विवाहसंस्था मर्यादीत केल्यास...

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 06:48

सद्य परिस्थितीत ढवळून निघालेले वातावरण, मायबोलीवर अश्या स्वरुपाचे काही धागे येणे यातून मनात जे आले ते लिहीत आहे. उत्स्फुर्त भावनेतून लिहीत असल्यामुळे आगापीछा ( / मेरिट्स - डिमेरिट्स) चा विचार केलेला नाही. तो विचार चर्चेतून होईलसे वाटत आहे.

शारीरिक दौर्बल्यामुळे स्त्रीचे शोषण करणे शक्य होते व शोषण करण्याची पाशवी वृत्ती पुरुषाच्या मनात जागृत होणे शक्य होते. मात्र हे शोषण होण्यामागे प्रामुख्याने स्त्रीचे परावलंबित्व कारणीभूत ठरते. म्हणजे शारीरिक दौर्बल्य हे बेसिक कारण झाले, पण अवलंबित्वामुळे शोषणाच्या वृत्तीला बहुधा चालना मिळू शकते. अर्थात, नुकतीच दिल्लीत झालेली घटना व तश्या घटना हे तत्व खोटेच ठरवतात व त्यातून मानवाचे पशूरूप थेटपणे समोर येते. संबंधही नसताना केलेले ते प्रकार हे कोणत्याच तार्किक मानसशास्त्रीय जडणघडणीच्या चौकटीत न बसणारे असतात, एक्सेप्ट की ते पुरुष पशूवत विचारसरणीचे आहेत.

पण परावलंबित्वामुळे शोषण प्रामुख्याने होते असे म्हणण्यास वाव आहे / असावा.

हे परावलंबित्व अनेक कारणांनी असू शकते. कमी शिक्षण, आर्थिक पारतंत्र्य, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकटीवर पडणे / टाकलेली असणे, विवाहबंधन इत्यादी!

यापैकी निदान शहरी भागात हळूहळू शैक्षणिक व आर्थिक आघाडीवर स्त्री काहीशी स्वतंत्र होत आहे असे दिसत आहे. ग्रामीण भागात हे अजून तितकेसे नाही, पण मंथन मात्र तेथेही चालू असल्यासारखे वाटते व कितीही टीका केली तरी माध्यमे व तंत्रज्ञान याद्वारे ग्रामीण समाजही अनेक नवनव्या कायद्यांना, सोयीसुविधांना सामोरा झालेला दिसत आहे. तेथील अश्या स्वातंत्र्याचा वेग कमी असला तरी चालना नक्कीच मिळालेली आहे.

मात्र लग्न ही संस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर स्त्रीला बद्ध करत आहे. स्वतःला उच्चशिक्षित, उच्चभ्रू इत्यादी समजणार्‍यांमध्येही 'विशिष्ट वयानंतर मुलीचे लग्न व्हायला हवे' हा विचार खूपच खोलवर रुजलेला आहे. लग्न या संस्थेद्वारे स्त्रीचे सर्वाधिक शोषण होत असावे असे फक्त मनात आले.

१. पतीद्वारे शोषण (यात हुंडाही आलाच)
२. सासू, सासरे, दीर व इतर नातेवाईकांद्वारे शोषण
३. मुलांद्वारे शोषण
४. एकंदर सासर व माहेर यांच्यातील संबंधांमुळे होत असलेले शोषण
५. विवाहितेकडून असलेल्या अपेक्षांमार्फत गावातील इतर नागरिकांद्वारे अप्रत्यक्ष शोषण
६. विवाहबंधन व नोकरी करण्याची जबाबदारी यातून वैवाहिक पातळीवर होत असलेले शोषण

इत्यादी!

असे वाटत आहे की मुलींचे तातडीने लग्न करणे हा प्रकार पालकांनी जरा कमी केला आणि तिला एकटीला जगू दिले तर तिच्या आयुष्यातील शोषणाचे एक बर्‍यापैकी प्रमुख कारण कमी तरी होऊ शकेल किंवा विलंबाने तरी सत्यात येईल, जोवर कदाचित ती ते परतवण्यास थोडीशी अधिक सिद्ध झालेली असू शकेल.

यातून व्यभिचार वाढू शकेल असे कोणी म्हणाल्यास त्यावर काहीच म्हणता येणार नाही, पण मुलीच्या इच्छेने जर तिचे कोणाशी संबंध असले आणि तिला त्या संबंधांना 'विवाहबंधन' हे लेबल चिकटवायचे नसले तर तिला तेवढी मोकळीक मुळात तिच्या घरच्यांनी द्यावी असेही वाटत आहे. कदाचित हे मूर्खपणाचे, स्वप्नवत किंवा चुकीचेही असू शकेल.

पण लग्नसंस्थेच्या फायद्यांची आजच्या वेगवान काळात कितपत अनिवार्यता आहे असे वाटत आहे. जशी एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नष्ट होत गेली / होत आहे तशीच ही संस्थाही हळूहळू विरत गेली तर काही प्रमाणात स्त्रिया मोकळा श्वास घेऊ शकतील असे वाटते.

आपल्याला काय वाटते ते कृपया नोंदवावेत.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी ह्युमन बिहेविअर सुद्धा शिकतो. आपल्या जगण्याच्या कक्षा रुंदावतात, व्याख्या ठळक होतात. अशा वेळी जर आपला पार्टनर ग्रो झाला नाही तर? आयमिन शोधून सवरून नीट पाहून केलं असेल तरी, लग्नाच्या वेळी जुळलेली वेव्हलेंग्थ जर का पुढे कंटिन्यू राहिली नाही तरीही.>>>>>>>>>
हे प्रेम विवाहात/लिव्ह इन रिलेशनशिप मधे होणारच नाही याची काय गॅरंटी आहे? एखादे नाते टिकेल किंवा टिकणार नाही याची खात्री कशी देता येउ शकेल?
एक उदाहरण..आमिर खान.. त्याचे आधीचे लग्न ज्या मुलीबरोबर झाले तिच्यावर त्याचे प्रेम होते. प्रेम विवाह होता. दोन मुले झाली. मला वाटते १५ वर्षे झाली होती त्याच्या लग्नाला(चु भु द्या घ्या). मला नेहमी वाटायचे की हा खरा मि. पर्फेक्ट!..त्याचे काम आणि खाजगी जीवन व्यवस्थित चालले आहे. त्या पहिल्या मुलीला स्वप्नात तरी वाटले असेल का की ज्याचे आपल्यावर्/आपले ज्याच्यावर इतके प्रेम आहे आपली वेव्हलेंग्थ तुटेल..पण ते झाले..
आता जर इतके घट्ट नाते तुटत असेल तर..लग्नाआधी दाखवण्याच्या कार्यक्रमात ३० मिनिटे एकमेकांशी बोललेल्या/ किंवा काही अधिक वेळा भेटलेल्या... लोकांची कशी वेव्हलेंग्थ जुळणार? आणि ते पुढे तसे राहण्याची काय शाश्वती?
मला तरी वाटते सगळे पाहुन (आर्थिक परिस्थिती, शिक्षण, पारिवारीक पार्श्वभुमी इ). केलेल्या लग्नामधे ते यशस्वी होण्याचे Odds जास्त असतात इतकेच. आणि महेश यानी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी योग्य गोष्टी घडल्या तर चांगले हे पालकांच्या डोक्यात असते त्यामुळे त्यांची ती किमान अपेक्षा असते.(माझीही आहे).

अर्थात There are no guarantees हे जीवनाप्रमाणेच नात्यांच्या बाबतीतही तितकेच खरे आहे. मग ते लग्नाचे असो/सिविल युनियन असो किंवा इतर कुठले.

योग्य वयात योग्य गोष्टी घडणे चांगले असते असे वाटते.

महेशरावांच्या या पोस्टला अनुमोदन.

आई वडिलानी मुलीला वाढवले, तिला संस्कार दिले, आयुष्य दिले, इस्टेटही दिली.

आता मुलगी स्वातंत्र्याच्या नावाने आई बापाची इस्टेट व स्वतःची मिळकत घेऊन ( आणि लग्नान्ण्तर बाहेर पडली असेल तर नवर्‍याचीही वाटणी घेऊन ) चैन्या करणार...

पुढच्या पिढीचे भवितव्य घडवण्यात तिचा काडीमात्र सहभाग नसेल, तर तिने पूर्णपणे नोकरी करुनच रहावे... माहेर सासरची इस्टेट फुकट खाऊ नये...

<पण नंतर त्याचे दुसर्‍या मुलीशी प्रेम जमले आणि त्याने पहिलीला सोडुन दुसर्‍या मुलीशी लग्न केल>
किरण अमीरला भेटण्यापूर्वीच त्याचा घटस्फोट झाला होता.

भरत मयेकर,
धन्यवाद. माझी माहिती चुकीची होती. ते पोस्ट संपादित केले आहे.

माझ्या त्या कॉमेंटमुळे झालेल्या विषयांतराबद्दल क्षमस्व.

मनस्मी वुई आर ऑन द सेम लाईन Happy
मी शोधून सवरून म्हणजे पाहून ठरवलेलं लग्न नाही सरसकट इन एनी टाईप ऑफ मॅरेज.. असं म्हणत होते.
खरंतर ग्रोईंग आणि वेव्हलेंग्थ जुळणं न जुळणं हे कोणत्याही नात्यात होऊच शकतं. पण ती नाती इतकी बंधनकारक नसतात. लग्नाचं असं नातं असेल तर ते बर्डनसम होऊ शकतं.

सॅम, खूप उपयुक्त माहिती दिलीत.
राजवाडे यांचा 'विवाह-संस्थेचा' इतिहास वाचला तर वैदिक कालातल्या चाली-रीतींबद्दल बरेचसे समज /अपसमज दूर होतील.
वैदिक काळ आदर्श मानायचा का? आजच्या काळात तसा समाज उभा राहू शकतो का? आणि ते कितपत इष्ट आहे? यांचा समग्र विचार न करता, फक्त वेदांचे [संदर्भ वगळून ] दाखले दिल्याने दिशाभूल होण्याचाच संभव जास्त.
इंगल्स् ने विवाह-संस्थेची आर्थिक आणि उत्पादन्-संबंध यांच्या आधारे चिकित्सा केली आहे. ती आजही उदबोधक वाटते. 'शोषण' हा मार्क्सवाद्यांचा आवडता विषय. त्या अंगानेच ही चिकित्सा जाते.
भारतात, आजमितीला घरगुती वापरासाठी, विशेषतः स्वयंपाकासाठी , वापरणारी उर्जा साधने पाहिली तर सुमारे ६५% ते ६७ % लोकसंख्या या कामासाठी लाकूड-फाटा, पाला-पाचोळा आणि काड्या-काटक्या किंवा शेण हे इंधन वापरते. हे इंधन कोण गोळा करतं? स्त्रीयाच. आपण आयात केलेल्या इंधनाच्या [तेल-जन्य पदार्थ] डॉलर-मूल्याचा बोजा असह्य होत चालला आहे असं सगळीकडे बोललं जातं. स्त्रीयांनी वणवण फिरून गोळा केलेल्या इंधनाची किलो-कॅलरी [उष्णांक] तत्वावर किंमत काढली तर ती आयात केलेल्या तेल-इंधनाएव्हढीच भरेल असं एक अभ्यास सांगतो. पण याची गणना राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही आणि स्त्रीला आपण इंधन-उत्पादक समजत नाही. तिच्या कष्टांचं [म्हणजेच उत्पादनाचं] रुपये-आण्यात मोजमाप होतच नाही. हा फक्त इंधनाचा विचार झाला. पाणी गोळा करणे, स्वयंपाक व घरकाम, तसंच संतती-संगोपन यांचं आर्थिक मूल्य काढलं तर ते किमानपक्षी 'इंधन-मूल्या' इतकं सहज भरावं. शेती आणि पशुपालनातही स्त्रीचा वाटा खूप मोठा असतो. या सगळ्याचं गणित मांडलं तर राष्ट्रीय उत्पन्नात पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांचं योगदान खूप जास्त भरण्याची दाट शक्यता आहे. तरीही स्त्रीला दुय्यम नागरीकाचा दर्जा कुटुंबात आणि समाजात का दिला जातो ?
याला 'शोषण' म्हणायचं नाही तर कशाला म्हणायचं?
या शोषणाचा आधार विवाह-संस्थेत आहे, आणि 'इंडिया' पेक्षा 'भारता' त स्त्रीचं जास्त शोषण होतं असे निष्कर्ष काढले तर ते चुकीचं होईल का?
आता, वैदिक संस्कृतीतही स्त्रीयाच इंधन गोळा करत होत्या आणि पाणी आणत होत्या असा जावई-शोध लावून शोषण-व्यवस्थेला कुणी वैदिक आधार शोधले नाहीत म्हणजे मिळवली!
-प्रभाकर [बापू] करंदीकर

स्वतःच्या घरासाठी पुरुस्।हाने काम केले तर ते कर्तव्य आणि बाईने केले तर शोष्हण हा मुद्दा समजला नाही.

पुरुष ऐदी असेल तर बाईने लाकूड आणणे , हे बाईचे शोष्हण मानता येईल ..

त्याच काळात पुरुषही स्वतःच्या कुटुंबासाठीच काहीतरी काम करत असेल तर बाईचे काम हे शोष्हण मानता येणार नाही. नै का?

यात लग्नाचा संबंध कुठून आला? लग्न होण्यापूर्वीही बाई वडिलांच्या घरात तेच काम करत होती ना? स्वयपाक, पाणी भरणे...? आणि नवयाच्या घरात नवरा, मूल यासाठी केले तर ते मात्र शोष्हण?

असे असेल , तर मग स्त्रीया पुरुष्हाना त्यांच्या घरी नांदवायला का नेत नाहीत? आम्ही बाईच्या घरी राहून पाणी आणू, पाट्यावर पुरण वाटू ...... बायकानी नोकरया कराव्यात.. ही सिस्टिम बायकानी का चालू केली नाही अजून?

तुम्ही ज्याला चार उपटसुभांनी संस्कृतीच्या नावाने केलेले निर्बंध म्हणता, त्यात जबाबदारीला (म्हणजे कर्तव्यांना) प्रथम प्राधान्य आहे.

गामा सहमत.

अग्ग्ग्गो बाई, या धाग्यावर महेश, गामा अशा भल्याभल्यांशी आमचे एकमत होत आहे.....आपण लिव इन करुया का? Biggrin

आदिवासी संस्कृती :

फक्त महाराष्ट्रातच आदिवासी संस्कृतींमधे कमालीचं वैविध्य आहे. शासनाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्या रुढी, परंपरांमधे गेल्या २५ वर्षांपासून बदल घडून येत आहेत. मात्र पुण्यातल्या क्वीन्सगार्डन येथील आदिवासी विकास संशोधन संस्थेमधे या रुढी वाचायला मिळतील.

काही लक्षणीय प्रथा :
काही जमातींमधे मुलाला मुलीकडच्यांना हुंडा द्यावा लागतो.
काही जमातीमधे मुलाला मुलीच्या घरी एक वर्षभर येऊन रहावे लागते. या काळात त्याची वागणूक ठीक असेल तर मुलीशी लग्न होते.\
काही जमातींमधे तरुण मुला मुलींना विशिष्ट सनाच्या काळात एका मोठ्या झोपडीवजा खोलीत रात्रभर ठेवले जाते. यात आवडलेल्या जोडीदाराबरोबर लग्न होते.
मुलीकडून हुंडा आणण्याची पद्धत एकाही जमातीत नाही.
सास-याकडे काम शिकण्यासाठी भावी जावयाला पाठवण्याची पद्धत काही जमातीत आहे. सासरा जावयाकडून अनेक कामं करून घेतो.

(पुस्तक सापडले तर आणखी काही प्रथांबद्दल लिहीन.)

तेच तर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पुरूष बाईकडे रहायला गेले तर ते हुंडा देतात ना? मग ........................................
( रिकाम्या जागा भरा...)

याला मात्र शोषण हे नाव का?

काटक्या गोळा करणे हे काम बहुतांश स्त्रिया करतात हे बरोबर आहे. पण त्याच वेळी जंगलात लाकुडतोड करणे, लाकूडफाटा गोळा करणे, कंदमुळं गोळा करणे हे काम पुरूष करत असत. कालांतराने माणूस शेतीकडे वळल्यावर स्त्री - पुरूष दोघेही शेतात काम करू लागले. बैलजोडीने नांगरणी, विहीर-आड यासाठी खणणे आदि मेहनतीची कामे पुरूषाकडे तर स्त्री ला करता येण्यासारखी अनेक बारीक बारीक कामे तिच्याकडे अशी विभागनी सहाजगत्या झाली असावी. तण काढणे, खुरपणे, तोडणी, छाटणी, मळणी, चाळणी इ. इ. कामे स्त्रियांकडे आली असावीत. पण ही कामं पुरुष करतच नाहीत हे बरोबर वाटत नाही. गवताचे हारे डोईवर आणताना स्त्री-पुरूष दोघेही दिसतात. या अनेक कामाला वीज लागली असती तर असंही ऑडिट करावं लागेल. खरंच काही हरकत नाही. राष्ट्रीय उत्पादकता काढताना हे सर्व विचारात घेत नाहीत का ?

आंबा ४

आदिवासी प्रथांमधून वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रथा आहेत हे दिसून येतं. पन लग्नसंस्थेला मोडीत काढलंय असं दिसत नाही. एकाच वेळी आदीम भागात असलेल्या या प्रथांमधून सामाजिक बदलांची कल्पनाही थोडीफार येऊ शकते. समाजात ज्यावेळी जिसकी लाठी उसकी भैस अशी स्थिती होती त्या वेळी मालमत्ता, गोधन, पशुधन आणि स्त्री ही जो बलवान त्याची मालमत्ता होत असे. सामाजिक उतरंडीमधे वरिष्ठ वर्णाला अशी परवानगी धर्मग्रंथातून देण्यात आली होती. मनुस्मृती हा त्याचा एक पुरावा आहे.

अशा काळात आपली स्त्री इतरांच्या नजरेला पडू नये या काळजीमुळेही चार भिंतीच्या आत तिला जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न होत असेल का ? यातूनच काही प्रथांनी जन्म घेतला असेल का ? असे प्रकार सरसकट असतील का याबद्दल काहिच बोलता येणार नाही. पण तरीही एक स्त्री आणि एक पुरुष यांना एकत्र सहजीवनासाठी समाजाने दिलेली परवानगी हे लग्नसंस्थेचं महत्व त्याही काळात अबाधित होतं. कदाचित राज्यकर्ते किंवा अधिकारी व्यक्तीशी दुर्बल समाज पंगा घेत नसावा. मात्र एकाच समाजाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हां एखाद्या दुर्बल पुरूषाला किंवा विवाहीत स्त्रीला समाजातल्या धटिंगणांकडून विवाहसंस्थेने संरक्षण मिळत असावं.

शक्तिमान गटाकडून अन्याय झाल्यास आजच्या प्रगत काळातही सर्वसामान्यांना "न्याय" मिळतच नाही.

कदाचित परस्पर विरोधीही असतील, पण तरीही सॅम, मो कि मी, अंड्या, डेलिया, श्रुती, बापू व दक्षिणा यांच्या अनेक पोस्ट्स आवडल्या.

धन्यवाद.

आंबा ४ यांचा हा मुद्दाही आवडला की स्त्री कष्ट करते तेव्हा पुरुषही काही ना काही करतच असतो.

धन्यवाद.

आंबा ४,
तुमच्या काही प्रतिक्रिया म्हणजे वक्रोक्तीची उदहरणं आहेत का? मला जरा शंका येतेय.
बापू

>>म्हणून शहरी भाग नाही तर ग्रामीण आणी कमी विकसित भाग डोळ्यासमोर ठेऊन चर्चा करा.
<<
चर्चेचे याकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे असे वाटते.

वक्रोक्ती नव्हे....

एका पीडीत पुरुष्हाची ती रुदनोक्ती आहे.

--- संसार हा एक आंबा असून गर बायकोला आणि कोय नवर्‍याला मिळते. Sad

पुरुष एकडची काडी तिकडे करत नाहीत असं मी म्हटलं नव्हतं.
कृषि आणि पशुधन विकासाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि विस्तार [extension] याबाबतच्या विविध राष्ट्रव्यापी सर्वेक्षणाअंती तज्ञांनी [मी नव्हे] असं नोंदवलं आहे की प्रत्यक्षात ग्रामीण भागात स्त्रीयाच शेतीचं काम जास्ती करून [संपूर्णपणे नव्हे] करतात आणि त्यामुळे स्त्रीयांसाठी खास प्रशिक्षणाचे कार्यक्रम आखावेत. विस्तार अधिकारी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करायला गाव-भेटीला जातात ती वेळ बहुदा सकाळची असते. त्यावेळी स्त्रीयांना मुळीच फुरसत नसते. त्यामुळे अशा कार्यक्रमांची वेळ दुपारची निवडावी जेणेकरून स्त्रीया मोठ्या संख्येने हजर राहतील आनि तंत्रज्ञान विस्ताराचं काम अधिक प्रभावी होईल.
माझा अनुभवही काहीसा असाच आहे. गावात केंव्हाही जा, चावडीसमोर किंवा अशाच मोक्याच्या जागी अनेक रिकामटेकडे पुरुष जर्द्याच्या फक्क्या मारत किंवा बिड्या फुंकत 'टाइमपास' करत बसलेले दिसतील. रिकामटेकड्या स्त्रीया मात्र शोधत जावं लागेल. ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी, खरेदी-विक्री संघ, बाजार समित्या, सहकारी दूध संघ किंवा साखर कारखाने, विधानसभा, लोकसभा अशा कोणत्या ना कोणत्या तरी निवडणुका एका पाठोपाठ सुरुच असतात आणि त्यात पुरुष वर्ग गुरफटलेला असतो. प्रपंचाची काळजी वहायला 'कारभारीण' असतेच ना?
काही आदिवासी जमाती आणि ईशान्य भारतातले काही तुरळक मातृसत्ताक समाज वगळता, उर्वरीत देशात जाती व्यवस्थेइतकीच पुरुष प्रधान संस्कृतीही शतकानुशतकं रुजली आहे, ती अपघातानं नव्हे. पोथ्या-पुराणं लिहिणार्‍या पुरोहीत वर्गाला हाताशी धरून समाजधुरीणांनी आणि सत्ताधीशांनी ती प्रयत्नपूर्वक रुजवलेली आहे. स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार नाकारून, त्यांच्या डोक्यात नव्या आणि आधुनिक विचारांचे वारे शिरू नयेत याची व्यवस्था केली गेली. त्यांना मालमत्तेचा अधिकार ठेवला नाही, त्यामुळे त्यांचं परावलंबित्व पक्कं झालं. वरती, विवाह-संस्थेला मांगल्य, पावित्र्य वगैरे उदात्त्त कल्पना चिकटवून देऊन चूल-मूल आणि पतिसेवा यातच स्त्री-जन्माची इतिकर्तव्यता असते असे संस्कार लहानपणापासूनच कुटुंबात आणि समाजात केले जातात, त्यातून स्त्रीची पुरुषानुकूल मानसिकता घडते. कायद्याविरुद्ध बंड करणं एक वेळ सोपं पण संस्कारातून बिंबवलेली मानसिकता आणि न्यूनगंड यांच्याविरुद्ध बंड पुकारणं फार कठीण असतं.
विधवा स्त्रीचं केशवपन वगैरे करून तिला अंधार्‍या माजघरात आणि स्वयंपाकघरात डांबून वेठबिगारासारखं राबवून घेतलं जात असे पण विधुर पुरुषाला मात्र पुनर्विवाह करून नवा संसार मांडण्याची मुभा. हे असं का हा प्रश्न कोणी विचारायचा नाही. स्त्रीचं परपुरुषावर मन जडलं तर तो व्यभिचार पण पुरुषानं 'अंगवस्त्र' बाळगलं तर तो समाज-संमत 'पुरुषार्थ'. हे काही आपोआप घडलेलं नाही आणि यात सहजासहजी खूप मोठ्या सुधारणाही घडून येणं कठीण आहे. एकेका प्रश्नावर, सुधारकांना, शेण गोट्यांचा प्रसाद खात, समाजाशी टक्कर घ्यावी लागली. इंग्रज सरकारला नवे कायदे करण्यासाठी भाग पाडावं लागलं. आज तितकी वाईट स्थिती नसेलही पण शहरी आणि ग्रामीण भागात लक्षणीय फरक दिसतो. हरियाणातल्या 'खाप' पंचायतीसारख्यापंचायती शहरात [सुदैवाने] नाहीत पण अजून बराच लांबचा पल्ला पार करायचा आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, स्त्री-भ्रूण हत्या करण्याचं प्रमाण शहरी आणि सुशिक्षित, सुखवस्तू कुटुंबात जास्त आहे हे कशाचं द्योतक आहे?
एकंदरीत, पुरुषप्रधान संस्कृती रुजवण्यात आपल्याकडच्या विवाह-संस्थेचं योगदान खूप मोठं आहे, यात शंकाच नाही.
'ओशो' विषयी वैयक्तिक मतं आणि वाद-विवाद बाजूला ठेवून, त्यांचं विवाह-संस्थेबाबतचं मत मला मननीय वाटतं. ते म्हणतात, " प्रगल्भ समाजात लग्न करणं अवघड असावं आणि घटस्फोट घेणं तुलनेनं सोपं असावं. "
- प्रभाकर [बापू] करंदीकर.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, स्त्री-भ्रूण हत्या करण्याचं प्रमाण शहरी आणि सुशिक्षित, सुखवस्तू कुटुंबात जास्त आहे हे कशाचं द्योतक आहे?

You said it....

वैदिक पद्धतीने केलेल्या विवाहात नवरा सासर्‍याला वचन देतो की बायकोच्या धर्म, अर्थ, काम या तिघांची जबाबदारी घेतलेली आहे. तसेच नातिचरामि (आचरटपणा करणार नाही) असं आश्वासनही देतो. >> जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा - पण माझ्या मते हे वाचन पती (सासर्याला नाही, कन्यादान विधीत देतो हे मान्य आहे पण ते पत्नीला उद्देशून असते. सासऱ्याने दान केली तरी कन्या धड नांदायला हवी घरी, तिची संमती हवी तिला वचन देणे अपरिहार्य आहे नाही तर तो प्राजापत्य विवाह ठरेल) पत्नीला देतो की "धर्म अर्थ आणि काम ह्या मार्गावर तुझ्याशिवाय जाणार नाही". आणि पत्नी पण तेच वाचन पतीला देते. पण मोक्षाच्या मार्गावर पती पत्नी एक एकटे असतात मग ते ह्या 'मनुष्यजन्माच्या' वेदनेतून मोक्ष असो किंवा इतर कुठल्याही सामान्य दैनंदिन जीवनातील वेदनेतून मोक्ष असो. विवाहाद्वारे होणारे 'शोषण' किंवा 'पीडा' ह्यातून मोक्ष ज्याचा त्यांनी आपले आई-बाबा, समाज, रिती इ इ ला बोल न लावता आपला आपण शोधायचा असतो. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाचे उत्तर वेगळे. विवाहसंस्था ही मुळातच मर्यादित आहे, अजून काय मर्यादित करायची. तिचा अर्थ समजून घेतला की झाल...

सिमन्तिनी,

>> विवाहसंस्था ही मुळातच मर्यादित आहे, अजून काय मर्यादित करायची. तिचा अर्थ समजून घेतला की झाल...

अगदी बरोबर निरीक्षण. बेफिकीर म्हणतात की एखाद्या मुलीने स्वेच्छेने कुण्या पुरुषाशी संबंध ठेवले तर त्यावर विवाहबाह्य असा शिक्का मारू नये. मात्र असं झालं तर त्याचा विपरीत परिणाम कुटुंबसंस्थेवर होतो. अमेरिकेत वडील घर सोडून जायचं प्रमाण पराकोटीचं वाढलं आहे. तिथे या घडीला ३ पैकी १ बालक बापाशिवाय वाढतं आहे.

भारताने अमेरिकेच्या अनुभवावरून शहाणे व्हायला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

गेल्या काही दिवसांत एक, दोन घटना अश्या पाहिल्या की आता असे वाटू लागले आहे की मुलामुलींनी सध्या लग्न करूच नये. व्यवस्थित पस्तीस-चाळीसपर्यंत जगावे आणि मग हवे तर जोडीदार शोधावा. लग्न न झालेली तरुण मुलगी घरात आहे हे लोढणे किंवा बोजा वाटणे ह्यातून पालक बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. एक मुलगी लग्न न करता माहेरीच कायमची राहू शकते व ते स्वागतार्ह ठरते अशी अवस्था यायला हवी.

ह्याशिवाय एक निराळी माहिती:

ग्रामीण विभागात सध्या जे प्रचंड प्रमाणावर मुली शिकताना दिसत आहेत त्यामागचे कारण धक्कादायक आहे. त्यांना त्यांच्या मुलींनी पुढे जाऊन करिअर करावे असे म्हणायचे नसून 'मुलगी ग्रॅज्युएट आहे' हा शिक्का मारून घेऊन तिला लग्नाच्या बाजारात मागणी वाढावी हा त्यांचा बहुतांशी हेतू आहे.

लिहावे तेवढे कमीच आहे. नव्या नवरीला तिच्या मोठ्या नणंदा, जावा 'असशील मोठी ग्रॅज्युएट, पण इथे हे असेच चालते' अशी वागणूक देतात हे काही नवीन नाही. पण नवरे मंडळींना त्यांच्यासाठी घरी आलेल्या नवर्‍यांबद्दल यत्किंचित आदर नसण्याचे एक उदाहरण पुण्यालगतच्या एका बारक्या गावात पाहिले. त्या मुलीच्या आईने मुलीला चक्क माहेरी आणले व म्हणाली की वाटेल ते झाले तरी मुलीला नांदायला पाठवणार नाही. निदान असा स्टँड एका ग्रामीण बाईने घेतला हेच खूप झाले.

Pages