विवाहसंस्था मर्यादीत केल्यास...

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 06:48

सद्य परिस्थितीत ढवळून निघालेले वातावरण, मायबोलीवर अश्या स्वरुपाचे काही धागे येणे यातून मनात जे आले ते लिहीत आहे. उत्स्फुर्त भावनेतून लिहीत असल्यामुळे आगापीछा ( / मेरिट्स - डिमेरिट्स) चा विचार केलेला नाही. तो विचार चर्चेतून होईलसे वाटत आहे.

शारीरिक दौर्बल्यामुळे स्त्रीचे शोषण करणे शक्य होते व शोषण करण्याची पाशवी वृत्ती पुरुषाच्या मनात जागृत होणे शक्य होते. मात्र हे शोषण होण्यामागे प्रामुख्याने स्त्रीचे परावलंबित्व कारणीभूत ठरते. म्हणजे शारीरिक दौर्बल्य हे बेसिक कारण झाले, पण अवलंबित्वामुळे शोषणाच्या वृत्तीला बहुधा चालना मिळू शकते. अर्थात, नुकतीच दिल्लीत झालेली घटना व तश्या घटना हे तत्व खोटेच ठरवतात व त्यातून मानवाचे पशूरूप थेटपणे समोर येते. संबंधही नसताना केलेले ते प्रकार हे कोणत्याच तार्किक मानसशास्त्रीय जडणघडणीच्या चौकटीत न बसणारे असतात, एक्सेप्ट की ते पुरुष पशूवत विचारसरणीचे आहेत.

पण परावलंबित्वामुळे शोषण प्रामुख्याने होते असे म्हणण्यास वाव आहे / असावा.

हे परावलंबित्व अनेक कारणांनी असू शकते. कमी शिक्षण, आर्थिक पारतंत्र्य, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकटीवर पडणे / टाकलेली असणे, विवाहबंधन इत्यादी!

यापैकी निदान शहरी भागात हळूहळू शैक्षणिक व आर्थिक आघाडीवर स्त्री काहीशी स्वतंत्र होत आहे असे दिसत आहे. ग्रामीण भागात हे अजून तितकेसे नाही, पण मंथन मात्र तेथेही चालू असल्यासारखे वाटते व कितीही टीका केली तरी माध्यमे व तंत्रज्ञान याद्वारे ग्रामीण समाजही अनेक नवनव्या कायद्यांना, सोयीसुविधांना सामोरा झालेला दिसत आहे. तेथील अश्या स्वातंत्र्याचा वेग कमी असला तरी चालना नक्कीच मिळालेली आहे.

मात्र लग्न ही संस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर स्त्रीला बद्ध करत आहे. स्वतःला उच्चशिक्षित, उच्चभ्रू इत्यादी समजणार्‍यांमध्येही 'विशिष्ट वयानंतर मुलीचे लग्न व्हायला हवे' हा विचार खूपच खोलवर रुजलेला आहे. लग्न या संस्थेद्वारे स्त्रीचे सर्वाधिक शोषण होत असावे असे फक्त मनात आले.

१. पतीद्वारे शोषण (यात हुंडाही आलाच)
२. सासू, सासरे, दीर व इतर नातेवाईकांद्वारे शोषण
३. मुलांद्वारे शोषण
४. एकंदर सासर व माहेर यांच्यातील संबंधांमुळे होत असलेले शोषण
५. विवाहितेकडून असलेल्या अपेक्षांमार्फत गावातील इतर नागरिकांद्वारे अप्रत्यक्ष शोषण
६. विवाहबंधन व नोकरी करण्याची जबाबदारी यातून वैवाहिक पातळीवर होत असलेले शोषण

इत्यादी!

असे वाटत आहे की मुलींचे तातडीने लग्न करणे हा प्रकार पालकांनी जरा कमी केला आणि तिला एकटीला जगू दिले तर तिच्या आयुष्यातील शोषणाचे एक बर्‍यापैकी प्रमुख कारण कमी तरी होऊ शकेल किंवा विलंबाने तरी सत्यात येईल, जोवर कदाचित ती ते परतवण्यास थोडीशी अधिक सिद्ध झालेली असू शकेल.

यातून व्यभिचार वाढू शकेल असे कोणी म्हणाल्यास त्यावर काहीच म्हणता येणार नाही, पण मुलीच्या इच्छेने जर तिचे कोणाशी संबंध असले आणि तिला त्या संबंधांना 'विवाहबंधन' हे लेबल चिकटवायचे नसले तर तिला तेवढी मोकळीक मुळात तिच्या घरच्यांनी द्यावी असेही वाटत आहे. कदाचित हे मूर्खपणाचे, स्वप्नवत किंवा चुकीचेही असू शकेल.

पण लग्नसंस्थेच्या फायद्यांची आजच्या वेगवान काळात कितपत अनिवार्यता आहे असे वाटत आहे. जशी एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नष्ट होत गेली / होत आहे तशीच ही संस्थाही हळूहळू विरत गेली तर काही प्रमाणात स्त्रिया मोकळा श्वास घेऊ शकतील असे वाटते.

आपल्याला काय वाटते ते कृपया नोंदवावेत.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्थिक आणि शारिरिक सबलता. कराटे वा तत्सम शिक्षण असल्यास (आणि मानसिक तयारीसुद्धा) स्रिचे
शोषण करणे कठीण होवु शकते.

आज पहिल्यांदाच लेख एकांगी वाटला... क्षमस्व..
स्त्रीच्या शोषणास ती स्वत: काहिच जबाबदार नाही का...? (प्रत्येक वेळी नाही पण काहिअंशी तरी)
किंबहुना विवाहसंस्था मर्यादीत केल्यावरच तिला धोका जास्त आहे....
लग्नसंस्था आहे म्हणुन तिला संरक्षण आहे... काहि परिचीत लोक शोषण करतात म्हणुन सरसकट ह्या संस्थेला जबाबदार करणं चुकिचं वाटतं..
एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू नष्ट होत गेली >>> हीच तर शोकांतिका आहे...
लग्नसंस्था नष्ट होत गेली तर स्त्रीया श्वासही नाहित घेउ शकणार.... नीट...

लग्नसंस्था आहे म्हणुन तिला संरक्षण आहे... काहि परिचीत लोक शोषण करतात म्हणुन सरसकट ह्या संस्थेला जबाबदार करणं चुकिचं वाटतं..

अनुमोदन.

लिव इन ला बाईला पोटगीचा हक्क मिळू शकतो. म्हणजे विवाहसंस्थेला अभिप्रेत असलेला फायदा तिला मिळतोच.

>> कदाचित हे मूर्खपणाचे, स्वप्नवत किंवा चुकीचेही असू शकेल.
अजिबात नाही. फ्रान्समधे मला हीच परिस्थिती आढळली.

  • तिथे पालक मुलांची लग्न लाउन देण्याचा संबंध नाही कारण मुलं सज्ञान (स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास पात्र) असतात.
  • पारंपरीक लग्न (धार्मिक अर्थाने) करण्याकडे कल कमी दिसतो. live-in ला कायदेशीर/व्यवहारीक स्वरूप देण्यासाठी १९९९ साली PACS करार अस्तित्वात आला (हा करार समलैंगिक व्यक्तिही करू शकतात)
  • २००० नंतर लग्नांची संख्या कमी होतीये आणि PACS ची संख्या वाढतिये.
  • PACS केलेल्या अनेकांना मुले असून ते सुखात जगत आहेत. त्यांचा समाजावर कोणताही (वाईट) परिणाम नाही. कारण त्यांनी लग्न/PACS केलाय/नाही याचे इतरांना काही घेणे देणे नाही. त्यापेक्षा या व्यक्ति समाजात कायद्याचे आणि नियमांचे पालन किती काटेकोरपणे करतात हे महत्वाचे आहे. हे नियम देखिल फ्रेंच घटनेवर (संविधान) आधारलेले आहेत (स्वातंत्र-समता-बंधुभाव वै). चार उपटसुंभांनी एकत्र येउन संस्कृति/परंपरेच्या नावाखाली केलेले नाहीत.

वैयक्तिक स्वातंत्र्याचे (जे असणे अतिशय महत्वाचे आहे) पुढचे पाउल हेच असावे. पण असा समाज आपल्याकडे व्हायला २० वर्ष तरी लागतील. फ्रांसमधे देखिल हे सहजी झालेले नाही. PACS अमलात आणायला देखिल आंदोलन झाले होतेच. सगळ्या जनतेची त्याला संमती होती अशातला भाग नाही. (खासकरून त्यातील same-sex च्या नियमाला)...
असो.
[प्रतिसाद जरासा भरकटल्यासारखा वाटतोय का? Happy ]

मुळात मुलींना शारीरीक व मानसिक द्रूष्ट्या सक्षम बनवण्याची गरज आहे. हा निर्णय खुप मोठा आहे. त्या मुळे तो घेताना त्या नीट सक्ष्म असल्या तर आजही सुशिक्षित समाजात लग्न हे लादले जात असेल असे वाटत नाही. मुळात आपण लग्न केले तर काय काय होइल व नाही केले, उशीरा केले किंवा लिव्ह इन मधे राहिले तर काय काय होइल ते समजण्याची/ निर्णय घेण्याची क्षमता आपल्या मुलींत असली पाहिजे.

लग्न करावेसे न वाटणे हे सरसकट होणार नाही. वाईट लग्नांचे अनुभव आजुबाजुला पाहिले नसतिल, तर लग्न करण्या कडेच कल असतो. म्हण्जेच काय तिला जो निर्णय घ्यायचा आहे तो घेण्याची तिला मुभा असणे व त्या नुसार पालकांनी तिच्या मताला पाठींबा देणे हे महत्वाचे आहे.

मुलीं पेक्षा पालकांची मानसिकता बदलायला हवी

वेगळा विचार...... कदाचित उद्याचं चित्र.....

आजही सुशिक्षित समाजात लग्न हे लादले जात असेल असे वाटत नाही.
>>>>>>>>
सहमत

यावरून अजून एक..
सुशिक्षित समाज तरी एकवेळ हे लग्नाचे बंधन अनिवार्य न मानता इतर बिनलग्नाचे पर्याय शोधेन.. पण अशिक्षित अन मागासलेल्या समाजाचे काय.. तेथील स्त्रियांना लग्न म्हणजे खूप मोठा आधार झाला.. आणि असा समाज भारतात ८० टक्के असावा..

म्हणून शहरी भाग नाही तर ग्रामीण आणी कमी विकसित भाग डोळ्यासमोर ठेऊन चर्चा करा.. बरेच मुद्दे आपसूक फोल ठरतील.. Happy

यावरून अजून एक..
सुशिक्षित समाज तरी एकवेळ हे लग्नाचे बंधन अनिवार्य न मानता इतर बिनलग्नाचे पर्याय शोधेन.. पण अशिक्षित अन मागासलेल्या समाजाचे काय.. तेथील स्त्रियांना लग्न म्हणजे खूप मोठा आधार झाला.. आणि असा समाज भारतात ८० टक्के असावा..

म्हणून शहरी भाग नाही तर ग्रामीण आणी कमी विकसित भाग डोळ्यासमोर ठेऊन चर्चा करा.. बरेच मुद्दे आपसूक फोल ठरतील.. >>>>

एकदम पटेश.....

माझी एक मैत्रिण आहे, ती स्व खुशीने एकटी रहात आहे. तिला अजिबात लग्न करावेसे वाटत नाही. त्यात मानसिक प्रॉब्लेम वगैरे काहीही नाही... पण तरीही अख्खे ऑफिस सतत तिला ही जाणीव करुन देतं. अगदी तिच्या लंच ग्रूप मधे ही ... ती जाम कंटाळते... घरातही तेच आणि बाहेरही तेच...

वर्षानु वर्ष चालत आलेली समाज व्यवस्था येवढ्या लौकर आणि साध्या उपायांनी बदलेल असे नाही.

हे मुलीं बद्दलच नाही... माझा एक खुप चांगला कलीग बीन लग्नाचा आहे,. आता ५० शीत आहे... म्हणजेच आता लग्न करेलसे वाटत नाही. आई मोठ्ठी समाज सेविका, आमदार वगैरे... पण ह्याने स्वखुशीने लग्नच केले नाही... त्यालाही आजुबाजुचे फार म्हणजे फारच पिडतात... तो गप्प करतो म्हणुन....

मला तरी वैयक्तिक रित्या दोघांच्या निर्णयाचे काहीच वाटत नाही...

स्त्रियांना लग्न म्हणजे खूप मोठा आधार झाला.. आणि असा समाज भारतात ८० टक्के असावा..
>> दुर्दैव म्हणावं की सुदैव हेच कळत नाही पण ही गोष्ट अत्यंत खरी आहे. फक्त मागासलेल्याच समाजात नव्हे तर सो कॉल्ड विकसित समाजात सुद्धा.

लग्न हा अनेक प्रकारे आधार आहे हे मान्य होतेच आहे, पण लग्नामुळे होणारे शोषणही विचारात घेतले जावे असा एक मुद्दा लेखात मांडला आहे.

मीरा, आपला समाज असा आहे की या दोघांचं काही जुळवता येतं का बघ म्हणेल. Happy

मला तरी माझ्या मुलांनी लग्न केलेलं/ लाईफ टाईम पार्टनर शोधलेलं आवडेल.
कुटुंब हे बर्याचदा अनकंडिशनल सपोर्ट देतं असं आता माझं मत झालं आहे.

तशीच ही संस्थाही हळूहळू विरत गेली तर काही प्रमाणात स्त्रिया मोकळा श्वास घेऊ शकतील असे वाटते.
>> बेफी पण वैचारीक स्वातंत्र्यता असली तरिही स्त्रीला भोगवस्तू म्हणून पाहणार्‍या समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय काही स्त्री मोकळा श्वास घेऊ शकणार नाही. मानसिकता बदलली तर लग्न केले काय आणि न केले काय? शोषण होणारच नाही. सो फिरून फिरून भोपळे चौक.. Happy

दक्षिणा,

बहुतेक शोषण हे लैंगीकच दृष्टीने पाहिले जात आहे असे वाटते. मला वाटते इतर अनेक पातळ्यांवर स्त्रीच्या दौर्बल्यामुळे व परावलंबित्वामुळे तिचे शोषण होत असते. उदाहरणार्थः सासरी समजा एक अचानक कोणी वृद्ध गृहस्थ येऊन राहिले. आता त्यांचे महत्व किती हे घरातल्यांना ज्ञात असेल, पण या सुनेने ते अनुभवलेले नसेल आणि आज ते गृहस्थ केवळ एक 'बोजा' असतील. तर तिला त्यांचे करावे लागणे हे तिच्यावर एक प्रकारे उगीचच लादले जाणार ना? (याला स्त्रिया शोषण न मानता वाढीव जबाबदारी मानतात हेही मला पटत नाही. त्या स्त्रीने ती जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा ठेवणे हेही एक शोषण आहे असे मला वाटते).

मीरा, आपला समाज असा आहे की या दोघांचं काही जुळवता येतं का बघ म्हणेल. >> अनुमोदन साती. आहे त्यात सुख माना असंच शिकवतात सगळे.

मला तरी माझ्या मुलांनी लग्न केलेलं/ लाईफ टाईम पार्टनर शोधलेलं आवडेल.
>> यावर मला एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतोय. आपण ग्रो होत असतो. शाळेत जी मैत्रिण आपली जीवश्च कंठश्च असते ती आपल्याला पुढे ही तशीच राहिल याची काही शाश्वती नाही. प्रत्येक क्षणी आपण काहीतरी नविन शिकत असतो. अगदी ह्युमन बिहेविअर सुद्धा शिकतो. आपल्या जगण्याच्या कक्षा रुंदावतात, व्याख्या ठळक होतात. अशा वेळी जर आपला पार्टनर ग्रो झाला नाही तर? आयमिन शोधून सवरून नीट पाहून केलं असेल तरी, लग्नाच्या वेळी जुळलेली वेव्हलेंग्थ जर का पुढे कंटिन्यू राहिली नाही तरीही... त्यांनी एकत्र राहिलं पाहिजे असं तुला वाटतं का?

तीव्र विरोध आहे अशा कल्पनांना. हा विचार चेष्टेत मांडला आहे का ? गंमत किंवा विनोद म्हणूनही अशा कल्पनांना प्राणपनाने विरोध केला पाहीजे. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे भारतीय संस्कृतीवर गंभीर आक्रमण झाले आहे. कुणीही काहीही करावे आणि विचारणारे कुणीच नसावे अशी युवापिढीची धारणा होत चालली आहे. ड्रग्ज, चरस, गांजा, अंमली पदार्थ, नशा आदीच्या आहारी युवापिढी जाऊन राष्ट्राचे नुकसान होत आहे. याची फिकीर ना राज्यकर्त्यांना ना आईबापाला. देशाचं भवितव्यच अशा खुळचट कल्पनांना बळी पडलं तर असं राष्ट्र सांस़्रुतिक आणि मानसिक दृष्ट्या गुलाम बनतं. एक प्रकारे परकीय दास्यत्व किंवा मांडलिकत्व स्विकारण्याचा हा प्रकार होय.

कुठे आपली अभिमानास्पद एकत्र कुटुंब पद्धती आणु कुठे ममी आणि डॅडी म्हणणा-यांची संस्कृती. ममी काय आणि डॅडी काय दोन्ही शवाला संबोधण्यात येणारे शब्द ! कल्पनाही भयंकर आहे. समलैंगिक विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप यातून काय साध्य होणार आहे ? स्त्री ने आपल्या नैसर्गिक मर्यादांचा आदर करून सुखी आणि स्वस्थ जीवन आनंदाने जगावं ही आपली संस्कृती सांगते. गृहीणीला प्रत्येक सण, समारंभात जे मानाचं स्थान दिलं गेलं आहे ते जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे आहे ? पुरूषाने स्त्री ला आनंदी ठेवावं, तिला सुखी ठेवता येईल इतकं उत्पन्न कमवावं ही परंपरा आहे. स्त्री ने काम करावं यात त्या पुरूषाची निर्भत्सना केलेली आहे. पुरूषाला जे बळ दिलं आहे ते कशासाठी असं आपल्याकडे मानतात. ते खरंच आहे. स्त्री ने पाश्त्यांच्या खुळचट करियरविषयक कल्पनांच्या मागे लागून अनेक अनर्थ ओढवून घेतले आहेत. यातूनच मग मूल न होणे, घटस्फोट आदी समस्या उद्भवतात. छोट्या छोट्या गोष्टीत सुख मानण्याऐवजी प्रत्येक गोष्टीत खुसपट काढण्याची वृत्ती वाढीस लागते. अभिमानाची जागा अहंकार घेऊ लागतो. यातून स्त्री कडे असलेले नैसर्गिक गुण नष्ट होत आहेत. स्त्री ला व्यवहारी जात्याच बनवलेले आहे. पण बाहेर पडलेल्या स्त्री ची ही शक्ती नष्ट होत असते. स्त्री च्या संरक्षणासाठी विवाह हा करार आवश्यक मानला गेला आहे. याद्वारे समाज पतीला पत्नीकडे नीट लक्ष द्यायला भाग पाडत असतो. हा करारच राहिला नाही तर सामाजिक दबावाचं काय ? त्या स्त्री ला कसलं संरक्षण मिळणार आहे?

माझ्यामते लग्न हे एक पॅकेज आहे. नवरा व बायको... हे दोघेही लग्नाला एक पॅकेज म्हणूनच बघतात. फक्त त्या पॅकेज मधिल वस्तू/मागण्यांचे स्वरूप कालानुरुप बदलत जातात.

म्ह्णजे कसं आधिच्या काळात या पॅकेजमधे नव-याला एक सेविका हवी असायची तर नवरीला देव (नव-याला देवा समान माननारा तो काळ) वगैरे...
नंतर नंतर या पॅकेज मधे बदल होत गेला व आज नव-याला सेविका-कम-सोलमेट-कम-मनिमेकर-कम-... वगैरे वगैरे हवी असते तर नवरीला शक्य तो चांगला कमावता-कम-एकुलता-कम-स्वतंत्र राहणार वगैरे वगैर....

आता राहतो प्रश्न शोषणाचा:- वैवाहिक शोषण स्त्री वा पुरुष म्हणून होत नाही तर जो प्रतिकार करत नाही त्याचं शोषण होतं. नवरा कमकुवत असला कि बायकाही शोषण करतात.
मग प्रतिकार कोण करत नाही?
-जो सक्षम नाही तो प्रतिकार करत नाही.
सक्षम म्हणजे नेमकं काय, व ते कसे करावे?
-आर्थिक, सामाजिक व मानसिक या तीन आघाड्यावर सक्षमिकरण व्हायला पाहिजे.

म्ह्णजे कसं आधिच्या काळात या पॅकेजमधे नव-याला एक सेविका हवी असायची तर नवरीला देव

हे सर्व गैरसमज आहेत. इंग्रजांनी आपल्या संस्कृतीबद्दल लिहून ठेवलेलं खरं मानण्याचं कारण नाही.

>>असे वाटत आहे की मुलींचे तातडीने लग्न करणे हा प्रकार पालकांनी जरा कमी केला आणि तिला एकटीला जगू दिले तर तिच्या आयुष्यातील शोषणाचे एक बर्‍यापैकी प्रमुख कारण कमी तरी होऊ शकेल किंवा विलंबाने तरी सत्यात येईल, जोवर कदाचित ती ते परतवण्यास थोडीशी अधिक सिद्ध झालेली असू शकेल. >>
हा या लेखाचा मूळ विचार अन तो बरोबरच आहे.हल्ली तो प्रत्यक्षात येतोयही बर्‍याचदा.
बहुधा पालकांबरोबरच मुलीही पीअर प्रेशरखाली विवाहोत्सुक असतात, त्यांच्या मैत्रिणी लग्ने वगैरे करून गेल्यावर प्रौढ कुमारिकेचा रोल वठवणे त्यांना पराभव स्वीकारण्यासारखे वाटू शकते. त्यांनीही हा काळ आयुष्यातला एक सुखाचा ,खर्‍या अर्थाने क्रिएटिव्ह असा काळ म्हणून व्यतीत करावा. ही प्रगल्भता पुढच्या वाटचालीत वेगळीच शक्ती देऊ शकते.

हे हळूहळू आपोआप होत जाईल. जसे बालविवाह आणि इतर प्रथा मागे पडून इथपर्यंत आलो आहोत तसेच पुढे जात रहाणार. असे आयुष्य जगू पहाणार्‍या लोकांची संख्या वाढली की कायदा आणि शासन दरबारी पण त्याची दखल घ्यावी लागेल.

त्या स्त्री ला कसलं संरक्षण मिळणार आहे? >>
हेहे , स्त्री ला कोणत्याही संरक्षणाची गरजच पडू नये अशा समाजाची अपेक्षा इथे आहे.
उदा. जपानमधे सुनामी येऊन सगळीकडे अंधाधुंद माजलेली असतानाही बलात्कारासारख्या घटना घडल्या नाहीत.
आपल्याकडे सगळे सुरळित असूनही भयानक परीस्थिती आहे.
'खरा विचारवंत' - जरा डोळे उघडा आणि डोके चालवा. डबक्याबाहेर पडा , जग बघा.

योग्य वयात योग्य गोष्टी घडणे चांगले असते असे वाटते.
ज्यांना लग्न करायचे आहे त्यांनी उशीर झाला तरी २५ ते ३० च्या दरम्यान करून ३० च्या आत किंवा आसपास पहिले मुल होणे जास्त लॉजिकल वाटते.
जर मुलामधे (मुलगा किंवा मुलगी) आणि पालकांमधे साधारण ३० चे अंतर असेल तर पालकांचे वय ६० होईपर्यंत मुले मार्गी लागलेली असतात.
लग्नाचे वय जास्त होत गेले किंवा जास्त काळ फॅमिली प्लॅनिन्ग केले की समस्या उद्भवू शकतात (शारिरिक आणि मानसिक देखील) नंतर अपत्य प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचारांचा सहारा घेण्याची वेळ येऊ शकते.
अर्थात हे सर्व ज्यांना सद्ध्याच्या समाजव्यवस्थेप्रमाणे सरळमार्गी जगायचे आहे त्यांच्यासाठी.
स्वतंत्र रहायचे आहे, वेगळे प्रयोग करायचे आहेत त्यांनी कृपया दुर्लक्ष करावे.

>>उदा. जपानमधे सुनामी येऊन सगळीकडे अंधाधुंद माजलेली असतानाही बलात्कारासारख्या घटना घडल्या नाहीत.
याच लोकांनी पुर्वी कमी कृत्ये केली नाहीयेत चीनमधे. दुसर्‍या युद्धानंतर बराच बदल घडला आहे.

स्त्री च्या संरक्षणासाठी विवाह हा करार आवश्यक मानला गेला आहे. >> asahamat. Vivah kinva kutumbvyavastha hee ajari, aksham, lahan mule, vruddh hyanchya sangopanarth astitvat aali. don saksham vyaktinchya samrakshanarth nahi. ha karar rahila nahi tar stree cha kay hoil hyache uttar sadhyacha kaalat ( sadhyacha kaal =garbh nirodhake aani arthik rojgarachi sandhi upalabdh astana) 'je kahi purushache hote tech hoil' ase yete.
Vivah kinva kutumbsanstha rahili nahi tar vruddh, apang aani mulanche kay hoil ha prashn adhik uchit vatato.

सॅम,

फ्रान्समध्ये स्त्रीपुरुष लग्न न करता एकत्र राहताच होते. विवाह हा तिथे फारसा लोकप्रिय पर्याय नव्हता. नागरयुग्म (सिव्हील युनियन म्हणजे PACS) हा केवळ एक करार आहे. तो दोघांपैकी कोणालाही केव्हाही कसाही मोडता येतो. विवाहविच्छेदासाठी कायदेशीर प्रक्रिया असते तशी या बाबतीत लागत नाही.

प्रश्न असा आहे की जी जोडपी एकत्र रहात होती, त्यांना किंवा नव्या जोडप्यांना नागरयुग्म कशास हवे आहे? कुणाला तरी कसली तरी सुरक्षितता हवी आहे म्हणूनच ना? मग विवाह का करत नाहीत तिथले लोक? कारण जबाबदार्‍या नको असतात (स्त्रीपुरुष दोघांनाही). मग असं दिसतं की सुरक्षितता हवीये, पण जबाबदारी नको. हे नैसर्गिक नियमाच्या विरुद्ध नाही का?

तुम्ही ज्याला चार उपटसुभांनी संस्कृतीच्या नावाने केलेले निर्बंध म्हणता, त्यात जबाबदारीला (म्हणजे कर्तव्यांना) प्रथम प्राधान्य आहे. वैदिक पद्धतीने केलेल्या विवाहात नवरा सासर्‍याला वचन देतो की बायकोच्या धर्म, अर्थ, काम या तिघांची जबाबदारी घेतलेली आहे. तसेच नातिचरामि (आचरटपणा करणार नाही) असं आश्वासनही देतो. नवरे लोकांनी हे वचन पाळलं नाही तर त्यात वचननाम्याचा दोष नाही.

आ.न.,
-गा.पै.

अगदी लहानपणापासून घरातच मुलींना तू स्त्री आहेसची जाणीव सतत सतत करून दिली जाते. आणि ही सगळ्या स्तरात आहे. ग्रामीण असो, शहरातली असो की महानगरातली असो. हे करू नको, अशी बसू नको, विरोध करू नको... तू उगाच कोणाच्या तोंडी लागू नकोस. रस्त्यात तुला कोणी छेडले तरी दुर्लक्ष कर. वाट बदल. या सगळ्या सारख्या केलेल्या सुचनांचा खोलवर परिणाम होतो. खरच आपल्याला कोणी रस्त्यात त्रास दिला तर आपल्या घरचे आपल्यासाठी खंबीर उभे राहतील का.. असा प्रश्न मनात येतो. नातेवाईक, शेजारपाजारचे काका-आजोबा यांच्याकडून सतत होत असलेले निरनिराळ्या प्रकारच्या शोषणाला सतत तोंड द्यावे लागते. शोषण हे नेहमीच बलात्कार याच स्वरुपाचे नसते पण त्या प्रत्येकवेळी मानसिक खच्चीकरण होत राहते. आणि या घटना वारंवार घडतात. घरच्यांनी हे कसे रोखता येईल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला हवे. मुलीला त्या क्षणी ओरडायला, मारायला... तीव्र प्रतिकार करायला शिकवले पाहीजे. पहिल्याच घडत असलेल्या स्पर्शाला वेळीच ठेचले गेले तर ७५% घटना ( घरगुती शोषणाच्या मुलींबाबतच्या ) कमी होतील. शेवटी हे असे छुपे लैंगिक वार करणारे समाजात उजळ माथ्याने जगत असतात त्यामुळे ते अशा प्रतिकार करणार्‍या मुलींच्या वाटेला पुन्हा जायला धजावत नाहीत.

लग्न झालेल्या मुली-स्त्रीयांच्या शोषणाचे प्रकार सर्व थरात आणि वयात आहेत. महानगरातली स्त्री आर्थिकदृष्ट्या सबल असली तरीही तिला या शोषणाला सामोरे जावे लागते. बाहेरही आणि घरातही. अनेकवेळा बाहेर सुरू असलेले शोषण हे सहज कळेल असे नसते. मोठ्या मोठ्या पदावर असलेली माणसे त्यांच्या पदचा व वयाचा प्रचंड गैरफायदा घेत राहतात. बरेचदा स्त्रीच्या घरातली परिस्थिती, जबाबदार्‍या, वगैरेंमुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार असे होत असते. नवर्‍याला सांगावे तर एक तर एक घाव दोन तुकडे किंवा तूच अमूक करु नकोस.. अश्या टाईपचे मन खच्ची करणारे सल्ले दिले जातात.

शोषण करणारा जितका दोषी तितकाच शोषण होऊ देणाराही हे मान्य असले तरीही अनेकदा प्रतिकार हा अशक्य असतो हेही लक्षात घ्यायला हवे. जितका जास्त प्रतिकार तितके जास्त अत्याचार असे गणित असेल तर... स्त्री स्वतंत्र झाली म्हणजे काय... अर्थार्जन करते, स्वत:ची मत मांडते, स्वत:चे निर्णय स्वत: घेते आणि त्याची पूर्तता करते. बस इतकेच. हे करत असतानाही तिचे शोषण होत असते. इथे असेही म्हणावे लागेल की काही वेळा ( हे प्रमाण फार व्यस्त आहे पण आहे नक्की ) पुरुषांचेही शोषण होत असते. फक्त फरक इतकाच आहे की ते बहुतांशी मानसिक असते.

लग्न हे निव्वळ स्त्रीला आधार म्हणून केले जावे हेच चुकीचे आहे. उद्या लग्न झालेले नवराबायको रात्री सिनेमा पाहून परत येतांना चार गुंडांनी स्त्रीवर बलात्कार केला तर एकटा नवरा त्यांना पुरे पडू शकतो का? नाहीच. पण त्या प्रसंगानंतर संपूर्ण निर्दोष असलेल्या आपल्या बायकोकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्वीसारखाच किती जण ठेवू शकतात. इथे स्त्रीही नवर्‍याच्या तिला सोडवण्यात असमर्थ ठरलेल्या कृतीला स्विकारू शकते का? हाही प्रश्न आहेच.

लग्न करावे का नाही. करायचे असल्यास नेमके कुठल्या कारणांसाठी करायचे आणि कुठल्या अपेक्षा ठेवायच्या याबाबतीतले फंडे स्वत:शीच स्पष्ट असायला हवेत. अवास्तव अपेक्षा कोणीच करता नये. बीनलग्नाच्या पर्यायाने सोकॉल्ड व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना वगैरे तात्पुरत्या आकर्षक वाटत ही असतील पण पुढे जाऊन याचे भयावह परिणाम दोघांनाही भोगावे लागतील. स्त्रीला जास्त.

मुलगी ही जबाबदारी आहे ही मानसिकता पालकांनी व स्वत: मुलींनीही बदलायला हवी. जसे बालपण रम्य असायला हवे, शैशव प्रफुल्लित-आनंदी तसेच तारुण्यही असावे. ते केवळ उन्मादी असू नये, भोगवादी असू नये. वीसबावीस वर्षाच्या मुलीचे लग्न तातडीने लावून देण्याची खरेच गरज आहे का? खरेच तिला आधाराची गरज असेल तर तो तिला स्वत:च्या जन्मदात्र्यांच्या घरात मिळत नसेल तर जगाच्या पाठीवर कुठेतरी मिळू शकेल का?

संस्कृतीच्या नावाने केलेले निर्बंध म्हणता, त्यात जबाबदारीला (म्हणजे कर्तव्यांना) प्रथम प्राधान्य आहे. वैदिक पद्धतीने केलेल्या विवाहात नवरा सासर्‍याला वचन देतो की बायकोच्या धर्म, अर्थ, काम या तिघांची जबाबदारी घेतलेली आहे. तसेच नातिचरामि (आचरटपणा करणार नाही) असं आश्वासनही देतो. नवरे लोकांनी हे वचन पाळलं नाही तर त्यात वचननाम्याचा दोष नाही. >>>> अनुमोदन.
लग्न करावे का नाही. करायचे असल्यास नेमके कुठल्या कारणांसाठी करायचे आणि कुठल्या अपेक्षा ठेवायच्या याबाबतीतले फंडे स्वत:शीच स्पष्ट असायला हवेत. अवास्तव अपेक्षा कोणीच करता नये. बीनलग्नाच्या पर्यायाने सोकॉल्ड व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना वगैरे तात्पुरत्या आकर्षक वाटत ही असतील पण पुढे जाऊन याचे भयावह परिणाम दोघांनाही भोगावे लागतील. स्त्रीला जास्त. >>>>> प्रचंड अनुमोदन

Pages