असण्याचं किंवा रोल मॉडेल असण्याचं द्योतक मानावं का ? शर्मिला टागोर आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाकडे आता तरी गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. सोहा अली बद्दल कुणाचे प्रतिकूल मत असल्यास तिलाही पुढे मागे पद्म् मिळेलच हे ध्यानात असू द्यावे. )

मेरीट बरोबर लागेबांधे हा ही एक फॅक्टर आहेच. तेवढे सोडूनच द्यावे. अन्यथा झैलसिंगांच्या गुडघ्याच्या ऑपरेशन करणार्‍या कुठल्यातरी डॉक्टरचे व 'मेरी इक्यावन कविताएं'या वाजपेयींच्या कविता गाणार्‍या पद्मजा फेणाणींना वाजपेयी सत्तेत असताना पद्म मिळण्यात तरी काय लॉजिक आहे..?बर्‍याच अंशी मेरीट पाळले जाते हेही खरेच आहे...

सैफला मागल्या वर्षी पद्मश्री...यंदाच्या वर्षी त्याच्या आईला पद्मभूषण्...एवढी महान अभीनेत्री आहे का ती?>>>> अनुमोदन. अगदी श्रीदेवीलाहि काय समजून मिळालाय हा पुरस्कार? दक्षिणेतल्या कम्ममुळे कि बॉलीवूडमुळे? हिंदि तर अजूनहि बोलता येत नाहि. Sad माधुरीलाहि पद्मश्री मिळालं होतं ना? (का?)

जानकिबद्दल आजच लोकसत्तेत वाचलं,त्यांच्यामते त्यांनी जेव्हा गायला सुरुवात केली तेव्हा जन्मलेल्या पोरांनाहि त्यांच्या कितीतरी आधी हा पुरस्कार मिळालाय.मग त्या गायक म्हणून कुठेहि कमी नसताना त्यआंना खूपच उशीरा मिळतोय हा पुरस्कार. म्हणून त्यांनी नाकारला.

@अशोक
एस.जानकी यांच्याबद्दल केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर संपूर्ण देशातील ज्या करोडो रसिकांच्या मनी आदर आहे त्यामध्ये मी स्वतःला एक गणत असलो तरी 'पद्मभूषण' पुरस्कारासंदर्भातील त्यांच्या भूमिकेबद्दल मी तीव्र नापसंती तर व्यक्त करतोच पण 'मला भारतरत्न द्यायला हवा होता...' अशी मागणी स्वतःच करणे तर फार अपरिपक्वतेचे लक्षण असून वयाची ७५ गाठत आलेल्य इतक्या उच्च दर्जाच्या कलाकाराच्या संपूर्ण कारकिर्दीला अशोभनीय असेच आहे.
<<
संपूर्ण देशातील करोडो रसिकांच्या मनी आदर असलेल्या, वयाची ७५ गाठत आलेल्य इतक्या उच्च दर्जाच्या कलाकाराच्या संपूर्ण कारकिर्दीत आजपर्यंत त्यांना जर भारत सरकारकडून कोणताच पुरस्कार मिळाला नसेल तर या देशातील कलाकार, रसिक, शासन ,नेते आणि एकंदर समाज यांच्याही फार अशोभनीय अपरिपक्वतेचे ते एक लक्षण आहे असेही म्हणता येईल.
एस.जानकी जर आधीच इतक्या प्रसिद्ध आहेत तर त्या प्रसिद्धीसाठी असे वागतील अशी शक्यता वाटते का? कलाकार मनस्वी असतात असे ऐकून आहे. या सर्व प्रकारात त्या कुणाकडून तरी दुखावल्या गेल्या असतील का? असा मोठा पुरस्कार नाकारण्यासाठीही तसेच कांहीतरी गंभीर कारण असावे.

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांना २००१ साली पद्मश्री मिळाले. पं हृदयनाथ मंगेशकर यांना २००९ साली. होतं असं कधी कधी.

"...या सर्व प्रकारात त्या कुणाकडून तरी दुखावल्या गेल्या असतील का? ...."

भास्करराव.... कलाकार मनस्वी असतातच आणि ते तसे असतात हे तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य रसिक समजावून घेत असतात. काही कलाकारांचा असा 'मनस्वी' पणा 'नखरे' प्रकारात कसा मोडतो याबाबत तर वेगळी कहाणीच होऊ शकेल. पण दुखावण्यापेक्षा मानापमानाच्या गोष्टी अशा पुरस्कारामध्ये फार गुंतलेल्या असतात.

माझा मुद्दा हा होता की, ज्यावेळी राष्ट्रपती भवनातील त्या कमिटीकडून पद्मची पहिली यादी तयार केली जाते [हे नोव्हेम्बरच्या शेवटच्या आठवड्यात होते] त्याचवेळी सरकारतर्फे [डिस्ट्रिक्ट कलेक्टर प्रतिनिधी असतात] संबंधितास 'स्वीकृती' बद्दल विचारतात. एस. जानकी यांच्याबाबतीत हा प्रोटोकॉल पाळला गेला असणारच. वादाकरीता असे समजा की जानकी यानी त्यावेळी कलेक्टरना 'पद्मभूषण' बाबतची स्वीकृती दिली असेल आणि त्यानंतर त्यांच्या वा त्यांच्या भोवती असलेल्या हितचिंतकांच्या ध्यानी ही बाब आली असेल की यंदाच्या पुरस्कारापूर्वी कितीतरी "ज्युनिअर्स" ना जानकी यांच्याअगोदरच 'पद्मभूषण' दिला गेला आहे....[आज माहितीच्या स्फोटामुळे अशी माहिती गूगलिंग केल्यावर स्क्रीनवर एका क्लिकने समोर येते हे तुम्हालाही माहीत आहेच...], तसे पाहिल्यावर जर जानकी याना 'आपण स्वीकृती दिली ते चुकीचे झाले' असे वाटले असल्यास त्या त्याचवेळी केन्द्र सरकारला आपला नकार कळवू शकल्या असत्या. तितका वेळ [जवळपास २ महिने] त्यांच्याकडे होताच होता.

ते केले नाही आणि मग पुरस्काराची बातमी २६ ला जाहीर झाल्यावर मिडियासमोर येऊन 'मी भारतरत्न सन्मानाच्या पात्रतेची असताना मला कमी दर्जाचा पुरस्कार दिला म्हणून मी तो स्वीकारत नाही...' असे भाष्य करण्यामध्ये ना त्या पुरस्काराची शान ना त्यांच्या आदरणीय अशा संगीत कमाईची.

.... आणखीन् एक ~ मध्यवर्ती सरकार देशभरातून आलेल्या शिफारशीवर विचार करते. या समितीमध्ये एकही "मंत्री" पातळीवरील व्यक्ती नसते. म्हणजेच एस. जानकी यांच्या नावाचा पाठपुरावा जर तमिळनाडू सरकारकडूनच झाला नसेल तर मग केन्द्राला दोष देण्यात तर काय हशील ?

वर श्री.मयेकर यानी हृदयनाथ मंगेशकर आणि पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचे उदाहरण दिले आहेच. त्याबद्दल इतकेच म्हणता येईल की, समितीचे काम आलेल्या नावांचा विचार करणे इतपत असते. म्हणजेच बाळासाहेबांचेच नाव जर आमच्या सांस्कृतिक खात्याकडून दिल्लीकरांकडे गेले नसेल तर मग पद्मजाताईना त्यांच्याअगोदर पद्मश्री मिळाली तर त्यात दोष कुणाचा ?

आणखीन् एक उदाहरण.....दिलीप-राज-देव ही सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अशी अभिनेत्याची त्रयी...प्रत्येकाचा इथे गेले अर्धशतक ठसा आहे. पण या तिघांच्याअगोदर सुनिल दत्त याना १९६८ मध्ये तर राजेन्द्रकुमार याना १९६९ मध्ये 'पद्म' पुरस्कार मिळाले होते. या दोघानंतर तब्बल २५ वर्षानंतर दिलीपकुमार याना तर ३० वर्षानंतर देव आनंदला पद्म मिळतात, हेही हास्यास्पदच. [यांच्यापेक्षाही ज्येष्ठ असलेले दादामुणी अशोककुमार याना तर हा पुरस्कार १९९८ मध्ये देण्यात आला होता..... तर किशोरकुमारला कधीच नाहीच.]

.... सांगायचा मुद्दा असा की अशा सदैव वादाच्या भोवर्‍यात राहिलेल्या पुरस्काराने आपल्या करीअरमध्ये तसेच रसिकप्रेमामध्ये कसलाही फरक जर पडणार नसेल [पडत नाहीच] तर मग त्याबाबत कलाकारांनी वाद निर्माण करण्यात कसले औचित्य ?

अशोक पाटील

@अशोक
.... सांगायचा मुद्दा असा की अशा सदैव वादाच्या भोवर्‍यात राहिलेल्या पुरस्काराने आपल्या करीअरमध्ये तसेच रसिकप्रेमामध्ये कसलाही फरक जर पडणार नसेल [पडत नाहीच] तर मग त्याबाबत कलाकारांनी वाद निर्माण करण्यात कसले औचित्य ?<<
हे खरे असले तरी , कलाकारही शेवटी माणसेच आहेत. त्यांनाही 'अहंभाव ' असणारच. त्यांच्या अहंभावाने औचित्यावर मात करण्यासारखे कांहीतरी घडले असले पाहिजे असे अजूनही मला वाटते.
त्यांनी पुरस्कार नाकारला ही बाब इतिहासजमा होऊन सरकार आणि समाज दोघांच्याही जवळपास विस्मरणात गेल्यासारखीच आहे.
बाकी आपल्या महितीपूर्ण आणि सर्वांगांनी विचार करणार्‍या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!

भान
माहितीबद्दल धन्यवाद.

अशोकजी
तुमचे मुद्दे अगदी माहितीपूर्ण आणि संयत भाषेत असतात हे ठळकपणे जाणवले. अशा वेळी सहमती नसेल तरी चर्चा छान वाटते. तुमचा मुद्दा बरोबरच आहे. मला इथे इतिहासातली एक घटना सांगाविशी वाटते. गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी ब्रिटीश सरकारला "सर" ही पदवी परत केली होती. दक्षिण भारत हा कलेने समृद्ध असल्याचे आपण सर्वच जण जाणतो. पद्म पुरस्कारासंदर्भात दक्षिणेच्या बाबत खरोखरीच डावेउजवे झालेय का कसे हे कळायला मार्ग नाही. पण असे झाले असल्यास भावना दुखावणे समजू शकते. अशा वेळी पुरस्कार नाकारणे हा निषेधाचा मार्ग असू शकतो.

पण वैयक्तिक कारणासाठी इतका मोठा पुरस्कार नाकारला गेला असल्यास खेदाची बाब आहे हे मान्य करावे लागेल.

Pages